प्रज्ञा माने-चौलकर

इयत्ता पाचवी. वय दहा वर्ष. मोठय़ा शाळेत आल्यावर पंधरानंतरचे पाढे पाठ करणं, इंग्रजीचं व्याकरण, इतिहासाच्या सनावळी, टुण्ड्रा प्रदेशाचा भूगोल आणि भयानक नावं, अगम्य संज्ञा असलेलं विज्ञान, हे असलं रडगाणं मला कधी आवडलंच नाही. चित्रकला, मराठी आणि शारीरिक शिक्षणाचे वर्ग हे सोडलं तर इतर विषयांशी माझं सोयर-सुतक नव्हतं. याच ‘अनहॅपनिंग’ काळात माझ्या आयुष्यातील ‘सुपरहॅपनिंग’ गोष्ट घडली. एका रविवारी मी अजय फणसेकर दिग्दर्शित ‘रात्रआरंभ’ चित्रपट पाहिला. हा मराठीतला पहिला मानसशास्त्र किंवा मानसिक आजारावरचा चित्रपट असावा. दिलीप प्रभावळकर यांनी अप्रतिम अभिनय केलाय. मी चित्रपटाने भारावून गेले. त्या वेळी खरं तर मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसतज्ज्ञ हा व्यवसायाचा विषय होऊ शकतो हे माझ्या गावीही नव्हतं. तेव्हा मानसशास्त्र भारतात अगदीच बाल्यावस्थेत होतं. मी उल्लेख करतेय तो २००० मधला. आम्हा मुलांकडे तेव्हा ‘गूगल’ही नव्हतं. मी शाळेच्या ग्रंथालयात बसून मानसशास्त्रावरची सगळी पुस्तकं वाचून काढली. ग्रंथपाल महाले मॅडम स्वत:हून पुस्तकं सुचवायच्या, उपलब्ध करून द्यायच्या. सुमारे दोन वर्ष भस्म्या झाल्यासारखी पुस्तकं वाचून काढल्यावर मी इयत्ता सातवीत ‘मला मानसतज्ज्ञ व्हायचंय’ यावर शिक्कामोर्तब केलं. आज इतकी वर्ष झाली पण मला त्या निर्णयाचा कधी पश्चात्ताप झाला नाही. त्या निर्णयाने काही दिलं असेल तर ते म्हणजे समाधान, आदर आणि आनंद!

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा
11 thousands Nikshay Mitra adopt 19 thousands tuberculosis patients
११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध

वैद्यकीय मानसशास्त्रात पदवी घेतल्यानंतर मी लहान मुलं आणि प्रौढ अशा दोन्ही वयोगटांसोबत काम करतेय. रुग्णालयं आणि सामाजिक संस्थांमध्ये काम करणं मला मनापासून आवडतं. ज्यांना खरंच आपली गरज आहे त्यांच्या कामी येणं यासारखी दुसरी मानवसेवा कुठली? ‘थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ शिकत असताना एका प्रोजेक्टच्या निमित्तानं बंगळूरुमधील वेश्यावस्तीवर जाणं व्हायचं. काही दिवसांतच मी त्यांची ‘सखी’ होऊन गेले. माझ्या एका वाढदिवसाला मी बंगळूरुला होते. दुपारी ६-७ जणी माझ्या रूमवर आल्या आणि काही तरी ‘एमर्जन्सी’ आहे असं सांगत घाईघाईने मला घेऊन गेल्या. गेले तर मी बसायचे ती जागा फुगे आणि फुलांनी सजवलेली. केक आणलेला आणि कन्नड गाणी गाऊन माझा वाढदिवस सगळ्या जणींनी साजरा केला. आपल्या कामाची पावती अशी हृदयाला हात घालून मिळते तेव्हा कामाचं समाधान आणखीच वाढतं.

माझी तब्येत बरी नसल्यावर कधी एखादी शन्नो यल्लमा देवीचा कडक उपवास ठेवते. कधी एखादी धुणी-भांडी करून घर सांभाळणारी माझी  पेशन्ट  मला लग्नाची भेट म्हणून मस्त दोन वडापाव घेऊन येते. अशा वेळांना भरून येतं. प्रेम व्यक्त करायला आपुलकीचे दोन शब्दही पुरतात. मध्यंतरी वरळीला एका आजींकडे जायचं होतं. त्यांना विस्मरणाचा त्रास होता. त्यांच्याकडे मी आडवडय़ातून तीनदा थेरपीसाठी जात असे. त्यांचे पती सिंग अंकल आणि माझी चांगलीच गट्टी झालेली. आजी खरं तर त्यांनाही विसरल्या होत्या, पण सिंग अंकल अगदी लहान बाळासारखे त्यांची काळजी घेत. नवीन लग्न झाल्यासारखे उत्साहाने आंटींचे लाड करत. मी अंकलना शांत बसलेलं पाहिलं ते आंटींच्या निधनानंतरच. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या मृत्यूसमयीदेखील ‘प्रज्ञा को कहना, चंगी रहे!’’ असा निरोप त्यांच्या मुलाकडे दिलेला. प्राण सोडताना एखाद्या म्हाताऱ्या माणसाला आवर्जून आपली आठवण यावी हे मला आंतरिक समाधान देत राहतं.

