News Flash

स्मृती आख्यान : मेंदूतलं ‘मेमरी कार्ड’

बहुतेक कायमस्वरूपी आठवणी या आपण अशा अनेकदा घोटवून घोटवून तयार करतो.

मंगला जोगळेकर

विचार करता करता आपल्याला मागे घडलेली कोणती गोष्ट कधी आठवेल, काही सांगता येत नाही. आणि एखाद्या ऐन मोक्याच्या वेळी अजिबात न आठवलेली गोष्ट थोडय़ा वेळानं अचानक आठवते. याचा विचार करता आपल्या आठवणी मोबाइल फोनमध्ये जुने फोटो साठवून ठेवावेत तशा मेंदूत संगतवार साठवलेल्या असतील का.. हवं तेव्हा हवी ती आठवण शोधली कशी जात असेल.. असे अनेक प्रश्न पडतात. स्मरणशक्ती तयार होण्याची ही प्रक्रिया मोठी रंजक आहे. त्याचे हे काही पैलू ..

आपल्या शरीराच्या अतिसूक्ष्म भागापासून ते मोठय़ा अवयवांपर्यंत काय घडतं आहे याची इत्थंभूत माहिती क्षणाक्षणाला मेंदूकडे येत असते. या माहितीचा ‘सुपर हाय-वे’ असतो पाठीचा कणा.

पाठीच्या कण्यामधून एक जाड दोरीसारखी केबल मेंदूकडे येते, त्याद्वारे मेंदू आणि शरीराचे अवयव यांमध्ये माहितीचं आदानप्रदान होतं. श्वास घेणं, हृदयाचे ठोके पडणं, घाम येणं, मलमूत्र विसर्जन, त्वचेला स्पर्श कळणं या जीवन चालवण्याच्या क्रिया याच केबलच्या कृपेनं होतात. तसंच पंचेंद्रियांकडूनही मेंदूकडे क्षणोक्षणी माहिती जात-येत असते. डोळे आणि कान हे दोन महत्त्वाचे माहिती संकलक आहेत. तुम्ही काहीही न करता शांतपणे बसलेले असलात, तरीही तुमच्या डोळ्यांना काही दिसतं, कानांवर काही आवाज पडतात. जे काही समोर जाणवतं ते सर्वच्या सर्व मेंदूकडे पोहोचवलं जातं. (ही माहिती अशी पोहोचते म्हणूनच तर आपण वास्तवात असतो!) एकदा माहिती मेंदूकडे पोहोचली की त्यातली कुठली महत्त्वाची आणि कुठली बिनमहत्त्वाची ते ठरवलं जातं. माहिती महत्त्वाची आहे असा जर निर्णय झाला, तर ती साठवण करण्यासाठी धाडली जाते. साठवण झाल्यानंतर त्या माहितीचा जेव्हा पाहिजे तेव्हा क्षणार्धात वापर करणं शक्य होतं. थोडक्यात कुठल्याही माहितीच्या बाबतीत, ती माहिती मिळवणं (अक्विझिशन), साठवणं (स्टोरेज) आणि वापरणं (रीट्रायव्हल) अशा तीन क्रिया सातत्यानं एकाच वेळी घडत असतात. एखादी माहिती मुळातच अर्धवट मिळाली किंवा चुकीची मिळाली तर ती तशीच साठवली जाईल आणि पुढे वापर करण्याच्या वेळी त्याच अर्धवट माहितीचा आधार घ्यावा लागेल. म्हणून माहिती मेंदूला पोहोचण्याची पहिली पायरी खूप महत्त्वाची आहे.

तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी आठवणी

सर्वच माहितीची साठवण नेहमीसाठी करावी लागत नाही. उदा. महिन्याचं सामान भरल्यानंतर काय सामान आणलंय ते स्मरणात ठेवणं जरुरीचं नसतं. माहितीच्या महत्त्वानुसार तिचं दोन गटांत विभाजन करायचं ठरवलं, तर ज्या माहितीचं महत्त्व थोडाच काळ असतं तिला तात्पुरती स्मरणशक्ती (शॉर्ट टर्म मेमरी) आणि जी जास्त काळ जतन करावी लागते, तिला कायमस्वरूपी स्मरणशक्ती (लाँग टर्म मेमरी) असं म्हणता येईल. तात्पुरती स्मरणशक्ती फक्त काही मिनिटांएवढय़ा छोटय़ा काळासाठी असू शकेल, तर कायमस्वरुपी स्मरणशक्ती दशकानुदशकांसाठी असू शकेल. या दोन्ही स्वरुपाच्या आठवणींशिवाय आपलं जगणं अशक्य असतं. तात्पुरत्या स्मरणशक्तीच्या स्वल्परुपाला ‘वर्किंग मेमरी’ म्हणतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डिरेक्टरीमधून शोधलेला फोन नंबर फिरवण्यासाठी काही क्षण तो लक्षात ठेवणं.

क्षणाक्षणाला जमा होणाऱ्या माहितीपैकी कुठल्या माहितीची साठवणूक करावी, हा लगोलग मेंदूमध्ये घेतला जाणारा निर्णय म्हटलं तर तितकासा सोपा नसतो. शिवाय गोळा होणाऱ्या माहितीची व्याप्ती बघता त्यातली गुंतागुंत वाढतच जाते. आपण उदाहरणातूनच बघू या. समजा तुम्ही भाजी खरेदीसाठी बाजारात चालला आहात. रस्त्यावरून चालताना अनेक लोकांचे चेहरे तुम्ही बघता. या सगळ्यांचे चेहरे लक्षात ठेवणं आवश्यक नसल्यामुळे थोडय़ाच वेळात ही माहिती आठवणीतून पुसली जाईल. याचबरोबर रस्त्यावर तुम्ही वेगवेगळी दुकानं बघता, नवीन उघडलेलं एक दुकानही तुम्ही टिपता. रस्त्यावर इतर हालचाली चाललेल्या असतात, लोकांची सामान खरेदी चाललेली असते, यातील ज्या गोष्टी महत्त्वाच्या समजल्या जातील त्यांच्यावर तसा शिक्का बसेल. उरलेल्या थोडय़ाफार काळात पुसट व्हायला लागतील. पुढे तुम्ही चार जणांकडून भाजी घेतल्यावर काय भाजी घेतली, कुठली भाजी स्वस्त, कुठली महाग, कुठली चांगली, किती पैसे खर्चले, वगैरे माहिती तुमच्यापाशी गोळा होईल. घरी जाऊन भाजीचा हिशेब केल्यावर ती माहिती निरुपयोगी होईल. पण एका नवीन भाजीवाल्याकडे गावाकडची ताजी भाजी होती याची खबर मेंदू घेईल. तुम्ही नजरचुकीनं जास्त दिलेले पैसे भाजीवालीनं परत दिले, तर तिची आठवण एक प्रामाणिक भाजीवाली म्हणून तुम्ही नेहमीसाठी ठेवाल. परंतु पुढेमागे तुमचं राहाण्याचं ठिकाण बदललं, तर मात्र तुमच्या सध्याच्या भाजीबाजाराच्या संदर्भातील सर्वच माहिती बिनजरुरीची ठरुन हळूहळू विसरायला होईल.

तात्पुरती आणि कायमस्वरुपी स्मरणशक्ती ही अशी त्या-त्या वेळेच्या गरजेप्रमाणे महत्त्वाची की बिनमहत्त्वाची, ते ठरवलं जातं. महत्त्वाची असलेली माहिती स्मरणात राहील, नको असलेली स्मरणात राहाणार नाही, हे आता अगदी स्पष्ट झालं असेल. आठवणं आणि विसरणं या दोन्ही क्रिया मेंदूचं कार्य व्यवस्थित चालण्याच्या दृष्टीनं गरजेच्या आहेत. नको असलेली माहिती मेंदूनं जर वेळोवेळी हातावेगळी केली नाही, तर माहितीचा ब्रह्मराक्षस मेंदूलाच खाऊन टाकेल. या दोन्ही प्रकारच्या स्मरणशक्ती एकसंधपणे, हातात हात घालून काम करतात म्हणूनच आपलं रोजचं जीवन शक्य आहे, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल.

