डॉ. मीनल माटेगांवकर

दोघींचीही घालमेल सुरू झाली.. लग्नानंतर नाही म्हटलं तरी असा पाऊस नाही अनुभवता येणार. हातातली कामं टाकून प्रत्येक वेळी नाही निघता येणार भिजायला. जबाबदारी आल्यावर ‘पोरपण’ संपेल आणि मुख्य म्हणजे आपण जसं आहोत तसेच स्वीकारले जाऊ याची खात्री नाही.. दु:ख नव्हतं, पण हुरहुर मात्र होती. लग्नाआधीचा हा पावसाळा शेवटचा होता..

पावसाची जोरदार सर आली आणि निमा धावत ऑफिसबाहेर आली. हातात चहाचा कप घेऊन कितीतरी वेळ नुसतीच उभी राहिली दाराबाहेर. मस्त वाटत होतं तिला.. खरं तर दुसऱ्या दिवशीच्या कामाची तयारी करायची होती. शिवाय सासूबाईंच्या वाढदिवसाची तयारी करायची होती. विराज तिला घ्यायला येणार होता ऑफिसमध्ये. पण पाऊस आला आणि ती सगळं विसरली.. तडक निघाली निशाच्या क्लिनिकमध्ये. फार जवळ नव्हतं खरं तर क्लिनिक आणि त्यांचं त्या पाठीमागे असणारं घरही, पण ती भारावल्यासारखी गाडी चालवत राहिली. सोबतीला गाडीत ‘बेला मेहेकारे मेहेका’ गाण्याची साथ होतीच..

निमा आणि निशा. निमा मोठी आणि निशा लहान. अगदीच २ वर्षांचं अंतर होतं दोघींमध्ये. दोघीही अगदी विरुद्ध स्वभावाच्या. निमा एकदम बेधडक तर निशा तशी बुजरी. कुठल्याही घटनेकडे बघण्याचा दोघींचा दृष्टिकोन अगदी वेगळा. पण गट्टी फार होती दोघींमध्ये.

निमाचं मित्रमंडळ खूप मोठं. निशाला आयत्याच मैत्रिणी मिळायच्या. त्यातल्या अगदी काहींशी तिचं सूत जमायचं. बाकी मस्ती वगैरे तिला काही जमायची नाही. निमा मात्र अखंड हुंदडायची. ‘मला लग्नच करायचं नाही.’ निमा म्हणायची तर ‘मी तुला माझ्या सासरी घेऊन जाईन,’ असं निशा म्हणायची. निमा सीए झाली तर निशा डॉक्टर. दोघीही करिअरमध्ये स्थिरावल्या होत्या. आई-बाबांनी लग्नासाठी लकडा लावला होता, पण दोघीही मनावर घेत नव्हत्या. पण विराजशी दोस्ती वाढली होती निमाची तर अर्जुन निशाला आवडत होता.

गाडी चालवताना निमाला शाळेतला पाऊस आठवत होता. जसा पावसाचा अंदाज यायचा तशी शाळा लवकर सुटायची. पण निमा आणि निशा उगाचच रमतगमत घरी जायच्या. पावसात भिजायला जाम आवडायचं दोघींना. घरी आल्यावर ‘निशालाच भिजायचं होतं पावसात,’ असं चक्क खोटं सांगायची निमा. त्यामुळे जरा कमी ओरडा मिळायचा. पुढेही निमा मुद्दाम निशाच्या महाविद्यालयात जायची आणि दोघी मस्त भिजत यायच्या घरी. आल्यावर केसात माळलेला पाऊस आणि हातात गरम चहाचा कप.. अहाहा!

अशाच एका पावसात निमाने विराजबद्दल निशाला सांगितलं. निशाच्या स्वभावाप्रमाणे तिने तशी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तशी बिनधास्त असलेली निमा जरा हिरमुसली. पण निशा गप्प होती. निमाला आई-बाबांना सांगायला निशाची मदत हवी होती. पण निशा काही बोलत नव्हती. दोनच दिवसांनी निशा निमाच्या कार्यालयात आली आणि तिने अर्जुनबद्दल निमाला सांगितलं. निमा उडालीच. निशासाठी आपल्यालाच मुलगा बघावा लागेल, असं निमाला वाटत होतं, पण ही पठ्ठी तर चांगलीच पुढे गेलीये. तिला सुचतच नव्हतं. शेवटी दोघीनींही ही गोष्ट आई-बाबांना एकत्रच सांगायचं ठरवलं. आणि दोघींचं लग्न ठरलंदेखील.

आणि मग सुरू झाली दोघींचीही घालमेल. लग्नानंतर नाही म्हटलं तरी असा पाऊस नाही अनुभवता येणार. हातातली कामं टाकून प्रत्येक वेळी नाही निघता येणार. जबाबदारी आल्यावर ‘पोरपण’ संपेल आणि मुख्य म्हणजे आपण जसं आहोत तसेच स्वीकारले जाऊ  याची खात्री नाही.. हीच तर गम्मत होती दोघींच्या नात्यातली. विरुद्ध स्वभावाच्या असूनही त्या एकमेकांसाठी होत्या. तसच या पुढेही रहाता येईल का, याबद्दल साशंकता होती.  आपले जोडिदार जरी छान असले तरी आपल्या नात्यातली ही गम्मत समजून घेतील का हे कळत नव्हतं. दु:ख नव्हतं, पण हुरहुर मात्र होती. निमासारखी मुलगीही हळवी झाली होती. याच हिवाळ्यात दोघींचीही लग्नं होतील म्हणजे हा पावसाळा शेवटचा..

हाच विचार मनात आला होता पाऊस सुरू झाल्यापासून आणि म्हणूनच निमा गाडी घेऊन निघाली होती, सगळं विसरून. तिला आत्ताच्या आत्ता निशाला भेटायचं होतं. एकत्र पावसात भिजायचं होतं. निशाही वाटच पाहात होती. तिचीही अवस्था थोडी फार तशीच झाली होती. निमाला पाहिल्यावर निशा धावतच बाहेर आली. आणि दोघीही मस्त भिजल्या पावसात. जरा पावसाचा जोर कमी झाल्यावर घरी आल्या तर तिथे विराज आणि अर्जुन आलेलेच होते. अर्जुन म्हणाला, ‘‘आम्हाला आई-बाबांनी तुमचं पावसाचं वेड सांगितलंय. तुम्हाला या वेडासकट सांभाळू आम्ही, पण आम्हालाही त्यात सामील करून घ्या म्हणजे झालं.’’ विराज हसत हसत म्हणाला आणि आनंदाने दोघी जणी नाचायच्याच काय त्या बाकी राहिल्या होत्या..

meenal.mategaonkar@gmail.com

chaturang@expressindia.com