श्रद्धेला जोपर्यंत विवेकाचे अस्तर असते तोपर्यंत श्रद्धा माणसाच्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या ऊर्जेचे काम करते, पण विवेकशून्य श्रद्धा माणसांच्या जीवनात भावनिक कोलाहल निर्माण करते.
माणसाच्या जीवनातून श्रद्धा वजा केली तर काय होईल? या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतील. जीवनात कशावरही आणि कुणावरही श्रद्धा न ठेवतादेखील वाटचाल करता येऊ शकेल, असं मानणाऱ्यांचा जसा एक वर्ग आहे तसा श्रद्धेय भावनेने जगणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. मुलांची आई-वडिलांवर श्रद्धा असते. विद्यार्थ्यांची गुरूंवर श्रद्धा असते. बुद्धिवादी आणि विचारवंतांची विचारांवर श्रद्धा ठेवून वाटचाल सुरू असते. विज्ञाननिष्ठांची प्रयोगातून हाती येणाऱ्या वैज्ञानिक सत्यावर श्रद्धा असते. एखादा रुग्ण शस्त्रक्रियेसाठी दवाखान्यात दाखल होतो. त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. दवाखान्यातील लोकांवर श्रद्धा ठेवून तो दिलेली औषधे घेत असतो. शस्त्रक्रियेपूर्वी या शस्त्रक्रियेला माझी मंजुरी आहे, अशा आशयाच्या फॉर्मवर सही करीत असतो. जे डॉक्टर तुझ्यावर उद्या शस्त्रक्रिया करणार आहेत, त्यांच्यावर तुझी श्रद्धा आहे का? हा त्या रुग्णाला विचारलेला प्रश्न हास्यास्पद वाटला तरी डॉक्टरांवर श्रद्धा असल्याखेरीज शांत मनाने त्या रुग्णाला शस्त्रक्रियेला सामोरं जाता येणार नाही. देव आहे की नाही? या प्रश्नावर सातत्याने विचारमंथन आणि वाद सुरू असतात. स्वत:ला आस्तिक म्हणवून घेणाऱ्यांची देवावर अढळ श्रद्धा असते. तर नास्तिक लोक देवाचे अस्तित्व मानायला तयार नसतात. तरीदेखील या जगात देव नाही यावर श्रद्धा ठेवून त्यांना वाटचाल करावी लागते. हे सारे पाहिल्यानंतर श्रद्धेचे महत्त्व लक्षात येते.
श्रद्धेमुळे विश्वास निर्माण होतो की विश्वासामुळे श्रद्धा निर्माण होते. याबाबतीतले प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. मी डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून उपचार घेतले आणि आजारातून बरा झालो, त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास बसला असे सांगणारेही रुग्ण असतात. माझा डॉक्टरांवर विश्वास होता पण दवाखान्यात दाखल असताना मला ज्या प्रकारची वागणूक मिळाली त्यामुळे माझ्या श्रद्धेला तडा गेला, असं बजावणारेही रुग्ण भेटतात. या गोष्टींमध्ये साम्य असले तरी आपल्याला येणाऱ्या अनुभवांच्या आधारेच माणूस प्रत्येक गोष्टीची मीमांसा करीत असतो. श्रद्धा हा विषयदेखील त्याला अपवाद नाही.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणत, ‘जीवनाला अधारभूत असणारा आणि जीवनातील विविध व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक वाटणारा एखादा अढळ भाव व्यक्तिजीवनात असेल, तर त्याला श्रद्धा हे नाव देता येईल. श्रद्धेच्या उपयुक्ततेविषयी दुमत असण्याचे कारण नाही. माणसाचं व्यक्तिमत्त्व, अस्तित्व आणि अस्मिता यांचा व्याधात करणारा कोणताही भाव श्रद्धा या संज्ञेस पात्र ठरू शकणार नाही. ‘श्रद्धा’ ही आत्मविश्वाससंवर्धक संजीवनी आहे.’
स्वामी विवेकानंद म्हणत, “”The old religion said that he was an ethist who did not believe in God, but my new religion says that he is an ethist who does not believe in himself”  ज्याचा देवावर विश्वास आहे पण स्वत:वर विश्वास नाही त्याला मी नास्तिक मानतो. कालीमातेवर अढळ श्रद्धा असणाऱ्या विवेकानंदांची ही भावना होती.
महात्मा गांधीदेखील परमेश्वराचे अस्तित्व मानणारे होते. पण त्यांची देवावरची अढळ श्रद्धा भाबडी नव्हती. ते म्हणत, ‘या देशात परमेश्वराला प्रकट व्हायचे असेल तर भाकरीच्या रूपातच प्रकट व्हावे लागेल.’
