19 October 2019

News Flash

लेखिकांचे प्रमाण कमी का?

काळाच्या कोणत्याही टप्प्यावर कायमच लेखिकांची संख्या लेखकांच्या तुलनेने अत्यल्प आहे,

रेखा इनामदार साने  rekha.sane@gmail.com

‘‘लेखिकांचे प्रमाण कमी का? या प्रश्नाची मुळे खूप खोलवर दडलेली आहेत. लेखिकांच्या प्रमाणाचा हा प्रश्न केवळ वाङ्मयीन पातळीवरचा नाही. तो मूलत: सामाजिक-आर्थिक आणि स्त्रीविषयीच्या सांस्कृतिक-नैतिक मूल्यांचा प्रश्न आहे. यासाठी ही पारंपरिक मूल्यव्यवस्थाही नाकारावी लागेल.’’ – अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलन  येत्या शुक्रवारपासून,  ११ जानेवारीपासून यवतमाळ येथे  सुरू होत आहे, त्यानिमित्ताने ‘मराठी साहित्यात पुरुषांच्या तुलनेत स्त्री-लेखकांचे प्रमाण  कमी का?’ या विषयावरील समीक्षक सुधीर रसाळ आणि  रेखा इनामदार-साने यांचे  खास लेख.

‘नेमेचि येतो मग पावसाळा’ याप्रमाणे मराठी समाजमानसात आणि अभिजनांच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वपूर्ण मानला गेलेला ‘अखिल भारतीय साहित्य संमेलन’ नावाचा तीनदिवसीय उत्सव अथवा सण समीप येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने मराठी चर्चाविश्वात काही प्रश्न (पुन्हा एकदा) ऐरणीवर आले आहेत. समकालीन आणि सनातन संदर्भातही ते अत्यंत प्रस्तुत असल्याने त्यांचा वेध घेणे, ते अधोरेखित करणे आवश्यक आणि इष्ट देखील ठरेल.

यावर्षी नियम बदलल्याने विपुल आणि वैविध्यपूर्ण साहित्यनिर्मिती करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकल्या. (त्यांचे वडील कै. रा. चिं. ढेरे हे प्रकांडपंडित आणि व्यासंगी संशोधक असूनही येथपर्यंत कधीही पोचू शकले नाहीत, ही बाबही नोंद घेण्याजोगी आहे.) गेल्या नऊ दशकांत केवळ पाच लेखिकांना हा सन्मान प्राप्त झाला. वृत्ती गांभीर्याने कसदार लेखन करणाऱ्या इंदिरा संत आणि प्रभा गणोरकर अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या चक्रव्यूहात, कदाचित संबंधितांनी गळ घातली किंवा स्वत:ला मोह पडला, म्हणून जेव्हा शिरल्या, तेव्हा त्यांना तो चक्रव्यूह यशस्वीपणे भेदता आला नाही. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत,

शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष यांना अध्यक्षपद प्राप्त होण्यामध्ये, त्यांचा काळ, साहित्यक्षेत्रातील कामगिरी आणि मुख्य म्हणजे ‘तेव्हा’ समाजमानसात प्रबळ असलेले मूल्यभान यांचाही फार मोठा वाटा आहे. त्यामुळे मुळातच जे मखर पुरुषांनी आपल्या वकुबाने, मर्जीने जसे हवे तसे सजवले, रंगवले आहे आणि वर्चस्व गाजवून ते तसे राखण्यात पुरुषार्थ मानला आहे त्यामध्ये केंद्रवर्ती, ‘शोभा’दायक स्थान, त्यांच्याकडून साम, दाम, दंड आणि भेद यांपैकी कोणताही मार्ग, विधिनिषेध न बाळगता खेचून घेण्यात लेखिकांना धन्यता वाटलेली वाटत नाही. (बायकांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक उपजत शहाणपण असते, ते असे!) किंबहुना साहित्य संमलेनच नव्हे तर कोणत्याही प्रस्थापित संस्थात्मक व्यवहारापासून लेखिका दूर राहातात अथवा त्यांना हेतुपुरस्पर दूर ठेवले जाते. कारण ज्या लेखिकांचे साहित्य अर्थपूर्ण आणि ‘मूल्य’वान आहे, ते प्रचलित समाजव्यवस्थेला छेद देणारे, तिच्याशी उभा दावा मांडणारे, विद्रोही आणि बंडखोरी करणारे आहे. अशा अस्वास्थ्य आणणाऱ्या, ठाम भूमिका घेऊन यंत्रणांना खिंडारे पाडू पाहणाऱ्या कटकटीच्या लेखिकांना आपल्या संपूर्ण साहित्य-व्यवहारात काही एक स्थान आणि मान मिळणेच मुश्कील आहे. परिणामी स्त्रियांची साहित्यनिर्मिती वेगळ्याच अर्थाने खरोखर ‘स्वान्त: सुखाय’ ठरते. त्यासाठीही त्यांना निग्रह, निश्चय आणि निष्ठा बळकट ठेवावी लागते.

काळाच्या कोणत्याही टप्प्यावर कायमच लेखिकांची संख्या लेखकांच्या तुलनेने अत्यल्प आहे, असे दिसते. त्यातही ‘कविता’ आणि ‘आत्मकथन’ या दोन साहित्यप्रकारांवर लेखिकांनी आपली मुद्रा जेवढी ठळकपणे उमटवली तेवढी सरस आणि सातत्यपूर्ण कामगिरी त्यांना कथात्म साहित्यप्रकारांमध्ये साधलेली नाही. वस्तुत: तूर्तास, म्हणजे गेल्या तीन दशकांतील बाह्य़ परिस्थिती स्त्रियांना पोषक आणि प्रोत्साहक म्हणावी अशी आहे. किमान  काही वर्ग-जातींमधील बंधनाचे पाश बऱ्यापैकी सैल झालेले असतानाही लेखिकांची संख्या रोडावलेली का आढळते? भोवतालचे वातावरण स्त्रियांच्या सर्वागीण उन्नतीसाठी अंशत: का होईना पण अनुकूल आहे. आता बहुतांश स्त्रिया सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित, नोकरदार, अर्थार्जन समर्थपणे करून आपल्या व्यवसायात लौकिकही मिळवू लागलेल्या आहेत. त्यांचे अनुभवविश्व सावकाश पण निश्चितपणे विस्तारते आहे. त्या करीत असलेल्या नोकऱ्या-व्यवसायांचे प्रकारही पूर्वीपेक्षा आमूलाग्र बदलले आहेत. १९७० ते १९९० पर्यंत कुंकू, बांगडय़ा, मंगळसूत्र ही सौभाग्यचिन्हे घालावीत की नाही? बायकांनी घरकामात किती गुरफटून घ्यावे? अपत्य-संगोपनासाठी कसा आणि किती वेळ काढावा? एकंदरीतच समर्पणशीलता आणि स्वातंत्र्य यांचा (सु) मेळ कसा साधावा यावर उलट सुलट, भिन्नभिन्न मतप्रवाह होते. बाह्य़ परिस्थितील हा कोलाहल, गलबला आणि स्वत:च्या मनात परस्परविरोधी भावना विचारांची अविरत चाललेली खळबळ यांना व्यक्त रूप देण्याच्या अतीव इच्छेतून कमल देसाई,

