News Flash

स्वत:मधला माणूस शोधताना

‘मी’ची गोष्ट

(संग्रहित छायाचित्र)

सानिया भालेराव

‘‘माझं बाईपण हे माझ्या अवयवांपलीकडचं आहे. मुळात ही गोष्ट बाईची नाहीये.. ही गोष्ट आहे माझ्यातल्या माणसाची. आज मी जी आहे ती माझ्या लिंगापलीकडची आहे. माझं बाई असणं नाही माझं दुबळेपण आणि नाही शस्त्रसुद्धा! माणूसपण गवसलेली स्वतंत्र स्त्री आहे मी. मी बाई आहे, कारण माझ्यामध्ये दोन एक्स क्रोमोझोम्स आहेत. बस्स..’’

‘तू मुलगा असूनही फ्रॉक का घालतोस?’ असा प्रश्न एका मुलग्याने मी सहावीत असताना मला विचारला होता. औरंगाबादेतील ‘सन्मित्र’ कॉलनीच्या पोषक आणि मोकळ्या वातारणात माझं लहानपण गेलं. त्यामुळे मी मुलगी आहे, याची जाणीव मला फार उशिरा झाली. मी कायम माझ्या मित्रांबरोबर असायचे. छोटे केस, बहुतांशी शर्ट-पॅन्ट. कारण चढणे, उडय़ा मारणे हे उद्योग करायला ते सोपं!

काचेच्या बाटल्या फोडून मांजा कर, मोठाली टायर जमा करून काठीने त्यांना फिरवत रेस लाव, उमरभाईंकडून पन्नास पशांत सायकल आणून मित्रांबरोबर दिवसभर ती सायकल फिरव, डब्बा ऐसपैस खेळ, क्रिकेटमध्ये कायम फिल्डिंग कर, होळीच्या वेळी सिल्लेखान्यातून गवऱ्या पळव, अशा अनेक उचापत्या मी करायचे. एकदा माझ्या मित्राच्या भावाचा मित्र आमच्या कॉलनीत आला होता. त्या दिवशी कधी नव्हे तो नेमका मी फ्रॉक घातला होता. आमचा लगोरीचा खेळ ऐन रंगात आला होता. दुपारभर खेळून आम्ही पार काळवंडून गेले होतो. मग उसाचा रस प्यायला गेलो तर याने मला विचारलं, ‘‘तू मुलगा असूनही फ्रॉक का घालतोस?’’ सगळे जण फिदीफिदी हसायला लागले.. त्यात सगळ्यात मोठा आवाज होता माझा..

त्यानंतरच्या काळात स्तन नावाचा बोरिंग प्रकार डोकं बाहेर काढायला लागला. असं असलं तरी माझ्या वागण्यात काडीचाही फरक झाला नव्हता. एकदा माझ्या मित्रांबरोबर ‘सादिया टॉकीज’ला भर दुपारी मी पिक्चर पाहायला गेले होते. मध्यंतरामध्ये आत येत असताना कोण्या इसमाने माझ्या स्तनांना जबरदस्तीने हात लावायचा प्रयत्न केला. तो हात मी तिटकाऱ्याने झिडकारला आणि प्रचंड ताकदीने धरून ओढला. तो माणूस जवळपास खाली पडला आणि घाबरून पळाला.. ‘‘काय झालं?’’  एका मित्राने विचारलं. यावर ‘काही नाही,’ असं म्हणाले खरं, पण त्या एका क्षणी मी माझ्या सातही मित्रांपेक्षा वेगळी आहे.. मुलगी आहे याचा साक्षात्कार वगरे मला झाला. संतापाने माझं अंग चित्रपटभर थरथरत राहिलं.. रडूही आलं. नंतरची काही वर्ष तो तिटकारा पुरुष नामक प्रजातीविषयी कायम राहिला.

पण माझ्या सुदैवाने माझी आई आणि तिची आई या दोघीही अत्यंत कणखर आणि स्वत:चं स्त्रीत्व गवसलेल्या बायका माझ्याबरोबर होत्या. त्या दोघींना मी घरी आल्यावर हे रडून रडून सांगितलं. ‘‘बरं केलंस हात ओढला ते.. पुढच्या वेळेस चांगलं ओरडदेखील.. पळून जाऊ देऊ नकोस..’’ हे त्यांचं उत्तर. ‘‘आणि हो, सगळेच पुरुष असे असतात असा लगेच निकाल लावू नकोस.. तुझ्या अनुभवांवरून ठरव..’’ असं आई म्हणाली.  त्यामुळे माझ्या स्त्रीत्वाच्या प्रवासात ही फेज खूप कमी काळ राहिली. माझ्या अनुभवांवरून मी ठरवू लागले. विशीपर्यंत बाई असणं हे स्तन आणि योनी असणे यापलीकडे आहे, हे उमजलं होतं.

