News Flash

स्त्रीचळवळीचा टवटवीत चेहरा

मीना देवल.. माझ्यासारख्या अनेक दुसऱ्या फळीच्या स्त्रीवाद्यांची मीनामावशी, १२ फेब्रुवारीला तिचं निधन झालं

(संग्रहित छायाचित्र )

योगिनी राऊळ

yogini.raul@gmail.com

नाटकासाठी नेसलेली परीटघडीची साडी, अनोळखी गाव, चक्कर येऊन पडणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष असा कसलाही विचार न करता मीनामावशीने त्यादिवशी जे केलं त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. रोजच्या जगण्यात विज्ञान कसं वापरायचं? स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत यातल्या दऱ्या ते कसं बुजवू शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं ‘स्त्रीमुक्तीवाल्या बायका उच्चमध्यमवर्गीय, आगाऊ असतात, अशांच्या नादाला कशाला लागायचं?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मीनामावशीच्या या कृतीने मिळाली. ‘मुलगी झाली हो’ आणि ‘स्त्री मुक्ती संघटना’ सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे झेंडे खांद्यावर घेतेय आणि आपण त्यांना साथ द्यायला हवी, हे त्या दिवशी डोक्यात पक्कं झालं ते कायमचं.

मीना देवल.. माझ्यासारख्या अनेक दुसऱ्या फळीच्या स्त्रीवाद्यांची मीनामावशी, १२ फेब्रुवारीला तिचं निधन झालं. एखाद्यावर मृत्युलेख लिहिण्याइतका खरं तर माझा अधिकार नाही, पण मला आवडणाऱ्या या मावशीविषयी काहीच लिहिलं नाही तर तो तिच्या निर्व्याज स्नेहाचा अपमान ठरेल आणि झरणारे डोळे थांबणारच नाहीत. गेल्या पस्तीस वर्षांतलं, वयाचं अंतर पार करून जपलेलं काहीबाही आज कागदावर मांडलंच पाहिजे..

‘मुलगी झाली हो’ नाटकाचा पन्नासावा प्रयोग दहिसरच्या समाजकल्याण मंदिरात होता. प्रयोगातल्या सात जणींनी सात कुटुंबांत पाहुणचार घ्यावा, अनौपचारिक गप्पा माराव्या आणि संध्याकाळी नाटक लोकांसमोर सादर करावं, असं ठरलं होतं. सात जणींना एकत्र करून नाटकाच्या ठिकाणी न्यायची जबाबदारी माझ्यावर व अश्विनीवर होती. सगळ्या मिळून तिथे पोहोचताना वाटेत एका अनोळखी माणसाला आकडी आली, तोंडातून फेस यायला लागला. गाव आमचं असूनही आम्ही पोरसवदा मुली बावरलो. मात्र झटक्यात पुढे गेली ती मीनामावशी. ‘त्याच्या तोंडावर पाणी मारू नका, आकडी आल्यावर पाणी मारायचं नसतं,’ असं आजूबाजूच्या माणसांना तिने अधिकारवाणीनं सांगितलं. त्या माणसाला आधार देऊन बसतं केलं. चप्पल हुंगवली.. हा प्रकार फार तर सात-आठ मिनिटे चालला. पण नाटकासाठी नेसलेली परीटघडीची साडी, अनोळखी गाव, चक्कर येऊन पडणारी व्यक्ती स्त्री आहे की पुरुष असा कसलाही विचार न करता मीनामावशीने जे केलं त्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. रोजच्या जगण्यात विज्ञान कसं वापरायचं? स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत यातल्या दऱ्या ते कसं बुजवू शकतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं ‘स्त्रीमुक्तीवाल्या बायका उच्चमध्यमवर्गीय, आगाऊ असतात, अशांच्या नादाला कशाला लागायचं?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मीनामावशीच्या या कृतीने मिळाली.

‘मुलगी झाली हो’ आणि ‘स्त्री मुक्ती संघटना’ सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे झेंडे खांद्यावर घेतेय आणि आपण त्यांना साथ द्यायला हवी, हे त्या दिवशी डोक्यात पक्कं झालं ते कायमचं.

