विभावरी देशपांडे

अभिनेत्री

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
8 Poses For hair growth, healthy scalp,
मानेपासून खांदा व कंबरेपर्यंत केस वाढण्यासाठी ‘या’ ८ हालचाली करून पाहाच; केस धुताना सुद्धा ‘ही’ गोष्ट पाळा
Loksatta Lokrang Where did these insults on Holi originate and how did they develop
निमित्त: शिव्या-महापुराण

२०२० या वर्षांची सुरुवात फारच उत्तम झाली. मी आणि श्रीरंग गोडबोले गेली अनेक वर्ष एका जर्मन नाटय़ चळवळीशी निगडित आहोत. लुट्झ ह्य़ुबनर या प्रथितयश जर्मन नाटककाराबरोबर आम्ही दोन नाटकं लिहिली आहेत. त्याच्याबरोबरच्या तिसऱ्या नाटकाची चर्चा २०१९ मध्येच सुरूझाली होती. २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात लुट्झबरोबर  ४ दिवसांची लिखाणाची उत्तम बैठक झाली, नाटक आकार घेऊ लागलं..

जून महिन्यात दुसरी आणि डिसेंबर महिन्यात तिसरी अशा जर्मनीत होणाऱ्या बैठकींच्या तारखा ठरल्या, ‘मॅक्सम्युलर भवन’च्या सहाय्यानं आर्थिक पाठबळही मिळालं. तसंच इतकी वर्ष सातत्यानं केलेल्या ‘ग्रिप्स’ चळवळीलाही एक नवं, ठोस स्वरूप देण्याची चर्चा झाली. मी लिहीत असलेल्या एका चित्रपटाच्या पटकथेचं कामही संपलं. चित्रपट एप्रिल महिन्यात चित्रित होऊन दिवाळीपर्यंत प्रदर्शित करायचा बेत होता. शिवाय माझी दोन पुस्तकंही प्रकाशनाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत होती. म्हटलं, वा! हे वर्ष काहीतरी नवीन घेऊन येणार आणि लेखिका म्हणून माझी ओळख ठोसपणे अधोरेखित करणार.

हे वर्ष नवीन काही तरी घेऊन आलं हे निश्चित! केवळ माझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वासाठी.  हळूहळू त्याची व्याप्ती, त्याचा धोका आणि दाहकता स्पष्ट समोर आली. बघता बघता जगानं आणि नंतर आपणही एक अल्पविराम घेतला. सुरुवातीला वाटलं हा विराम ‘अल्प’ असेल, पण तो तसा राहिला नाही. जे घडतं आहे त्याबद्दल सुरुवातीला एक अविश्वासही होता आणि अस्वीकारही. सुदैवानं रोजचं जगणं मुश्कील होईल अशी माझी परिस्थिती नव्हती, पण आपण जी स्वप्नं पाहातो आहोत, जे ठरवतो आहोत आणि त्यामागे धावतो आहोत, ती एकाच वेळी किती मौल्यवान आणि त्याच वेळी किती अर्थहीन आहेत, या दुहेरी सत्याची जाणीव झाली आणि मग शोध सुरू झाला या अर्थहीन परिस्थितीतल्या अर्थाचा. या अर्थहीनतेत अनासक्त होण्याची भीती होतीच. नाहीतरी आपण कितीही, काहीही करायचं ठरवलं तरी आपल्या हातात काय आहे? असा निराशावादही येऊन गेला. पण या सगळ्यात आनंद मिळाला ते राहून गेलेलं वाचन आणि स्वत:साठी म्हणून केलेलं लिखाण पूर्ण करता आल्याचा.

मी अनेक वर्ष ‘टेलिव्हिजन’साठी लिखाण करते. कळत नकळत ‘डेडलाइन’साठी लिहायची सवय लागली होती. एक शिस्त म्हणून, रियाज म्हणून, स्वत:साठी लिहिताना त्यातून खूप काही मिळतं, हे मला नव्यानं जाणवलं. याच काळात माझ्या ‘इंडियन मॅजिक आय’ या निर्मितीसंस्थेनं ‘सोनी मराठी’ या वाहिनीवर ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही ‘टाळेबंदी स्पेशल’ दैनंदिन मालिका केली. त्याच्या कथालेखनाची जबाबदारी माझ्यावर होती. पुन्हा हे ‘डेडलाइन’चं काम असलं, तरी विषय, आशय आणि मुख्यत: मांडणीच्या अपरिमित मर्यादा सांभाळत नवीन काही तरी निर्माण करण्याची अप्रतिम संधी मिळाली. मीही इतरांप्रमाणेच एका प्रवासात आहे. कलाकार म्हणून आपली स्वत:विषयीची कल्पना, अपेक्षा आणि सत्य यात तफावत आहे का? असेल तरी ती किती आहे? हे अंतर आपण पार करू शकतो का? या अफाट स्पर्धेच्या, चढाओढीच्या कार्यक्षेत्रात आपल्या आतला समतोल, शांतपणा आपण टिकवू शकतो का? अशा अनेक प्रश्नांचा शोध चालू आहे.