21 September 2020

News Flash

‘मी’ची गोष्ट : एकाच या जन्मात..

हल्ली शाळेत जाणारी जवळपास सगळीच मुलं सर्रास शिकत असली तरी आम्ही शाळेत असताना ‘अबॅकस’ हे अगदी नवं प्रकरण होतं

(संग्रहित छायाचित्र)

रुचिरा सावंत

आयुष्यातल्या विविध अनुभवांतून एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या. कधी कधी जगाला प्रेरणादायी वाटणारं आपलं आयुष्य हे आपल्यामुळे कमी आणि आपल्या अवतीभवतीच्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे जास्त प्रेरणादायी वाटत असतं. माझ्यासाठी अवतीभवतीच्या छोटय़ा-छोटय़ा घटना, प्रसंग, भेटणारी अगणित माणसं माझ्यातल्या ‘मी’चा शोध घेण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि या एकाच जन्मात वेगवेगळी ‘मी’ मला सापडत जाते..

काही घटना असतात, काही प्रसंग, तर काही भेटीगाठी, ज्या दिसायला फारच छोटय़ा वगैरे असल्या तरी आपलं आयुष्य, विचारसरणी यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरतात. आणि त्यातही हे अनुभव लहानपणी आलेले असतील तर मनाच्या एका कोपऱ्यात ते कायमस्वरूपी स्थान पटकावतात. मी पाचवीत असतानाची गोष्ट. एक दिवस आमच्या मराठीच्या बाईंसोबत गप्पा मारत असताना नुकत्याच निवडून आलेल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींचा उल्लेख झाला आणि त्यांनी अचानक मला विचारलं, ‘‘रुचिरा, तुला प्रतिभाताई पाटील व्हायचं आहे की इंदिरा गांधी?’’ क्षणभर मी गांगरले पण लगेच माझ्या आगाऊ  स्वभावाला अनुसरून मी उत्तर दिलं, ‘‘मला त्या दोघींसारखं कर्तृत्ववान व्हायचं आहे खरं. पण मला ना ‘रुचिरा सावंत’च व्हायचं आहे.’’ आता बाईंचा ओरडा ऐकावा लागतो की काय अशी भीती वाटत असताना घडलं मात्र वेगळंच. बाईंनी शाबासकी देत, ‘‘मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आपलं वेगळेपण जप.’’ असं म्हटलं आणि मग काय स्वारी भयंकर खूश! पुढे याच आशयाची ‘क्लासमेट’ची जाहिरातसुद्धा आली आणि मला ती या जुन्या ‘कनेक्शन’मुळे भलतीच आवडली.

मध्यंतरी एका परिषदेदरम्यान शांत राहून, अवतीभवतीच्या निसर्गाशी हितगुज साधत आपल्याशी साधर्म्य असणारं, आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्रतिबिंबित करणारं काही तरी शोधून आणायला सांगितलं होतं. मी खोलीबाहेर पडताक्षणीच दिसली भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरं.. या फुलावरून त्या फुलावर ती मनसोक्त बागडत होती. मी हरखून त्यांचा तो खेळ पाहत राहिले. प्रत्येक फुलावर थोडा वेळ थांबून ती फुलपाखरं पुढे जात होती आणि हे करताना प्रत्येक नव्या फुलाचं सौंदर्य ती वाढवत होती. अनेक फुलपाखरं त्यांचा रंग, आकार वेगळा होता पण भिरभिरणं तसंच.. जगाची पर्वा न करता मनसोक्त बागडणंही तेच आणि माझ्यासारखं कुणी तरी थांबून त्यांना पाहत बसलंय याची नसलेली पर्वाही अगदी तशीच.. या सगळ्यात आम्हाला दिलेला वेळ संपत आला आणि झालेल्या घंटेच्या निनादासोबत ‘मी आता खोलीत काय बरं नेऊ ?’ हा विचार माझ्या मनात मागच्या १० मिनिटांत पहिल्यांदाच डोकावला. शेजारून जाणाऱ्या सरांनी कदाचित हे ओळखलं आणि चालता-चालताच मला म्हटलं, ‘‘निसर्ग काही तरी सांगतोय तुला. खऱ्या अर्थाने हितगुज करतोय. तुला सहज म्हणून जे दिसलंय ते जोड स्वत:सोबत. तुझ्या स्वभावासोबत. तुला तुझं व्यक्तिमत्त्व आधीच दाखवलं आहे निसर्गाने. ऐक त्याचं.’’ ‘‘मला तर फुलपाखरंच दिसताहेत सगळीकडे. त्यांना कसं धरून नेऊ  खोलीत?’’ माझा प्रश्न. यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकताच मी खोलीत रिकाम्या हातीच गेले. ते म्हणाले, ‘‘फुलपाखरांचं ते भिरभिरणं, त्यांचं ते रंगीबेरंगी विश्व कोणत्याही चौकटीत धरता येणं शक्यच नाही ना! त्यांना असंच विहरू द्यावं, कारण चौकटी त्यांच्यासाठी नाहीतच. आत जाऊन हेच सांग. त्यासाठीच निवडलं आहे ना निसर्गाने तुला आणि तू त्या फुलपाखरांना.’’