पुढे मी नाटकाचा भाग झाले अन् मीनामावशी माझ्या भावविश्वाचा भाग झाली. ‘मुलगी झाली हो’ नाटक जरी स्त्री चळवळीचं असलं तरी ते फार गंभीर वा अंगावर येण्याच्या पद्धतीने स्त्रियांचे प्रश्न मांडत नाही. हसत-हसत, टपल्या मारत लोकांशी संवाद साधला जातो. नाटकाचा हा मिश्कील सूर मीनामावशी अचूक पकडत असे. आणि तिला तेवढीच उत्तम साथ कमलाबाई या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्तीची मिळत असे. त्यामुळे हळूहळू नाटकातल्या भूमिकांना छोटी मुलगी, मोठी मुलगी, आई, सासू अशी सर्वसाधारण नावं मिळाली तरी मीनाची भूमिका कायम मीनाच्याच नावाने ओळखली गेली आणि अजूनही ओळखली जाते. सर्वसामान्य लोकांच्या मनातले स्त्री चळवळीबद्दलचे पूर्वग्रह काढण्यासाठी मीनाच्या या भूमिकेचा नाटकाला फार उपयोग झाला. नाटकाच्या निमित्ताने मीनाच्या संपर्कात आलेल्या आणि तिच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलेल्या नीला लिमये, मीनू हिंग्लासपूरकर, माधुरी पुरंदरे, कल्याणी पाटील, अपर्णा अंबिके, सुमेधा रायकर, उज्ज्वला तोडकरी, प्रज्ञा सराफ, भारती शर्मा, सुवर्णा भुजबळ, अलका पावनगडकर, नीलिमा जोशी, ज्ञानेश्वरी दीक्षित, वंदना साळसकर, स्नेहल लोटणकर, माझी बहीण अश्विनी कापरेकर .. किती नावं घ्यायची? आम्ही सगळ्याच या मावशीच्या प्रेमात. शारदा साठे, ज्योती म्हापसेकर, मंगल पाध्ये, कमल फाटक यांचा संपर्क अधिक असला तरी मीना देवल नावाचं गारूड त्याहून जास्त. कारण मीनाचं दिसणं, वागणं, मुद्दे मांडणं, एखादी गोष्ट समजावून सांगणं सगळंच अस्सल स्त्रीवादी, आम्हा स्वप्नाळू सतरा-अठरा-विशीतल्या मुलींना एकदम भारी वाटणारं.