कायमची स्मरणशक्ती घडवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ- तुम्ही योगासनं शिकण्यासाठी जात आहात असं समजा. शिकलेली योगासनं काही महिने पुन:पुन्हा करत राहाल, तेव्हा ती आसनं करण्याचं कौशल्य तुम्ही हळूहळू आत्मसात कराल. तुमचं शरीर पुरेसं लवचीक बनेल, तुम्हाला श्वास घेण्याचं आणि सोडण्याचं तंत्र जमायला लागेल. जेव्हा ही आसनं तुमच्या नित्यक्रमाचा भाग बनतील तेव्हा ती नेहमीसाठी लक्षात राहातील. बहुतेक कायमस्वरूपी आठवणी या आपण अशा अनेकदा घोटवून घोटवून तयार करतो. इथे तुम्ही असं म्हणू शकाल, की पाणी घातल्यावर सिमेंट जसं लगोलग घट्ट होतं तशा आठवणी आपल्या डोक्यात लगेच घट्ट बसत नाहीत, तर मोरावळा कसा वर्षांनुवर्ष मुरतो तशा पुन्हा-पुन्हा गिरवल्यानं त्या नेहमीसाठी स्मरणात राहातात.

आपल्या आयुष्याशी जोडलेल्या कायमस्वरूपी आठवणी विविध स्वरूपाच्या असतात. त्याचे दोन प्रमुख प्रकार म्हणजे व्यक्त अथवा स्पष्ट (एक्सप्लिसिट) आणि सूचित, पण अव्यक्त (इम्प्लिसिट) आठवणी.  ‘एक्सप्लिसिट’ आठवणींचे दोन भाग असतात. एक घटनात्मक (एपिसोडिक)- जिच्यामुळे मधमाशी कशी चावली, कधी चावली किंवा सुरीने बोट कसं कापलं, अशा आठवणींचं आपण वर्णन करू शकतो. तर अर्थाशी संबंधित (सेमँटिक) आठवणींमुळे वाक्याचा अर्थ समजतो उदा. ‘अपघात झाला’ म्हणजे काय, हे कळतं. या आठवणींमध्ये सामान्यज्ञानाची माहितीही समाविष्ट असते. उदा. पुणे हे एक मोठं शहर आहे, ते महाराष्ट्रात आहे, आदी.  ‘इम्प्लिसिट’ आठवणींमुळे चहा कसा करायचा, गाण्याचे शब्द काय, चाल काय, सायकल कशी चालवायची, पत्ते कसे खेळायचे, हे सगळं स्मरतं (इथे ‘प्रोसिजरल’ स्मरणशक्ती असंसुद्धा म्हणू शकू.). तसंच अनुभवांवरूनही आपण शिकत जातो. तो ही ‘इम्प्लिसिट’ स्मरणशक्तीचा प्रकार. सगळ्या आठवणींचं इथे वर्णन करणं शक्य नाही. पण तुम्ही तुमच्या आठवणींचा आढावा घेण्याचा जरूर प्रयत्न करा. आश्चर्य वाटेल इतक्या प्रकारच्या ‘आठवणी’ तुम्हाला सापडतील.

स्मरणशक्तीची व्याख्या

वरील माहितीवरू न मेंदूमध्ये साठवलेल्या आठवणी, तसंच माहिती, वैयक्तिक अनुभव, सवयी, कौशल्यं इत्यादी, इत्यादी पाहिजे त्या क्षणी वापरण्याची क्षमता म्हणजे स्मरणशक्ती, अशी सोपी व्याख्या आपण करूशकतो. प्रत्येकाकडचा माहितीचा साठा हे त्याच्या भोवतालचं जग, त्यातील अनुभव, शिक्षण, संधी, पेललेली आव्हानं, तसंच ज्याच्या-त्याच्या गरजा, इच्छा, अपेक्षा यांवर अवलंबून असतो.