पुढे बायोटेक्नॉलॉजी या विषयात वेलोरमध्ये एम.टेक. करताना ‘एकुलत्या एक मुलीला इतक्या दूर कशाला पाठवायचं’ हे ऐकण्यापासून ते आज वयाच्या पस्तिशीत एक कंपनी उभी करताना ‘साहेब असतील तर त्यांच्याशी बोलतो’ ही असली वाक्य कानावर पडतातच. पण गेल्या दशकात समाजाच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडतो आहे हे नक्की. ‘आपण बदललो तर जग बदलतं’ हा माझ्या आयुष्याचा फंडा आहे. लग्नानंतर जे नाव जन्मापासून मिळालं आहे तेच लावणं, मुलीच्या नावामध्ये आडनाव न घालता माझं आणि तिच्या बाबाचं नाव त्यात ठेवणं, काम करताना ते पुरुषाचं आहे की बाईचं असा कोणताही भेदभाव न करणं, मासिक पाळीला ढाल न बनवता ती शिकणं, भूक लागणं यांसारखी एक नैसर्गिक क्रिया आहे असं मानणं आणि तसं वागणं, बाईपणाचा कोठेही गैरफायदा न घेणं अशा कित्येक गोष्टी ज्या मी मानते, त्यानुसार वागते.

मी एम. टेक.नंतर काही वर्ष ‘रिसर्च’मध्ये होते. एका मोठय़ा प्रोजेक्टवर लॅबमध्ये संशोधनाचं काम असल्याने साधारण १२ ते १५ तास काम करत असे. ‘आमची सानिया सकाळी लॅब झाडायला जाते,’ असं आई गमतीने म्हणायची आणि ते अक्षरश: खरंसुद्धा असायचं कारण कोणीही पोहोचायच्या आत, सात वाजताच मी काम सुरू करायचे. झाडून वगरे आधीच काढायचे म्हणजे मग कामात व्यत्यय नको. निघायचे पण रात्री दहा वगरे नंतर. एकदा माझ्या गाइडने चिडून मला सांगितलं, ‘‘काम करते आहेस ते ठीक. हुशार आहेस. पण विसरू नकोस की मुलगी आहेस तू. इतक्या रात्री लॅबमध्ये थांबायची परवानगी मी तुला देऊ शकत नाही.’’ मी अवाक झाले. ‘‘काही मुलगे रिसर्चसाठी रात्री बारापर्यंत थांबतात, सर. त्यांना कसं चालतं मग?’’ मी त्यांना विचारलं. ‘‘कारण ते मुलगे आहेत.. तुझं काही बरं-वाईट झालं तर?’’ असं त्यांच्या तोंडून उत्तर ऐकून मला हसू आलं.

माझ्यामध्ये असं काय सोनं जडलं आहे ज्यामुळे मला कायम स्वतचा बचाव करावा लागतो, स्वतला सुरक्षित ठेवावं लागतं, असा प्रश्न मला नेहमी पडायचा. माझं बाई असणं जर मला मनासारखं काम करू देऊ शकत नसेल तर ती माझ्यासाठी शरमेची बाब आहे. सरांना सांगितलं मी, ‘‘काम करताना जर माझं बरं-वाईट झालं तर ती माझी जबाबदारी. वाटल्यास लिहून सही करून देते.’’ सर चमकले. म्हणाले, ‘‘वेडी मुलगी आहेस तू. कर काय करायचं ते. मी दोन वर्ष तिथे नीट काम केलं. कोणताही ‘सो कॉल्ड’ वाईट प्रसंग घडला नाही. सज्जन पुरुष सहकारी, काळजी करणारे सिक्युरिटी गार्ड. चांगली माणसं भेटली. एकदा घरी येताना रस्त्यात रात्री गाडी बंद पडली होती तर एका काकांनी मदत केली होती. जबाबदारी होतीच.. ती सगळ्यांवरच असते.. मुलगा आणि मुलगी असा भेद कशाला त्यामध्ये?’’

