22 July 2019

News Flash

चिरंतन सत्याच्या वैश्विक आनंदासाठी

मनातलं कागदावर

(संग्रहित छायाचित्र)

माधुरी ताम्हणे

फिलीपा अंत:करणापासून बोलत असते. धर्म, देश, भाषा, पंथ या तटबंदीपलीकडून येणारे तिचे निखळ स्वच्छ भावनेने ओथंबलेले शब्द मला चिंब भिजवतात. मी अवाक्  होऊन विचार करते. ही नक्की कोण? कुठली? हिची मुळं नक्की कोणत्या मातीत रुजलीत? पोर्तुगालच्या? छे! हिची मुळं रुजलीत चिरंतन सत्याच्या वैश्विक भूमीत! तिचा धर्म एकच, मानवता धर्म!

‘चार्लस द गॉल’ विमानतळावरून ‘एअर फ्रान्स’चं विमान उड्डाणाच्या तयारीत आहे. शेवटची उद्घोषणा होते. तेवढय़ात एक गोरी स्त्री धावतपळत येऊन बाजूच्या सीटवर बसते. मी अंग चोरून डोळे मिटते. मिटल्या डोळ्यांसमोर एअरपोर्टवर निरोप घेऊन वळलेला लेक यायला लागतो. त्याला सोडून येताना रोखून धरलेले अश्रू आता मात्र गालांवरून ओघळू लागतात..

‘‘एक्सक्यूज मी!’’ आवाज ऐकू येतो. मी डोळे उघडते. पाण्याचा ग्लास धरून ती माझ्याकडे बघून आपुलकीने हसते. तिच्या हातातून ग्लास घेताना नकळत मीसुद्धा हसते. त्या हास्याने संकोचाची तटबंदी कोसळते. आम्हा दोघींमध्ये संवादाचा पूल उभारला जातो.

‘‘हाय! आय अ‍ॅम फिलीपा! फिलीपा सिमाँ!’’

‘‘तू फ्रेंच आहेस?’’

‘‘नाही. मी पोर्तुगीज आहे. पोर्तुगालमध्ये राहते.’’ ती गोड हसत सांगते. ‘‘मी पाँडेचरीला अ‍ॅरोवेलला चाललेय. मुंबईत इस्कॉन मंदिरातल्या हॉस्टेलमध्ये काही दिवस राहून पुढे इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रात जाणार आहे.’’ आता चकित होण्याची वेळ माझी असते. तिची खासगी चौकशी करणं अनुचित वाटतं. पण ती मात्र निखळ स्वच्छपणे विचारते, ‘‘मघाशी तू रडत का होतीस?’’ औपचारिकतेचं कवच गळून पडतं आणि मी उत्तरते, ‘‘माझा मुलगा फ्रान्समध्ये शिकतोय. त्याला सोडून जाताना वाईट वाटणारच ना. तुम्ही भाग्यवान. तुमची मुलं तुमच्याजवळ राहतात. तुमच्या देशांत शिकतात.’’

‘‘यू आर राँग! आम्ही इतर युरोपिअन देशांसारखे श्रीमंत नाही. म्हणूनच आमची मुलं शिकायला फ्रान्स, जर्मनीला जातात. तिथेच स्थायिक होतात. ब्रेन ड्रेन पोर्तुगालमध्येही आहे.’’ त्या पोर्तुगीज आईमध्ये भारतीय आईही डोकावत असते. ‘‘आणि तुला काय वाटतं? पोर्तुगालमधली तरुण मुलं आईवडिलांसोबत राहतात? नाही. बहुतेक मुलं कंट्रीसाइड सोडून शिकायला, नोकरी करायला शहरांत जातात. तिथेच संसार थाटतात. मग ही मुलं आपल्याला आजारी वृद्ध आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात. ख्रिसमसच्या सुट्टीत त्यांना भेटायला येतात. कार्ड्स देतात. गिफ्ट्स देतात. त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवतात. आणि पुन्हा आपल्या चकचकीत दुनियेत परत जातात. पोर्तुगालमधले वृद्ध खूप दु:खी, खूप एकाकी आहेत. त्यांच्याकडे पैसाही नाही आणि प्रेमही!’’

मी हलकेच तिच्या हातांवर थोपटते. पण तिचं लक्षच नसतं. ती आवेगाने बोलत राहते, ‘‘आर्थिक मंदीमुळे पुन्हा मुलं गावाकडे परतत आहेत. त्यांना आता हे जाणवतंय की शहरांमध्ये राहात असताना आपला निसर्ग, आपली माती, आपली संस्कृती यांच्याशी कुठेतरी आपलं नातं तुटतं. आपण निव्वळ पैसे कमवणारं यंत्र बनतो. मला सांग, शहरातल्या लोकांची निसर्गाशी नाळ जुळलेली असते का गं?’’

