News Flash

‘मी’ची गोष्ट : स्थिर जगण्यातली अस्थिरता

स्वत:चं ‘मी’पण स्वत:लाच शोधावं लागतं. हे ‘मी’पण सापडलं, की आपण अस्सल जगू लागतो..

(संग्रहित छायाचित्र)

रेणुका कल्पना

तत्त्वज्ञान आणि ‘आभा’नं मला जगाकडे बघण्याचा एक निकोप, निर्मळ आणि तरतरीत दृष्टिकोन दिला. स्वत:चं ‘मी’पण स्वत:लाच शोधावं लागतं. हे ‘मी’पण सापडलं, की आपण अस्सल जगू लागतो.. जुन्या फोटोमधल्या माझ्या ‘मी’कडे पाहते तेव्हा स्थैर्य मिळवण्यासाठी धडपडणारी मी आठवते. नेमकं कोणतं स्थैर्य मला मिळवायचं होतं, हे मला नीटसं कधी उमगलंच नाही; पण स्थैर्यातला फोलपणा जाणवल्यावर मी दुसरी वाट धरली..

त्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर किलकिल्या डोळ्यांनी कसलीशी ‘फेसबुक’ नोटिफिकेशन उघडली. एक फोटो दिसला. अंधारलेला आसमंत, समोर समुद्र आणि त्या समुद्राकडे चालत जाणारी एक मुलगी त्यात दिसली. आधी वाटलं, आपण कसलासा वॉलपेपर बघतोय; पण मग लक्षात आलं, अरे, ही तर मीच! डोळे खाड्कन उघडले..

असंच खाड्कन डोळे उघडणारं एक अख्खं वर्ष माझ्या आयुष्यात आलं होतं. त्याआधीचा हा फोटो ‘फेसबुक’वर मेमरी म्हणून दिसत होता. तेव्हा मी त्या फोटोला कॅप्शन दिलं होतं, ‘टुवर्डस स्टॅबिलिटी’ म्हणजेच ‘स्थैर्याकडे जाताना’. रात्र होणार असल्यानं आसमंतात भरून आलेला अंधार, ओहोटी लागलेला शांत समुद्र, सगळंच कसं या फोटोत जमून आलं होतं. त्या वेळीच्या माझ्या मनाची स्थिती हा फोटो समजावून सांगत होता आणि योगायोगानं त्यातली मुलगीसुद्धा मीच होते.

पण असं तरी कसं म्हणता येईल? आज मी या फोटोतल्या मुलीकडे पाहते तेव्हा जाणवतं, फक्त हे शरीर सोबत घेऊन मी मोठी झाले आहे. या मधल्या काळात मनातल्या, बुद्धीतल्या, परिस्थितीतल्या अनेक जन्मजात ओळखी मी मागे सोडल्यात. त्याच समुद्रात त्यांचं विसर्जन केलंय. आपण जन्मतो तेच मुळी एक वास्तव घेऊन. नाव, आडनाव, जात, धर्म, वर्ण, लिंग अशी किती तरी वलयं जन्मल्या-जन्मल्या आपल्या नग्न  शरीराभोवती एक उबदार पांघरूण तयार करतात. या पांघरुणात फार सुरक्षित वाटत असतं. त्यामुळेच या पांघरुणातून बाहेर पडता येऊ शकतं याची जाणीवही आसपासचा समाज आपल्याला होऊ देत नाही. अर्थात, ही जाणीव न करून देण्यामागे मोठे ‘पॉलिटिकल इंटरेस्ट’ही असतात; पण मला यातून बाहेर पडावंसं वाटलं, ते प्लेटोमुळे. प्लेटो ग्रीक तत्त्वचिंतक. ‘अ‍ॅलगरी ऑफ केव्ह’ नावाची एक गंमतशीर गोष्ट प्लेटो सांगतो. प्लेटो म्हणतो, माणसं अंधाऱ्या गुहेत साखळदंडांनी बांधलेली असतात. त्यांच्या मागे गुहेचं तोंड असतं. तिथून थोडासा सूर्यप्रकाश आणि गुहेच्या बाहेर असणाऱ्या जगाच्या सावल्या गुहेतल्या भिंतीवर पडत असतात. साखळदंडांनं बांधलेल्या माणसांना या सावल्या म्हणजेच खरं जग आहे असं वाटत असतं; पण त्यातला एक कैदी उठतो, साखळ्या तोडतो आणि गुहेतून बाहेर पडतो. त्याला सूर्य दिसतो! अंतिम सत्याचं, खऱ्या जगाचं ज्ञान होतं. प्लेटोच्या ‘केव्ह मॅन’सारखं समोरचं वास्तव झुगारून, आपल्या साखळ्या तोडून, अंतिम सत्याच्या शोधासाठी उबदार गुहेतून बाहेर पडून, थेट सूर्यासोबत डोळे भिडवण्यात नशा असते. ही नशा फार लवकर कळत नाही. अनेकदा ती जन्मभर कळतच नाही. प्लेटोच्या याच ‘सूर्य पाहिलेल्या माणसा’नं मला गुहेतून बाहेर पडण्याची ऊर्मी दिली.

