22 November 2019

News Flash

मनातलं कागदावर : चिमण.. आता मोठा झालाय !

महाभारतात युद्ध संपल्यानंतर रोज संध्याकाळी कुरुक्षेत्र कसं दिसत असेल? सेम तसंच..

(संग्रहित छायाचित्र)

प्रभाकर बोकील

फलंदाज जसा क्रीजवर आल्यावर चौफेर निरीक्षण करीत ‘बल्ला’ चालवतो, तसं सकाळी उठल्या उठल्या हॉलच्या मदानावर येत, निरीक्षण करत चिमण पुढचा ‘डल्ला’ शोधतो. मोहरा तिकडे वळतो. खालच्या लेव्हलची छोटी कपाटं उघडली जातात, त्यातलं सामान एकेक करत बाहेर येतं. चौफेर पसारा होतो. महाभारतात युद्ध संपल्यानंतर रोज संध्याकाळी कुरुक्षेत्र कसं दिसत असेल? सेम तसंच..

‘बाई.. बाई..’ घरी आलेल्या कुठल्याही पाहुण्याकडे हात दाखवून तो असं लक्ष वेधून घेतो तेव्हा त्या पाहुण्याला –  तो अगदी काका, मामा, आजोबा कुणीही असो – प्रश्नच पडतो, आपल्याला पाहून हा ‘बाई’ का म्हणतोय? या ‘बाई’साठी तो अनोळखी पाहुण्याकडेदेखील जातो, कडेवर बसून त्याच्या वरच्या खिशाकडे हात दाखवतो. तोंडानं ‘बाई..बाई!’ चालूच. खिशातून डोकावणारा मोबाइल हातात मिळाला की चेहऱ्यावर ‘जिंकल्याचा’ प्रचंड आनंद!   ‘बाई म्हणजे मोबाइल.. वा, म्हणजे या बिलंदराला मोबाइल पाहिजे!’  सगळा उलगडा होऊन पाहुणे खो खो हसतात.    ‘जन्मल्यापासून सगळ्यांच्या हातात अन् कानाशी तो बघत असेल ना! मग त्यालाही मोबाइल हवाच..’ बरोबरच्या काकी-मामी-आजीचं विश्लेषण.    ही सगळी गंमत आमच्या दीडेक वर्षांच्या नातवाची.. ‘चिमण’ची. त्याच्या ‘चिमण’ नावाचीदेखील गंमतच.  त्याच्या आई-वडिलांसाठी मुलगा वा मुलगी हा मुद्दा कधीच नव्हता. बाळ होणं हाच खरा आनंद! त्यांनी बाळाचं नाव आधीच ठरवलं होतं. मुलगी झाली तर ‘चिन्मयी’, मुलगा झाला तर ‘चिन्मय’. बारसं झाल्या-झाल्याच त्यांनी प्रेमळ ताकीद दिली आम्हा आजी-आजोबांना. ‘‘त्याच्या नावाचं उगाच चिनू-चिमू काही करायचं नाही हं, आजी-आजोबा. आपणच पूर्ण नावानं हाक मारली की, उद्या बाहेरच्यांनादेखील सवय लागेल पूर्ण नावानं हाक मारायची.’’

‘‘ठीक आहे.. बघू कसं जमतंय..’’ जरा कुरकुरतच आम्ही कबूल झालो. बारशानंतर मस्त गुंडाळून, टोपडं घालून – जे त्याला कधीच आवडलं नाही – आईच्या कडेवर बसून ‘चिन्मय’ बाहेर फिरायला जाऊ लागला. बरोबर आजी हवीच. पहिल्याच दिवशी कोपऱ्यावरची फुलवाली मावशी म्हणाली,  ‘‘अरे वा, चांगलं भटकाया लागलंय की हो बाळ,’’ असं म्हणत तिनं चाफ्याची तीन टपोरी फुलं आईच्या हातात दिली.   ‘अहो, काय हे आजी, कशाला?’’

‘‘आई अन् आजी झालात ना तुम्ही! दोन तुम्हाला, एक बाळाला.. नाव काय ठेवलं बाळाचं?’’                                                                          ‘‘चिन्मय..’’

