22 April 2019

News Flash

स्वातंत्र्य आणि स्वावलंबन

‘मी’ची गोष्ट

(संग्रहित छायाचित्र)

विशाखा गोखले

जेव्हा त्याला खूप काम असतं तेव्हा मी घर सांभाळते, कधी मी कामात खूप व्यग्र होते तेव्हा तो घराकडे जास्त लक्ष देतो. कोणतीही जबाबदारी कोणा एकाची नसून दोघांची असल्याने कोणाचंही अडत नाही. त्यामुळे संसार करत असूनही आमचं वैयक्तिक असं आयुष्यही आम्ही जपलं आहे

गोष्ट ‘मी’ची आहे, तर मी कोण? मी विशाखा गोखले. ‘‘अग्गं गोखले काय?’’ – ‘‘काय म्हणजे, तेच नाव आहे न माझं.’’  ‘‘लग्न झालंय ना मग गोखलेच काय सांगतेस.’’ असे किंवा अशा प्रकारचे अनेक संवाद लग्न झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत शंभर वेळा तरी झाले असतील. लहानपणीच आडनाव न बदलण्याचा साधा विचार मी केला होता, त्यावर आजही इतकी चर्चा होते याचं आश्चर्यच वाटतं. लग्नानंतर नाव/ आडनाव बदलणे ही खरंतर वैयक्तिक बाब आहे. तसं असूनही त्यावर नानाविध आणि चमत्कारिक प्रतिक्रिया येतातच.

‘‘ मग दोन्ही आडनावं का नाही लावत? किंवा, सासरच्यांना कसं चालतं?’’ खरंतर सासरच्यांना आडनाव काय लावते त्यापेक्षा घरच्यांना किती जीव लावते हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि लहानपणापासूनच सगळेच करतात म्हणून कोणतीही गोष्ट न करता पूर्ण विचार करून स्वत:चे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि शिकवण मिळाली आहे. त्यामुळे स्वत:च्या निर्णयांच्या परिणामाचे फळ उपभोगण्याचे किंवा भोगण्याचे बळही ओघाने आलेच.

वाढण्याच्या वर्षांमध्ये जे संस्कार घरात आणि समाजात वावरताना झाले त्यात स्वावलंबनाचे धडे खूप खोलवर रुजले आणि स्वावलंबन हा मूळ स्वभावाचा मोठा भाग झाला.

आता विचार करताना असं वाटतं की, विचारातलं स्वावलंबन वडिलांकडून तर वागण्यातलं स्वावलंबन आईकडून शिकले. घरात कशालाही कमी नसताना वैयक्तिक आणि घरातील कामं स्वत:च करायला शिकलो. ती काही कोणी बसवून शिकवली नाहीत किंवा जबाबदारी म्हणून केली नाहीत, पण प्रत्येकाला काही कामं करता आलीच पाहिजेत या भावनेतून ती कामे आम्ही करत गेलो. आम्ही म्हणजे माझा भाऊ आणि मी. मुलगा मुलगी यात खरोखरच फरक होत नसल्याने हरप्रकारची कामं आम्ही दोघेही करू शकतो. त्यामुळेच आज स्वयंपाकापासून ते पंखे पुसण्यापर्यंत आणि फ्युझ बदलण्यापासून ते पशांच्या गुंतवणुकीपर्यंत सगळं मी करू शकते. ते करण्यासाठी किंवा त्याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही. स्वावलंबन म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वत:च्या हाताने करणे असे नाही तर कोणतीही जबाबदारी पार पाडता येणे, ती स्वत: करणे किंवा कोणाकडून करून घेणे, पण तो निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे.

स्वावलंबनाचं मला इतकं महत्त्व वाटतं त्याचं कारण असं की मुळात स्वातंत्र्य हवं. करिअर निवडण्याचं, जोडीदार निवडण्याचं, पेहराव, खाणं, काय वाचावं, काय पाहावं, कसं वागावं सगळ्याच बाबतीत निवड करण्याचं स्वातंत्र्य हवं हे पहिल्यापासूनच हवं होतं. त्याची माझ्यासाठी पुढची लॉजिकल स्टेप होती ते स्वातंत्र्य उपभोगायला, ते निर्णय- योग्य निर्णय घेण्याची क्षमता हवी. वडिलांमुळे आधीच दर आठवडय़ाला घरात नवीन पुस्तकं येत, त्यात मग माझ्या पुस्तकांची भर पडू लागली. त्या वयात जे वाचलं त्यातून प्रत्यक्ष अनुभव न घेता बऱ्याच गोष्टी शिकत गेले.