माझी उबदार गुहा चारचौघा मुलींसारखीच होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलीसारखं खूप अभ्यास करणं, चांगले गुण मिळवण्यासोबतच रामरक्षा म्हणणं, संस्कृतमधले श्लोक, स्तोत्र स्पष्ट उच्चारासोबत म्हणू शकणं, हे माझ्यासाठी आदर्श होतं. घरात वडील नव्हते, पण थोरल्या भावामुळे घरातल्या पुरुषाचं वर्चस्व मी मान्य केलं होतं. अशा वातावरणात वाढल्याने थोडी समज आल्यावर मी स्वत: पुरुषसत्ताक, वर्चस्ववादी आणि जातीयवादी भूमिका फार ठामपणे मांडू लागले. माझ्या जातीचा, धर्माचा मला अभिमान होता तसाच इतरांच्या जातीविषयी, इतर धर्माविषयी तुच्छता मनात होती. घरातल्या मोठय़ांकडून, नातेवाईकांमधल्या पुरुषांकडून मी सामाजिक, राजकीय मतं जशीच्या तशी स्वीकारत होते. शिकायचं, लग्न करायचं आणि नोकरी व घरातली कामं करत नवऱ्याभोवती आयुष्य काढायचं, अशा माझ्या आयुष्याविषयीच्या संकल्पना होत्या. सगळं ठरलेलं, स्थिर, सुरक्षित, उबदार आयुष्य मला हवं होतं. माझं नाव आणि आडनाव मी ठसठसून सांगायचे. या आडनावाचं एक ‘कल्चरल प्रिव्हिलेज’ मला मिळत होतं. आज मी माझ्या नावापुढे माझ्या आईचं नाव लावते. माझं असणं माझ्या आईचं नाव घेतल्याशिवाय, तिच्या कष्टाची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही म्हणून!

प्लेटो आयुष्यात आला ते तत्त्वज्ञान या विषयात पदवीचं शिक्षण घ्यायचं ठरवलं त्यामुळे. महाविद्यालयातल्या आमच्या प्राध्यापिका वैजयंती बेलसरे प्लेटो, सॉक्रेटिसची ही गोष्ट अनेकदा वर्गात सांगायच्या. त्यातून प्रत्येक वेळी नवा अर्थ उलगडायचा. तत्त्वज्ञानामुळेच जीवघेणं, आकर्षक वाटणारं एक अद्भुत सत्य माझ्या हाताला लागलं. ते म्हणजे, स्वत:ला सतत ओलांडत राहणं, स्वत:च्या पलीकडे जाणं.

एक प्रसंग कायमचा मनावर ठसलाय.