‘‘चि.. चिन..चिम.. अवघड हाय हो.. माज्यासाठी ‘चिमण’च हाय तो.’’

पहिल्या बॉलवरच ‘विकेट’ गेल्यासारखी आई आजीकडे पाहून हसली. आता खरं सांगायचं तर, पुस्तकी नावापेक्षा, हाक मारण्याच्या नावात ‘जवळीक’ नको का? त्यातून प्रमोशन झाल्यामुळे आमची सेकंड इिनग सुरू झालेली. दुसरं बालपणच हे! नातवाशी खेळायला दिवसभर भरपूर वेळ दुसरं कोण देऊ शकणार? चिमणदेखील काही शब्द बोलायला लागल्यावर आम्हाला ‘आज्जी-आबा’च म्हणतो. तेसुद्धा एकदा नाही, तर दोनदा.. ‘आज्जी, आज्जी’. आज्जीचा ठोस हक्क एका ‘आजी’त नाही अन ‘आबा आबा’ची जवळीक ‘आजोबा’त नाही! ही जवळीक वेगळीच. तान्हा असल्यापासून रोज त्याला ‘नीनी’ करताना मांडीवर घेऊन थोपटत आज्जी अंगाईगीत म्हणायची, ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई! आज माझ्या पाडसाला, झोप का गं येत नाही?’ आबा तर तद्दन ‘फिल्मी’. त्याला फिरवत-फिरवत पाठीवर थोपटत गाणं म्हणणार, ‘म गाउं तुम सो जाओ, सुख सपनोंमे खो जाओ..’ अशी एकामागोमाग गाणी झाल्याशिवाय ‘नीनी’ करणारच नाही पठ्ठय़ा!

खरी दंगा-मस्ती सुरू झाली चिमण पालथं पडायला लागला तेव्हाच.. पालथं पडून सरकताना त्यातच कधी तरी रांगण्याची आयडिया त्याच्या धडपडय़ा डोक्यात आली.. अन् मग हळूहळू धरून उभं राहण्याचीदेखील. ‘अरे वा, हेदेखील जमतंय की!’ असे त्याच्या चेहऱ्यावर भाव. मग चालणं दूर नव्हतंच. प्रत्येक ‘अचिव्हमेंट’वर सगळ्यांच्या टाळ्या व्हायलाच पाहिजेत. स्वत:वरच खूश होऊन हसताना, बोळक्यातल्या चिमुकल्या दोन दातांतून होणारं ‘विश्वरूप’ दर्शन एरवी दुर्लभ. मग काय, ‘घर इज द लिमिट.’ मुक्तसंचार सुरू! आज्जीचं वा आबाचं बोट धरून घरभर फिरवायचं, हवं ते करवून घ्यायचं. हट्टच करायचा. गंमत म्हणजे चालता यायला लागल्यानंतर मधूनच रांगायची हुक्की यायची. त्यात वेगळं काय, म्हणून उलट रांगायचं. फलंदाजाच्या ‘रिव्हर्स स्वीप’ फटक्यासारखा हा झटका!

फलंदाज जसा क्रीजवर आल्यावर चौफेर निरीक्षण करीत ‘बल्ला’ चालवतो, तसं सकाळी उठल्या उठल्या हॉलच्या मदानावर येत, निरीक्षण करत चिमण पुढचा ‘डल्ला’ शोधतो. मोहरा तिकडे वळतो. खालच्या लेव्हलची छोटी कपाटं उघडली जातात, त्यातलं सामान एकेक करत बाहेर येतं.. चौफेर पसारा होतो. महाभारतात युद्ध संपल्यानंतर रोज संध्याकाळी कुरुक्षेत्र कसं दिसत असेल? सेम तसंच. यात किचनमधील भांडी, कुकर, पोळपाट-लाटणं, यांचीदेखील सुटका नाही. विकत आणलेल्या व भेट मिळालेल्या महागडय़ा डिस्को लाइट अन् आवाजी खेळण्यात त्याला इंटरेस्ट नाही. त्यात कधी बांबूचे बसायचे हलके मोडे, स्टूल, ढकलत-ढकलत निर्थक ‘अक्षर-संगीत’ बडबडत घरभर फिरायचं. त्या निर्थकातून पुढं ‘सार्थ’ शब्द निर्माण झाला की घरातल्या सगळ्यांसाठीच परमोच्च आनंदाचा क्षण. हा ‘टी- २०’चा वन-सायडेड सामना रोजचाच. त्यात कधी झालाच तर शी-शूचा ब्रेक. त्यासाठी आज्जी-आबा हेच राखीव खेळाडू. त्याच्याबरोबर खेळायचं म्हणजे आज्जी-आबांची कंबख्ती. ढिल्या झालेल्या कंबरेवर सक्ती!

