प्रसाद शिरगांवकर – responsiblenetism@gmail.com

समाजमाध्यमांवरील अभिव्यक्ती सामान्य माणसासाठी सोपी झाली आणि विनोदी ‘मीम्स’ हा अभिव्यक्तीचा प्रकार लोकप्रिय होत गेला. ताज्या घडामोडींच्या संदर्भानं लोकप्रिय चित्रपटांमधले प्रसंग, लोकप्रिय व्यक्तींचे फोटो, वक्तव्यं वापरून के लेले मीम्स हसवत असले, तरी त्यातला कोणता विनोद कुणाला खटकेल आणि भावना दुखावणारा ठरेल, हेही सांगता येत नाही. ‘मीम्स’च्या या दुनियेविषयी –

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

रोजच्या वर्तमानपत्रामध्ये एक व्यंगचित्र असतं. कोण्या प्रसिद्ध व्यंगचित्रकारानं ते काढलेलं असतं. नुकत्याच घडलेल्या कुठल्याशा घटनेवर खणखणीत, खमंग विनोदी भाष्य करणारं असतं. बहुसंख्य वेळा कोणत्याही गंभीर घटनेची दुसरी धमाल बाजू ते व्यंगचित्र आपल्याला दाखवतं. कधी खळखळून हसवतं, तर कधी अंतर्मुख करतं. महान व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आणि त्यांचा ‘कॉमन मॅन’ आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. व्यंगचित्रांच्या इंटरनेटवरच्या आधुनिक आविष्काराला ‘मीम’ (Meme) म्हणतात. इंटरनेटच्या कृपेनं ही आधुनिक व्यंगचित्रं निर्माण करण्याची ताकद आता ‘कॉमन मॅन’च्या हातात आली आहे. अर्थात व्यंगचित्रं आणि मीम्स यात मुख्य फरक असा, की व्यंगचित्रं ही व्यंगचित्रकाराची पूर्णपणे स्वतंत्र निर्मिती असते, तर मीम ही अस्तित्वात असलेली छायाचित्रं, व्हिडीओ, रेखाचित्रं इत्यादींचा वापर करून तयार केलेली ‘रिमिक्स’ निर्मिती असते. मात्र अशा प्रकारची नवी अभिव्यक्ती ही अत्यंत वेगानं लोकप्रिय होत आहे, झाली आहे.

हल्ली कोणतीही मोठी घटना घडली की त्याबद्दलच्या मीम्सचा काही क्षणांत समाजमाध्यमांवर महापूर येतो. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर त्या घटनेवर भाष्य करणारी विनोदी मीम्स वेगानं फिरायला लागतात. त्या घटनेशी संबंधित व्यक्तींचे फोटो, त्यांचे उद्गार, त्या घटनेशी संबंधित वाटू शकणारा एखाद्या चित्रपटातला संवाद किंवा चित्रपटातलं दृश्य अशा कशाचीही सरमिसळ करून मीम्समध्ये विनोदनिर्मिती करायचा प्रयत्न केलेला असतो. त्यातले जे विनोद लोकांना खळखळून हसवतात ते अत्यंत वेगानं पसरतात- म्हणजेच ‘व्हायरल’ होतात. अर्थात, मीम्स हे फक्त फोटो किंवा चित्रांचेच असतात असं नाही, तर व्हिडीओ मीम्स हादेखील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे.

मीम या अभिव्यक्ती प्रकाराची सुरुवात इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळातच झाली. नव्वदच्या दशकात तेव्हाच्या ‘यूजर फोरम्स’वर किंवा ई-मेलवर लोक काही विनोदी क्लिप्स करून पाठवायचे त्यांना मीम म्हटलं जायचं. खरंतर मीम हा शब्द सत्तरच्या दशकात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांनी त्यांच्या ‘सेल्फिश जीन्स’ या पुस्तकात एक शास्त्रीय संज्ञा म्हणून वापरला होता. ‘स्वत:च्या प्रती तयार करून पसरत जाणारे सांस्कृतिक माहितीचे एकक’ अशा अर्थानं त्यांनी हा शब्द वापरला होता. इंटरनेटवरून पसरत जाणाऱ्या आणि वेळोवेळी बदलत जाणाऱ्या चित्रांना किंवा व्हिडीओज्ना असं माहितीचं एकक समजून मीम म्हणणं हे अगदीच सार्थ आहे. ‘यूटय़ूब’च्या निर्मितीनंतर व्हिडीओ मीम्सची एक मोठी लाट आली होती, ती अजूनही वेगवेगळ्या रूपानं सुरू आहे. व्हिडीओ मीम्स अनेक प्रकारचे असू शकतात. एखाद्या घटनेवर आधारित विडंबनात्मक व्हिडीओज, एखाद्या चित्रपटातला प्रसंग घेऊन त्याला वेगळे संवाद चिकटवणं, एखाद्या चित्रपटातलं नृत्य आणि भलत्याच चित्रपटातलं गाणं यांची सरमिसळ करणं, एखाद्या वक्त्याच्या वेगवेगळ्या भाषणांचे विनोदी वाटणारे तुकडे एकत्र करणं अशा अनेक प्रकारचे व्हिडीओ मीम्स असू शकतात. फोटो मीम्स हा प्रकार मात्र २०१०च्या दशकात विशेषत: समाजमाध्यमांच्या वापराच्या विस्फोटानंतर जास्त प्रकाशात आला आणि वेगानं वाढत, पसरत गेला. फोटो मीम्समध्येही अनेक प्रकार असतात. प्रसिद्ध व्यक्तींचे खरे (किंवा बदल केलेले) फोटो, लोकप्रिय चित्रपटांमधल्या दृश्यांचे फोटो, कथा, कादंबऱ्या, मालिकांमधल्या पात्रांचे वा प्रसंगांचे फोटो किंवा प्राण्यापक्ष्यांचे फोटो घेऊन त्यावर काही प्रत्यक्षातले किंवा काल्पनिक संवाद जोडणं हे फोटो मीम्सचं स्वरूप असतं.