टु-व्हीलरचं ‘लर्निंग लायसन्स’ काढायला गेले होते. दलालाला ६०० रुपये आणि एक परीक्षा देऊन काम होणार होतं. त्यानं परिक्षेसाठी अभ्यास करायला एक दीडशे प्रश्न-उत्तरांचा संच पाठवला होता. त्या काळात मी कोणतीच गोष्ट गांभीर्यानं घेत नव्हते. मी प्रश्नसंच नीट वाचला नाही. अळम-टळम करत थोडे प्रश्न वाचले आणि परिक्षेला गेले. चक्क नापास झाले. लायसन्स मिळणार नव्हतं. नापास झाल्याची लाज वाटली. ते जगाला कळू नये म्हणून तिथं दलालाला पैसे देऊन लायसन्स बनवून घेतलं. त्याच दिवशी ‘फर्स्ट इअर’चाही निकाल लागला होता. त्यातही कमी मार्क मिळाले होते. खूप अपराधी वाटलं. त्या दिवसानंतर किती तरी दिवस मी फार अस्वस्थपणे जगले. खोटेपणा, बेजबाबदारपणा, फसवणूक, असे किती तरी गुन्हे मी एकाच दिवशी केले होते. त्या दिवशी पहिल्यांदा स्वत:ला तपासून पाहावंसं वाटलं. हा प्रसंग आजही माझ्या मनात येतो तो अपराधीपणाची भावना घेऊनच. अगदी या लेखात हा प्रसंग लिहितानाही खूप हिंमत एकवटावी लागतेय. या प्रसंगानंतर मी स्वत:ला बदलायचं ठरवलं. स्वत:च्या राजकीय विचारांपासून ते शैक्षणिक गोष्टींपर्यंत सगळ्या गोष्टी बदलायच्या होत्या. तत्त्वज्ञान हा ‘स्पेशल सब्जेक्ट’ घेतला आणि त्यासोबतच जगणं वाचू लागले..

‘फर्स्ट इअर’ला असताना आम्ही काही मुलामुलींनी दर आठवडय़ाला एकत्र जमून काही विषयांवर बोलायचं, चर्चा करायची, आपला अभ्यास वाढवायचा, असं ठरवलं होतं. पहिलाच विषय ‘महात्मा गांधी-नथुराम’ असा काहीसा होता. मला आठवतं, नथुराम गोडसेंचं, त्यांनी केलेल्या गांधीहत्येचं आणि हिंसेचं समर्थन मी फार तावातावाने करत होते. बोलण्यात नुसताच आवेश. त्याला अभ्यासाची धार नाही; पण नंतर या विषयाचा अभ्यास केला तेव्हा ती संपूर्ण भूमिकाच चुकीचं असल्याचं जाणवलं. माझी राजकीय मतंही अशीच बदलत गेली. २०१४ ला उजव्या विचारसरणीचं घरचे करतात म्हणून समर्थन करणाऱ्या मला २०१६-१७ पर्यंत त्या विचारांचा फोलपणा कळत गेला. मला धर्माविषयीही असंच काहीसं वाटू लागलं. देवावरची श्रद्धा उडाली. विज्ञानाला धरून जगायचं, विज्ञानावर श्रद्धा ठेवायची, हे मी ठरवून टाकलं.

मी घडले की बिघडले ते मला माहीत नाही; पण मी ‘मी’ असण्यात तत्त्वज्ञानाचा वाटा खूप मोठा आहे. शिक्षण म्हणजे काय याचं अंतज्र्ञान मला तत्त्वज्ञान हा विषय घेऊन झालं. तत्त्वज्ञानानं जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. जातीयवादापासून ते पुरुषसत्ताक विचारसरणीपर्यंत माझ्यातल्या प्रत्येक गोष्टीला तत्त्वज्ञान आव्हान देत होतं. तत्त्वज्ञानानं सहिष्णुता शिकवली. पटत नसलेल्या मताचा आदर करायचा म्हणजे काय करायचं हे तत्त्वज्ञानानं सांगितलं. तत्त्वज्ञानानं मला माझं अस्सलपण दाखवलं. कोणाचं तरी उसनं घेऊन ते आपलं म्हणून सांगत फिरण्यापेक्षा मला माझी ओळख होणं महत्त्वाचं आहे हे तत्त्वज्ञानानं मला शिकवलं. स्वत:शी संवाद करण्याची गरज मला तत्त्वज्ञानामुळे कळली.