तिचा प्रश्न देशांच्या, संस्कृतीच्या सीमा पार करून माझ्या भारतीय मनाला स्पर्श करून जातो. नकळत मनात येतं, या पाश्चात्त्य तरुणीचे पाय भारतीय भूमीकडे का बरं वळले असावेत? माझा प्रश्न ओळखून ती आपणहून सांगू लागली, ‘‘मला भारतातला स्वच्छ, निखळ प्रामाणिकपणा भावतो. आम्ही वृद्ध, एकाकी माणसांना वृद्धाश्रमात, इस्पितळात किंवा अनाथालयांत डांबतो. वी हाइड सफिरग!  क्लेशकारक गोष्टी आम्ही दडपून टाकतो. पण जीवनाला दोन्ही बाजू असतात ना. सुख आणि दु:ख, हसू आणि आसू, आनंद आणि वेदना! आयुष्य म्हणजे नुसतं तारुण्य, ऐश्वर्य आणि सौंदर्य एवढंच असतं का गं? आम्ही पाश्चात्त्य माणसं जगाला फक्त तेवढंच दाखवतो. सर्व काही स्वच्छ, चकचकीत. भारतीय संस्कृतीतली पारदर्शकता म्हणूनच मला भावते. ज्या ज्या वेळी इथल्या जगण्याचा मला कंटाळा येतो त्या त्या वेळी माझी पावलं भारतीय भूमीकडे वळतात.’’ मला आमची पाश्चात्त्य देशांतल्या श्रीमंती, स्वच्छता, शिस्त यांच्या आकर्षणाची जातकुळी तपासून पाहावीशी वाटू लागते.

तुला भारताची ओढ कधीपासून वाटू लागली, या माझ्या प्रश्नावर ती अनेक वर्ष मागे जाते. ‘‘लहानपणापासून माझी राहणी, विचारसरणी पाश्चात्त्य वळणाची होती. मित्र-मैत्रिणी, डिस्कोथेक पाटर्य़ा, वीकएंड सेलेब्रेशन! बस्स हेच होतं माझं आयुष्य! मी रोज मटण, बीफ खायची. हॉटेलिंग, मौजमजा करायची. पुढे नोकरी लागली. हातात पैसा खेळायला लागला. तो ड्रिंक्स, शॉपिंग आणि ट्रॅव्हलिंग यावर मनसोक्त उडवायला लागले. माझ्या आईवडिलांनी मला पाश्चात्त्य मूल्यं, संस्कार शिकवले. त्यांनी आयुष्यात यशस्वी होण्याचं महत्त्व शिकवलं. पण समाधानी होण्यासाठी काय करायला हवं ते मात्र कधीच सांगितलं नाही. मी मजेत होते. सुखी होते. पण समाधानी नव्हते. आतून अस्वस्थ, हरवलेली होते. प्रेम केलं. लग्न केलं. संसार थाटला. तिसाव्या वर्षी मी स्वत:ला विचारायला लागले, ‘मी खरंच सुखी आहे का?’ मन:शांतीच्या शोधात मी शहर सोडलं. माझ्या खेडय़ाकडे गेले. गरिबांची सेवा करायला लागले. शाकाहारी बनले. काही काळाने माझ्याच मनाने मला फटकारलं. यातून तुला खरंच मन:शांती मिळतेय. की ही केवळ स्वत:ची फसवणूक करतेय, या विचाराने मला खूपच हरवल्यासारखं, हताश, एकाकी वाटायला लागलं. वाटलं, परत एकदा त्या जुन्या, रंगीत दुनियेत परत जावं. नाही. पण तेही खरं आयुष्य नव्हतंच.’’

‘‘त्याच वेळी हंगेरी इथल्या ‘हरे कृष्णा कम्युनिटी’विषयी मला कळलं. मी तिथे गेले. ध्यानधारणा शिकले. मंत्रपठण करू लागले आणि हळूहळू माझं मन शांत शांत होऊ लागलं. आता मी माझ्या स्वत:च्या आयुष्याला ‘कंट्रोल’ करणं सोडून दिलं. मी स्वत:ला ईश्वरावर सोपवून दिलं आणि जादू झाली. प्रयत्न.. प्रामाणिक प्रयत्न तर मी आजही करते. पण आज मी गोष्टी ‘माझ्या’ मनाप्रमाणे घडवण्याचा आटापिटा करत नाही. त्या जशा घडतात तशा मी स्वीकारते आणि मग माझ्या प्रयत्नांना यश येते. यश आणि त्यासोबत अपूर्व मन:शांती! एकदा मी एका तीन दिवसीय आध्यात्मिक परिषदेला हजेरी लावली. त्या तीन दिवसांच्या दिव्य अनुभूतीतून मला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली. आपण जर अंतर्मनातून सच्च्या भावनेने प्रार्थना केली तरच आपण त्या चैतन्याशी, निसर्गाशी त्या परमात्म्याशी जोडले जातो. पण आपली प्रार्थना नेहमीच अहंकारातून येते. म्हणूनच ती परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही.’’