फोटो मीम्सची एक गंमत अशी, की त्याचे तयार साचे किंवा नमुनेही इंटरनेटवर मिळतात. मीम्ससाठी वापरल्या गेलेल्या काही लोकप्रिय चित्रपट्टय़ा असतात. त्या घेऊन त्यात नवा संवाद, नवी वाक्यं घालून नवे मीम्स बनवले जातात. उदाहरणार्थ- मराठीतल्या अत्यंत लोकप्रिय मीम्समध्ये अनेकदा ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातल्या प्रसंगांचे फोटो वापरले जातात. तसंच ‘टॉम अँड जेरी’सारख्या कार्टूनपासून ते अगदी अलीकडच्या ‘सेक्रेड गेम्स’सारख्या वेबसीरिजपर्यंत अनेक मालिकांमधली पात्रं, प्रसंग वा संवादांचे तयार साचे मीम्ससाठी असतात. योग्य तो साचा घेऊन त्यात आज घडलेल्या प्रसंगानुरूप बदल करून नवे मीम्स तयार केले जातात.

आजच्या पंधरा ते पंचवीस वयोगटातल्या इंटरनेट वापरणाऱ्या पिढीमध्ये मीम्स हा अभिव्यक्तीचा अन् संवादाचाही अत्यंत लोकप्रिय प्रकार असल्याचं  दिसून येतं. ही पिढी फेसबुकऐवजी ‘इन्स्टाग्राम’सारख्या ‘व्हिज्युअल’ समाजमाध्यमाला प्राधान्य देते. तिथे पानभर मोठय़ा निबंधापेक्षा एखाद्या फोटोत व्यक्त केलेल्या विषयाला जास्त महत्त्व असतं. शिवाय ‘रेडिट’सारख्या नव्या पिढीच्या ‘यूजर फोरम्स’वर मीम्सना वाहिलेले चॅनल्स असतात. मीम्स तयार करण्याची तंत्रं नव्या पिढीनं आत्मसात केलेली दिसतात. त्यामुळे नवी पिढी आपल्या आभिव्यक्तीसाठी मीम्स मोठय़ा प्रमाणावर वापरताना दिसते.

मीम्स नेमकी कोण तयार करतं हे सांगता येणं अवघड असतं. अनेकदा मीम्स तयार करणारे त्याच्यावर आपलं नाव किंवा टोपण नाव लिहितात, पण अनेकजण लिहीत नाहीत. समाजमाध्यमांच्या महाप्रवाहात कोणतंही मीम आलं की ते इतक्या वेळा, इतक्या ठिकाणाहून फिरत राहतं, की त्याचा मूळ स्रोत शोधणं केवळ अशक्य बनतं. शिवाय फक्त मीम्स प्रकाशित करणारी अनेक संके तस्थळं आहेत, फक्त मीम्सना वाहिलेले अनेक फेसबुक ग्रुप्स, इन्स्टा पेजेस आहेत. या ठिकाणी सतत नवनवे मीम्स येत राहतात आणि तिथून कॉपी होऊन व्हायरल होत राहतात.

