धर्म अगदी समान असतात. म्हणजेच आपल्या सगळ्यांचे ‘मूळ’ एकच असेल का? मानवी बुद्धी, पंचज्ञानेंद्रियांच्या आकलनक्षमता जिथे संपतात तिथेच ‘खरे’ काही आहे का? जर त्या निर्मितीचा एक अंश मी असेन, तर त्याचा पुरावा काय? ‘डीएनए कोडिंग’प्रमाणे आपल्यातील परमेश्वरी अस्तित्वाचा पुरावा म्हणजे आपल्या अंतकरणात असलेला आपला ‘आतला आवाज!’ मन व बुद्धी या दोघांनाही मागे टाकीत आपला हा आतला आवाज आपल्याला सूचना करीत असतो. पण या सूचनांकडे बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो म्हणूनच राग-द्वेषाला आमंत्रण देतो.
 एकदा हा ‘आतला आवाज’ थोडय़ा मोठय़ा आवाजात ऐकू येऊ लागला की जणू आपण स्वतला प्रेम या एकाच भावनेवर ‘टय़ून’ करायला शिकू, असे तत्त्वज्ञान उपनिषदे खात्रीने सांगतात.
  आज आपण उत्थित एक पादासनाचा सराव करू या-
शयनस्थितीतील पूर्वस्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या बाजूला समांतर. पोटाचे काही आजार असल्यास, एक पाय गुडघ्यात दुमडून टाच दुसऱ्या गुडघ्याच्या बाजूला ठेवा. आता सरळ असलेला पाय गुडघ्यात न दुमडता दोन्ही हातांचा जमिनीला घट्ट आधार घेऊन ३० ते ६० अंशापर्यंत वर उचला. अंतिम स्थितीत डोळे मिटून श्वासावर लक्ष एकाग्र करा. साधारण चार ते पाच वेळा श्वास घेऊन सोडल्यानंतर, अंतिम स्थितीत राहिल्यानंतर पाऊल सावकाश खाली घ्या. जर आपल्याला शक्य असेल तर विरुद्ध पायही गुडघ्यात न दुमडता जमिनीवर सरळ ठेवून ही कृती करता येईल. दोन्ही बाजूने ही कृती करा. यामुळे पोटाचे आवरण मजबूत होण्यास मदत होते तसेच हृदयाकडे अशुद्ध रक्तपुरवठा करणारी व्यवस्था कार्यक्षम होण्यासाठी हे उपयुक्त आसन ठरेल.

खा आनंदाने! : चैत्रातील चैतन्य
वैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ
‘अगं, कैऱ्या बाजारात आल्यावर सर्वात आधी लोणचं घालण्यात मी अग्रणी असायचे. आता मनच होत नाही.’ काल माझ्या ‘डाएट ओ.पी.डी.’मध्ये आलेल्या आजी-वय वर्ष ७६- सांगत होत्या. तसा आजार काही नाही, थोडासा रक्तदाब कमी-जास्त होतोय, पण मुख्य समस्या म्हणजे उदास वाटतं, पूर्वीसारखा उत्साह आता राहिला नाही. असं वाटतं काही करूच नये. मग मनात आलं की अशा समस्त आजी-आजोबांना भेडसावणारा प्रश्न- आहारतज्ज्ञ म्हणून आपण काही उत्तर देऊ  शकतो का? नक्कीच! आयुष्य किती आहे हे आपल्या हातात नाही, पण आहे ते आयुष्य आनंदाने कसं जगायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे.   
एक शब्द : माइटोकॉन्ड्रिया- म्हणजेच आपल्या शरीरातील असलेल्या पेशींसाठी- ऊर्जेचा स्रोत. खरं तर, आपल्या शरीरात १ लाख ट्रिलियन mitochondria  आहेत. हे ऊर्जा कारखाने आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे कार्य संरक्षित व सुधारित ठेवले तर अगदी उत्साह द्विगुणीत होईल असं नाही, पण टिकून राहील आणि नैराश्य नक्कीच आटोक्यात राहील.
