02 June 2020

News Flash

‘मी’ची गोष्ट : खडुतून दुग्ध स्रवताना..

मी तास झाल्यावर लगेच सगळी कामं बाजूला ठेवली. सहकारी शिक्षकांना घेऊन निकिताचं घर गाठलं.

(संग्रहित छायाचित्र)

ज्योती चौंडे-महाजन

अलीकडची गोष्ट. शाळेत रोजच्यासारखा प्रार्थना आदीचा परिपाठ झाला आणि मुलं त्यांच्या त्यांच्या वर्गात गेली. मी मस्त फ्रेश मूडनं सातवीच्या वर्गात पाऊल टाकलं. एरवी जोरात आणि एकासुरात ‘गुड मॉर्निंग मॅडमऽऽऽ’ म्हणून दिवसाची गोड सुरुवात करणारा वर्गाचा आवाज आज जरा दबका वाटला. हजेरीमध्येपण रोजच्यासारखा ‘येस मॅडम ऽऽऽ’वाला खळाळता उत्साह जाणवत नव्हता.

‘काय झालं रे, असे नाराज का दिसताय?’ म्हणून विचारलं तर काहीच उत्तर नाही. मग मी अधिकच बेचन झाले. मला माहीत होतं याचं उत्तर आपल्याला पटकन कोण सांगेल. मग भाग्यश्रीलाच थेट विचारलं, ‘काय झालंय गं? सगळी फुलं, कळ्या आज अशी का कोमेजलेली’ तिचं उत्तर तयारच होतं, ‘‘मॅडम, निकिता आणि तिचे आई-वडील गाव सोडून नाशिकला चाललेत, कामासाठी.’’ तिच्या या उत्तरावर काय बोलावं मलाही कळेना.

मी तास झाल्यावर लगेच सगळी कामं बाजूला ठेवली. सहकारी शिक्षकांना घेऊन निकिताचं घर गाठलं. खरोखर सगळ्या सामानाची बांधाबांध करून तिचे आई-वडील आणि निकिता तयार होते. माझ्या पोटात कालवाकालवच झाली. निकिताच्या घरी अजिबातच आर्थिक स्थर्य नसल्यानं तिचं कुटुंब उपजीविकेसाठी स्थलांतरित होणार होतं. ती शाळेत रुळलेली, हुशार पोर. मी तिच्या वडिलांशी आत्मीयतेने चर्चा केली. त्यांना अनेक उदाहरणं देत आश्वस्त केलं. विचारात पडून काही वेळानं ते म्हणाले, ‘‘ठीक आहे. मी निकिताला नातेवाईकांकडे ठेवून जातो.’ तिची आई हळूच म्हणाली, ‘‘मॅडम, तुम्ही असल्यावर आम्हाला निकिताची काय चिंता नाही.’ तिच्या आईचं हे वाक्य माझ्यासाठी खूप ऊर्जा देणारं, खूप आशादायी होतं.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोजेगाव. तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. या दुर्गम पत्त्यावर प्राथमिक शिक्षक म्हणून काम करताना स्वत:मध्ये इतक्या क्षमता असतात याची नव्याने ओळख पटली.

माझ्यातल्या ‘मी’कडे बघताना समोर उभी राहते ते निमशहरी खाणाखुणा अंगावर घेत मोठे खेडे वाटावे अशा गावात जन्मलेली, आई-वडिलांच्या पारिजाताच्या फुलांसारख्या मायेनं सुखावलेली, भरपूर मोठं, शेतकरी कुटुंब असलेली आणि सर्वाच्या ‘गळ्यातला ताईत’ म्हणावी अशी मी एक मुलगी. कळत्या वयाकडे जाताना एकापाठोपाठ एक तरुण चुलत्यांच्या मृत्यूने झाकोळून जाऊ बघणारी परिस्थिती पप्पांनी न डगमगता हाताळली. त्यांना पाहून लढण्याची ऊर्जा नकळत माझ्याही आयुष्यात पेरली गेली. दुसरीकडे आध्यात्मिक, साधीभोळी आणि सहवासात येणाऱ्या प्रत्येकावर भरभरून माया करणारी आई. घरात काम करताना ओव्या म्हणायची. आजही म्हणते. गावात पहाटेच्या भूपाळीने जाग यायची. हरिनाम सप्ताह, भजनं यांनी गाव कायम गजबजलेला असायचा. माझे कान आणि मन त्यातून तयार होत गेलं.