मला बऱ्याचदा ओळखीतले, नव्याने भेटणारे लोकही म्हणतात की अनेकांसाठी स्वप्नवत ठरणारं ‘हॅपनिंग’, वेगळं आयुष्य मी जगतेय. आणि मग त्याचा विचार करताना असे कित्येक प्रसंग, अनुभव मनात रुंजी घालू लागतात. आपण सगळेच आपल्याला भेटणारी माणसं, आलेले अनुभव यातून घडत असतो. मित्रांसोबतचं मनमोकळं हसू, लहान मुलांसोबतच्या निरागस गप्पा, मोठय़ांच्या अनुभवाचे शहाणे बोल, नको असणाऱ्या भांडणामधले कडवट शब्द, ऐकलेली गाणी, पाहिलेले चित्रपट, नाटकं, वाचलेली पुस्तकं आणि माणसं, मला लाभलेले सहवास आणि त्या सहवासातून विचारांवर झालेले संस्कार, मिळालेली दिशा.. आणि हो, माझ्या प्रवासात भेटलेले ते सगळे अगणित अपरिचित ‘काइंड सोल्स’.. या सगळ्यांचाच आज मी जी कुणी आहे त्यात फार महत्त्वाचा वाटा आहे. माझ्या ‘मी’ची घट्ट मुळं याच्याच आधाराने भरक्कमपणे उभी आहेत. आणखी मजबूत होऊ  पाहताहेत.

हल्ली शाळेत जाणारी जवळपास सगळीच मुलं सर्रास शिकत असली तरी आम्ही शाळेत असताना ‘अबॅकस’ हे अगदी नवं प्रकरण होतं. मी पाचवीला असताना मला पहिल्यांदा त्याविषयी समजलं. आम्ही मराठी माध्यमात असल्यामुळे आम्हा दोघी बहिणींना तिथे प्रवेश नाकारला गेला पण बाबांनी हट्टाने आम्हाला प्रवेश मिळवून दिलाच. मराठी माध्यमाच्या विद्यार्थिनी म्हणून नाकारलेल्या आम्ही दोघी पुढे तो अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या मोजक्या मुलांपैकी एक ठरलो तेव्हा आमच्याही नकळत आम्ही खूप काही शिकलो होतो. जिद्द आणि आवड यांची सांगड घालणं जमलं तर आपण काहीही करू शकतो हे लक्षात आलं. आणि सोबतच माझ्यात दडलेल्या एका ‘कॉन्फिडन्ट मी’ची ओळख झाली त्या दिवशी.

एकदा असंच कुठल्याशा प्रसंगाने व्यथित झाले होते. खूप वाईट वाटलेलं. तेव्हा संपूर्ण वर्गासमोर आमच्या बाईंनी मला हत्तीची गोष्ट सांगितली होती. हत्ती रस्त्यावरून डुलत जात असताना कुत्र्याचं पाठीमागून भुंकणं आणि हत्तीचं आपला संयम मुळीच ढळू न देता आपल्या वाटेने मागे वळूनही न पाहता चालत राहणं. अशा आशयाची ती गोष्ट सांगून झाल्यावर बाईंनी मला त्या गोष्टीमधल्या हत्तीसारखं व्हायला सांगितलं आणि तेव्हापासून हत्ती माझा आवडता प्राणी झाला. आपल्या वाटेने, आपल्याला हवा तो रस्ता निवडून निघतानाचा संयम मला देणारा तो हत्ती मी आता एकरूप करू पाहतेय स्वत:सोबत. त्याच्या भक्कम पायांसारखीच तत्त्वे आणि त्याचा कमालीचा संयम रुजवू पाहतेय माझ्यात. माझ्यातल्या ‘मी’ची ती संयमी बाजू पाहण्यासाठी धडपडतेय आणि दिसली की खूश होतेय.

