माधुरी ताम्हणे

.. माझ्या स्क्रिप्टमधल्या प्रश्नांपलीकडचा तिचा प्रश्न. स्क्रिप्टमधल्या प्रश्नांच्या उत्तरांची रिहर्सल झाली होती. या अनपेक्षित प्रश्नाला मात्र माझ्याकडे उत्तर नव्हतं. दादर स्थानक जवळ येत होतं. ‘कळवते तुम्हाला’ असं पुटपुटत मी गडबडीने उठले. गाडीतून उतरले. भर गर्दीतही तिचे आशेने माझ्याकडे पाहणारे, दोन डबडबलेले डोळे माझा पाठलाग करत होते. आजही करत आहेत. पण त्या क्षणाचा मोती हातातून निसटून घरंगळून गेला होता.. अशा घरंगळलेल्या अनेक क्षणांची माळ ओवायला घेतली तेव्हा जाणवलं..

वेळ भर दुपारची. स्थळ – मेंटल हॉस्पिटल. डॉक्टर्स, परिचारिका, मनोरुग्णांचे नातलग, केअरगिव्हर सेवक अशा प्रत्येकाच्या मुलाखती घेण्याचं माझं काम तन्मयतेने चालू होतं. निमित्त होतं ‘आकाशवाणी’साठी मनोरुग्णालयावरील बाह्य़ध्वनीमुद्रणाच्या कार्यक्रमाचं.

मुलाखती चालू असताना कॅरिडॉरमध्ये बसून जेवणाऱ्या एका तरुणावर नजर गेली आणि मी दचकले. तो तरुण माझ्या परिचयाचा होता. अत्यंत सधन, सुशिक्षित घरातला तो तरुण मनोरुग्णालयाच्या गणवेशात कथलाच्या थाळीतलं अन्न चिवडत मन लावून जेवत होता. मन गलबलून आलं. चांदीच्या ताटात सोन्याचा घास जेवण्याची ज्याची ऐपत त्याच्यावर नियतीने ही वेळ आणावी.. का?

या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. माझ्याकडे वा अन्य कोणाकडेही. पण मजजवळ उत्तर नसलं तरी त्याला विचारण्यासाठी एक प्रश्न मात्र नक्की होता. ‘बाळा कसा आहेस?’ मी त्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आणि झपकन मागे घेतलं. त्या एका क्षणात मनात किती विचार उसळून यावेत? मनोरुग्णालयाचे अधीक्षक, डॉक्टर्स माझ्यासोबत आहेत.

त्यांना काय वाटेल? हा तरुण हिच्या ओळखीचा? इतका जवळचा? माझ्याबद्दल काय विचार करतील ते? आणि तो? तो कसा प्रतिसाद देईल? न जाणो हिंसक झाला तर? किंवा मला ओळखून नको इतकी सलगी दाखवू लागला तर?

मी झटकन परत फिरले. त्याच्यापासून दूर जात रेकॉर्डिग करू लागले. आज वाटतं, त्याक्षणी आकाशवाणी कलावंताची झूल उतरवून, माणूस म्हणून का नाही बोलले मी त्याच्याशी? त्या सर्वस्वी परक्या वातावरणात माझ्या आपुलकीच्या, मायेच्या, ओंजळभर शब्दांनी त्याचं दुस्तर काटेरी आयुष्य क्षणकाल का होईना सुगंधी झालं नसतं कां?

पण.. क्षणाचा मोती घरंगळून गेला होता.

‘दूरदर्शन’वरच्या ‘हॅलो सखी’ कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी रेल्वेने प्रवास करत होते. प्रवासात निवेदनाची संहिता नजरेखालून घालावी म्हणून वाचायला घेतली. शेजारी बसलेली स्त्री वारंवार माझ्या हातातले कागद वाचायचा प्रयत्न करत होती. थोडय़ा वेळाने तिने हळूच विचारलं, ‘‘हे काय लिहिलंय तुम्ही?’’ मी म्हटलं, ‘‘परित्यक्ता या विषयावर मी आज ‘दूरदर्शन’वर कार्यक्रम करणार आहे.’’ तिच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं. ‘‘मला तुमची मदत हवी आहे. मीसुद्धा परित्यक्ता आहे. नवरा एका डान्सबारमधल्या बाईसोबत राहतो. मी एकटी दोन मुलांना घेऊन वेगळी राहते. तो देतो तेवढय़ा पैशांत भागवते. पण शिक्षण असूनही नोकरीसाठी घराबाहेर जायची मला परवानगी नाही. अनेक वेळा ती बाई त्याचा अख्खा पगार काढून घेते. आज एक तारीख. म्हणून आज मी त्याच्या ऑफिसमध्ये चालले आहे. त्याच्या साहेबांना सांगून निदान पोरांना जगवण्याइतके तरी पैसे आणायला. ताई मला मदत कराल?’’