डॉ. विजया राजाध्यक्ष, अंबिका सरकार, गौरी देशपांडे,आशा बगे, सानिया आदी लेखिकांनी आपले नवे विश्व निर्मिले आणि त्याची दखल घेण्यास अभ्यासकांना भाग पाडले. असे असले तरी ‘कादंबरी’सारखा दीर्घ पल्ल्याचा, व्यापक पैस, विस्तृत काळ – अवकाशाच्या पटावर पात्र चित्रण करणारा बहुमुखी साहित्यप्रकार त्यांच्यापैकी ज्योत्स्ना देवधर आणि आशा बगे यांचे सन्माननीय अपवाद वगळता फारसा कोणी आजमावून पाहिला नाही. गौरी देशपांडे यांनी अधिकतर लघुकादंबऱ्या लिहिल्या. सानिया यांनी जेवढे कथालेखन केले त्या मानाने ‘कादंबरी’च्या शक्यता त्यांनी पडताळून पाहिल्या नाहीत. ‘स्थलांतर’, ‘आवर्तन’ आणि ‘अवकाश’ अशा तीनच कादंबऱ्या त्यांच्या नावावर जमा आहेत. उत्तरकालीन लेखिका मल्लिका अमर शेख, मेघना पेठे आणि कविता महाजन यांच्याबाबतीतही हेच म्हणता येईल. आजही माधुरी शानबाग, रेखा बैजल, प्रतिमा इंगोले असे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच अपवाद वगळले तर लक्षणीय कादंबरीकार लेखिका सांगता येत नाही.

खरे तर अंत:स्थ आकांताने समाजाला सांगावे असे पुष्कळ काही सुखावणारे आणि त्याहून कितीतरी पटीने अधिक दुखावणारे, ठसठसणारे सल स्त्रियांच्या अंत:करणात असूनही ही बोच परोपरीने प्रकट करावी, वाचकांनाही ती टोचणी तीव्रतेने लावावी असे लेखिकांना का वाटत नाही? का कथात्म साहित्याच्या क्षेत्रात मुक्त संचार करण्याचा आत्मविश्वास, स्वत:च्या व्यावहारिक अनुभवांना सौंदर्यानुभवात संक्रमित करण्यासाठी लागणारी कलामाध्यमावरील त्यांची हुकमत, पकड अजूनही पुरेशा प्रमाणात दृढ झालेली नाही? विषयांच्या दृष्टीने विचार केला तर लेखिकांच्या कक्षा विवाह, कुटुंब-त्यामुळे नातेसंबंधांत उत्पन्न होणारे ताण आणि पेचप्रसंग एवढय़ापुत्या मर्यादित राहातात. परंतु त्यातील गाठी-निगरगाठी उकलण्याचा प्रयत्न त्या कसोशीने करतात, याचे श्रेयही त्यांना अवश्य  द्यायला हवे. इतकेच नव्हे तर अगदी अलीकडच्या, पिढीतील बदलत्या जीवनजाणिवांचे, आंतरिक चढ-उतारांचे आणि मानसिक हेलकाव्यांचे दर्शन घडविणाऱ्या मनस्विनी लता रवीन्द्र, कल्पना दुधाळ, शिल्पा कांबळे यांच्यासारख्या लेखिकांचे कथाविश्वही, त्यातील अपरिचिततेने लक्ष वेधून घेणारे आहे.

संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्टय़ा नाटककार स्त्रिया तर नगण्यच आहेत. इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, मधुगंधा कुलकर्णी आणि ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आठवणींची गोष्ट अर्थात ‘माझ्या आठवणींचा फड’, ‘बया दार उघड’ असे एकपात्री नाटय़प्रयोग चिवटपणे करीत राहाणाऱ्या सुषमा देशपांडे यांचे यश उल्लेखनीय आहे. नाटकासारख्या संमिश्र स्वरूपाच्या कला-साहित्यप्रकाराला ‘प्रयोगा’शिवाय पूर्णत्व लाभत नाही. निर्माता, दिग्दर्शकापासून  ते नट – नटय़ांपर्यंत संच जमवणे, तो कायम राहील हे बघणे, असंख्य व्यावहारिक व्यवधाने सांभाळताना तालमींपासून प्रत्यक्ष प्रयोगांपर्यंत नाटकाचे कलामूल्य अबाधित राखणे, जमा-खर्चाकडे लक्ष ठेवणे ही तारेवरची कसरत स्त्रियांना जड जाते. तरीही रंगमंच, नेपथ्याबाबतची लवचीकता, सामाजिक परिवर्तनाच्या लढय़ाशी, चळवळीशी जोडलेपण, समानधर्मी नटसंचाची उपलब्धी आणि विजय तेंडुलकरांसारख्या ज्येष्ठ नाटककाराने दिलेली दाद विशेषत: मनस्विनी लता रवींद्र यांना उपकारक ठरली. मनस्विनी आणि मधुगंधा या दोघींनी व्यावसायिक नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या क्षेत्रात उडी घेऊन तेथेही आपला जम बसविला आहे, दैनंदिन लेखनातील तत्परता आणि सफाईदारपणा त्यांनी कमावला आहे, मुळात भुसभुशीत असलेल्या खेळपट्टीवर त्या टिच्चून टिकून राहिल्या आहेत, भविष्यात त्यांचा खेळ अधिक बहरेल. एवढेच नव्हे तर ताज्या दमाच्या नव्या खेळाडू अवतरतील आणि आपल्या वेगळ्या क्षमता दाखवून देतील. अशी आशा करायला हरकत नाही. कादंबरी आणि नाटक यांच्या तुलनेने कथा म्हणजे (सुसूत्र) गोष्ट लिहिणाऱ्या लेखिकांची संख्या पुष्कळ असली तरी नीरजा, प्रज्ञा दया पवार, मोनिका गजेंद्रगडकर असे काही मोजके अपवाद वगळले तर संस्मरणीय ठरेल असे कथालेखन कोणाच्या हातून होताना आढळत नाही. त्यातही क्षोभनाटय़ मूर्त करणाऱ्या कुटुंबकथांच्या मानाने अद्भुतिका किंवा कल्पना रम्यतेच्या अंगाने जाणारी, भविष्यवेध घेणारी विज्ञानकथा वा नारायण धारपांचा वारसा सांगणारी गूढकथा/ भयकथा ही जवळजवळ लोप पावलेली आहे. विनोदी लेखनात इंद्रायणी सावकार, मंगला गोडबोले हे सन्मानीय अपवाद वगळले तर विनोदी कथालेखन स्त्रियांनी केलेले फारसे आढळत नाही.

एकूणच बायका बोलतात खूप, पण लिहितात कमी अशी स्थिती आहे. आता ‘बोलत्या व्हा’ आणि ‘लिहित्या (ही) व्हा’ असे सांगण्याची नितांत गरज आहे. तसेच एकीकडे समाजमाध्यमांवर उत्स्फूर्तपणे अभिव्यक्त होणाऱ्या, स्वत:वर आणि भवतालावर ललितरम्य, आत्मपर काही वेळा टीकात्मकही लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत. परंतु या लेखनाचे स्वरूप बव्हंशी स्फुट, स्वैर आणि प्रतिक्रियात्मक असते. ते जसे जोमाने परसते, तसेच वेगाने विरतेसुद्धा! हेच कवितेच्या संदर्भातही म्हणावे लागेल. कविता करणे, शब्द जुळवून ते विशिष्ट लयीत बांधणे, म्हणणे आणि ‘कवयित्री’ असणे या दोन्हींमध्ये केवढे तरी अंतर आहे. पहिला पर्याय आवड, छंद म्हणून कौतुकाचा विषय असतो. दुसरा पर्याय अपरिहार्य, अंगभूत असतो. तेथे सवड, निवड यांचा सवालच नसतो. कवितेची वाट वरवर दिसायला सोपी पण आतून अतोनात निसरडी, पदोपदी खाचखळग्यांची, भास भ्रमांनी विस्मय उत्पन्न करणारी असते. उत्कट भावनेचा उत्स्फूर्त उद्गार अथवा आविष्कार असे कवितेचे स्वरूप असल्याने ती विपुल प्रमाणात लिहिली जाते. स्त्रियांना ती जवळची आणि सुलभ वाटते हे स्वाभाविक असले तरी अल्पाक्षरबहुल, अर्थगर्भ आणि सूचक कवितांनी रसिकांच्या मनात वर्षांनुवर्षे घर करणाऱ्या कवयित्रीही अभावानेच आढळतात, ही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे. अनुराधा पाटील, प्रभा गणोरकर, अश्विनी धोंगडे, रजनी परुळेकर, नीरजा, आसावरी काकडे, आश्लेषा महाजन यांच्या कविता, त्यांची शीर्षके जशी उद्धृत करता येतात तशी लखलखीत स्मरणे आता अल्प आहेत. पण त्याच वेळी हेही  आवर्जून नमूद करावेसे वाटते की हा लेख लिहिताना शब्दमर्यादेमुळे सर्वच लेखिकांची नावे घेता आलेली नाहीत.

