‘‘आमच्या नात्यांचा गोफ आता चांगलाच विणला गेला आहे. केवळ आनंदाचे प्रसंग, समारंभ मिळून साजरे करण्यातून हे होत नाही, तर दु:खाचे किंवा कठीण प्रसंग, सत्त्व पाहणाऱ्या घटना यातून एकमेकांना सावरणे, सांभाळणे व एकूणच कठीण गणिते साथीने सोडवणे, यातून नात्यांचा गोफ जास्त घट्ट विणला जातो. याचा आम्ही अनुभव घेतला. आता आयुष्याच्या संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात आवडीची कामे करण्यातला आनंद घेणे चालू आहे.’’ शास्त्रज्ञ, संशोधक, लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या काहीशा हटके, कौटुंबिक रूपांबद्दल, आणि त्यांच्या ४८ वर्षांच्या सहजीवनाविषयी सांगताहेत त्यांच्या गणितज्ञ पत्नी डॉ. मंगला नारळीकर.
महिना असेल जून किंवा जुल. १९६० मधला. ‘केसरी’च्या एका पानावर विविध परीक्षांत प्रावीण्य मिळवलेल्या यशस्वी लोकांचे फोटो, परिचय होते. त्यात माझा म्हणजे मंगला राजवाडेचाही होता. मुंबई विद्यापीठात इंटर आर्ट्सच्या परीक्षेत पहिला क्रमांक आला व अनेक बक्षिसे मिळाली, म्हणून. त्याच पानावर माझ्यापेक्षा खूप मोठा पराक्रम केलेल्या तरुणाचाही फोटो व माहिती होती.    जयंत नारळीकर या तरुणाने केम्ब्रिज विद्यापीठाच्या परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले, स्टार रँगलर झाला, शिवाय त्याच्या वडिलांनी अनेक वर्षांपूर्वी मिळवलेले पारितोषिक मिळवले, अशी माहिती होती. माझ्या आजोबांनी (श्री. द. चितळे) ते वर्तमानपत्र माझ्या आईला दाखवून म्हटले, ‘‘मंगलसाठी हा वर योग्य दिसतो आहे.’’ इंटर आर्ट्सच्या परीक्षेत मी मुंबई विद्यापीठात पहिली आले होते. पहिल्या वर्गात मी एकमेव होते. आजी-आजोबांसकट लोकांना माझ्यासाठी माझ्याहून हुशार नवरा शोधण्याची जबाबदारी वाटत होती. आजही विवाह जमवताना वधूपेक्षा वर अधिक शिकलेला, कर्तबगार असावा असं अनेक लोक मानतात. पन्नास वर्षांपूर्वी तर हे त्याहून सर्वमान्य होतं. त्या वेळी जयंत केम्ब्रिजमध्ये शिकत होता, मला तर एम.ए. होईपर्यंत लग्नाचा विचारच करायचा नव्हता. पण आईने ही गोष्ट लक्षात ठेवली होती. पुढे १९६४ मध्ये ‘हॉइल नारळीकर’ यांची नव्या रीतीने मांडलेली गुरुत्वाकर्षणाची थिअरी एकदम प्रसिद्धीला आली, जयंत नारळीकर हे नाव खूपच प्रकाशात आलं. भारतीय व्यक्तीने पाश्चात्त्य जगात केलेला पराक्रम भारतात नेहमीच जास्त भाव खाऊन जातो, तसं घडलं. मी त्या वेळी माझी एम.ए.ची पदवी व कुलगुरूंचे सुवर्णपदक मिळवून ‘टीआयएफआर’ या संस्थेत गणित विभागात संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतला होता. आमच्या  हितचिंतकांनी मी एम.ए.चा अभ्यास करत असतानाच माझ्यासाठी योग्य वरांची यादी काकांना दिली होती, त्यात जयंत नारळीकर हे नाव होते व त्याचा विचारही आई व काका काकूंनी केला होता. आता जयंतला एवढी प्रसिद्धी मिळाल्यावर, त्याचं वय आणि अविवाहित असणं यामुळे तो ‘एलिजिबल बॅचलर नंबर १’ झाला. अनेक लोकांनी त्याची व माझी जोडी जमवून टाकली. काही लोकांना राजवाडय़ांच्याकडे असा प्रस्ताव आहे याची कुणकुण असावी, त्यामुळे त्यांनी हे लग्न ठरलंच असल्याचं सांगायला सुरुवात केली. त्याचा परिणाम मात्र विचित्र झाला..