मग परळच्या तिच्या घरातल्या ओव्हरनाईट मिटिंग्ज, तिची मूलभूत मांडणी यांचा एक सिलसिला सुरू झाला. मीनाचे पती डॉ. बाबा देवल हे केईएम इस्पितळात न्यूरोसर्जन होते. बाबांचा एक वेगळा दबदबा त्या परिसरात होता. पण संघटनेच्या सगळ्यांनाच मीनाच्या घरी मुक्तद्वार होतं. याचं एक कारण परळ हे आम्हाला भेटायला मध्यवर्ती पडत असे आणि मीनाच्या घरी सगळं वातावरणच मोकळंढाकळं असे. कितीही गंभीर विषय असला तरी मीनाला मध्येच काहीतरी गंमत सुचत असे नाहीतर आठवत असे. मग चर्चेत ब्रेक, हास्याचे फवारे आणि मीनाचीच परत दमदाटी.. ‘ए मूळ मुद्दय़ाकडे वळू या गं, खूप हसलो..’ तीच मीनामावशी नाटकाच्या दौऱ्यावर असताना एकदम वेगळी. भाषण करताना, स्थानिक महाविद्यालयीन मुलींशी बोलताना त्या मुली जास्त समृद्ध झालेल्या की मीना? असा प्रश्न पडावा, इतकं ती बारीक-बारीक, सूक्ष्म काहीतरी टिपत असे. पुढे त्यावर विचार करत असे. स्वत:चे निष्कर्ष काढत असे आणि त्याला सैद्धांतिक स्वरूपही देत असे. हे सगळं हसत-हसत, प्रसन्नपणे. कोणत्याही परिसंवादानंतर मीना ओढलेला चेहरा, ठणकणारं डोकं घेऊन स्टेजवरून उतरलीय असं आठवत नाही. भाषण-परिसंवाद झाल्यावर, नाटक संपल्यावर ती पुन्हा मीनामावशी होई. मग आमच्या बॅगा भरायला मदत करणं, कपडय़ांच्या घडय़ा नीट नसतील तर ओरडणं अशी खास मावशीची कामं ती करत असे. राहायला दिलेली खोली सोडताना.. ‘ए पोरींनो बघा गं च, ब लटकतायेत का कोणाच्या आत, पताका लावलेल्या होतात का तुम्ही कुठे-कुठे?’ असं जोरात ओरडायची.. म्हणजे आज आपल्याला दीपिका पदुकोनच्या बिनधास्त बोलण्याचं कौतुक वाटतं. मीनामावशीने ३५ वर्षांपूर्वी हे आम्हाला शिकवलं की बाईचं शरीर, तिची अंतर्वस्त्रं यात लाज बाळगण्यासारखं काही नाही. इतर कपडय़ांसारखे ते कपडे आहेत. एका विशिष्ट वयानंतर बाईने आतले कपडे वापरणं बंद करावं, निदान घरात वावरताना तरी, हे तिचं ठाम म्हणणं होतं आणि ते स्त्री आरोग्याशी जास्त निगडित होतं. स्त्री आरोग्याच्या प्रश्नांची, त्यातल्या नव्या प्रयोगांची ती सतत स्त्रीवादाशी सांगड घालत असे. महाराष्ट्रातल्या ज्या अनेक स्त्री कार्यकर्त्यांनी हे काम केलं त्यात मीनाचं स्थान फार वरचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कुटुंबनियोजन विभागात ती काही काळ कार्यरत होती. त्यातूनच पुढे गर्भनिरोधक साधनं, त्यासाठी बायकांना गिनीपिगसारखं वापरणं, कृत्रिम गर्भधारणा, त्यातली नवीन तंत्र यावर ती सातत्याने लिहीत राहिली, बोलत राहिली.

स्त्री-पुरुष समानता यात्रांच्या बरोबरीने ‘स्त्री मुक्ती संघटने’चं काम वाढत होतं. पंधरा-वीस जणींचा मुंबईतला गट असं आमचं स्वरूप बदलून राज्यव्यापी संघटनेत आमचं रूपांतर होत होतं. या काळात मीना आमची पहिली अध्यक्ष झाली. एकूणच विश्लेषक असलेली मीना संघटनेच्या कामात आणि इतर संघटनांसोबत एकत्रितपणे ठोस सैद्धांतिक मांडणी करू लागली. दुसरीकडे तिचं लिखाण सुरूच होतं. महत्त्वाच्या सर्व वर्तमानपत्रात ती लिहीत असे. ‘प्रेरक ललकारी’च्या संपादनाची जबाबदारी कमी झाल्यावर ‘स्त्री उवाच’ नियतकालिकासाठी ती लेखन-संपादन दोन्ही करू लागली. अनेकांच्या मते ‘प्रेरक ललकारी’पेक्षा ‘स्त्री उवाच’मध्ये लिहिणाऱ्या स्त्रिया अधिक कडव्या स्त्रीवादी होत्या. पण मीनाचा दोन्हीवर तेवढाच जीव होता. ‘ललकारी’च्या २०१९च्या आरोग्य विशेषांकाची जबाबदारी मीनाने घ्यावी अशी आम्हा सगळ्यांची इच्छा होती, पण तब्येतीमुळे मीनाला ते शक्य झालं नाही.