सोशिकता, त्याग आदी पारंपरिक मूल्यांचे उदात्तीकरण ओसरल्याने गेल्या दशकात आपली कैफियत चव्हाटय़ावर निर्भयपणे मांडणाऱ्या आत्मकथनांची संख्याही हळूहळू कमी होत चालली आहे. एकेकाळी पुरुषसत्ताक व्यवस्थेने दबल्या वा दाबल्या गेलेल्या गुणी स्त्रियांची घुसमट चित्रित करणारी, ‘आहे मनोहर तरी’, ‘बंध – अनुबंध’, ‘नाच गं घुमा’, ‘आयदान’ आदी आत्मकथने चर्चाविषय ठरली. आता परिस्थितीच्या रेटय़ाने का होईना पण रूढी आणि संकेत निर्थक ठरले आहेत. दिवसेंदिवस विघटित, शतखंडित होत चाललेल्या समाजात तथाकथित प्रगतीचा वेग, झपाटा अनावर होत असताना प्रचलित मूल्यसरणी (सुद्धा) डळमळीत आणि प्रश्नचिन्हांकित होते आहे. आरक्षणाच्या लाभाने वंचितांना, शोषितांनाही सुस्थिर केले आहे. त्यामुळे त्यांच्या दु:खाची आणि विद्रोहाची धारही बोथट झाली आहे.

याआधी म्हटल्याप्रमाणे सध्याची बाह्य़ परिस्थिती लेखिकांना बऱ्यापैकी अनुकूल असली तरी बहुसंख्य स्त्रिया दैनंदिन, चाकोरीबद्ध आणि रटाळ दिनक्रमात अडकलेल्या असतात. त्यातच त्यांची इतकी सारी शक्ती, वेळ आणि पैस खर्ची पडतो की शारीरिक – मानसिकदृष्टय़ा त्या वयाच्या साठीपर्यंत थकून जातात. त्यामुळे एक हाती, एकाग्र चित्ताने लेखन-वाचनाची साधना (व्यावहारिक यशापयशाची अजिबात शाश्वती नसताना) चालू ठेवणे, ही बाईच्या आंतरिक सामर्थ्यांची जणू कसोटीच ठरते. वास्तव आणि कल्पित यांचा मेळ घालून नवी सृष्टी निर्माण करण्यासाठी केवळ वेगळे काहीतरी सुचणे, स्फुरणे पुरेसे नसते तर प्रतिभेलाही बहुश्रुतता, व्यासंग यांची जोड लागते. तिच्यावर योग्य ते संस्कार व्हावे लागतात तरच भाषेला हवे तसे वाकवता येते, स्वत:ची छाप पाडणारी शब्दकळा आणि शैली यांच्या साहाय्याने ‘आपला’ आशय गवसतो आणि तो वाचकांपर्यंत पोचवता येतो. परंतु कित्येक हौशी लेखिका स्वत:वर इतक्या निहायत खूश असतात की आपण ज्या विशिष्ट परंपरेतील दुवा आहोत, तिचेही समग्र भान त्यांना असत नाही. मुळात, आपण पूर्वकालीन आणि समकालीन, मराठी आणि अन्य भाषकांचे साहित्य नित्यनेमाने वाचले पाहिजे, त्यावर विचार करण्याइतका अवसर स्वत:ला द्यायला हवा, कोणत्याही लेखकाला हा रियाज आवश्यक असतो याचे नीट भान नसल्याने अपुऱ्या दिवसांची जन्म घेतलेली, पुरेसे भरणपोषण न झालेली अपत्ये, अर्ध्या -कच्च्या लेखनाच्या रूपात दृष्टीस पडतात तेव्हा त्यातील सहानुभूतीने पाहाण्यावाचून गत्यंतर उतर नाही. म्हणून लेखिकांच्या साहित्यामध्ये क्षोभ आहे, परंतु त्यातून उत्तम क्षोभनाटय़ाचा मानदंड त्यांना सहसा निर्मिता येत नाही. त्यांच्या ठायी विनोदबुद्धी आहे परंतु त्यातून अखंड हास्यनिर्मिती करणारी साहित्यकृतीही दिसत नाही आणि स्त्रीजीवनाला लगडलेले कारुण्य तर उपजत आहे तरी त्यातून उत्तम शोकान्तिकेचा जन्म झालेला नाही.