डिसेंबर १९६४ मध्ये जयंत ‘सीएसआयआर’च्या आमंत्रणावरून भारतात आला, तेव्हा त्याचे प्रत्येक शहरात प्रचंड स्वागत झाले. त्या प्रसिद्धीने व अनेक व्याख्याने, सत्कार समारंभ या सर्वानी तो भांबावून गेला, हतबुद्ध झाला. त्यातच लग्नाचे प्रस्तावही होते. त्याने त्याच्या पालकांना सांगून टाकले होते की या ट्रीपमध्ये तो वधूसंशोधन मुळीच करणार नाही. राजवाडय़ांकडून माझ्यासाठी प्रस्ताव नारळीकरांकडे गेल्यावर माझे मामा बा. श्री. चितळे व काका बाळासाहेब राजवाडे हे भेटायला गेले, तेव्हा त्यांना नारळीकरांकडून रागाचे वाक्प्रहार मिळाले. त्या लोकांचा असा समज झाला होता की, हा विवाह ठरल्याची राजवाडय़ांनी मुद्दाम अफवा उठवली आहे. त्यामुळे आणखी वेगळ्या मुली सांगून येऊ नयेत ही त्यांची युक्ती आहे. माझे काका व मामा सुन्न झाले. काका म्हणाले, ‘हा गरसमज आहे, पण आता या ठिकाणी आपण हा प्रस्ताव रद्द करू. पुढे तुम्हाला हवे तर तुम्हीच आम्हाला पत्र लिहा.’ मामाने त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, अशी अफवा मुलीचे लोक उठवणार नाहीत, कारण अशा अफवेचा वधूला जास्त धोका असतो. पहिल्या भेटीतले असे गरसमज व रागावणे झाल्यावर मामाला माझी चिंता वाटत होती, की मी ही गोष्ट मनाला लावून घेईन. पण हे सगळं समजल्यावर मला वाईट वाटण्याऐवजी यातला विनोद जाणवून हसू आलं हे पाहून तो नििश्चत झाला. १९६५च्या डिसेंबरमध्ये जयंत परत भारतात आला, त्या वेळी वधुसंशोधन करायचे ठरले होते. तोपर्यंत मी रिसर्च स्टुडंटची रिसर्च असोसिएट होऊन गणिताचा अभ्यास, संशोधन करत होते. पुढे नारळीकरांच्या लक्षात आले की आणखी एक-दोन शहरांत, जिथे त्यांच्या मते योग्य अशी उपवर, हुशार मुलगी लोकांना माहीत होती, तिथे तिचा जयंतशी विवाह ठरल्याची अफवा उठली होती. ऑक्टोबरमध्ये जयंतच्या वडिलांचे अजमेरहून काकांना पत्र आले. त्यांनी मला तिथे भेटण्यास बोलावले. मी नोव्हेंबरमध्ये मामाबरोबर जाऊन आले. नंतर डिसेंबरमध्ये जयंत आल्यावर त्याला भेटायला काकांबरोबर गेले. नंतरची गोष्ट जयंतच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या पुस्तकात आहे.
लग्न झाल्यावर केम्ब्रिजमध्ये घर सजवणं, स्वयंपाक फारसा येत नव्हता तो शिकणं, नवे मित्रमत्रिणी, विविध ऋतूंमधला निसर्ग न्याहाळणं, प्रवास हे करता करता जमेल तेवढा गणिताशी संबंध ठेवला. श्रीलंकेहून आलेल्या नलिनचंद्र व प्रिया विक्रमसिंह या दुसऱ्या नवविवाहित जोडप्याशी आमची खास दोस्ती झाली. अनेकदा आम्ही बरोबर भटकणे, नदीवर जाणे, बठे खेळ खेळणे अशा गोष्टी करत असू. एकदा जयंतने प्रियाबरोबर पज लावली होती. चंद्र व जयंत यांचा न्यूझीलंडहून आलेला मित्र ब्रेंट विल्सन याने आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली होती म्हणे. एकदा त्याला व न्यूझीलंडच्या एका तरुणीला बरोबर िहडताना पाहून प्रियाने तर्क बोलून दाखवला, की यांचे लग्न होणार. जयंतचा आपल्या मित्राच्या शपथेवर विश्वास होता. जर एक वर्षांच्या आत प्रियाचा तर्क बरोबर ठरला, तर ती जिंकणार अन्यथा जयंत जिंकणार असे ठरले. पजेची अट मजेदार होती. प्रिया हरली, तर तिने आम्हा चौघांना चांगल्या फ्रेन्च रेस्तराँमध्ये जेवण द्यायचं, जयंत हरला तर त्याने स्वत: आम्हा चौघांसाठी जेवण बनवायचं. ती पज प्रिया जिंकली. कारण सहा महिन्यांतच ब्रेंट व त्याची मत्रीण यांच्या विवाहाचे आमंत्रण आले. पजेच्या नियमाप्रमाणे जयंतने स्वत: जेवण बनवून