कंपवाताने गेल्या दोन-तीन वर्षांत तिच्या हिंडण्याफिरण्यावर एकदमच बंधनं आली. नाहीतर प्रवास आणि भटकणं हा मीनाचा आणखी एक वीक पॉइंट.. मीनाच्या भाषेत स्ट्राँग पॉइंट. अमेरिकेपासून ते किहीम-अलिबागपर्यंत आणि पार गडिहग्लजच्या ग्रामीण शाळांपासून प्रभादेवी-दादरच्या नाटय़गृहांपर्यंत मीना त्याच उत्साहात, सहजपणे भटकायची. नोकरी, लेखन, दोन मुलं, संसार, केईएममधला डॉक्टरांचा गोतावळा, त्यातच संघटनेचे नाटकाचे दौरे इतके व्याप ती कसे सांभाळते याचं मला नेहमीच आश्चर्य वाटायचं. मुंबईबाहेर असल्यावर अजित-अतुलचा उल्लेख बोलण्यात नेहमी असायचा, पण त्यातही दोघांच्या गमती, विनोद सांगणं जास्त. मुलांमध्ये, घरच्यांमध्ये रमणं म्हणजे त्यांच्यात अखंड बुडणं नव्हे, येता-जाता त्यांच्या आठवणींनी डोळे ओलावणं नव्हे, हे न बोलता ती दाखवून देत असे. तिची दोन्ही मुलं आज आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत, याचं एक कारण मुलांना तिने मोकळेपणाने वाढवलं हेही आहे.

१९९० ते २०१० अशी जवळजवळ २० वर्षे मीना किहीममय झाली होती. शरीराने कुठेही असली तरी तिचं किहीम तिच्या डोक्यात ठाण मांडून बसलेलं असायचं. या काळात ती चळवळीचा भाग होतीही आणि नाहीही. किहीमच्या देवलवाडीच्या निमित्ताने तिने मुक्तपणे, आपलं बाईपण विसरून समुद्राशी मत्री केली, त्याच्या किनाऱ्यावर उनाडक्या केल्या आणि टिपिकल संसारी बाईसारख्या डॉक्टर देवलांच्या तक्रारीही केल्या, त्यांच्याशी वाद घातले. चुकलेला पीर मशिदीत सापडतो, तसं घरचा टेलिफोन दुसराच कोणी उचलला, असं घडलं की समजावं मीनामावशी किहीमला आहे (मीनाशी सलग मत्री असण्यामागे तिच्या अनेक वर्ष न बदललेल्या लँडलाइनचा मोठा हात होता. शेवटची दोन-तीन वर्षच मला वाटतं ती मोबाइल वापरत होती.). या काळात तिने लिखाण मात्र भरपूर केलं. जगभरातल्या चळवळ्या स्त्रीवादी स्त्रिया ती शोधत असे, त्यांच्या लेखांचे, पुस्तकांचे अनुवाद करीत असे. मार्ज पिअरसी, नावल अल सदावी यांच्यासारख्या सहा स्त्रीवादी लेखिकांच्या पुस्तकांचे अनुवाद, परीक्षणं, स्त्री आरोग्याशी निगडित लेख, स्वत:चे अनुभव असं काहीबाही ती सतत लिहीत असायची.

देवलवाडीला सारखं जाणं होत नाही म्हणून मीनाचं मुंबईत स्थानबद्ध होणं आणि मी बँकेतली नोकरी सोडून ‘प्रेरक ललकारी’चं काम बघायला लागणं एकाच काळात झालं. मीनामावशीचं घरही तसं मला जवळ होतं. मग ‘ललकारी’च्या निमित्ताने पुन्हा आमच्या भेटी, गप्पा व्हायला लागल्या. काही लिहून झाल्यावर ती हक्काने फोन करायची, लिहिलेलं घेऊन जा म्हणून सांगायची आणि दहा मिनिटांसाठी गेलेली मी तिच्याकडे तास-दीड तास रमायची. चहा करता-करता, लेख फेअर करता-करता तिची मिश्कील रनिंग कॉमेंटरी सुरूच असायची. अंजलीकडे येणारे रुग्ण (तिची सून स्त्रीरोगतज्ज्ञ आहे), तरुण मुलींच्या आरोग्याच्या समस्या, नातीने काढलेली चित्रं, अजितचं गाणं अशा सर्वसमावेशक गप्पा मारत-मारत आमचं चहापान चालत असे. ‘माझे किहीम’ या तिच्या पुस्तकाच्या उत्तम परीक्षणाबद्दल मला तिची शाबासकी मिळाली होती. त्यानंतरच्या तिच्या-माझ्या भेटीत माझ्याही अनेक जुन्या खपल्या निघाल्या होत्या. ती पुन्हा एकदा १९८४ची मीनामावशी झाली होती आणि मी तिच्यासमोर मनसोक्त रडले होते.