स्वत:च्या अस्तित्वाची अशी जाणीव झाल्यावर स्त्रीवादानं मला माझ्या अस्मितेची जाणीव करून दिली. बाई एक आई, बहीण, मुलगी आणि गर्भाशय-योनीपलीकडे बरंच काही असते हे स्त्रीवादानं शिकवलं. या सगळ्या भूमिकांच्या पल्याड मी जाऊ लागले. स्वत:ला माणूस म्हणून शोधलं तेव्हा मनातून फार शांत वाटलं होतं. माझ्याच नाही, तर पुरुषसत्तेत वाढलेल्या कोणत्याही स्त्रीच्या जडणघडणीत स्त्रीवाद प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. जवळचे पुरोगामी विचारांचे माझ्या काही मित्रमैत्रिणी माझ्यातल्या हा बदल पाहात होते. त्यांच्यासाठी मी घडत होते; पण माझ्या घरच्यांसाठी मात्र मी बिघडत होते. सकाळी महाविद्यालय, दुपारी तिथेच बसून वाचन आणि वेगवेगळी व्याख्यानं, पुस्तक प्रकाशनं, चर्चासत्रं ऐकण्यात संध्याकाळ होत होती. यात इतका वेळ जायचा, की अनेकदा अख्खा दिवस बाहेरच काढायचे. घरची कामं, स्वयंपाकपाणी यात मन रमत नव्हतं. एक वेगळ्या प्रकारची प्रगल्भता माझ्या रोमारोमांत वाहत होती.

अशीच एके  संध्याकाळी कुठल्या तरी कार्यक्रमाला गेले होते. आई ऑफिसमधून दमून घरी आलेली. मी स्वयंपाक केला नव्हता, पाणी भरलं नव्हतं. आई साहजिकच वैतागली. मी घरी आल्यावर ती मला ओरडली. चूक माझी होती; पण उलट मी तिच्याशी वाद घालून ‘माझं अशा कार्यक्रमांना जाणं किती गरजेचंय,’ हे सांगत राहिले. आई म्हणाली, ‘‘तू मोठी झालीस; पण मॅच्युरिटी नावाचा प्रकार तुझ्यात आला नाही.’’ मला धक्काच बसला. बाहेर एवढं बोलणारी, वेगळी मतं मांडणारी आणि लोकांना वयापेक्षा जास्त प्रगल्भ वाटणारी मी.. आईला असं कसं वाटतं? पण तोवर घरच्यांसाठी मी अतिशय अपरिपक्व मुलगी होते.

मी प्रचंड बंडखोर होते. ‘एखादी गोष्ट करू नको,’ असं सांगितलं, की ती मुद्दाम करायची, असं धोरणच मी अवलंबलं होतं. अशा वेळी आपले आपल्या कुटुंबासोबतचे संबंध ताणले जातात. त्यातही कुटुंबाच्या आणि आपल्यात ‘वैचारिक दरी’ असेल तर हा गुंता आणखीनच वाढतो. कुटुंबाचं सोबत असणं, त्यांचं काळजी करणं ही सगळी जाचक बंधनं वाटू लागतात. ‘भांडून आपल्याला पाहिजे ते मिळवलं पाहिजे’ हा बंड करण्याचा मार्ग होऊन जातो. या अर्थानं मी खरंच अपरिपक्व होते.