श्रद्धेला जोपर्यंत विवेकाचे अस्तर असते तोपर्यंत श्रद्धा माणसाच्या जीवनाला समृद्ध करणाऱ्या ऊर्जेचे काम करते, पण विवेकशून्य श्रद्धा माणसांच्या जीवनात भावनिक कोलाहल निर्माण करते. त्याचे जीवन कडेलोटाच्या काठावर आणून उभे करते.
श्रद्धा की अंधश्रद्धा हादेखील अनेकदा वादाचा आणि चच्रेचा विषय राहिलेला आहे. अनेक विचारवंतांना असे वाटते, ‘अंधश्रद्धा नावाची गोष्ट नसते. एक तर श्रद्धा असते किंवा नसते.’ अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाचे प्रतिपादन करणारे लोक सांगतात, ‘श्रद्धेच्या लाटेवर स्वार होऊन माणूस जेव्हा बुद्धी आणि विवेक हरवून बसतो तेव्हा आमचे काम सुरू होते.’
रवींद्रनाथ टागोर म्हणत, ‘ज्याला प्रकाशाची चाहूल लागते आणि पहाटेच्या काळोखात ज्याला गाणे स्फुरते असा पक्षी म्हणजे श्रद्धा होय. श्रद्धा ही सुखद आशावादाची सनई असते. तिच्या वादनाने जीवनाचे दालन उघडते.’
बुद्धिनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा यांच्या इतकाच जीवनात भावनांचाही पाझर असायला हवा. भावनाशून्य जीवन रूक्ष आणि कोरडे होईल. मूलभूत श्रद्धेशिवाय माणसाला जगता येणार नाही हे खरे तथापि कशालाही श्रद्धा म्हणून वाटचाल करता येणार नाही.
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची देवावर श्रद्धा असेल त्याच्या कृपेने मी पास होईन, अभ्यास करण्याची आणि पेपर लिहिण्याची तसदी घेण्याचे काहीएक कारण नाही असा दृढनिश्चय त्या विद्यार्थ्यांने केला तर काय होईल? माझी डॉक्टरांवर श्रद्धा आहे. त्याच्या कृपेने मी अनेकदा आजारातून आणि मरणाच्या दारातून बाहेर आलो आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली पथ्ये मी पाळली नाहीत तरीही माझे काहीही वाकडे होणार नाही, असे रुग्णाला वाटले तर काय होईल? माझा माझ्या आध्यात्मिक गुरूंवर विश्वास आहे. मी निवडणूक लढवत असताना प्रचार करण्याचे, मतदारांना भेटण्याचे आणि सभा घेण्याचे काहीएक कारण नाही. मला मताधिक्य मिळवून देण्याचे काम माझे गुरू करतील. अशी श्रद्धा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ठेवली तर? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे निराशाजनक येतील. श्रद्धेशिवाय माणसाला जगणे अवघड आहे, हे खरे असले तरी नुसत्या श्रद्धेवरही जगणे शक्य नाही.
जगातल्या सगळ्या विचारवंतांचे हेच सांगणे आहे. श्रद्धा हेच दैवत मानून जीवनात वाटचाल करता येणार नाही. प्रयत्नवादाची कवाडे बंद करणारी कोणतीही श्रद्धा माणसाला उत्कर्षांच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही. श्रद्धेमुळे माणसाची तौलनिक विचारशक्ती कुंठित होता कामा नये. माणसांना जसे भावभावनांचे व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रद्धाभावाचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे. श्रद्धेमुळे दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर भरवसा टाकून वाटचाल करणेही योग्य नाही.
गोंदवलेकर महाराजांची पत्नी, मुले कालवश झाली. अनेकांचा मृत्यू त्यांच्या देखत घडला. त्यांना एका भक्ताने विचारले, ‘महाराज, हे सारे घडत असताना तुमच्या रामाने काय केले?’ त्यावर महाराजांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘संसार हा असाच आहे. तो पुरता खोटा नाही आणि सर्वस्वी खरा नाही. सृष्टिचक्र हे फिरतच राहणार. अजरामर सिद्धान्त शोधून काढणारा शास्त्रज्ञ स्वत: अमर होत नाही. घटनांची स्वाभाविकता ही ईश्वरतत्त्वांशी विसंगत असत नाही.’
विचारांची वारी विवेकाच्या वाटेवरून चालत राहिली तरी श्रद्धेचे मोल कमी होत नाही. हे ज्याला समजते त्याच्याच जीवनमंदिरात आनंदाचा आणि समाधानाचा अखंड घंटानाद होत राहतो. अशांसाठीच श्रद्धा ही प्रेरकशक्ती ठरते.   

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…