11 July 2020

News Flash

मनातलं कागदावर : स्वदेशी सवंगडी

धाकटय़ा चिरंजीवांच्या लग्नाचा बार उडाला आणि ते दोघेही अमेरिकेलाही उडाले.

(संग्रहित छायाचित्र)

मीनाक्षी सावरकर

धाकटय़ा चिरंजीवांच्या लग्नाचा बार उडाला आणि ते दोघेही अमेरिकेलाही उडाले. लग्नाची धावपळ, त्यांची अमेरिकेत पाठवणी या दगदगीतून जरा मोकळी होऊन श्वास घेतला. ते दोघेही तिथे स्थिरावत होते. आमच्या मनानेही त्यांच्या दुराव्याची सवय लावून घेण्याचे ठरवले होते.

पण वर्षभरातच दोघांचा फोनवरून आम्हाला तिथे येण्याचा आग्रह वारंवार सुरू झाला. तिथे जाणं सोपं नव्हतं. पैशांची सोय तर करावी लागणार होतीच. पण दोघांच्या रजेचाही प्रश्न होता. प्रत्येक वेळी काही तरी निमित्त सांगून आम्ही जाणं पुढे ढकलत होतो. एक-दोन वर्षे अशीच गेली. अखेर एके दिवशी जाण्याचं पक्कं ठरवलं. पासपोर्ट तयार होताच. व्हिसा,  तिकिटे वगैरे औपचारिक गोष्टी पार पडल्या आणि विमानप्रवासाला सुरुवात झाली. मला थोडा ताणच आला होता कारण या मोहमयी पण अलिप्त अमेरिकी जीवनाबद्दल बरेच वाद-प्रवाद ऐकले होते. विशेषत: तिथल्या एकटेपणाची तर मी भीतीच घेतली होती. इथे जन्मापासूनच सतत माणसांच्या गराडय़ात राहणारे आपण तिथे कसे रमू, याबद्दल मन साशंक होते. म्हणून स्वत:ला विरंगुळा होईल असे भरतकामाचे साहित्य, वाचायला पुस्तके, कॅसेट्स, सीडीज अशी सर्व आयुधे बरोबर घेऊन आम्ही निघालो होतो.

प्रवास चांगला झाला. घरी पोचेपर्यंत रात्र झाली होती. सूनबाईने, सीमाने ताजा स्वयंपाक करून ठेवला होता. मजेत जेवणं झाली. प्रवासाच्या थकव्यामुळे झोपही लगेच लागली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे सतीश आणि सीमा दोघे घरीच होती. त्या दिवशी अखंड गप्पाच चालू होत्या आणि मधून मधून सतीश मला तिथल्या विविध यंत्रांच्या वापराबद्दल माहितीही देत होता. कारण दुसऱ्या दिवसापासून ते दोघेही ऑफिसला जाणार होते.

दुसऱ्या दिवशी ते दोघे नोकरीसाठी बाहेर पडले. आणि मी स्वयंपाकघराचा ताबा घेतला. दिवसभर सतीश आणि सीमा सारखे फोनवरून आमची चौकशी करीत होते. इतक्यात पाच-साडेपाच वाजता फोन वाजला आणि पलीकडून अपरिचित पण एका बाईंचा आवाज ऐकू आला. मी गोंधळले. कारण, इथे अमेरिकेत आत्ताच कुणाचाही फोन अपेक्षित नव्हता. ‘‘सतीशच्या आई ना? वेलकम टू अमेरिका!’’ यावर मला पटकन् उत्तर द्यायलाही सुचले नाही. ‘‘मी तुमच्या सतीशच्या मित्राची, अनिलची आई बोलतेय. आम्हीही नुकतेच भारतातून इथे सूनबाईच्या बाळंतपणासाठी आलो आहोत. तुम्ही येणार कळल्यापासून फार खूश होतो आम्ही. अगदी आतुरतेने वाट पाहात होतो तुमची! तसं मला घरातलं काम करताना दिवस चांगला जातो. पण बोलायलाच कोणी नाही हो! खूप बरं वाटलं तुम्ही आलात हे ऐकून.’’ त्या अगदी आस्थेने म्हणाल्या. परदेशातही आपल्या भाषेत आपल्याबद्दल एवढे अगत्याचे शब्द ऐकून मीही सुखावले. ‘‘आम्हीही तुमच्याबद्दल बरंच ऐकलं होतं सतीशकडून. त्याला फार आपुलकी आहे तुमच्याबद्दल. बरं वाटलं. फोनवर भेट झाल्यामुळे कधी तरी प्रत्यक्ष भेटू या.’’ मीही उत्तर दिलं. दुसऱ्याच दिवशी सतीश आम्हाला अनिलच्या घरी घेऊन गेला. त्याचं घर खूपच जवळ होतं. आईवडील खूप साधे आणि मनमोकळे वाटले. ते साताऱ्याचे होते. सून बाळंतीण असल्यामुळे घरीच होती.