ही अपरिपक्वता ‘आभा’मुळे गेली. ‘आभा’ म्हणजे आरोग्यभान. आरोग्याच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या लोकांचा हा एक गट आहे. ‘आभा’मध्ये मी संवाद कसा करायचा हे शिकले. माझा स्वत:शी, माझ्या शरीराशी संवाद झाला. माझ्या आसपासच्या माणसांशी, माझ्या आसपासच्या संस्कृतींशी माझं असणारं नातं मी तपासून पाहू लागले. संवाद काय कमालीची खास चीज असते हे मला कळलं. मी संवाद करायला शिकले. संवाद शिकावा लागतो. चांगला संवाद करण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागतात. असे संस्कार ‘आभा’मधून माझ्यावर झालेत.

महाविद्यालयामध्ये असताना मी लेखनाची, अनुवादाची काही कामं केली होती. त्याच्या बळावर ‘आंदोलन शाश्वत विकासासाठी’ या मासिकात मला छोटी नोकरी मिळाली. ही नोकरी करत असताना आयुष्यात मला पत्रकारिता करायची आहे हे मी ठरवून टाकलं. माझं पदवी मिळेपर्यंतचं आयुष्य पुण्यात गेलं होतं. त्यातही मी कोथरूडसारख्या सांस्कृतिक साचलेपण आलेल्या एका भागात राहायचे. एकच एक संस्कृती, तोच-तोचपणा, लहानपणापासून राहत असल्यानं शहरात झालेला ‘कम्फर्ट झोन’ हे सगळं ओलांडून नव्यानं स्वत:चा शोध घ्यावा असं वाटू लागलं.. मी मुंबई गाठली. आज मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काही करू पाहतेय. वेगवेगळ्या गोष्टी शिकतेय, प्रयोग करण्यातला आनंद अनुभवतेय.

तत्त्वज्ञान आणि ‘आभा’नं मला जगाकडे बघण्याचा एक निकोप, निर्मळ आणि तरतरीत दृष्टिकोन दिला. माझी जन्मजात ओळख विसरायला भाग पाडलं. मला वाटतं, आपण जेव्हा आपल्या या ओळखी सोडतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण होतो. या ओळखी मी कसं असलं पाहिजे हे सांगत असतात; पण त्या ओलांडून स्वत:चं ‘मी’पण स्वत:लाच शोधावं लागतं. हे ‘मी’पण सापडलं, की आपल्या आयुष्यासाठी आपण जबाबदार होतो. आपले निर्णय आपण घेऊ लागतो. अस्सल जगू लागतो. हे तत्त्वज्ञान कळल्यापासून माझा अस्सलपणे जगण्याचा प्रयत्न सुरु आहे.

जुन्या फोटोमधल्या माझ्या ‘मी’कडे पाहते तेव्हा स्थैर्य मिळवण्यासाठी धडपडणारी मी आठवते. नेमकं कोणतं स्थैर्य मला मिळवायचं होतं, हे मला नीटसं कधी उमगलंच नाही; पण स्थैर्यातला फोलपणा जाणवल्यावर मी दुसरी वाट धरली तेव्हा एक वाक्य मान्य केलं. आज त्या फोटोतल्या मुलीला मला हिरॅक्लिटस या ग्रीक तत्त्वचिंतकाचं हेच वाक्य पुन:पुन्हा सांगावंसं वाटतं, ‘या जगात काही स्थिर असेलच तर ती गोष्ट म्हणजे अस्थिरता.’ अशाच एका वळणावर भेटलेला बुद्धही मला हेच सांगत राहतो..

happyrenuka46@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 5:09 am

Web Title: me chi gosht article renuka kalpana abn 97
Next Stories
1 सृजनाच्या नव्या वाटा : मरुदम फार्म स्कूल निसर्गस्नेही शेतीशाळा
2 आव्हान पालकत्वाचे : शारीर वैगुण्याची भ्रामकता
3 वेध भवतालाचा : अंतराळातून शोध प्राचीन संस्कृतीचा..
Just Now!
X