माझ्या स्क्रिप्टमधल्या प्रश्नांपलीकडचा तिचा हा प्रश्न. स्क्रिप्टमधल्या प्रश्नांच्या उत्तरांची रिहर्सल झाली होती. या अनपेक्षित प्रश्नाला मात्र माझ्याकडे उत्तर नव्हतं. दादर स्थानक जवळ येत होतं. ‘कळवते तुम्हाला’ असं पुटपुटत मी गडबडीने उठले. गाडीतून उतरले. भर गर्दीतही तिचे आशेने माझ्याकडे पाहणारे, दोन डबडबलेले डोळे माझा पाठलाग करत होते. आजही करत आहेत. पण त्या क्षणाचा मोती हातातून निसटून घरंगळून गेला होता..

वृत्तपत्रातील एका लेखासाठी ‘सावधान’ या वेश्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी वेश्यांच्या मुलाखती घेणं चालू होतं. या मुलींची नुकतीच कुंटणखान्यातून सुटका झाली होती. त्यांना नेपाळला, त्यांच्या गावी परत पाठवण्यात येणार होतं. पण त्यातली एकही मुलगी गावाला परत जाण्यास उत्सुक दिसत नव्हती. न राहवून मी एकीला म्हटलं, ‘‘या नरकातून तुझी सुटका झालीय. गावाला परत जायला मिळतंय याचा तुला आनंद नाही का होत?’’ म्लान चेहऱ्याने ती उद्गारली, ‘‘कसा होईल आनंद? गावातल्या माझ्या रिश्तेदारांना, कुटुंबीयांना वाटतंय, की मी इथे चांगली नोकरी करतेय. मुंबईत पैसे कमवतेय. आता धंदा सोडून गावाला गेले, की कोण विचारणार मला? पैसा है तो सम्मान है.’’

‘‘मग हा पैसा सन्मानाने कमव ना? असा शरीरविक्रय करून का कमवतेस? त्यापेक्षा चार घरची धुणीभांडी कर. काम कर.’’

‘‘तू देतेस तुझ्या घरी मला काम?’’

तिच्या धारदार प्रश्नाने माझं काळीज चिरत गेलं. कुठे उत्तर होतं तिच्या या प्रश्नाचं माझ्याकडे?

खरं तर अशा प्रश्नांना उत्तरं असतात. पण ती देण्याचं धैर्य आपल्यात नसतं. म्हणूनच अशा क्षणांचे मोती हातांतून घरंगळत जातात.

एक दिवस सकाळी सकाळी फोन वाजला. फोन एका स्त्रीचा होता. ‘‘मी कालचा तुमचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला. कार्यक्रम आवडला. म्हणून तुमचा नंबर शोधून फोन केलाय.’’

‘‘थँक यू!’’ मी अवघडत म्हटलं, तर ती न थांबता बोलूच लागली, ‘‘मी अमुक माणसाची पत्नी. माझ्या पतीचं नाव तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच वेळा वाचलं असेल. हा माणूस उच्चशिक्षित आहे. मोठय़ा पदावर काम करतोय. मी स्वत: नोकरी करते. पण रोज पट्टय़ाने मला मारतो. सिगारेट्सचे चटके देतो आणि त्याच्या शरीराची भूक भागवतो. वर मला धमकी देतो. बाहेर याची वाच्यता केलीस तर मुलांसकट तुला रस्त्यावर आणीन. मुलांचे तो एवढे लाड करतो की मुलांसाठी वडील म्हणजे देवमाणूस आहे. त्याच्यातला राक्षस फक्त माझ्यासाठी आहे.’’

मला घाम फुटला. ती बोलतच होती. ‘‘कालचा तुमचा ‘घरगुती हिंसाचार’ या विषयावरचा कार्यक्रम पाहिला आणि वाटलं, तुम्हीच मला मदत करू शकाल.’’ ती माझ्याशी फोनवर बोलत असताना माझा फोन सतत टॅप होत असल्याचं मला जाणवत होतं. मी ‘ऑफिसला जायला उशीर होतोय’ म्हणत रिसिव्हर पटकन खाली ठेवून दिला. तिचा पत्ता, फोन नंबरही न विचारता. पुन्हा एकदा क्षणाचा मोती हातांतून घरंगळून गेला होता..