एका बाजूने हे असमाधान व्यक्त करीत असताना दुसऱ्या बाजूने, याच समूहाच्या संवेदनशील घटक म्हणून हेही जाणवते की बऱ्या-वाईट कोणत्याही अर्थाने स्वच्छंदी आणि आत्मनिर्भर जगण्याची संधी आणि मुभाच मिळत नसल्याने पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या अनुभवांची उपलब्धीच मर्यादित राहाते. म्हणजे रात्री-अपरात्री रस्त्यावरून साधे हिंडणे-फिरणे ही गोष्ट बाईला अजूनही शक्य होत नाही, तर त्याचे वर्णन ती निव्वळ ‘कल्पने’ने किंवा कल्पकतेने किती आणि कसे करेल! पारंपरिक आणि आधुनिक जीवन पद्धतींच्या टकरावातून उत्पन्न होणारे अनंत पेचप्रसंग, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिवादाने मिळालेल्या संधी, तशीच ओढवणारी संकटेसुद्धा, कुटुंबांतर्गत श्रमविभागणी, पालकत्वामुळे होणारी गोची, लैंगिक शोषणाच्या नाना तऱ्हा, जाती-धर्मामुळे आजही भोगावे लागणारे जीवघेणे दु:ख अशा साक्षात रणभूमीवर स्त्रिया प्रत्यही लढत, झगडत आहेत. कोणासहित वा विरहित या भूमीवर भक्कमपणे पाय रोवून उभ्या आहेत.  येथे त्यांच्या आसपास सर्वत्र ठासून भरलेले कितीतरी सुरुंग पेरलेले आहेत. आता फक्त प्रतीक्षा आहे ती त्यांनी निर्भयपणे त्यांना काडी लावून स्फोट घडविण्याची आणि असे करताना आपणच त्यात भस्मसात होणार नाही, इतपत अंतर राखण्याची! एकदा का या अंतराचा अचूक अंदाज आला की मग त्यांच्या आत्मशोधाच्या स्वयंप्रकाशी वाटा उजळतील आणि भविष्यात इतरांनाही मार्ग दाखवतील मग लेखिकांचे अस्तित्व कोणत्याही प्रयत्नांविना, आपोआप सिद्ध होईल, यात शंका नाही.

chaturang@expressindia.com

First Published on January 5, 2019 4:48 am

Web Title: marathi women writers 92nd marathi sahitya sammelan