सकाळच्या ‘टी-२०’ सामन्यानंतर आई अन् बाळामध्ये रंगतो ‘तोतो’चा वन-डे सामना. त्याचे कपडे काढताना, ‘तोतो’ झाल्यावर पुन्हा घालताना, आई अन् बाळाचा ‘खोखो’ चालतो. आंघोळ तशी अप्रियच. पण पाण्यात खेळायला मिळतंय, ही त्याच्यासाठी एकमेव जमेची बाजू. नळातून पाणी कसं येतं, बंद कसं होतं, याचं स्वत: प्रात्यक्षिक करायचं. गरम पाणी कसं ‘हाहा’ असतं, ते तोंडावर हात ठेवून आईलाच सांगायचं. या दंगामस्तीत साबण डोळ्यात गेला, की पुन्हा तारसप्तकातला ‘नी’ लागणार. तो सूर खाली आणायला मग गाण्याला पर्याय नाही.. ‘जय गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी!’ या नाटय़गीताच्या साथीला बाथरूमच्या दारावर तबल्याचा ठेका. कपडे झाल्यावर मोठय़ा माणसासारखा डोक्यावरून केसांचा ब्रश फिरवायचा, आरशात बघायचं, अन् टाळ्या वाजवायच्या.

मग स्वयंपाकघरात आजीच्या पूजेत देवाची घंटा वाजली की बाप्पाशी खेळण्याची वेळ. अन् घंटा-झांजा, पळी-पंचपात्र ही खेळणी. आरतीसाठी निरांजनाची ज्योत काडेपेटीतून कशी पेटते याचं चेहऱ्यावर प्रचंड कुतूहल. नंतर मात्र लंच-ब्रेक. लंचसाठी हा खेळाडू पॅव्हेलियनमध्ये नाही येणार. त्याच्यामागे मदानावर ताटली-वाटी-चमचा घेऊन बाल्कनीतून चिऊ-काऊ, विठूविठू, हम्मा-भूभू, दाखवत फिरत-फिरत ‘मंमं’ चालणार. इथं पक्ष्या-प्राण्यांचे आवाज काढता आले नाहीत, तर ते ‘आज्जी-आबा’ फेल. त्यांत खिडकीतून खाली दिसणाऱ्यांना चवथ्या मजल्यावरून हाका मारायच्या.. अगदी ‘पमपम’ला सुद्धा ‘येये’ करून बोलवायचं. लंच-ब्रेकमध्ये सगळा वरण-भात अन् बरोबरीने उकडलेला ‘बदादा’- अर्थात बटाटा – खाणं, ही ब्रेकिंग न्यूज असते!

नंतर दुपारचा ‘नीनी’चा कार्यक्रम. अशा वेळेस सकाळचा पेपर दुपारी वाचायला घेत, पेपरच्या आत याला मांडीवर घेऊन बसायचं. मग चष्मा सांभाळायची कसरत. वाचण्यासाठी असलेला चष्मा वाचवण्यासाठी चष्म्याला लावून घेतलेली दोरी ओढणं हा त्याचा खेळ चालणार, त्यात वाचन अशक्यच. ‘आपडी-थापडी’, ‘इथं इथं बश ले मोला’, ‘ठो दे ले, ठो दे ले’, ‘चाऊ-म्याऊ’ वगैरे सुरू होणार. तर कधी ‘कोकरू घ्या  कोकरू’चा पाठीवरून घरभर फेरा होतो.

