16 January 2021

News Flash

मी, रोहिणी.. : अभिनयाचे धडे..

माझं पहिलं बालनाटय़ ‘मंतरलेले पाणी’ कृष्णदेव मुळगुंद यांनी लिहिलेलं

इब्राहिम अल्काझी

रोहिणी हट्टंगडी

अभिनयातले पहिले गुरूखुद्द बाबाच असल्याने आणि त्यात यथेच्छ मुशाफिरी करायला बालरंगभूमी असल्याने रोहिणी ओक (हट्टंगडी) यांचे अभिनयाचे धडे चोख गिरवले गेले याबद्दल शंकाच नाही. पुढेही बाबांच्याच प्रेरणेने ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’ची शाळा आयुष्यात आली आणि तिथे इब्राहीम अल्काझीसारखा गुरू मिळाल्यानंतर तर काय रंगभूमी ही कर्मभूमी होणार  हेही ठरूनच गेलं.. आज नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी या तीनही माध्यमांत स्वत:ची अनोखी छाप सोडणाऱ्या रोहिणी हट्टंगडी त्यांच्या या प्रवासातील विविध टप्पे उलगडणार आहेत दर पंधरवडय़ाला.

नमस्कार!

बऱ्याच वर्षांनी अशी लिहायला बसलेय!

कसं लिहावं, कशी सुरुवात करावी समजत नव्हतं. बरं, लेखणीचं आणि आमचं तसं फार सख्य नाही. आणि इतकं लिखाण तर दूरच! त्यातून विचार आणि संगणकाचा वेग याचा ताळमेळ बसला पाहिजे. असो!  तर..

दर पंधरवडय़ाला हा यज्ञ मला करायचा आहे. या यज्ञात समिधा कोणत्या असणार आहेत ते ठाऊक असलं तरी त्या कशा पडणार आहेत हे मला ठरवता आलं नाहीये अजून. अनुभवांच्या, आठवणींच्या संदर्भातच असणार हे नक्की!  नाही म्हटलं तरी आता ‘वय’ हे स्वीकारावंच लागतंय. ‘मला अजून काम करायचंय’ असं म्हणूनही,

‘ते तुम्ही करालच हो, पण तुमचे ‘इतक्या’ वर्षांचे अनुभव आम्हाला ऐकायचेत’ म्हटलं की बस! ठीक आहे तर!

प्रत्येकाच्या जडणघडणीत आईवडिलांचा पहिला वाटा असतो. माझ्याही बाबतीत तो आहेच. (मग गुरू, जोडीदार, नातेवाईक आणि स्त्रियांच्या बाबतीत सासू-सासरेही. सर्वच.)  माझ्या वडिलांचा प्रत्यक्षपणे. त्यांच्याकडेच मी रंगभूमीचे पहिले धडे घेतले. आणि आईची हौस! तिच्याचमुळे रंगमंचावर  पाऊल ठेवलं ‘फॅन्सी ड्रेस’च्या निमित्तानं. नंतर नेहमीच घरून प्रोत्साहन मिळत गेलं. मी पुण्याची. त्या वेळचं पुणं आजच्यापेक्षा खूप छोटं. अरण्येश्वर, पद्मावती, ही ठिकाणं आमचे ‘पिकनिक स्पॉट्स’ होते. शाळा-कॉलेजच्या वेळा सोडून आपल्याला आपली आवड जोपासता यायची. शाळेत असताना शाळेच्या बँड पथकात होते. टेबल टेनिस, थ्रो-बॉल खेळायचे. नंतर कॉलेजमध्ये व्हॉलीबॉलची ‘युनिव्हर्सिटी प्लेअर’ही होते. याशिवाय नृत्याच्या क्लासलाही जायचे. शाळेची आठ वर्ष कथकली, भरतनाटय़म् शिकले (हेही आईमुळेच.). शाळेत असतानाच बालनाटय़ात काम करायला लागले. (ते करायला मिळालं ते मला नाच येतो म्हणून!) तिथूनच नाटकाची आवड निर्माण झाली बहुतेक.