सॅटनॉग्ज नावाच्या ग्राऊंड स्टेशन प्रोग्राममध्ये काम करत असतानाची गोष्ट. आशिया खंडातील पहिला ‘ओपन सोर्स ग्राऊंड स्टेशन प्रोग्रॅम’ म्हणून फार नेटाने मिरवायचो आम्ही तेव्हा. आमच्या गटामध्ये मी एकटीच मुलगी होते आणि वयाने इतरांहून लहानसुद्धा. असं असतानाही रात्री-अपरात्री प्रवास करताना, औद्योगिक परिसरात एकटीने जाऊन काम करून आणताना मला कधीच खास वेगळी वागणूक मिळाली नाही. किंवा कुणी ‘तुला हे जमणार नाही,’ असंही म्हटलं नाही. यामुळे आपली जबाबदारी पार पाडताना सगळे समान असतात हे शिकलेच पण माझी माझ्यातील ‘स्वावलंबी मी’ शी ही भेट झाली त्या निमित्ताने.

‘डिझाइन थिंकिंग’मध्ये काम करू लागल्यापासून शिक्षणक्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे अनेक मित्र झालेत. वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांदरम्यान ‘ग्राऊंडब्रेकिंग’ काम करणारे अनेक जण भेटलेत.‘गिव्हिंग इज नॉट अबाऊट मेकिंग अ डोनेशन. इट्स अबाऊट मेकिंग अ डिफरन्स’ हे आजवर ऐकलेलं वाक्य माझ्या त्या मित्रांना आपले हुद्दे, यश विसरून तन्मयतेने आणि एकरूप होऊन काम करताना पाहून पदोपदी जाणवतं. निर्मळ मनाने आणि सकारात्मक उद्देशाने केलेलं कोणतंही काम समाधान देतं हा मूक संदेश देणारं असतं ते वातावरण.. सकारात्मकता, प्रसन्नता, जिद्द, ध्यास, आनंद आणि सगळ्यात महत्त्वाचं असं सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात हरवलेलं ‘समाधान’ तिथून येताना ओंजळीत भरून आणते मी माझ्या. आणि मग मला माझ्यातल्याच एका नव्या ‘मी’ची जाणीव होते.

असाच एक न विसरता येणारा अनुभव ‘क्रांती’सोबतचा. ‘क्रांती’ ही वेश्यावस्तीमध्ये राहणाऱ्या मुलींसाठी काम करणारी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी झटणारी मुंबईस्थित संस्था. एका आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान त्या मुली भेटल्या आणि एका कार्यशाळेदरम्यान त्यांनी उपस्थित आम्हा सर्वाना त्यांच्या आयुष्याचा प्रवास करवला. ते सगळं इतकं भयंकर होतं, की सगळेच हमसून-हमसून रडले. आपल्या जागी राहून दुसऱ्याला सल्ले देणं, आपली मतं मांडणं, हे सगळं फार सोप्पं असतं. पण स्वत:ला त्या जागी ठेवून पाहणं तितकंच कठीण. त्या दिवशी मत देण्याआधी स्वत:चा ‘कम्फर्ट झोन’ सोडून दुसऱ्याच्या जागी मी स्वत:ला ठेवू शकते, त्याच्या नजरेतून जग पाहू शकते हे जाणवलं. अशाच प्रसंगात तर माझ्यातल्या ‘कम्फर्ट झोन’पलीकडच्या ‘मी’ची मला नव्याने ओळख होते. सोबतच प्रेरणा मिळते आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहण्याची.. आयुष्याप्रति कृतज्ञ होण्याची..

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन, माणसं आणि पुस्तकं मिळणं फार महत्त्वाचं असतं असं म्हणतात आणि याबाबतीत मी स्वत:ला फार भाग्यवान समजते. सुदैवाने विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गजांचा वेगवेगळ्या निमित्ताने फार जवळून सहवास मला लाभलाय आणि लाभतोय. ही सगळीच ग्रेट माणसं त्यांच्या ग्रेटनेससोबतच त्यांच्यातल्या साधेपणासाठीही लक्षात राहताहेत. ‘इस्रो’चे अध्यक्ष असणाऱ्या किरण कुमार यांची भेट घेऊन निघताना त्यांचं माझ्यासाठी आपल्या खुर्चीतून उभं राहत ‘कीप इन टच’ सांगणं जसं भावलं तसंच कस्तुरीरंगन यांचं ‘‘समोसा संपवला नाहीस तर मी पुढची गोष्टच सांगणार नाही,’’ असं प्रेमाने हसत सांगणंही मनावर कोरलं गेलं. ‘‘तुझ्या नोबेल परितोषिकाची मी वाट पाहतोय,’’ असं माझ्यासारख्या १८ वर्षांच्या एका मुलीला सांगणारे ‘शांती स्वरुप भटनागर पारितोषिक’ विजेते प्रोफेसर महान एम.जे. हे त्यांच्या महानतेने जसं स्तिमित करतात तसंच अगदी दोन मिनिटांच्या पहिल्याच भेटीत आपला व्हॉट्सअ‍ॅप नंबर देऊन निवांत भेटायला बोलवणाऱ्या, माझ्यासाठी वेळ काढणाऱ्या लता रजनीकांतही आपल्या वागण्यातून खूप काही शिकवतात.