ट्रेनचा प्रवास. त्यातही स्त्रियांचा डबा. हा स्त्रीजातीचा जणू आरस्पानी चेहराच. ठाणे ते सीएसएमटी या तासाभराच्या प्रवासात माझ्याशेजारी खिडकीत ‘ती’ बसली होती. क्षणभर हेवा वाटला. वा, हवेच्या दिशेची मस्त खिडकी मिळाली की हिला. पण हळूहळू लक्षात आलं, खिडकीत तोंड घालून ती सतत डोळे पुसतेय. एक दोनदा मनात आलं, विचारावं का काय झालंय? प्रेमभंग, बॉसची छळवणूक, घरच्या माणसांचं आजारपण, प्रिय व्यक्तीचा मृत्यू.. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंचं कारण शोधण्याचा माझा तासभर मनातल्या मनात प्रयत्न. तिला थेट विचारलं तर आवडेल? रुचेल? तिच्या समस्येवर हळुवार फुंकर घातली तर तो वन्ही विझेल की पुन्हा चेतवेल? गाडीने मस्जीद स्टेशन सोडलं आणि तिने पर्स उघडली. रुमालाने चेहरा खसाखसा पुसला. त्यावर पावडरचा हलका पफ फिरवला. ओठांवर छान शेडची लिपस्टिक फिरवली. त्या लिपस्टिकने रंगलेल्या ओठांनी दु:खाचा प्याला अलगद रिचवला होता.

पर्स उचलून ती उठली. स्टेशनवर उतरली. भर गर्दीत झपझप चालत मिसळून गेली. मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फक्त पाहात राहिले. आणखी एक हळव्या क्षणांचा मोती हातांतून निसटून गेला होता.

मॉर्निग वॉक घेता घेता मनात सकाळच्या प्रहरी वाचलेली वृत्तपत्रातील बातमी अक्षरश: धुमाकूळ घालत होती. मध्यमवर्गीय घरातल्या एका पंचाहत्तरीच्या आजोबांनी आपल्या सत्तरीच्या पत्नीचा खून केला होता. बातमी चार ओळींची! पण मनात एक अख्खा लेख आकार घेऊ लागला. नुकतंच एका वृत्तपत्रासाठी लिहिलेला लेख आठवू लागला. कुटुंब न्यायालयातली प्रकरणे, समुपदेशक यांच्या मुलाखती आठवू लागल्या. उतार वयातल्या विसंवादाची कारणं, त्याची इतकी विपरीत परिणती.. मनात लेख झपाटय़ाने आकार घेऊ लागला. रोजच्या ठरलेल्या फेऱ्या थांबवून घराकडे धाव घेतली. मनात विचार उसळून येत होते. घुसळून काढत होते. त्यांना शब्दबद्ध व्हायची असोशी लागली होती.

मोबाइल वाजला. पलीकडून भाऊ बोलत होता. ठाण्यात एका कामासाठी येतोय. तासाभरात पोहोचतो. तुझ्याकडे जेवून पुढे कामाला निघून जाईन. आणि हो, तुझ्या हातचं गरमागरम थालीपीठ.. भरपूर लोणी लावून.. हास्याची लकेर. फोन कट्! माझी पावलं लिखाणाच्या टेबलाऐवजी स्वयंपाकघराकडे..

मनातले शब्द, उसळणारे विचार हिंपुटी होऊन मनातच जिरून गेले. नवनिर्मितीच्या अलवार क्षणांचा मोती हातांतून घरंगळून गेला होता. पुन्हा एकदा.. या अशा घरंगळलेल्या क्षणांची माळ ओवायला घेतली तेव्हा जाणवलं, हे मोती घरंगळले कारण मनाचं सूतच मुळी कच्च होतं. अकल्पितपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्याच्या धैर्याचं कवच त्याला मुळी नव्हतंच. त्यातूनच इतरांना वाचवण्याआधी स्वत:ला कसं वाचवता येईल या विचारांना अग्रक्रम मिळत असावा. कदाचित त्यातूनच आग्रही स्पष्टवक्तेपणाला वाकवणारा भिडस्तपणा डोकं वर काढत असावा. त्यातूनच कलावंताच्या झुलीआडून सुखकर सुरक्षिततेच्या अवगुंठनात लपेटून घेणं सोयीचं वाटत असावं. त्यामुळेच क्रियाशील कर्तेपणाच्या अभावातून नाकर्तेपण जन्माला येत असावं.

मात्र पुलाखालून अनेक वर्षांचं पाणी वाहून गेलं तरी आजही मनाला लागणारी टोचणी आपल्यातलं संवेदनशील ‘माणूसपण’ शाबूत असण्याची पावती तर देत नाही? हा विचार मनाला खूप आश्वस्त करून जातो.

madhuri.m.tamhane@gmail.com

chaturang@expressindia.com