मानसतज्ज्ञ म्हणून मागची काही वर्ष मी बाललैंगिक शोषणाविरुद्धही काम करते आहे. ‘पॉक्सो- पिव्हेन्शन ऑफ चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट’अंतर्गत येणाऱ्या काही बलात्काराच्या खटल्यांवर मानसतज्ज्ञ म्हणून काम करण्याची जबाबदारी मी घेतली. कोवळ्या वयात लैंगिक अन्याय-अत्याचार केलेल्या या चिमुरडय़ा मानसिकरीत्या उद्ध्वस्त झालेल्या असतात. पीटीएसडी, नराश्य किंवा इतर मानसिक आघातांच्या बळी असतात. त्यांना सावरणं, त्यांचा विश्वास मिळवणं, त्यांना न्यायालयातल्या कामकाजासाठी तयार करणं आणि त्यांना मानसिक बळ देणं हे थोडक्यात माझं काम असतं. मानसतज्ज्ञ म्हणून कितीही अंतर राखायचा प्रयत्न केला तरी या चिमुरडय़ा काळजात घर करतात. ‘जवळीक साधायची पण गुंतायचं नाही’ हे तसं कठीणच. पण तरीही कधी तरी गुंतणं होतंच.

२०१४ चा एक किस्सा सांगते. माझी पहिली पॉक्सो केस. त्या ११ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या जन्मदात्या बापाने अनेकदा बलात्कार केला होता. मी तिला त्या अवस्थेतून सावरायच्या प्रयत्नात होते. तिने या आघातातून बाहेर पडावं म्हणून मी ईएमडीआर ही ट्रॉमा थेरपी शिकून घेतली. काही महिन्यांनी या सगळ्याचा मलाच मानसिक त्रास व्हायला लागला. मी ही गोष्ट माझे गुरू,  मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांना सांगितली. सरांनी मला एकाच वाक्यात आयुष्यभर पुरेल असा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘यू कान्ट पोअर इनटू अ मग इफ यू आर एम्प्टी.’ मला एकदम ‘युरेका’ झालं. मी दरम्यानच्या काळात स्वत:ची काळजी घेणंच विसरलेले. मी लागलीच स्वत:साठी एक वेळापत्रक केलं. मॅरेथॉन ट्रेनिंग, पेंटिंग, गायन या माझ्या आवडत्या छंदांना पुन्हा रोजच्या खटाटोपात स्थान दिलं. लिहायला लागले. स्वत: आनंदी आणि समाधानी राहिलो तरच तो आनंद इतरांपर्यंत पोहोचवता येतो, हे कळलं.

‘आपण माणूस म्हणून इतरांशी एका वैश्विक नाळेने जोडलेले आहोत,’ असं मला लहानपणीच सांगण्यात आलेलं. अशाच भेटलेल्या अनेक माणसांवर, त्यांच्या भावविश्वावर आणि त्यांनी कळत-नकळत काही तरी शिकवलेल्या बाबींवर लिहिलेल्या लेखांवर ‘कवडसा’  हे पुस्तक ‘राफ्टर पब्लिकेशन्स’चे उमेश जोशी यांनी २०१५ ला प्रकाशित केलं. मला घडवण्यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे माझ्या संपूर्ण कुटुंबाचा. संयुक्त कुटुंबातील जडणघडण, आईमधली चिकाटी, आप्पांमधला हळवेपणा आणि दुसऱ्याला समजून घेण्याचं कसब, हे लहानपणापासूनच आपोआप संस्कार करत राहिलं. तसं पाहिलं तर जन्म सुखवस्तू घरातला. पण आई-आप्पांनी हट्ट पुरवले असले तरी कधी फाजील लाड केले नाहीत. ते मला स्वावलंबी बनवत गेले. प्रचंड स्वातंत्र्य दिलं, पण ते वाढणाऱ्या जबाबदारीच्या जाणिवेसकट. ‘आपण आजूबाजूच्या समाजाला काही तरी देणं लागतो.’ हे त्यांनी सदैव त्यांच्या कृतीतून दाखवलं. भारतभरातच नव्हे तर युरोपात आनंदाने सोलो ट्रिपला मुलीला पाठवणारे आई-वडील मध्यमवर्गीय मराठी घरात विरळाच! मागच्या वर्षी स्वित्झर्लंडच्या ‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी असोसिएशन’कडून माझ्या बाललैंगिक शोषणाविरुद्ध असलेल्या कामाचा त्यांच्या जर्नलमध्ये विशेष उल्लेख झाला. तो गौरवही खरं तर आई-आप्पांचाच!

