08 December 2019

News Flash

मनातलं कागदावर : काळजातलं कुसळ

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला.

(संग्रहित छायाचित्र)

पुष्पा जोशी

बागेत बाकावर बसलेल्या नलूने समोरून येणाऱ्या उषाला बघून हसून हात हलविला. उषा येऊन बाकावर टेकण्याआधीच तिला विचारलं, ‘‘अगं, कुठे होतीस काल? किती वाट पाहिली तुझी. शेवटी चार फेऱ्या मारून मी घरी गेले.’’

‘‘सॉरी, सॉरी अगं, मानसीची एक मीटिंग रद्द झाली. म्हणून आयत्या वेळी तिनं आम्हाला मॉलला यायला सांगितलं. ‘अ‍ॅव्हेंजर’ सिनेमा बघायला.’’

‘‘बरं – बरं. आवडला का?’’

‘‘डोक्यावरून गेला.’’ हसल्यासारखं करत उषा म्हणाली, ‘‘काय ते वेडेवाकडे एलियन्स, त्यांची विचित्र वाहनं, शस्त्रास्त्रं, सारंच अगम्य! मला तर अधूनमधून डुलक्याच येत होत्या.’’

‘‘आणि आता आपल्याला मॉलमधलं ते हिंडणं, खाणं, खरेदी काहीच नको वाटतं. त्यात सिनेमा असा असला म्हणजे..’’ नलूने उषाच्या सुरात सूर मिळवला.

‘‘आपल्या या कर्तृत्ववान, ऑफिसमध्ये बॉस असलेल्या लेकी, त्यांच्या सोयीप्रमाणे आपल्याला गृहीत धरतात. शिवाय घरीदारी सगळीकडे बॉससारख्याच वागतात.’’ उषा नाराजीच्या स्वरात म्हणाली.

‘‘आमची चंदा ‘सेव्हन सिस्टर्स’ला जायला निघालीय ते सांगायचं होतं तुला.’’ नलूच्या स्वरातून काळजी डोकावत होती.

‘‘कुणाबरोबर जातेय?’’

‘‘एकटीच जातेय. नागालँड, त्रिपुरापासून एकटीने हिंडणारेय महिनाभर. तिच्या एनजीओतर्फे तिथल्या स्त्रियांच्या आरोग्याचा सव्‍‌र्हे करायचाय म्हणे. मला तर खूप टेन्शन आलंय.’’

‘‘साहजिकच आहे. तरण्याताठय़ा मुलीनं तिथल्या अशांत वातावरणात एकटीने वावरायचं म्हणजे काळजी वाटणारच.’’ नलूला दुजोरा देत उषा म्हणाली.

‘‘हो. पण घरात तसं काही बोलायला गेले, तर चंदानं मोबाइलमधून डोकं वर काढून ‘कूऽऽल, आई कूऽऽल’ म्हणत माझ्याकडे ‘जग कुठे चाललंय आणि मी कुठल्या युगात वावरतेय,’ अशा नजरेनं पाहिलं.’’

‘‘अरुणा काही म्हणाली का?’’ उषानं नलूच्या सुनेचं मत आजमवायला विचारलं.

‘‘म्हणाली, माझी समजूत काढल्यासारखी. अहो आई, तुम्ही ‘व्हॉटस्अ‍ॅप’ वापरता. आपल्या फॅमिली ग्रुपवर चंदा रोज मेसेज करील ना. फोटोसुद्धा पाठवील. काळजी नका करू.’’

‘‘फक्त तिथलं इंटरनेट कनेक्शन चालू असायला हवं, ही माझी शंका मग मी मनातच गिळली.’’ नलूच्या बोलण्यात नाराजी होती.

‘‘अलीकडे रात्री बराच वेळ झोप लागत नाही. वेडय़ासारखे विचार मनात येतात. वाटतं की काळ पंधरा-वीस वर्षांनी मागे जावा. किती छान स्थळं येत होती तेव्हा मानसीसाठी. हुशार, स्मार्ट, पाच आकडी पगार घेणारी एकुलती एक लाडकी लेक आमची. काही तरी निमित्त काढून चांगली चांगली स्थळं तेव्हा नाकारली मानसीनं. ठाण्याचा एक मुलगा तर अगदी ‘परफेक्ट मॅच’ होता मानसीला. पण ‘त्याची-माझी उंची जवळ जवळ सारखीच आहे.’ असलं खुसपट काढून मानसीनं त्यालासुद्धा नाकारलं. यांनी किती समजूत काढली होती तिची. त्यावेळी मानसीची बाजू घेण्याचा मूर्खपणा मी केला नसता तर..’’ उषाच्या मनातली खदखद बाहेर पडत होती.