पारंपरिक सणांसोबत भगतसिंग, शिवाजी महाराज यांची जयंती, प्रजासत्ताक दिन अशा उत्सवांना घरात गोड-धोड करणारी आई, त्यांच्या गोष्टी सांगणारे वडील यांनी तेव्हाच पुढच्या सगळ्या प्रवासाची शिदोरी बांधून दिली होती. अगदी खूप लहान असताना वाडय़ातली सगळी भावंडं एका ओळीत बसवून स्वत: बाई होऊन मी त्यांना बाराखडी, उजळणी शिकवायचे. माझ्यातली शिक्षिका आईनं ओळखली. खाऊसोबत वाचण्यासाठी ‘चंपक’, ‘चांदोबा’ आणणाऱ्या, ऐन उमेदीच्या, तारुण्याच्या उंबरठय़ावरही सतत प्रेरणादायी पुस्तके हातात ठेवणाऱ्या वडिलांनी ओबडधोबड जगण्याला आकार दिला. आज त्याच जाणिवांतून घरात स्वत:चं ग्रंथालय आहे. दागिन्यांप्रमाणे माझा जीव या पुस्तकांमध्ये अडकलेला असतो. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन गवस, अनुराधा पाटील आणि नीरजा यांचं लेखन वाचून आलेली खोल समज रोजच्या जगण्यात, अनेकानेक वृत्ती-प्रवृत्तींना हाताळताना उपयोगी पडते. कसोटीच्या प्रसंगी खंबीर ठेवते. आजी, चुलत्या, आत्या, मामी, मावशी आणि माझ्या नोकरीदरम्यान खेडोपाडी मला भेटत गेलेल्या असंख्य महिला पालक, भोगलेलं दु:ख गोड मानून, अडचणींशी दोन हात करणाऱ्या स्त्रिया माझ्यासाठी सतत प्रेरणादायी बनत आल्यात. वैवाहिक आयुष्यातही मित्र बनून राहिलेला कुटुंबवत्सल जोडीदार अजय यांच्या रूपाने मिळाला. माझ्यातल्या ‘मी’ला पुस्तकं आणि जितीजागती माणसं दोघांनीही घडवलंय.

मागच्या १५ वर्षांपासून दररोज नोकरीच्या निमित्ताने रोजचं जगणंच लहानशा खेडय़ाशी जोडलेलं असतं. दररोज येणं-जाणं मिळून १४० किलोमीटर असा शहराकडून खेडय़ाकडे असणारा रोजचा प्रवास. दोन वेगवेगळ्या जगण्यांतला, वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा दुवा. मराठवाडय़ासारख्या सतत दुष्काळ, नापिकी, राजकीय तंटे आणि अभावशील परिस्थिती अनुभवणाऱ्या प्रदेशाचा पट दररोज माझ्यासमोर मांडलेला असतो. या प्रवासात नित्यनवे अनुभव गाठीशी बांधले जातात. कधी मुद्दाम आपल्याला पाहून ‘यांना पगारी खूप झाल्या हो!’ असे कुत्सितपणे म्हणणारे लोक तर कधी ‘मॅडम, तुम्ही बसा बरं माझ्या जागेवर.’ म्हणून पटकन बसमध्ये जागा देणारी अनोळखी व्यक्ती, अशा असंख्य व्यक्ती आणि वल्लीही भेटतात.

आपल्या लेकरांचे नाव शाळेत दाखल करण्यासाठी आलेले निरक्षर वडील, आजोबा यांच्यापासून दररोज शाळेच्या वाटेने डोक्यावर टोपलं घेऊन शेताच्या वाटेने जाणारी आई, आजी.. असंख्य माणसं मी रोज नवं पुस्तक वाचावं इतक्या ओढीने अनुभवते. छोटय़ाशा, डोंगराळ भागात बऱ्याचशा सोयीसुविधांपासून दूर असणारं माझं नोकरीचं गाव. पंधराशे लोकसंख्येच्या या दुर्गम गावात भावभावकीच्या गुंत्यात गुंतलेले लोक अडीअडचणीला कशाचीच पर्वा न करता एकमेकांसाठी धावून येतात. तर कधी अगदी छोटय़ाशा मानापमानासाठी एकमेकांशी हाडवैरसुद्धा करायला मागेपुढे पाहात नाहीत. इथल्या स्त्रिया कष्टाच्या घाण्याला जुंपून घेत उभ्या आयुष्यात स्वत:साठी एक क्षणसुद्धा वेगळा काढत नाहीत. या सगळ्यांच्या जगण्याचे अनेकरंगी पदर न्याहाळताना मला जगताना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळत राहतात.