पेशींच्या चयापचयाशी ‘टय़ून अप’ करणाऱ्यासाठी :
१. ‘शरीरातील प्रदूषण’ टाळा. म्हणजेच अवयवांना (आणि मनालासुद्धा) गंज लागू देऊ  नका. त्यासाठी आपलं दैनंदिन जीवन थोडंसं बदला. अतिकॅलरीजयुक्त पदार्थ (तेलकट-तुपकट-गोड) खाताना नियंत्रण असू द्या. अतिसाखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले / निकृष्ट पदार्थ न घेतलेले बरे. वजन आटोक्यात असेल तर उत्साह कमी नाही होणार. २. जरुरीप्रमाणे किंवा थोडंसं कमी खा.  
३. शरीर जसं साथ देईल त्याप्रमाणे चालत-फिरत राहा. थोडं का होईना, पण चाला. ४. रंगीत, ताज्या भाज्या-फळे खा. सोयाबीन, काजू, तेलबिया- तीळ, अळशी, भोपळ्याच्या बिया नेहमी खाण्यामध्ये असू देत. ५. पूरक आणि जैविक अन्न सेवन करा, म्हणजेच ताजे आणि शाकाहारी अन्न.
६. जरुरीप्रमाणे पाणी प्या. ७. दुसऱ्यांना कोणत्या पदार्थानी त्रास होतो हे बघण्यापेक्षा आपल्याला कोणते पदार्थ ‘चालतात’ ते बघा. ८. भूक नाही म्हणून जेवण घ्यायचं टाळू नका. योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य अन्न सेवन करणे जरुरी आहे. कंटाळा करून चालणार नाही, कारण त्रास आपल्यालाच होतो.
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, आम्ही वचनबद्ध आहोत!

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

आनंदाची निवृत्ती :  बहरली वक्तृत्वकला
डॉ. सीमा दाबक
नोकरी करताना अनेकदा, वेळेअभावी किंवा प्राधान्यक्रम वेगळा असल्याने अनेक आवडत्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्यामुळे छंद-विरंगुळ्यांना मुरड घालावी लागली होती. तेव्हाच एक गोष्ट पक्की ठरवली होती की निवृत्तीनंतर या छंदांसाठी वेळ काढायचाच.
म्हणूनच निवृत्त झाल्यानंतर मी माझा दिनक्रम पूर्णच बदलून टाकला. मला आता हवं होतं शांत-समाधानी-आनंदी आयुष्य!
सकाळी उठलं की एक तास योगासनं-प्राणायाम-सूर्यनमस्कार हा व्यायाम मी आता नियमानं करू लागले. यातून दिवसाभरसाठी ऊर्जा-उत्साह मिळू लागला आणि शरीर मनाचा लवचीकपणाही वाढला.
त्यानंतरचे २-३ तास घरातील कामे करण्यात जायची. जेवणानंतरचा दुपारचा वेळ मात्र फक्त माझ्यासाठी असायचा. आता या वेळेचा उपयोग फक्त वाचनासाठी करायचा होता. वाचन हा माझा सर्वात आवडता छंद. वाचनाचं वेड मला अगदी बालपणी लागलं आणि शालेय जीवनात ते वृिद्धंगत होत गेलं. पण पुढे शिक्षण-संसार-मुलं-नोकरी या चक्रात हे वेड बाजूला ठेवावं लागलं हे खरं.
पण आता मला भरपूर वेळ मिळायला लागला नि मी विविध विषयांवरील पुस्तक वाचायला लागले. यातही महाभारत व श्रीकृष्ण हे दोन विषय माझ्या मनाला भुरळ घालणारे. मग मी श्रीकृष्णावरील विविध पुस्तके गोळा केली. महाभारताचे ११ खंड वाचले. इतरही कथा कविता-कादंबऱ्यांचं वाचनही सुरुच होतं. यातून अनेक श्रवणीय कविता, कथा, लेखांचा मी संग्रह केला. त्या आत्मसात करून मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच सादरीकरणही करू लागले. श्रीकृष्णावरही ४-५ तास पुरेल एवढे, भाषण तयार केले. ‘महाभारत व जनुकांचं आधुनिक जग’ हे एक निराळं प्रबोधनात्मक सादरीकरणही करायला सुरवात केली.