करिअर निवडताना सुद्धा तशी ‘स्कॉलर’ असूनही हे काय रेडिओ, फिल्मी गाणी वगरे असेही म्हणणारे होतेच. पण त्या क्षेत्राच्या ‘ग्लॅमर’कडे पाहून नाही तर मला हिंदी-मराठी चित्रपट, संगीताची आवड होतीच, त्यात अशी म्युझिक मॅनेजरची नोकरी चालून आली. तर हा अनुभव आणि चॅलेंज घेऊन बघायला काय हरकत आहे. नाहीच जमलं तर इतर गोष्टी करायला आपण कॉलिफाइड आहोतच की असा विचार करून उडी घेतली. नुसतंच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये भेंडय़ा खेळणे ते रेडिओच्या श्रोत्यांना आवडतील अशी गाणी निवडणं असा तो प्रवास फारच इंटरेस्टिंग होता. आज चौदा वर्ष झाली या क्षेत्रात, आधी रेडिओ नेटवर्क आणि आता एका म्युझिक टेलिव्हिजन नेटवर्कची म्युझिक हेड आहे. व्यावसायिक आयुष्यात मुलींना ‘मुलगी’ म्हणून येणारे अनुभव आलेच. तिथे एक गोष्ट पहिल्यापासूनच केली, मुलगी म्हणून वेगळी वागणूक नको असेल तर मुलगी म्हणून वेगळ्या प्रिविलेजेसची अपेक्षादेखील ठेवली नाही. ज्या प्रकारचं काम आम्ही करतो त्यात अनेक वेळा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करणं, सुट्टीच्या दिवशी काम करणं, चटकन सुट्टी घेता न येणं, सुट्टी घेतलीच तरी घरून किंवा फोनवरून काम करावं लागणं हे नेहमीचंच. अशा परिस्थितीत मी ९ नंतर काम नाही करणार, आता लग्न झालंय तर घरची जबाबदारी वाढली आहे अशी कारणं कधीच पुढे केली नाहीत. उलट आई-वडिलांना, सासू-सासऱ्यांना कामाचं स्वरूप समजावून दिलं. मी सुरक्षित असल्याची खात्री पटवून दिली त्यामुळे त्यांनासुद्धा काळजी न वाटता पाठिंबाच दिला.

सुरुवातीच्या काळात दर शुक्रवारी घरी जायला उशीर व्हायचा. पूर्ण वीकेण्डचे गाण्यांचे आणि रेडिओ शोजचे शेडय़ुलिंग संपवून घरी पोहोचायला दर शुक्रवारी किमान एक तरी वाजायचाच. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात राहात असल्याने असं एकटीने उशिरा घरी जायला कधी भीती वाटली नाही. त्यामुळे मला काही असं उशिरापर्यंत काम करता येणार नाही असं कधीच म्हणाले नाही. लग्न झालं तेव्हाही मी त्याच रेडिओ स्टेशनमध्ये काम करायचे. कामाचं ठिकाण तेच, शहरही तेच त्यामुळे माझं लग्न झालं आहे, मला वेळेत घरी गेलं पाहिजे हा विचारसुद्धा मनात आला नाही. तसं असूनही एकदा लंडनमध्ये होणाऱ्या एका अ‍ॅवॉर्ड शोसाठी आमच्याकडून प्रतिनिधी पाठवायचा होता. तेव्हा तिथल्या जबाबदारीसाठी मी पात्र असताना देखील, एका मुलाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचं कारणही हेच देण्यात आलं की उगाच आपल्याकडून एका मुलीला परदेशी पाठवण्याची जबाबदारी कशाला घ्या. तेव्हा मात्र मी म्हणाले, तीच मुलगी अशी रात्री-अपरात्री ऑफिसमध्ये एकटी काम करते, त्यानंतर एकटीच घरी जाते तेव्हा ही काळजी कुठे जाते? तरीदेखील ते ही ‘रिस्क’ घ्यायला तयार झाले नाहीतच.

या क्षेत्रात काम करताना वेगवेगळ्या स्वभावांची माणसं भेटली. काही सेलेब्रिटीज, त्यातले काही तर नंतर मित्र बनले, आमच्या क्षेत्रात अनुभवी असलेल्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. नुसतेच व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यावर, विचारांवर प्रभाव पाडणारी माणसं भेटली. त्यांचे वेगळे विचार, ते पटले तर आत्मसात करण्याचा पूर्ण प्रयत्नही केला. त्यातच योगायोगानेच अमोल भेटला. वर पाहता एकच क्षेत्र पण कामाचं स्वरूप खूपच वेगळं. त्यामुळे मत्रीसुद्धा पटकन झाली. भेटीगाठी होत गेल्या तसं लक्षात आली की हा सुद्धा व्यक्ती म्हणून एखाद्याकडे पाहतो. गर्लफ्रेंडकडून अशा काही वेगळ्या अपेक्षा त्याच्या नव्हत्या. जे क्षेत्र निवडेन त्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करावी असं लहानपणीपासूनच वाटायचं. जसजशी मोठी होत गेले तसं जाणवलं की जसं मुलींकडे केवळ मुलगी नाही तर व्यक्ती म्हणून पाहावं तसं मग मुलांनासुद्धा पुरुषपणाच्या स्टिरीओटाईपमधून पाहायचं नाही. त्यामुळे आम्हाला एकत्र राहाणं खूपच सोपं जातं. जसं मी स्वत: स्वावलंबी असावं असं मला वाटतं तितकंच त्याने माझ्यावर विसंबून असू नये. आपल्यावाचून कोणाचं अडतंय ही भावना कधी कधी सुखावह वाटत असली तरी मला त्याची अडचणच जास्त वाटते.

घर चालवण्याची जबाबदारी प्रामुख्याने नवऱ्याची आणि घर सांभाळण्याची प्रामुख्याने बायकोची, असा विचार आम्ही दोघेही करत नाही. ज्याला जे काम येतं ते तो करतो आणि मोकळा होतो. त्यामुळे कधी मी फ्रीलान्स काम करते कधी तो. जेव्हा त्याला खूप काम असतं तेव्हा मी घर सांभाळते, कधी मी कामात खूप व्यग्र होते तेव्हा तो घराकडे जास्त लक्ष देतो. कोणतीही जबाबदारी कोणा एकाची नसून दोघांची असल्याने कोणाचंही अडत नाही. त्यामुळे संसार करत असूनही आमचं वैयक्तिक असं आयुष्यही आम्ही जपलं आहे. म्हणूनच जशी आमची एक गोष्ट आहे तितकीच, एक वेगळी ‘मी’ची गोष्टसुद्धा आहेच.

vishakhagokhale@gmail.com

First Published on February 9, 2019 1:20 am

Web Title: me chi gosht article by pallavi matkari 2