पाठीवरून ‘घोडा घोडा’ करताना घोडाच गाणार, ‘लकडी की काठी, काठीपे घोडा..’  इथं दमून थोडं आडवं व्हावं तर स्वारी पोटावर बसणार.. एका हातानं कान धरून दुसऱ्या हातानं हत्तीची सोंड करणार अन् ‘आ आ’ करणार. म्हणजे गाणं व्हायलाच पाहिजे.  ‘चल चल चल, मेरे हाथी..’ हे गाणं म्हणायचं. ही ‘आपकी फर्माईश’ झोप येईपर्यंत चालूच राहणार.. त्याला अंथरुणावर झोपवून बाहेर आलं की.. हुश्श, त्यानंतर इतरांची ‘मंमं’!

हल्लीहल्ली सोसायटीत भरणाऱ्या रविवार सकाळच्या आठवडी बाजारात त्याला घेऊन भाजी आणायला जायची गंमत वेगळीच. त्यातून पुण्यातल्या उन्हात जायचं, मग टोपी पाहिजेच. अन् टोपडय़ा-टोपीचा चिमणला जन्मजात कंटाळाच. टोपी घातली की काढून टाकायची. मग ‘सूल्ल्य बाप्पा’ कसा ‘हा-हा’ असतो, टोपी का घातली पाहिजे, याची उजळणी व्हायची. मग केव्हा तरी टोपी डोक्यावर स्थिरावायची! एरवीचा ‘कडेवर’चा हट्ट इथं नसतो. ‘स्वारी’ खाली उतरणार कारण खाली पाटय़ात ठेवलेल्या भाज्यांतून बागडत मुक्त भटकायचं असतं. मग गवारीत तोंडली, ढोबळ्या मिरचीत टोमॅटो, कांद्यात बटाटे घालायचा ‘आयपीएल’ सामना रंगतो. झुबकेदार मिशी असणारा भाजीवाला खोटंखोटं रागवला की ‘स्वारी’ पुन्हा हात वर करून ‘कडेवर’ येणार! त्या भाजीवाल्यामुळे त्याला चित्रातली ‘मिशी’ कळू लागली.. अन् ‘चिमण बाजारातून काय आणतो?’ यावर ‘भाज्जी!’ हे उत्तर मिळू लागलं. बोबडशब्दांची ‘तोंड’ओळख झाल्यानंतरचं हे अपूर्व शब्दब्रह्म!

या सगळ्यात ‘चिमण’बरोबर दीड वर्षकधी उलटून गेलं कळलंच नाही.. पण परवा ते जाणवलं..

त्या दिवशी चिमणची मिनतवारी करून, समजूत काढून, बँकेच्या कामानिमित्त अकरा-साडेअकराला घराबाहेर पडलो. अशा वेळेस वरून बाल्कनीतून त्यानं आबांना ‘टाटा-बाय बाय’ करणं हा आनंद दुतर्फी असतो. त्या दिवशी खाली आल्यावर मागं वळून वर बाल्कनीकडे पाहिलं.. आज्जीच्या कडेवरून स्वारी ग्रिलमधून वाकून पाहतेय.. पण खालून केलेल्या ‘टाटा’ला वरून रिस्पॉन्स नाही. त्याऐवजी स्वत:च्या डोक्याला हात लावून खुणा चालल्यात. खालून काही कळेना. आज्जी वरून म्हणाली..     ‘तो तुम्हाला टोपी घालायला सांगतोय.’’ माथ्यावर तळपता ‘सूल्ल्य बाप्पा’ अन् आबा टोपीशिवाय? चिमणच आता आमची काळजी घ्यायला लागला की! तेव्हा जाणवलं.. चिमण आता मोठा झालाय! मी स्लिंगबॅगमधून टोपी काढून डोक्यावर घातली, अन् वर पाहिलं.

चौथ्या मजल्यावरून चिमण दोन्ही हात हलवत म्हणाला, ‘आबा.. ताता..!’

pbbokil@rediffmail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 15, 2019 1:46 am

Web Title: manatale kagdavar article by prabhakar bokil
Just Now!
X