माझं पहिलं बालनाटय़ ‘मंतरलेले पाणी’ कृष्णदेव मुळगुंद यांनी लिहिलेलं. मुळगुंद सर आम्हाला शाळेत चित्रकलेचे शिक्षक होते. हरहुन्नरी! स्वत: नृत्य करायचे. शाळेच्या ‘फोक डान्स’ स्पर्धा असायच्या, त्यात ते नाच बसवायचे. चित्रकला तर होतीच पण नृत्यासाठी लागणारे वैविध्यपूर्ण पोशाखही ते स्वत: बनवायचे. आमच्या नाटकातले सगळे मुकुट, कंबरपट्टे, जे काही होतं, ते सगळं त्यांनीच स्वत: बनवलेलं होतं. मला आठवतंय, सोडय़ाच्या, कोकाकोला वगैरेंच्या बाटलीच्या झाकणांपासून ते कंबरपट्टे बनवायचे. झाकणाच्या आत रंगीत कागद ठेवायचा आणि चार बाजूंनी ठोकून त्याला चौकोनी आकार द्यायचा. मग त्याला दोन बाजूंनी छिद्रं पाडून जोडला की झाला पट्टा तयार. मी तो प्रयत्न केलेला आठवतोय मला.

मजा यायची नाटक करताना! मुलं इतकी रमून जायची नाटकात.. त्यांचं ते खदखदून हसणं, कधी भीतीनं किंचाळणं, तर कधी अद्भुत दृश्य पाहिलं, की ‘ओ..’ करून दाद देणं. खूप गंमत यायची. ‘भरत नाटय़ मंदिरा’त ही नाटकं व्हायची. ‘भरत’ तेव्हा र्अध ‘ओपन एअर’ नाटय़गृह होतं. म्हणजे रंगमंच बंदिस्त, पण प्रेक्षागृह उघडं. बालनाटय़ं सुट्टीतच व्हायची. एकदा दोन अंकांनंतर जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. थांबेचना. प्रयोग बंद करावा लागला. आम्हा मुलींना तर रडूच कोसळलं. आमचीही तितकीच भावनिक गुंतवणूक होती ना त्यात.

तर अशी नाटय़प्रवासाची सुरुवात झाली माझ्या. नंतर मोठय़ांच्या नाटकात आले. माझे वडील ‘सुंदर मी होणार’ नाटक ‘राज्य नाटय़ स्पर्धे’साठी बसवत होते. ‘बेबीराजे’साठी मुलगी शोधणं चालू होतं. मी समोर असूनही ते माझा विचार करत नव्हते.. का? तर, ‘आपल्याच मुलीला घेतलं नाटकात’ असं लोक म्हणतील म्हणून! आईनंच सुचवलं तेव्हा कसेबसे तयार झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझं अभिनयाचे धडे गिरवणं सुरू झालं. पुण्यात आमचं घर भरत नाटय़ मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर यांच्या मध्ये. प्रयोग झाला की आमच्याकडे सगळे जमायचे. मग तो प्रयोग आमचा असो किंवा आम्ही पाहून आलेलो असू. त्या प्रयोगावर चर्चा, टिप्पण्या, आमचंच नाटक असेल तर तू इथे हे केलंस, ते केलंस, बाबांनी (- म्हणजे माझ्या वडिलांनी. ते ‘बाबा ओक’ होते सगळ्यांचे.) असं नव्हतं सांगितलं.. असं जोरजोरात चालायचं. जोडीला आईनं केलेली कॉफी. आणि हे सगळं रात्री एक, दीड, दोन वाजता! आमचं घर म्हणजे बंगला होता म्हणून बरं. पण या चर्चेतून आणि नंतरच्या प्रयोगांमधून स्वत:ला सुधारण्यातूनच आमचं नाटक शिकणं होत होतं. फक्त अभिनयच नाही, त्याबरोबर इतरही गोष्टी.

यावरून आठवलं, ‘सुंदर मी होणार’मध्ये (प्रयोग स्पर्धेचा होता की रंगीत तालमीचा आठवत नाही.) तिसऱ्या अंकात वडिलांशी भांडून मी घर सोडून रडत जाते, असा प्रसंग होता.  मी रडत रडत विंगमध्ये आले पण माझं रडणं थांबेचना. खूप ‘घुसले’ होते मी बहुतेक त्यात! बाबा आमचे दिग्दर्शक. ते विंगेतच उभे होते. त्या वेळी ते मला ‘‘आत जा’’ एवढंच म्हणाले, पण नंतर समजावलं, ‘‘एवढं भूमिकेत शिरणं बरं नाही. आता स्वत:ला बाहेर ठेवणं शिक!’’ तो माझा पहिला धडा!