खिलवायला पाहिजे, असं प्रिया म्हणाली. जयंतला स्वयंपाक येत नव्हता, म्हणून त्याने ऑम्लेट टोस्टचे साधे ‘जेवण’ देऊन दुसऱ्या दिवशी फ्रेंच रेस्तराँमध्ये जेवायला नेतो अशी पळवाट काढायचा प्रयत्न केला. चंद्राला ते मान्य होतं, पण प्रिया हटून बसली. पजेच्या अटीप्रमाणे जयंतने आम्हा चौघांसाठी जेवण बनवायलाच पाहिजे म्हणून. मला हसू येत होतं. त्या वेळी मी कुणाचीच बाजू घेतली नाही. त्याची बाजू घेऊन प्रियाशी वाद घातला नाही, म्हणून जयंत माझ्यावर रागावलादेखील. अखेर अटीप्रमाणे जेवण बनवण्याचे ठरवून काही दिवस रोज माझ्याजवळ भातात पाणी किती घालायचं, कणीक कशी भिजवायची, चिकन करी कशी करतात हे शिकत होता. ठरल्या दिवशी त्याने चांगलं चार कोर्सचं जेवण बनवलं. प्रथम खरबुजाचे स्लाइस, त्यानंतर चिकन करी, पुलाव, पुऱ्या व आलू दम असा मेनू असलेलं जेवण होतं. त्यापकी आलू दम हा पदार्थ बटाटे उकडून सोलून, आतून कोरून त्यात मटार भरून बनवला होता. मीदेखील तसे बटाटे कधी बनवले नव्हते. स्वीट डिशसाठी फ्रूट सॅलड व आइस्क्रीम, नंतर कॉफी. हे मात्र त्याने बनवलेले एकमेव पूर्ण जेवण. त्यानंतर न झेपणाऱ्या पजा घेऊ नयेत हा धडा त्याने घेतला, तो कायमसाठीच. मला मात्र वेगवेगळे पदार्थ करून पाहायला उत्तेजन देत असे.
आमच्या दोघांच्या सहजीवनातला आणखी एक गमतीशीर किस्सा आठवतोय. मुंबईत असताना मी मोटार चालवण्याचं लायसन्स घेतलं होतं. पण इंग्लंडमध्ये ड्रायिव्हगची परीक्षा खूप कठीण असते याचा अनुभव घेतला. मोटार ड्रायिव्हग स्कूलच्या शिक्षकाकडून २४ लेसन घेऊनसुद्धा पहिल्या वेळी मी नापास झाले. तेव्हा माझी समजूत काढताना जयंतने सांगितले की तो तर तीन वेळा या परीक्षेत नापास झाला होता. मग सौ. हॉइलच्या आईंनी त्यांच्या जुन्या गाडीवर भरपूर सराव दिला, तेव्हा तो पास झाला. मग त्याने मला घरच्या छोटय़ा हिल्मन इम्प गाडीवर सराव दिला व मी दुसऱ्या प्रयत्नात पास झाले.
गीता व गिरिजा या आमच्या दोन मुली केम्ब्रिजमध्ये जन्मल्या. १९७२ मध्ये माझे सासरे निवृत्त होणार होते, आई-वडिलांना आधाराची अपेक्षा आहे, तो पुरवायचा हा जयंतचा बेत मला मान्य होता. माझ्या माहेरी एकत्र कुटुंबाचे फायदे आम्ही अनुभवले होते. मुलींना भारतात वाढवणं अधिक चांगलं वाटत होतं. जयंतने टीआयएफआरमध्ये प्राध्यापकाचे पद घेतले. सप्टेंबर १९७२ मध्ये दोन लहान मुलींना घेऊन आम्ही मुंबईत आलो. ऑक्टोबर मध्ये आम्ही ‘टीआयएफआर’च्या कॉलनीमध्ये राहायला आलो. दोन बेडरूमचा फ्लॅट उपलब्ध होता. स्वयंपाकाचा गॅस, दुधाचे कार्ड, टेलिफोन या सगळ्यांसाठी बरेच प्रयत्न करावे लागले. पाश्चात्त्य देशातून आल्यावर या गोष्टींची टंचाई अजब वाटत होती. मार्च १९७३ मध्ये ताई व तात्यासाहेब पुण्याहून आमच्या घरी कायमचे राहायला आले. ते अनेक वष्रे खूप मोठय़ा घरात राहिले होते, भरपूर सामान होते. आता मुंबईच्या दोन बेडरूमच्या घरात आम्ही चौघे व हे दोघे असे सहा जण राहणार. बरेचसे सामान कमी करायला हवे यासाठी जयंतने त्यांना फार चांगले उदाहरण दिले. महाभारतातील युद्धाच्या वेळी दुर्योधन व अर्जुन कृष्णाकडे मदत मागायला गेले, तेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणाला, ‘मला तू फार प्रिय आहेस, फक्त तू माझ्याकडे ये, दुसरं काही आणू नको.’ त्याची आठवण देऊन ‘तुम्ही दोघे या, फारसे सामान आणायची जरुरी नाही’ असे त्याने सांगितले. १९८९ पर्यंत आम्ही मुंबईत होतो, त्याच काळात ‘लीलावती’चाही जन्म झाला.