विद्या बाळ आपल्या वैचारिक प्रवासाबद्दल म्हणत असत की, पूर्वीची मी १८० अंशांत बदलले. मीना म्हणत असे की मी तर ३६० अंशांची एक गिरकीच मारली माझ्याभोवती. तिच्याकडे खुमासदार टिप्पण्यांचा खजिनाच होता. सात जन्म तोच नवरा मिळावा यासाठी व्रतवैकल्यं करणाऱ्या बायकांबद्दल तिचं

म्हणणं होतं की, नवऱ्याआधी मरण आलं आणि पुढच्या जन्मात तोच नवरा मिळाला की तो बायकोपेक्षा वयाने कमीच असणार. दर जन्मात असा दोन-चार वर्ष लहान नवरा मिळाला की सातव्या जन्मी नवरा पाळण्यात आणि बायको वीस-एकवीसची.. बायकांनी वटपौर्णिमा करण्यापूर्वी ठरवावं एकदा काय ते! मीना उत्तम लावणी म्हणत असे. मध्ये शंकर महादेवनने म्हटलेलं ‘कळीदार कपूरी पान..’ ऐकलं आणि दिल्लीच्या दौऱ्यात ट्रेनमध्ये मीनाने म्हटलेल्या त्याच लावणीची आठवण झाली. अनेक लावण्या तिला तोंडपाठ होत्या. तिच्याचमुळे लावणीचे शब्द, लावणी गाण्याची ढब आणि लावणीतल्या अदा या साऱ्याकडे बघायची एक स्वच्छ नजर मला मिळाली.

गेल्या जुलै वा ऑगस्टमध्ये तिने मला फोन केला होता, थोडी पुस्तकं संघटनेच्या लायब्ररीला द्यायचीत, थोडी तुलाही द्यायचीत, वेळ काढून निवांत ये म्हणाली. मला जायला जमलं नाही. डिसेंबरमध्ये सगळ्यांनी तिला भेटायला जाऊ असं म्हटलं, पण तेही जुळून आलं नाही आणि मग एकदम १२ तारखेला तिला दादर स्मशानभूमीतच पाहिलं. हिरवी काठपदराची साडी, डोक्यावर पदर, कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र अशा वेशात ती शांत झोपल्यासारखी दिसत होती. पण ती मला मीनामावशी वाटलीच नाही.

आमची मीनामावशी मंद रंगाची साडी नेसणारी, रुंद गोरं कपाळ मोकळंच ठेवणारी, हातानेच आपले डोक्याबरोबरचे कुरळे केस सारखे करणारी आणि कधीच शांत न बसणारी होती. ते तिचं रूप पुसलं जाऊ नये म्हणूनच कदाचित कंपवाताने हलणाऱ्या मीनाकडे जाणं मी शेवटी शेवटी टाळत राहिले. म्हटलं तर चुकलं, म्हटलं तर तिचं खरं रूप नकळत जपलं गेलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:15 am

Web Title: meena deval glowing face of feminine movement abn 97
Next Stories
1 गर्जा मराठीचा जयजयकार : ‘आपल्या भाषेचा अभिमान हवाच’
2 हेल्पलाइनच्या अंतरंगात : मुलांवरील अत्याचाराला वाचा
3 पुरुष हृदय ‘बाई’ : आणि मी..
Just Now!
X