माझी इथं बदली झाली ती मागच्या वर्षी. जुन्या शाळेतून पाऊल निघेना. वाटलं, नकोच इतका जीव लावायचा कुठल्या लेकरांना, आणि शाळेला. पण नव्या शाळेच्या रूपाने कोरी करकरीत पाटी आणि नवे निरागस डोळे माझी वाट बघत होते. ‘पुन्हा नवा खेळ’ म्हणत पदर खोचून मी उभी राहिले. शाळेत सर्वात ज्युनियर असतानाही मुख्याध्यापक पदाचा पदभार माझ्या पुढय़ात येऊन उभा राहिला. मनात बरीच धाकधूक होती. शिकण्या-शिकवण्यात रमणारी मी, या पदासोबत येणाऱ्या असंख्य दृश्य-अदृश्य जबाबदाऱ्या पेलू शकेन का? अशा शंका मनात ठेवूनच पद स्वीकारलं. दरम्यान ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन’ आला. मी मुख्याध्यापक म्हणून ध्वजारोहण केलं. तिरंगा फडकावण्याची आयुष्यातली ती पहिलीच वेळ. त्यातून एक आगळीच ऊर्जा संचारली. मग सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष, गावकरी यांना विश्वासात घेतलं. गावाला उद्देशून तब्बल दोन तास बोलले. गावानंही हाकेला प्रतिसाद दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावकऱ्यांचा ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ तयार केला. शिकून नोकरीला गावाबाहेर गेलेल्या मुलांनाही शाळेसाठी काहीतरी वाटा उचलण्याचे आवाहन केले. गरिबीला तोंड देणाऱ्या या गावानं फक्त आठ दिवसांत तब्बल दोन लाख रुपये शाळेच्या विकासासाठी जमा करून दिले. माझ्यात एरवी कधी ठळकपणे न दिसलेले नेतृत्वगुण मला यातून शोधता आले. एक गोष्ट कळून चुकली, आपण जरी खार असलो तरी आपली सकारात्मक वृत्ती आणि आशावाद आपल्यामध्ये हत्तीचं बळ निर्माण करतो.

मुलांच्या घरी भेटी देताना अनुभवायला मिळणारा गाव मला खूप प्रगल्भ करतो. एखाद्या घरापुढे बाज टाकून बसलेल्या आजी त्यांचे दोन्ही खडबडीत, कष्टलेले हात माझ्या तोंडावरून फिरवत, ‘आमची सावित्रीमाय हायस गं तू, आमचे लेकरं हुशार केलीस.’ असं बोलत आलामला घेतात. एखाद्या लेकराची आई माझ्यासाठी काळा चहा उकळते. हातात हात घेऊन भरल्या डोळ्यानं संसारातल्या असंख्य अडचणी बहिणीला सांगितल्यासारखं सांगते. मी त्यांच्याशी त्यांच्या वयात येणाऱ्या मुलींच्या शारीरिक, भावनिक आरोग्याची सोप्या भाषेत चर्चा करते. सुरुवातीला बुजून बोलणाऱ्या स्त्रिया हळूहळू मोकळेपणाने बोलू लागतात. अडचणी, वेदना आणि बरंच काही अवघड-अनवट सांगून जातात. खूप मोठं असं काहीतरी शोधत बसण्यापेक्षा या मायमाउल्यांवर क्षणाची तरी सावली धरण्याचं सुख एव्हरेस्टएवढं मोठं असतं!