मुंबईत ‘टीआयएफआर’च्या कॉलनीत राहायला आल्यावर माझा मोठा फायदा असा झाला, की मी माझ्या जुन्या डिपार्टमेंटमध्ये चटकन जाऊ शकत होते. मुली शाळेत गेल्या की, घरचं काम उरकून रस्ता ओलांडून ‘टीआयएफआर’मध्ये पोहोचायचं. एक वाजण्यापूर्वी परत येऊन फुलके भाजायचे, कारण आम्ही चौघे त्या वेळी एकत्र जेवत असू. फावल्या वेळात पुन्हा गणितात संशोधन चालू करण्याची उत्तम संधी होती. ती मी साधली. जुने मार्गदर्शक सोडून गेलेले, माझ्या अभ्यासात खंड पडलेला, पण मी पुन्हा नव्या विद्यार्थ्यांबरोबर लेक्चर्सना जाऊ लागले. जरा वेगळ्या शाखेत रस वाटू लागला व प्राध्यापक रामचंद्र यांच्या ग्रुपमध्ये काम करू लागले. लेक्चर्सच्या वेळा माझ्या सोयीने ठरवल्या जात व माझा अभ्यास परत चालू झाला. सावकाश एक चांगला प्रश्न सुटला आणि अखेर मला पीएच.डी. मिळाली. सहा जणांचा संसार, मुली, पाहुणेरावळे, सगळं सांभाळून केलेला अभ्यास जरा सावकाश झाला. माझ्या पीएच.डी. मिळवण्याची तुलना मी श्रावणात सांगितल्या जाणाऱ्या सोमवारच्या कहाणीतल्या म्हातारीच्या खुलभर दुधाशी करते. घरच्या सगळ्यांच्या गरजा पुऱ्या झाल्यावर तिने उरलेलं खुलभर दूध मंदिरात घातलं व त्याने गाभारा भरला, तसं काहीसं हे झालं. जयंतचं सहकार्य अर्थात होतं. मुलींच्या संगोपनात आणि घरकामातदेखील तो न कंटाळता मदत करत असे. मुंबईत आल्यावर जयंतने विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली. त्याच्या कथांची व एकूणच सामान्य माणसांसाठी केलेल्या लिखाणाची बहुधा मी पहिली वाचक असते. मला जर एखादी कल्पना समजली नाही किंवा वेगळ्या प्रकारे द्यावी असे वाटले तर तसा विचार होतो. लिखाण नक्की जास्त सुबोध होते.
पुढे १९८९ मध्ये आम्ही पुण्याला राहायला आलो. ‘आयुका’ संस्थेच्या स्थापनेची जबाबदारी जयंतवर होती. ‘आयुका’चे सुरुवातीचे दिवस खूप उत्साहाचे, नवीन संस्था निर्माण करण्याचा आनंद देणारे होते. सुदैवाने सहकारीदेखील उत्तम होते. काही प्रश्न उभा राहिला तर सर्व जण मिळून त्याचा सामना करत. बजेटमध्ये संस्था जास्तीतजास्त उत्तम उभी करायची, आधुनिक सामग्री मिळवायची यासाठी सगळे झटत होते. इथे जयंतचा केम्ब्रिजच्या खगोलसंस्थेचा व ‘टीआयएफआर’चा अनुभव उपयोगी पडला. पारदर्शक पद्धतीने सहकारी नेमणे, त्यांना योग्य उत्तेजन देऊन, त्यांच्यावर जबाबदारी टाकून त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे यामुळे ‘आयुका’ची प्रगती चांगली झाली. चार्ल्स कोरियासारख्या वास्तुशास्त्रज्ञाने रचना केलेली आयुकाची वास्तू प्रेक्षणीय आहेच, महत्त्वाचे म्हणजे संस्थेची जी उद्दिष्टे ठरवली होती, ती चांगल्या प्रकारे साधली गेली. अनेक लोकांनी भेटी दिल्या, समाधान व्यक्त केले. सर्वाचे लाडके पु. ल. देशपांडे व सुनीताबाई संस्था पाहायला आले तेव्हा ते खूश झाले व नंतर सुनीताबाईंनी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानशोधिका बांधण्यास मोठी देणगी दिली. ‘आयुका’च्या घडणीमध्ये सगळे सहकारी व त्यांचे कुटुंबीयदेखील सहभागी होते. त्या सर्वाना श्रेय द्यायला हवे.