उषाच्या हातावर हलकेच थोपटल्यासारखं करीत नलू म्हणाली, ‘‘जॉर्जबद्दल तर तुला माहीतेय. चंदाच्याच ऑफिसमधला हुशार, सालस मुलगा. केवळ दुसऱ्या धर्माचा म्हणून यांनी टोकाचा विरोध केला. तो लग्न करून, अमेरिकेला जाऊन चांगला सेटल झाला आणि ‘आता मला लग्नच करायचं नाही’ म्हणून चंदा हट्ट धरून बसलीय.’’

‘‘आजचा जमाना असता ना तर आधी लग्न करून नंतर त्यांनी तुम्हाला कळवलं असतं.’’

‘‘ते परवडलं असतं. हे गेल्यानंतर कधी नाही इतकं एकटं वाटतं आताशा.’’ नलू खिन्न होऊन म्हणाली. ‘‘मला तर हल्ली जवळच्या नात्यातसुद्धा कुठल्या कार्याला जावंसं वाटत नाही. तिकडं आडवळणानं गाडी शेवटी मानसीच्या लग्नावर येतेच. परवा मुंजीला गेले होते, तेव्हा ओळखीच्या एका बाईंनी चंदासाठी घटस्फोटित स्थळ सुचवलं. धीर करून घरी बोलले. मात्र, चंदा एखाद्या वाघिणीसारखी चवताळली. तिनं घेतलेल्या स्वतंत्र फ्लॅटमध्ये राहायला जाते म्हणाली.’’

‘‘अगं बाई, मग? अरुणाने समजूत काढली का तिची?’’

‘‘काढणारच, सगळ्याच स्वार्थी आणि मतलबी झाल्येत आजकाल. चंदा सढळपणे घरातच खर्च करते. मग तिची मर्जी सांभाळत अरुणा सगळं तिच्या हातात आयतं देते. ‘आत्या आत्या’ करत मुलं चंदाकडून हॉटेलिंग, उंची कपडे, गेम्स वसूल करतात. शिवाय चंदा तिच्या भाडय़ानं दिलेल्या फ्लॅटचं उत्पन्न थोडंच सोडणारेय? कधी लाडीगोडी लावून अरुणा मुलांना चंदाच्या खोलीत झोपायला लावते. राजाराणीचं दार लागलं की मलाच काहीतरी अपराध केल्यासारखं वाटतं.’’ नलूने मनातली खदखद व्यक्त केली.

‘‘वैजूसारखं वागायला जमत नाही गं आपल्याला. ती कशी, कुणी चौकस भेटलं की, तिच्या  लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते.विचारणाऱ्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.’’ उषाने त्यांच्या मैत्रिणीचा, वैजूचा दाखला देत म्हटलं.

‘‘हो ना! वैजू म्हणते की ‘लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं ‘च्युइंगम’ व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?’’

‘‘बरोबरच आहे तिचं. पण..’’ म्हणत दोघी गप्पच बसल्या.. आपापल्या विचारात मग्न झाल्या आणि मग निमूट घरी निघाल्या.

‘लॅच कीने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढय़ातली भाजी आवरायला घेतली.

‘‘शी! काय पसारा केलायस आई, माझ्या खोलीत.’’ पर्स ठेवता ठेवता मानसीनं शेरा मारलाच.

‘‘हे मॅच बघताहेत आमच्या रूममध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत.’’ उषाने खालच्या मानेनं म्हटलं.

‘‘आवर ते सगळं लवकर’’ मानसीच्या आवाजातून बॉसगिरी डोकावलीच.

काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हँगर्स, पिनांचा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाटय़ाने भाजीचा पसारा आवरताना, तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं..

pushpajoshi56@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on July 13, 2019 12:12 am

Web Title: manatale kagdavar article pushpa joshi abn 97
Just Now!
X