पुण्यात वेगवेगळ्या नाटय़स्पर्धा सुरूअसायच्या. शालेय, महाविद्यालयीन, बँकेच्या, औद्योगिक, एक ना दोन.. औद्योगिक स्पर्धेतील एकांकिकेत काम करायला मुली तयार व्हायच्या नाहीत. त्यामुळे कंपनीव्यतिरिक्त इतर मुलींनाही नाटकात काम करता यायचं. फक्त बक्षिसासाठी त्यांचा विचार केला जायचा नाही. त्यात मला खूप काम करायला मिळालं. अनुभव मिळाला. त्या वेळचे माझे काही सहकारी आजही या क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दुर्दैवानं ‘होते’ म्हणावं लागतंय. बालनाटय़ातला माझा मित्र मोहन जोशी. अनेक वर्षांनी त्याच्याबरोबर ‘नटसम्राट’मध्ये काम केलं. राज्य नाटय़ स्पर्धेत ‘श्रीमंत’मध्ये माझ्या भावाचं काम केलेला विहंग नायक, औद्योगिक नाटय़स्पर्धेत एकत्र काम केलेले रमेश भाटकर, यशवंत महाडिक म्हणजे यशवंत दत्त, यांच्याबरोबरच अभिनयाचंही अंग असलेले आजचे आघाडीचे लेखक श्रीनिवास भणगे, ‘भरत नाटय़ संशोधन मंदिरा’चा अध्यक्ष आणि आमच्या ‘भरत’च्याच बालनाटय़ातला आनंद पानसे.. असे अनेकजण. असो, या झाल्या काही आठवणी..

पदवीधर झाल्यावर नोकरीच्या शोधात असतानाच सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. बाबांनीच दाखवलं होतं ते कात्रण. आणि दिल्लीला ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त (एनएसडी) दाखल झाले. ती तीन वर्ष.. त्यांनीच घडवलं मला! माझे गुरू इब्राहिम अल्काझी. आमची शाळा.. शाळाच म्हणते मी! तिथले विद्यार्थी.. माझे मित्र. सगळे! त्याबद्दल तर अगदी सविस्तर लिहिणार आहे मी नंतर. पण तिथेच माझा साथीदारही भेटला.. आयुष्याचा. जयदेव!

दिल्लीहून परत आल्यावर माझा नाटय़प्रवास सुरू झाला. मग चित्रपट, दूरचित्रवाणीवरच्या मालिका. पुढचे माझे लेख यावरच असतील. अनुभव, गमतीजमती, आठवणी..

भेटूच मग परत!

रोहिणी हट्टंगडी यांनी बालनाटय़ांपासून आणि पुढे दिल्लीतील ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’मध्ये (एनएसडी)अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी, सर्वच माध्यमांमध्ये आपल्या सशक्त अभिनयाने स्वतंत्र ओळख कमावली आहे.  रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबांच्या भूमिके ला ‘बाफ्टा’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कर्नाटक लोकनाटय़ ‘यक्षगान’मध्ये अभिनय केलेली पहिली स्त्री कलाकार आणि ‘इबरागी’ या जपानी काबुकी नाटकात काम करणाऱ्या आशियातील पहिल्या स्त्री कलाकार असा मान त्यांनी मिळवला आहे. ‘अंधायुग’, ‘होरी’, ‘कस्तृरीमृग’, ‘मित्राची गोष्ट’, ‘नटसम्राट’, ‘चांगुणा’ यांसारखी नाटकं, ‘सारांश’, ‘अर्थ’, ‘पार्टी’, आदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वेगळाआशयविषय आणि अभिनयानं गाजल्या. मराठी-हिंदी वाहिन्यांवरील मालिकांबरोबरच त्यांनी कन्नड, मल्याळम, तेलुगु, तमिळ, गुजराती आदी  विविध भाषांमध्येही अनेक भूमिका साकारल्या. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच, ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’, ‘विष्णुदास भावे सुवर्णपदक’ आणि इतरही अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2021 12:02 am

Web Title: me rohini article on acting lessons by rohini hattangadi abn 97
Next Stories
1 वसुंधरेच्या लेकी : रागावलेल्या मुलींची गोष्ट!
2 गद्धेपंचविशी : स्वत:ला शोधताना..
3 एक दशक संपताना!
Just Now!
X