निवृत्त होण्याच्या किंचित आधीच आमचे सामान स्वत:च्या फ्लॅटमध्ये हलवले व जयंत निवृत्त होताच आम्ही प्रवासाला गेलो. डायरेक्टर असताना अधिक काळासाठी परदेशी जाणे योग्य नव्हते, पण आता वर्षभरासाठी जयंतने पॅरीसच्या ‘कॉलेज दी फ्रान्स’चे आमंत्रण स्वीकारले व आम्ही आधी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडचा प्रवास करून तिथे गेलो. पूर्वीदेखील आम्ही अनेक देशांचा प्रवास केला होता. त्या वेळी मुलींच्या शाळांची सुट्टी, भारतात ताई-तात्यासाहेबांची व्यवस्था ही व्यवधाने पाहावी लागत. आता मुलींची लग्ने झाल्याने आम्ही घरी दोघेच असल्याने प्रवास जरा सोपा झाला. पॅरीसमधील वर्षभराचे वास्तव्य संस्मरणीय होते. नवरा शास्त्रज्ञ असल्याने अनेक देशांचा प्रवास व निवास सहज झाला, त्याने माझ्या अनुभवकक्षा रुंदावल्या. नेहमीपेक्षा वेगळ्या देशांच्या भेटींची वर्णने ‘पाहिलेले देश, भेटलेली माणसे’ या माझ्या पुस्तकात आली आहेत.
लवकरच आमच्या लग्नाला ४८ वष्रे होतील. नात्यांचा गोफ चांगलाच विणला गेला आहे.  केवळ आनंदाचे प्रसंग, समारंभ मिळून साजरे करण्यातून हे होत नाही, तर दु:खाचे किंवा कठीण प्रसंग, सत्त्व पाहणाऱ्या घटना यातून एकमेकांना सावरणे, सांभाळणे व एकूणच कठीण गणिते साथीने सोडवणे, यातून नात्यांचा गोफ जास्त घट्ट विणला जातो. याचा आम्ही अनुभव घेतला. प्रियजनांचे मृत्यू, गंभीर आजार, क्वचित अवमानकारक प्रसंग यांचा सामना बहुतेकांना केव्हातरी करावा लागतो. आम्हालाही याचे अनुभव आले. त्यातून एकमेकांच्या सहकाराने नीट बाहेर पडलो. आता संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात आवडीची कामे करण्यातला आनंद घेणे चालू आहे. मला गणित शिकवायला, त्याची भीती घालवून गोडी निर्माण करायला आवडते. ‘बालभारती’च्या गणिताच्या पाठय़पुस्तक लेखनात अलीकडे माझा सहभाग असतो. जयंतचे संशोधन सावकाश चालू असते. विज्ञान व गणित यावर सामान्य माणसांसाठी रोचक लेखनही चालू आहे. अधूनमधून लेक्चर देण्यासाठी प्रवास होतो. घरात शाली व लाकूड, चकचकीत धातू, काच व प्लास्टिक यांनी बनवलेली मानचिन्हे खूप जमा झाली आहेत. शाली ज्या लोकांना उपयोगी येतात, त्यांना देता येतात. मानचिन्हे मात्र त्यांच्यासाठी केलेल्या कपाटाच्या बाहेर ओसंडतात.
आज विसराळूपणा आम्हाला दोघांनाही जाणवतो, मग एकमेकांना आठवण करायला सांगतो. नातवंडं आली की अनेकदा आजोबांच्या चष्म्याची केस शोधणं हे त्यांचं काम असतं. त्यांना आजोबांकडून गोष्टी ऐकायला आवडतं. नातवंडांबरोबर वेळ घालवता येणे हा वृद्धपणाचा बोनस आहे, त्याचा आम्ही आनंद घेतो आहोत..