अवकाशात सर्वाधिक वेळा जाऊन आलेले जेरी रॉस त्यांच्या प्रतिभेइतकंच गडगडाटी हसतात तेव्हा जसं त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा भारदस्तपणा पाहून प्रभावित होते तसंच जगातील ‘लाइटेस्ट सॅटेलाइट’ बनवणाऱ्या ‘स्पेस किड्स’ची संस्थापक केसन म्हणजे माझी अम्मा तिच्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्वापलीकडे जात माझ्यासाठी वाढदिवसाचं गाणं स्वत: गाऊन पाठवते तेव्हा मी भारावून जाते.. जागतिक कीर्तीचे अवकाश विज्ञान पत्रकार आणि उत्कृष्ट लेखक श्रीनिवास लक्ष्मण यांच्यामुळे ‘ब्रिटिश इंटरप्लॅनेटरी सोसायटी’च्या वाचनालयामध्ये त्यांच्या पुस्तकासोबतच मी लिहिलेलं पुस्तकाचं समीक्षण मी तिथे जाण्याआधी पोहोचतं तेव्हा मी अशीच थक्क होऊन पाहत राहते. आणि त्यांची पत्नी म्हणजे माझी लाडकी ‘उषा आंटी’ प्रत्येक वेळी माझ्यासाठी आणत असलेल्या भेटवस्तू पाहते आणि त्यांच्या प्रेमात चिंब भिजते.

अशी एक नाही अनेक उदाहरणं. जी मला माणसाच्या मोठेपणाच्या, त्याच्या यशाच्या आणि नावाच्या पलीकडे असणाऱ्या माणसाला पाहायला शिकवतात. त्यांचं मोठेपण आणि साधेपणा पाहून स्वत:विषयीच्या न्यूनगंडात न जाता त्यांच्यासारखं होण्यासाठी अविरत प्रेरणा देतात. आणि यश, प्रसिद्धी यासोबतच एक चांगली व्यक्ती म्हणून घडण्यासाठी प्रवृत्त करतात.

या सगळ्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या. कधी कधी जगाला प्रेरणादायी वाटणारं आपलं आयुष्य हे आपल्यामुळे कमी आणि आपल्या अवतीभवतीच्या माणसांमुळे, आलेल्या अनुभवांमुळे जास्त प्रेरणादायी वाटत असतं. आपल्या चांगल्या गुणांचं, आपल्या यशाचं, जगाकडे बघण्याच्या आपल्या  वेगळ्या दृष्टिकोनाचं बरंचसं श्रेय त्यांचं असतं. असं म्हणतात, की कधी-कधी आपण आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींना फारच बिनमहत्त्वाचं समजतो. पण माझ्यासाठी मात्र अवतीभवतीच्या याच छोटय़ा-छोटय़ा घटना, प्रसंग, भेटणारी अगणित माणसं माझ्यातल्या या ‘मी’चा शोध घेण्यासाठी, त्याला आकार देण्यासाठी कारणीभूत ठरतात.

आणि म्हणूनच एक अनुभव घेतल्यानंतर मी पुढच्या धाडसासाठी तयार होते. माझ्यातल्या नव्या ‘मी’च्या शोधात निघते.. माझ्यातल्या नव्या रुचिरासाठी!

ruchirasawant48@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 12:08 am

Web Title: me chi gosht article by ruchira sawant abn 97
Next Stories
1 सृजनाच्या नव्या वाटा : विमुक्त बंदीश
2 आव्हान पालकत्वाचे : मना कल्पना कल्पिता कल्पकोटी
3 वेध भवतालाचा : शैक्षणिक क्षेत्रातली शोधयात्री
Just Now!
X