माझं हे सादरीकरण, व्याख्यानं, जसजशी लोकांना आवडू लागली. त्यांच्याकडून तसा अभिप्राय मला मिळू लागला तसतशी माझ्यातली ही वक्र्तृत्वकला विकासित होऊ लागली. खरतर मी वैद्यकीय महाविद्यालयात ३२ वर्षे शिक्षिकेची नोकरी केली तेव्हा तशी बोलायची सवय मला होतीच. पण साहित्यांचे सादरीकरणही आपल्याला जमते आहे, असा विश्वासही वाटू लागला. मग मी अनेक महिला मंडळं, ज्येष्ठ नागरीक संघ, रोटरी क्लब, अनेक छोटे मोठे घरगुती कार्यक्रमातून विविध कार्यक्रम सादर केले आणि माझा आत्मविश्वास वाढू लागला. वक्तृत्वकलेला बहर येऊ लागला. सादरीकरणातही विविधता येऊ लागली. या सादरीकरणाने मला तर आनंद मिळत होताच पण लोकही या कार्यक्रमाने आनंदी होतात, प्रभावित होतात या भावनेने माझा आनंद द्विगुणीत होई.
यंदा मला निवृत्ती घेऊन ७ वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत मी ७०-८० कार्यक्रम केले. अपेक्षेप्रमाणेच शांत-संयमित आयुष्य जगले. निवृत्ती नंतरच्या या कालावधीत मी आणखी प्रगल्भ, परिपक्व झाले. काहीशी पारमार्थिक सुद्धा झाले. निवृत्तीनंतर माझ्या वृत्तीत घडलेले बदल बघून वाटले ‘‘निवृत्ती म्हणजे बदललेली वृत्ती तर नव्हे ना?’’   

आजी आजोबांसाठीचे खास मोबाइल
संकलन-गीतांजली राणे – rane.geet@gmail.com
सध्या आपल्याजवळ मोबाइल असणे ही काळाची गरज आहे. छोटय़ा कुटुंबव्यवस्थेमुळे सून-मुलगा कामावर गेल्यावर, आजी-आजोबा घरात एकटे असताना एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सोपे माध्यम म्हणजे मोबाइल फोन. म्हणूनच तर बाजारात खास ‘ज्येष्ठ नारिकांना वापरायला सोपे’ असे मोबाइल आलेले आहेत. आज आपण अशाच काही मोबाइल फोन्सची माहिती घेणार आहोत.
१.  iBall Aasan
आय बॉल या कंपनीने खास वृद्धांसाठी ‘आसान’ ही मोबाइल फोनची श्रेणी बाजारात आणलेली आहे. या श्रेणीतील मोबाइलची किंमत रु. २,८०० पासून रु. ३,७०० रुपयापर्यंत आहे. या मोबाइलमध्ये तातडीच्या संपर्कासाठी  SOS  हे बटण देण्यात आले आहे. ज्यामुळे गरजेच्या वेळेस फक्त हे एक बटण दाबून संपर्क साधला जाऊ शकतो. या फोनची रचना ही हाताळण्यास उपयुक्त अशी आहे. यात बेसिक कॅमेरा असून ८ जीबीपर्यंतचे मेमरी कार्ड यात वापरता येऊ शकते. ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आवडीची गाणी ऐकू शकतात. आवाजाची पातळी कमी करण्याकरता मोबाइलच्या बाजूला खास बटणाची व्यवस्था केलेली आहे. तसेच यात बॅटरीचीही खास सोय करण्यात आलेली आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे याची रचना. या फोनच्या बटणांची रचना ही वृद्धांना चष्म्याशिवाय क्रमांक किंवा अक्षरे दिसतील या पद्धतीने करण्यात आली आहे.
२. Magicon Senior Duo
मॅजिकॉन सिनीअर डय़ुओ हा मोबाइल फोन अंदाजे रु.  १५०० ते रु. ३५०० या किमतीत बाजारात उपलब्ध आहे. या फोनमध्येही SOS  हे बटण देण्यात आले असून बटणांची रचना ही वापरायला सोपी अशी करण्यात आलेली आहे. फोनचा आकार हा २.६ इंच इतकाच असला तरी यात टाइप केलेली अक्षरे, आकडे चष्म्याशिवाय दिसतील अशी सोय करण्यात आलेली आहे. तसेच या फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरण्याची सोय आहे.