गेल्या काही वर्षांमध्ये मीम्सचा वापर राजकीय कारणांसाठी आणि राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी खूप मोठय़ा प्रमाणावर केला जातो आहे. त्यात गंमत म्हणजे आपल्या पक्षाच्या प्रसाराऐवजी विरोधी पक्षाची किंवा पक्षनेत्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी, खिल्ली उडवण्यासाठी मीम्सचा वापर केला जातो. आपल्या विरोधी विचारसरणीच्या पक्षाच्या नेत्याचे विनोदी वाटणारे फोटो घेऊन त्यावर त्यानं केलेली वक्तव्यं ‘संदर्भ सोडून’ चिकटवणं किंवा काही नेत्यांच्या फोटो वा व्हिडीओंचं अत्यंत विनोदी पद्धतीनं रिमिक्स करणं असा प्रकार सर्व पक्षांकडून केला जातो आहे. हे फक्त एखाद्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घडतं असं नाही, तर कोणत्याही नेत्याचं कोणतंही ‘मीम’जोगं वक्तव्य आलं

किं वा कृती झाली की लगोलग हे घडत असतं. अशा मीम्सचा हेतू फक्त विनोदनिर्मिती करणं हा नसून कु णाची मानहानी करणं असा असू शकतो. त्यामुळे अनेकदा अशी मीम्स वादग्रस्त ठरतात.

अशा राजकीय मीम्ससारखेच काही सामाजिक अथवा सांस्कृतिक संदर्भ असलेली मीम्सही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतात. विशेषत: एखाद्या धर्म, जात वा पंथाला लक्ष्य करून केलेली मीम्स लोकांच्या भावना दुखावणारी ठरू शकतात आणि अशा मीम्सवर जोरदार वादंग घडतात किंवा घडवून आणले जातात. याशिवाय मीम्समध्ये वापरली जाणारी भाषा अनेकदा अश्लील वा अश्लाघ्य असू शकते. मीम्ससाठी वापरले जाणारे फोटोही अश्लील असू शकतात. त्यामुळेही अनेक मीम्स वादग्रस्त ठरतात.

इंटरनेट अन् सोशल मीडियावरच्या मीम्स संस्कृतीचा विचार करताना काही गोष्टी जाणवतात. पहिली गोष्ट म्हणजे, मुळात आपल्याला व्यंगचित्रं आवडतात. सध्या सुरू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सारांश एका चित्रात मांडलेला आपल्याला आवडतो. त्यातही जर व्यंग, विनोद, विरोधाभास असेल अन् तो ठळकपणे मांडला गेला असेल तर आपल्याला तो बघायला धमाल येते. व्यंगचित्र हे व्यंगचित्र असतं. कोणतीही परिस्थिती, घटना, व्यक्ती, त्यांचं वागणं, त्यांची वक्तव्यं यातल्या कशातलंही ‘व्यंग’- म्हणजे विरोधाभास, विनोद इत्यादी आपल्यासमोर ठळकपणे (कधी भडकपणे) मांडणारं ते चित्र असतं. त्यातलं व्यंग समजून घेऊन, त्यातल्या विनोदावर खळखळून हसून अन् जमलंच तर त्यात जे मांडलं आहे त्यावर अंतर्मुख होऊन विचार करून ते सोडून द्यायचं असतं. कोणत्याही व्यंगचित्रानं स्वत:च्या भावना, स्वत:चे मानसन्मान, स्वत:चे अभिमान वगैरे दुखावून घ्यायचे नसतात. अगदी थोडी विनोदबुद्धी ज्यांच्याजवळ आहे ते असं काहीही दुखावून वगैरे घेत नाहीत.

मीम्स ही नव्या युगातली व्यंगचित्रं आहेत. ती तयार करण्याची ताकद तुमच्या, माझ्या प्रत्येकाच्या हातात आहे. मात्र हल्ली कोणत्याही स्वरूपाचा विनोद पचवण्याची क्षमता समाजातल्या अनेकांकडे शिल्लकच नाही. लोकांच्या भावना, मानसन्मान, अभिमान, अस्मिता अतिशय टोकदार झाल्या आहेत. कुठल्या विनोदानं, कुठल्या मीमनं कु णाच्या भावना दुखावतील, कु णाच्या अहंकाराच्या शेपटीवर पाय पडेल हे काही सांगता येत नाही. मग अशा प्रकारे भावना दुखावलेल्या व्यक्ती पोलिसात तक्रार करण्यापासून ते तुम्हाला गाठून मारहाण करणं किंवा तुमच्या घरावर दगडफेक करण्यापर्यंत काय करतील हेही काही सांगता येत नाही. अत्यंत तीव्र ध्रुवीकरण झालेला हा अतिशय कठीण काळ आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयी जे मांडायचंय ते व्यंगचित्र किंवा मीमच्या रूपानं मांडायचं असेल तर ते लोकांच्या कमीतकमी भावना दुखावून किंवा न दुखावता कसं मांडायचं हे नवं तंत्र ‘मीमकारां’ना शिकावं लागणार आहे.

तुम्ही मीमकार असाल तर आर. के . लक्ष्मण यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराचा दृष्टिकोन अंगी बाळगून असं म्हणावं लागणार आहे, ‘‘मला जे मांडायचंय ते मी मांडतो, तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा !’’

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे  प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)