वर्गात सूर लावून अभंग म्हणणारा संदेश, आर्त आवाजात माहेराची लोकगीतं म्हणणारी दुर्गा, चारोळ्या रचणारा साई, उच्चारात स्पष्टता नाही म्हणून सगळ्यांच्या चिडवण्यात केंद्रस्थानी असणारा सुदर्शन आता रोज आत्मविश्वासाने शाळेची कुलपं लावतो. प्रसन्न सकाळी गावात पाऊल ठेवताच पिटुकली मुलं-मुली तयार होऊन पळत पळत माझी पर्स घेत मिठी मारतात. या सगळ्या चतन्याच्या चांदण्या. आमच्या शाळेत सुरू असलेली ‘बँक ऑफ गोजेगाव’ आणि ‘आनंदी ग्रंथालय’ हे प्रयोग खास आहेत. खाऊचे पैसे वाचवून आमची मुलं शाळेच्या बँकेत ते पैसे जमा करतात. वडिलांची अडचण असेल तेव्हा वह्य़ा-पेनासाठी ते पैसे उचलून घेतात. प्रतिकूलतेतही त्यांच्यात शाबूत राहिलेली शिक्षणाची ओढ मला अधिकाधिक संवेदनशील बनवत राहते. स्वत:च्या दोन मुलांचा आहार, आरोग्य, व्यायाम, खेळ आणि अभ्यास यात कसलाच चान्स न घेणारी माझ्यातली आई. ती शाळेतल्या पण हरेक लेकरातही स्वत:च्या लेकरांना, अभिनव आणि समृद्धीला शोधते.

‘आर्थिक कारणांनी हतबल होत आधी घरातल्या मुलीचं शिक्षण बंद करणारी खेडय़ातली कुप्रथा कधी संपेल? उपासतापासात अडकलेली आई आपल्या वयात येणाऱ्या मुलीची मत्रीण कधी होतील?’ अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी आणि सहकारी मैत्रिणींनी शाळेमध्येच ‘हळदीकुंकू’ घेऊन अनेक नाजूक प्रश्नांची चर्चा या आयांसोबत केली. ‘आई बदलली तर जग बदलेल,’ हा आमचा विश्वास. मुलांचा आहार, आरोग्य आणि अभ्यास यावर चर्चा करणं, पर्यावरणवादी, विज्ञानवादी, जागरूक मुलं-मुली घडवणं हेच आम्ही मत्रिणी एकमेकींशी बोलत राहतो. बोलताना बऱ्याच वेळा वैयक्तिक सुखदु:ख वाटून घेतो. ‘वर्किंग वुमन’ म्हणून घरच्या-बाहेरच्यांच्या अपेक्षांचा प्रचंड दबाव आम्हा सगळ्या जणींना जाणवतो. तसा तो हरेक स्त्रीवर असतो. मात्र ग्रामीण-निमशहरी भागात त्याचा गुंता अजूनच अवघड असतो. हा गुंता समजून घेणं माझी इयत्ता वाढवत राहतं.

कधी एखादी मत्रीण तिच्या घरकामात मदत करणाऱ्या नवऱ्याचे भरभरून कौतुकदेखील करते. कधी छोटंसं बाळ घरी ठेवून आलेली एखादी मत्रीण बाळाच्या आठवणीने व्याकूळ दिसते. तर कधी ‘सहकारी खूप खडूस आहेत गं’ म्हणून चेहरा पाडून बसलेली मत्रीण भेटते. अतिशय माया करणारी सासूसुद्धा बऱ्याच मत्रिणींना असते. मग त्या अगदी बिनधास्तपणे नोकरी करतात. काल एक जिवलग मत्रीण हातात हात घेऊन म्हणाली, ‘‘पिकलेली मोसंबी अलगद सोलतात न प्रेमाने, तसं आयुष्य जगू गं आपण!’’ हा जिव्हाळा अडथळ्यांची शर्यत धावत राहण्याची ताकद देत राहतो.

एक शिक्षिका म्हणून जोतिबा आणि सावित्रीमाईंच्या कामाची रेघ पुढे ओढताना आवडते कवी रमेश इंगळे-उत्रादकर यांच्या कवितेच्या ओळी सतत मनाशी असतात.

‘इतुकेच अंगी बळ यावे फक्त

खडुतून रक्त उतरावे

उतरावे आणि देह व्हावा मुग्ध

खडुतून दुग्ध स्रवताना.’

jyotichounde@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:14 am

Web Title: me chi gosht article jyoti mahajan abn 97
Next Stories
1 सृजनाच्या नव्या वाटा : मुलींसाठीची पहिली शेतीशाळा ‘दि गुड हार्वेस्ट स्कूल’
2 आव्हान पालकत्वाचे : एक ‘गलेलठ्ठ’ समस्या
3 वेध भवतालाचा :वृक्षांशी जोडून घेताना
Just Now!
X