३. Forme Love One
‘फॉर्म लव वन’ हा आजी आजोबांसाठी असलेला सर्वात स्वस्त फोन म्हणता येईल. या फोनची किंमत ही ७९९ ते १३०० च्या दरम्यान आहे. या फोनचे वैशिष्टय़ म्हणजे यात वायरलेस (हेडफोन शिवाय ऐकता येणे) एफ.एम. ची सुविधा आहे. तसेच रुंद कीपॅड  हे याचे वैशिष्टय़ . तसेच जास्तीत जास्त ७ दिवसांपर्यंत या फोनची बॅटरी टिकते. या फोनमध्येही दोन वेगवेगळ्या क्रमांकाची सीमकार्ड व ८ जीबीपर्यंतचे मेमरी कार्ड वापरण्याची सोय आहे. सोने पे सुहागा म्हणजे १.८ इंचाच्या या फोनचा कॅमेरा १.३ मेगापिक्सलचा आहे. इतरही कंपन्याचे असे फोन उपलब्ध आहेत
महत्त्वाची सूचना – हे मोबाइल  ठरावीक वयोगटासाठीच असल्यामुळे बाजारात सहज विकत मिळण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे तुम्ही ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून हे फोन ऑर्डर करू शकता.   

धडपडे आजी-आजोबा : फिटनेसवेडय़ा विला आजी   
हल्लीची तरुण पिढी खूप हेल्थ कॉन्शियस आहे. जीम, एरोबिक्स, पॉवरयोगा आणि बरेच काही. पण ‘आमच्या वेळेस बाई असं नव्हतं. नसती आपली व्यायामाची खुळं.’ असे एखाद्या आजीच्या तोंडी शोभतील असे उद्गार विला आजींनी मात्र बाद ठरवले आहेत. त्या याला अपवाद आहेत, कारण त्या स्वत: नियमित जिमला जाऊन व्यायाम करतातच, परंतु इतरांनीही व्यायाम करावा म्हणून प्रेरणा देतात. पोर्टलँडमध्ये राहणाऱ्या या ९३ वर्षांच्या आजींना व्यायामाचं वेडच आहे म्हणा ना.
पाच वर्षांपूर्वी या आजींनी आपल्या मुलीला ठणकावून सांगितले की मी ‘डे केअर सेंटर’मध्ये राहणार नाही. हवं तर मी एकटी राहीन, पण मला इथून घेऊन जा. त्यांच्या मुलीला त्यांचा हा हट्ट पुरवावाच लागला. परंतु उतारवयात स्वत:ची काळजी घेण्यासाठी निव्वळ आधुनिक संपर्क साधने उपयोगी नसतात याची जाणीव असलेल्या आजींनी स्वतच्या सुरक्षेसाठी जिम लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी खास वैयक्तिक प्रशिक्षकाची नेमणूकही केली. आणि गेली पाच वर्षे कसलाही खंड पडू न देता विला आजी नियमित व्यायाम करतायत.
त्या म्हणतात व्यायामाला सुरुवात करण्यासाठी निश्चित असं वय नसतं. फक्त तुमची आंतरिक इच्छा हवी. तरच तुम्ही कोणत्याही वयात व्यायामाला सुरुवात करून तंदुरुस्त होऊ शकता.
या अवलिया आजींनी त्यांच्या बिनधास्त वागण्याची सुरुवात साठी ओलांडल्यावर लगेच सुरू केली. ६० व्या वर्षी या आजी पाठीवर फक्त एक बॅग घेऊन एकटय़ाच आशिया आणि आफ्रिका खंडाची भ्रमंती करून आल्या. बरं या भ्रमंती दरम्यान या आजींनी हिमालयाची १६ हजार फूट उंचीपर्यंत चढाईदेखील केली. हॅट्स ऑफ विला आजी!