दुसऱ्या दिवसापासून आमची चौकडीच जमली. रोज संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या घरी जायचं. जवळच्या बागेत बसून गप्पा मारायच्या आणि आरामात परतायचं. असा उपक्रम सुरू झाला. हळूहळू रस्त्यात नवीन भारतीयांच्या ओळखी होऊ लागल्या. हुबळीचे हेगडे, दक्षिणेकडचे वेंकटरामन्, कोलकात्याचे घोष असा आमचाही ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ आकार घेऊ लागला. आणि थोडय़ाच काळात आम्ही जिवाभावाचे मित्र कधी झालो हे कळलंच नाही. आम्हा बायकांना तर विषयांची कमतरताच नव्हती.  दरम्यान, अनिलच्या बाळाचे बारसेही दणक्यात साजरे झाले. अगदी ‘गोविंद घ्या, गोपाळ घ्या’पासून ते बारशाच्या घुगऱ्या, पाळणा, नाव घेणं, सर्व रीतसर झालं. त्यानंतर छानशी पार्टी झाली. अनेक जण त्या पार्टीला आले होते. अमेरिकेतील बारशाचा एक वेगळाच अनुभव त्यामुळे मिळाला.

अमेरिकेतल्या आमच्या या मित्रमंडळींची सोबत आम्हाला इतकी भावली की अगदी इथल्यासारखेच एकमेकांकडे पदार्थ पाठवणे, एखाद्या दिवशी कोणा एकाकडेच भात-पिठल्याची अंगतपंगत करणे हेही सुरू झालं. ‘अमेरिकेत भौतिक सुखांची चंगळ असली तर एकटेपणावर उपाय काय’ हा प्रश्न घेऊन गेलेलो आम्ही, पण त्या प्रश्नाचे उत्तर अगदी सहजपणे  गवसले होते. त्यातच श्रावण महिना असल्यामुळे श्रावणी, शुक्रवारची सवाष्ण, सत्यनारायणाची पूजा या कार्यक्रमांमुळे वरचेवर आम्ही भेटत होतो आणि त्यामुळे जवळीक वाढत होती. आम्ही सर्व जण समविचारांचे आणि मध्यमवर्गातील असल्यामुळे आमचे सूरही छान जुळले होते. असेच दिवस मजेत चालले होते आणि आमची परतायची वेळ जवळ येऊ लागली. सर्वानाच हुरहुर लागली. प्रत्येकाकडे निरोपाच्या जेवणाची आमंत्रणं सुरू झाली. एकमेकांना भारतातले पत्ते, फोन नंबर दिले-घेतले गेले. भारतात गेल्यावरही संपर्कात राहायची वचने दिली गेली आणि मजा म्हणजे अमेरिकेत मिळालेली ही सोबत, हे सवंगडी  भारतात परतल्यावरही साथ देत आहेत..

आता आमचं एक घर सांगलीला, एक हुबळीत, एक दक्षिणेकडे तर एक कोलकात्यातही आहे!

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2019 1:32 am

Web Title: manatale kagdavar article meenakshi savarkar abn 97
Next Stories
1 आरोग्यम् धनसंपदा : पचवाल तर वाचाल
2 तळ ढवळताना : कविता.. गच्च पाऊस
3 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : जगभ्रमणाचा दावा
Just Now!
X