19 October 2020

News Flash

‘मनगंगे’च्या निमित्ताने

‘‘नवीन काय अनुवाद करते आहेस?’’ मत्रिणीचा प्रश्न. आवडता विषय असल्याने त्यावर माझं भरभरून उत्तर, ‘‘अगं, ‘मनगंगेच्या काठावर’ हे एक नवीन आणि वेगळं आत्मचरित्र करते आहे.

| July 13, 2013 01:01 am

‘‘नवीन काय अनुवाद करते आहेस?’’ मत्रिणीचा प्रश्न.
आवडता विषय असल्याने त्यावर माझं भरभरून उत्तर, ‘‘अगं, ‘मनगंगेच्या काठावर’ हे एक नवीन आणि वेगळं आत्मचरित्र करते आहे. सबिता गोस्वामी या बीबीसीच्या वार्ताहर होत्या. त्या मूळच्या आसामी आहेत. आसाम आंदोलनाच्या काळात त्यांनी जीव धोक्यात घालून पत्रकारिता केली. त्यातच नवरा सिझोफ्रेनिक होता..’’
माझं पुढलं बोलणं तोडून ती एकदम म्हणाली, ‘‘हं, म्हणजे काहीतरी सनसनाटी आणि दु:खमय लिहायला ज्यांना आवडतं, अशा बायकांच्या पठडीतलं असणार हे आत्मचरित्र.’’
तिचं बोलणं, मुख्य म्हणजे त्यातील असंवेदनशीलता ऐकून मी अवाक्  झाले आणि मग निमूटपणे बोलणं आवरतंच घेतलं.
खरंच, किती सहजपणे माणसं ठप्पे मारून मोकळी होतात. सनसनाटी आणि दु:खमय जीवनाबद्दल बोलायला सोपं आहे, कारण परदु:ख नेहमीच शीतल असतं. पण तसं जीवन प्रत्यक्षात कुणाच्या वाटय़ाला आलं तर? सबिता गोस्वामींच्या मनाचा मोठेपणा हाच की, जीवनाच्या खेळात हातात जे पत्ते मिळाले ते घेऊन त्यांनी शेवटपर्यंत डाव निभावून नेला. परिस्थितीला दोष देत त्या रडत बसल्या नाहीत. मानसिक अत्याचाराच्या आणि आíथक संकटांच्या बळी त्या स्वत: होत्या आणि त्यांच्या मुलीही होत्या. अशा वातावरणात राहूनही आपल्या दोन मुलींना त्यांनी स्वतंत्र व्यक्ती म्हणून वाढवलं, त्यांना उच्चशिक्षण देऊन त्यांचा सर्वागीण विकास व्हावा, यासाठी त्या आपल्या मुलींच्या पाठीशी उभ्या राहिल्या. हे सोपं नसतं.
पण तरीही जेव्हा आत्मचरित्र लिहिण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी अत्यंत संयतपणे आणि किंचितही आक्रस्ताळेपणा न करता आपली जीवनकथा लिहिली. एके ठिकाणी त्या म्हणतात, ‘‘माझ्या पतींशी माझं नातं ‘प्रेम आणि तिरस्कार’ या प्रकारचं होतं; परंतु घटस्फोट हाही त्याला पर्याय नव्हता. भावनांची गुंतागुंत असलेल्या वैवाहिक नात्यातून बाहेर पडणं मुळीच सोपं नसतं.’’  हे वाक्य त्या अगदी सहजपणे लिहून जातात खऱ्या, पण प्रत्यक्षात त्यासाठी त्यांनी काय मोल मोजलंय याची कल्पना आपण करू शकतो.
सबिताजींचा जीवनप्रवास खरोखर चकित करणारा आहे. त्यांना लेखनाची आवड होती. लग्नानंतर घराकडे आणि मुलांकडे लक्ष देऊन आपण मुक्त पत्रकारिता करायची असं त्यांनी ठरवूनही ठेवलं होत; परंतु आपल्याच खांद्यावर संपूर्ण संसाराचं ओझं येईल आणि त्यासाठी पत्रकारिताच आपल्याला आधार देईल असं मात्र त्यांच्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं. त्या लिहितात, ‘‘आम्ही आसामात परत आलो त्यानंतर ‘ब्लिट्झ’सारख्या वृत्तपत्रात आसामबद्दल बातम्या पाठवू शकेन म्हणून संपादकांशी बोलले, तेव्हा मला समजलं की आसाम किंवा एकूणच ईशान्य भारतातील बातम्यांना ‘न्यूज व्हॅल्यूच’ नाही.’’ परंतु पुढे आसाम आंदोलन सुरू झालं, त्यातून आसाम जगाच्या समोर आला आणि सबिताजींना बीबीसीवर वार्ताहर म्हणून संधी मिळाली. त्यानंतर तर सबिताजींच्या जीवनप्रवासातलं एक पात्र म्हणूनच आसाम आंदोलन आपल्याला भेटतं. तिथली सामाजिक घडण, तिथली माणसं, राजकीय डावपेच, समस्या यांबद्दल सबिताजी इतक्या बारकाईने आपल्याला सांगतात की आपल्यापुढे एका वेगळ्याच विश्वाची दारं उघडली आहेत की काय, असा भास होतो. वेगळ्या वाटेने जाणारं हे आत्मचरित्र लिहिताना सबिताजींनी अत्यंत प्रांजळपणा आणि विनम्रता दाखवली आहे ती खरोखरच विलोभनीय आहे. लिहिता लिहिता त्या अस्सल पत्रकारितेच्या तत्त्वांविषयीही सहजगत्या सांगून जातात. आपल्या आयुष्याचं फलित काय, आसाम आंदोलनाने तिथल्या लोकांना काय दिलं? आपण जी पत्रकारिता त्या काळात केली त्यामुळे खरोखरच काही फरक पडला का? असे अनेक प्रश्न त्यांनी उभे केले आहेत. ते प्रश्न सबिताजींसोबतच वाचकांनाही अस्वस्थ करून जातात.
अनुवाद करताना नटाप्रमाणेच अनुवादकालाही परकाया प्रवेशच करावा लागतो. मूळ लेखनाने अनुवादकाला एक चौकट आखून दिलेली असते. त्या चौकटीच्या मर्यादेत राहूनच अनुवादक मूळ लेखनात आपल्या भाषेचे रंग भरतो. मूळ लेखकाला जे सांगायचं आहे तेच दुसऱ्या भाषेत तेवढय़ाच कसदारपणे सांगणं ही तारेवरची कसरत असते. म्हणूनच चांगला अनुवाद करणं ही सर्जनशील कला आहे. त्यासाठी अनुवादकाला स्वत:ही लेखक असणं गरजेचं आहे.
हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि ते वाचताना मी विस्मयचकित झाले. अनुवादाचं काम हे माझ्यासाठी काम राहिलं नाही. मला वाटलं की, सबिताजींसोबत मीही त्यांचं आयुष्य जगते आहे, एवढी मी त्या अनुवादलेखनात समरस झाले होते. पुस्तक वाचताना मला काही शंका आल्या त्यासाठी मी स्वत: सबिताजी आणि त्यांची सुविद्य कन्या त्रिवेणी माथूर यांना भेटले आणि त्या शंकांचं निरसन करून घेतलं. अशा तऱ्हेची आत्मचरित्रं म्हणजे जणू त्या त्या काळातील समाजजीवनाचा त्या त्या व्यक्तीच्या नजरेतून पाहिलेला आरसाच असतो. त्यामुळे ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा ती मोलाची ठरतात असं मला वाटतं.
राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी मला या अनुवादासाठी उत्तेजन दिलं. आव्हानात्मक अनुवाद करायला मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही. तो आनंद या पुस्तकाने मला भरभरून दिला असंच म्हणावं लागेल. कारण मुळात मूळ पुस्तकात जर आव्हान असेल तर अनुवादाचं शिवधनुष्यही उचलावंसं वाटतं. अनुवाद करताना पुस्तक बारकाईने वाचावं लागतं. कधी कधी माहीत नसलेले संदर्भ शोधावे लागतात. मला असं वाटतं की, या सर्व प्रक्रियेत एक लेखिका आणि अनुवादिका म्हणून माझ्याही जाणिवेचं क्षितिजही विस्तारलं आहे आणि मी स्वत: मनाने समृद्ध झाले आहे.
हा अनुवाद करून पूर्ण झाला तेव्हा माझा एक छानसा लेखनप्रवास संपला म्हणून मला रुखरुख लागली होती. नंतर वाचकांनी त्या प्रवासाला चांगली दाद दिली. आज त्यासंबंधी लिहिताना त्या छान क्षणांची मला पुन्हा नव्याने आठवण झाली आहे आणि माझ्या मनगंगेच्या काठावर गतजीवनाची प्रतििबबं पाहत मीही बसले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 1:01 am

Web Title: mangangechya kathavara book by savita goswami translated by savita damle
टॅग Marathi Books
Next Stories
1 माझं नववं अपत्य!
Just Now!
X