‘इंडिपेडन्स कम्स विथ सिक्युरिटी’ हे एकदा ठामपणे कळलं की प्रश्न नसतो. उशिरापर्यंत काम करायचं आहे म्हटल्यावर गाडी व्यवस्थित चालवता येणं, सगळी कागदपत्रं असणं, गाडी बंद पडली तर ती ठीक करण्याची साधारण माहिती, गाडीच्या पार्ट्सबद्दलचं ज्ञान हे सगळं माहिती करून घ्यायचं, असा आईचा दंडक. हेच बाहेरगावी राहताना. आपल्याला स्वातंत्र्य हवं असेल, तर जबाबदारीने राहता आलं पाहिजे. आपलं आपण जेवण बनवता येणं, बँकेचे सर्व व्यवहार, फ्युजपासून ते सिलेंडर बदलण्या- पर्यंतची कामं.. सगळी आपली आपण करायला यायला हवीत, हा आईचा पहिला नियम. आणि मग ते पटत गेलं. स्वातंत्र्याची अशी एक किंमत असतेच. आपल्या निर्णयाचं ओझं आपण वाहायचं. चांगलं आणि वाईट जे होईल त्याला आपण जबाबदार. या गोष्टीमुळे स्वतचा शोध घेता आला. चुकांमधून शिकता आलं. स्त्री असण्यापेक्षा माणूस आहोत हे फिलिंग अधिक प्रबळपणे मुरत गेलं.. वागण्यात, बोलण्यात.. आणि मग हळूहळू माझं जेंडर कोपऱ्यात जाऊन बसलं.

माझं बाईपण हे माझ्या अवयवांपलीकडचे आहे. मुळात ही गोष्ट बाईची नाहीये.. ही गोष्ट आहे माझ्यातल्या माणसाची. मी ती खुल्या मानाने लिहिणार आणि जगणार. आज मी जी आहे ती माझ्या लिंगापलीकडची आहे. माझ्या प्रवासात माझे स्तन हा अडथळा नाहीये आणि नाही मिरवण्याची गोष्ट! तसंच माझ्या शरीरातला स्त्रीत्वाची ओळख असलेला अवयव मला दुबळं बनवू शकत नाही आणि माझं चारित्र्यही त्यांच्यावर अवलंबून नाही. मला काहीबाही बोलून कोणी माझ्या स्त्रीत्वाचा अपमान करू शकत नाही आणि माझ्या ‘सो कॉल्ड’ चारित्र्यावर शिंतोडेही उडवू शकत नाही. कारण मला अपमानित करण्याचा हक्क मी कोणत्याही व्यक्तीला देत नाही. माझं बाई असणं नाही माझं दुबळेपण आणि नाही शस्त्रसुद्धा! मी अबला नाही आणि मी जगन्मातासुद्धा नाही. माणूसपण गवसलेली स्वतंत्र स्त्री आहे मी. मी बाई आहे, कारण माझ्यामध्ये दोन एक्स क्रोमोझोम आहेत. बस्स..  माझ्यामध्ये धडधडणारं हृदय आहे, काळजात सहृदयता आहे, डोक्यात तल्लख मेंदू आहे, डोळ्यांत उंच उडायची स्वप्नं आहेत, खूप काही नवीन गोष्टी करू शकणारे हात आहेत, सगळ्या जबाबदाऱ्या पेलू शकणारे खांदे आहेत, अपमान सहन न करणारा ताठ कणा आहे, लांब पल्ल्याचा प्रवास करू शकणारे पाय आहेत, करुणा आणि प्रेम बाळगणारं मन आहे.. थोडक्यात मी माणूस आहे.. आणि मी माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही फक्त माणूस म्हणूनच बघते, तशीच वागते आणि वागवतेसुद्धा!

आज कामाच्या ठिकाणी ‘मॅडम, साहब को बुलाओ’ असं जेव्हा मला एखादा बाप्या म्हणतो तेव्हा मी ‘म ही साहब हूं यहाँ.. बोलो क्या बोलना हैं.’ असं हसून म्हणते आणि मग समोरचा ‘तो’ सुद्धा थोडासा वरमून ‘ठीक है’ असं म्हणतो.. हा बदल आहेच की.. आपण सगळेच शिकतो आहोत आपल्यातलं माणूसपण शोधायला.. ते टिकवायला आणि जपायलासुद्धा.. करूया प्रयत्न, नक्कीच जमेल.. आपण बदललो की हळूहळू जगही बदलतंच!

saniya.bhalerao@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:10 am

Web Title: me chi gosht article by sania bhalerao
Next Stories
1 शिक्षकांविना चालणारी शाळा सच की पाठशाला
2 ‘अवघड’ प्रसंगाचं भान
3 आहारभानाचं जागतिकीकरण
Just Now!
X