दुसरी मला घडवणारी बाब म्हणजे पुस्तकं. ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ हे माझ्या घरासाठी शंभर टक्के खरं आहे. हे वाचनाचे संस्कार सर्वस्वी माझ्या दादाचे. त्याचा व्यासंग पाहता-पाहता मी मोठी झाले. ‘सगळे अनुभव घेणं थोडं महाग पडू शकतं.. पुस्तकं त्या मानाने स्वस्त असतात!’ हे स्मरून मी वाचनाच्या आणि पर्यायाने अनुभवाच्या कक्षा रुंदावत गेले. ‘चंपक’, ‘ठकठक’ ते आज ‘भावार्थदीपिका’, ‘द रिपब्लिक’, ‘द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’, अथवा ‘पातंजलयोगप्रदीप’पर्यंतचा प्रवास खूप खूप शिकवून गेलाय. मानसतज्ज्ञ म्हणून लागणाऱ्या महत्त्वाच्या गुणांपैकी ‘एम्पथी’ आणि ‘बिइंग नॉन-जजमेंटल’ हे गुण अंगीकारणं फक्त आणि फक्त वाचनामुळेच शक्य झालं.

‘लग्नानंतर मुलींचं आयुष्य बरंचसं बदलतं,’ असं म्हणतात. म्हणजे भावनिक, वैयक्तिक आणि मुख्य म्हणजे व्यावसायिक तडजोडी कराव्या लागतात. पण माझ्या नवऱ्याने माझ्या करिअरकरिता स्वत: जास्त तडजोडी केल्या. माझ्या कामामध्ये येणारे ‘रिस्क फॅक्टर्स’ ठाऊक असल्याने काळजीवजा दमदाटी करतानाही तो कामाचं कौतुक करत राहतो.

माझे रोजचे अनुभव शांतपणे ऐकणं, कधी त्यावर काही सुचवणं, मानसिक बळ देत राहणं, हे करता-करता तो आता माझ्यासारख्या सायकॉलॉजिस्टचा सायकॉलॉजिस्ट झाला आहे. आत्ताही हा लेख लिहिताना, ‘‘तू लिही. जेवणाचं मी बघतो,’’ असा आतून आवाज दिलाय. अजून पुढे हातून बरंच चांगलं काम व्हायचं आहे, त्यामुळे यतीनचं त्यातलं श्रेय आधीच नमूद करते.

‘आपल्या आयुष्यात येणारी माणसं काही तरी शिकवायला येतात,’ यावर माझा विश्वास आहे. नेहमी ते चांगलंच असेल असं नाही, पण नकारात्मक गोष्टीत सकारात्मक शोधता आलं की आयुष्य सुकर होतं. व्यक्त होणं, काही तरी एखादा छंद जोपासणं, मन भरून कोणाची स्तुती करता येणं, समोरच्यावर अपेक्षांचं ओझं न लादणं, कृतज्ञ राहणं, या गोष्टी अनुभव आणि अनुभूतीतून शिकत गेले. ‘आयुष्य म्हणजे काय?’ यावर भाष्य करायला माझं वय आणि अनुभव हे दोन्ही कमी असलं तरी ते आपल्या दृष्टिकोनावर बरंचसं अवलंबून असतं हे जाता-जाता सांगायला हरकत नाही.

हल्लीच ‘इकीगाई’ पुस्तक वाचलं. इकीगाई म्हणजे आनंदी राहण्याची कला. हे एक जापनिज शास्त्र आहे खरं तर. प्रत्येकाच्या आयुष्याला काही एक हेतू असतो. हा हेतू त्यांना कामात आनंद, समाधान देत राहतो. तो हेतू आणि आपलं काम एकच असेल तर माणसाचं जगणं नुसतं जगणं न राहता एक उत्सव बनून जातो आणि माझी आयुष्यातली सगळ्यात मोठी जिंकलेली बाजी तीच आहे. माय पॅशन अ‍ॅण्ड प्रोफेशन इज कॉनग्रुअन्ट! दिवसभरात १५ रुग्ण पाहिले तरी कधी कधी थकायला होतं. मला कोणी सहसा त्यांच्या आयुष्यात घडलेली छान गोष्ट संगायला येत नाहीत. ९९ टक्के मजकूर नकारात्मक असतो. पण तरीही घरी आल्यावर आपण आपलं काम चोख केलं किंवा आपले १०० टक्के दिलेत हे समाधान कुठल्याही पुरस्काराच्या वरचं आहे. कारण इथं स्वत:चं अंतर्मन कौतुक करत असतं. त्याच्यापासून काहीही लपवता येत नसतं आणि ते अंतर्मनाने केलेलं कौतुक म्हणजेच इकीगाई.

डिकार्ट्स हा थोर तत्त्ववेत्ता. त्याला त्याच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारला असता म्हणतो, ‘कॉजिटो एर्गो सम!’ म्हणजे, ‘मी विचार करतो याचा अर्थ मी अस्तित्त्वात आहे.’ हाच विचार पुढे नेत मी सांगेन, ‘मी इतरांचा विचार करते म्हणजे मी अस्तित्वात आहे.’ आफ्टर ऑल, दॅट इज व्हॉट बिइंग अ सायकॉलॉजिस्ट इज ऑल अबाऊट!

pddmane@gmail.com

chaturang@expressindia.com