फिलीपा अंत:करणापासून बोलत असते. धर्म, देश, भाषा, पंथ या तटबंदीपलीकडून येणारे तिचे निखळ स्वच्छ भावनेने ओथंबलेले शब्द मला चिंब भिजवतात. ती मात्र स्वत:च्याच दुनियेत असल्यासारखी बोलत राहते, ‘‘दु:खाची गोष्ट अशी की भारतीय तत्त्वज्ञानातील त्यागाची, प्रेमाची शिकवण विसरून लोक आमचं अंधानुकरण करत आहेत. कशासाठी? खरंतर आपलं मन विशाल होतं तेव्हा आपण आजूबाजूच्या लोकांवर निष्कपटपणे प्रेम करायला लागतो. आम्ही खूप रूढी, परंपरा पाळतो. दर रविवारी न चुकता चर्चमध्ये जातो. येशुची प्रार्थना करतो. प्रवचन ऐकतो. धर्मगुरू सांगतात येशूने सांगितलंय, शेजाऱ्यांवर प्रेम करा. आम्ही सगळं ऐकतो आणि चर्चबाहेर पाय टाकताच शेजाऱ्यांची निंदा सुरू करतो. ‘तो’ परमेश्वर तुमच्या-आमच्यात आहे, हे सगळ्यांना कधी कळणार? ईश्वर म्हणजे निखळ प्रेम! माझ्यासाठी ख्रिस्त म्हणजे गणेश, गणेश म्हणजे लॉर्ड क्रिश्ना!’ क्षणभर मला वाटतं, फिलीपाने माझ्या भारतीय संस्कारांच्या, मूल्यांच्या चेहऱ्यामोहऱ्यासमोर बिलोरी आरसा धरला आहे. त्यांत भारतीय संस्कृतीचंच दर्शन ती लख्खपणे घडवत आहे. फिलीपाचं अध्यात्म बावनकशी सोन्यासारखं असतं. क्षणभर ती पोर्तुगीज आहे हेच मी विसरून जाते. फिलीपा तर जणू अंतर्मनाशी संवाद साधत असते.

फ्रान्स ते मुंबई हा विमान प्रवास आता अखेरच्या टप्प्यात येत असतो. फिलीपा निर्व्याजपणे हसत माझा हात हातात घेते.

‘‘येशू ख्रिस्तानेच नव्हे तर प्रत्येक धर्मातल्या प्रेषितांनी कितीतरी चांगली तत्त्वं सांगितली आहेत. भूतदया, क्षमाशीलता, प्रामाणिकपणा, सत्याचरण! या तत्त्वांचं पालन केलं तर माणसातून देवमाणूस घडेल. पण आपण निव्वळ कर्मकांडात अडकतो आणि त्यानं स्वत:लाच हरवून जातो.’’

मी अवाक्  होऊन विचार करते. ही तरुणी नक्की कोण? कुठली? फिलीपा पोर्तुगीज नाही. ख्रिश्चन नाही. कुठल्याही धर्माचं लेबल तिला लावता येणार नाही. हिची मुळं नक्की कोणत्या मातीत रुजलीत? ती रुजली आहेत चिरंतन सत्याच्या वैश्विक भूमीत! तिला कोणताही धर्म नाही. तिचा धर्म एकच! मानवता धर्म! अवघं विश्व हीच तिची भूमी.

भर मध्यरात्री ताठ मनाने चालत विमानतळावरून निर्भयपणे मुंबई महानगरीत मिसळून जाणाऱ्या फिलीपाकडे मी अनिमिष नेत्रांनी केवळ पाहात राहते आणि कृतज्ञतेने हात जोडते.. तिने पदरांत टाकलेल्या त्या चार अमूल्य, समृद्ध क्षणांसाठी..!

madhuri.m.tamhane@gmail.com

First Published on March 16, 2019 1:03 am

Web Title: manatal kagadavar article by madhuri tamhane