आठवणींचे/माहितीचे गोफ

क्षणाक्षणाला जमा होणाऱ्या या कोटय़वधी आठवणी मेंदूत ठेवल्या तरी कशा जातात, असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला असेल. खरं सांगायचं म्हणजे मेंदूचं कार्य कसं चालतं याबद्दल आपल्याला खूपसं ज्ञान नाही. या क्षेत्रात प्रचंड संशोधन मात्र चाललेलं आहे आणि पुढच्या काही वर्षांत बऱ्याच बाबींचा उलगडा व्हावा अशी अपेक्षा आहे. परंतु या ज्या आठवणी/ माहिती मेंदू साठवतो, त्याचं विषयवार संकलन केलेलं असावं, असं आपण सध्या समजतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं, तर प्रवास या शब्दावरून तुम्हाला काय काय आठवतं ते बघा. प्रवासाची तयारी, बॅगा भरणं, मजा, सुटी, रिझव्‍‌र्हेशन वगैरे वगैरे. विचार करू लागलात तर ही यादी लांबच लांब होईल आणि तुम्हाला असं दिसेल की प्रवासाशी संबंधित शंभर गोष्टी तुम्हाला आठवल्या. एवढंच नाही, तर गेल्या प्रवासात काय अडचणी आल्या त्यासुद्धा! डोळे क्षणभर बंद करून ‘थंडी’ या शब्दाचा विचार करू या.. पुन्हा तसंच. स्वेटर्स, शाली अशा गरम कपडय़ांसह पहाटेची अंथरुणातील ऊब आणि आलं घातलेला चहासुद्धा समोर आला ना? अशा एकमेकांत गुंफलेल्या आठवणींचे लाखो गोफ मेंदू आपल्यासाठी जपून ठेवतो आणि त्यावर एक फुंकर मारायचा अवकाश, या जोडलेल्या आठवणी एकापाठीमागून एक आपल्यासमोर उलगडू लागतात.

 भावना आणि आठवणी

मेंदूच्या आठवणी संकलनाबाबत आणखी एक गोष्ट आपल्याला माहिती आहे. ती म्हणजे आठवणींबरोवर भावना जोडल्या की त्या आठवणींचं विस्मरण जवळपास अशक्य असतं. आठवतो, तुमचा तो ‘खडूस’ बॉस! त्यानं तुम्हाला कसं वागवलं हे सांगायची संधी तुम्ही नक्कीच सोडणार नाही. आणि एखादी सासूपीडित सून सासूचं पुराण अगदी चार ताससुद्धा न थकता सांगू शकेल. मान-अपमानाच्या, दु:खाच्या आठवणींसह, सुखाचे, कौतुकाचे, आनंदाचेही प्रसंग असेच साठवले जातात. तुमच्या स्वत:च्या कमाईचे पैसे पहिल्यांदाच मिळाले तो दिवस, तुमच्या हक्काच्या घरात राहायला आलात तो दिवस, अशा भावनांशी निगडित शेकडो आठवणी पुसल्या जात नाहीत.

भावनेत गुंतलेल्या आठवणींचं एक वैशिष्टय़ असतं, ते म्हणजे या आठवणी गिरवण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला झालेला अपघात, तुमच्या घरची चोरी, या घटना सगळ्या तपशिलांसह नेहमीकरताच आठवतात, त्या तुम्ही अनेक वेळा इतरांना सांगतादेखील. याचबरोबर अतीव महत्त्वाच्या घटनादेखील अशाच लक्षात राहातात उदा. मुंबईचे साखळी बाँबस्फोट, त्सुनामी आल्याची घटना. अशा बातम्या जेव्हा कळल्या त्या वेळी तुम्ही काय करत होतात, अशा छोटय़ा छोटय़ा बारकाव्यांसकट त्या विशद करू शकाल. जणू काही अशा घटनांसाठी ‘हॉटलाईन’च आपल्या मेंदूमध्ये आहे. सध्याच्या ‘करोना’ काळाच्या आठवणी अशाच आपल्या मेंदूत घट्ट बसणार आहेत.

उल्लेखनीय चित्रस्मृती

मेंदूचा तिसरा गुणधर्म म्हणजे त्याची उल्लेखनीय चित्रस्मृती. इंग्रजीमध्ये ‘अ पिक्चर सेज अ थाऊजंड वर्डस्’ असं म्हणतात, ते अक्षरश: खरं आहे. चित्रातून माहिती जितकी पटकन समजते, तितकी शब्दांतून नाही. म्हणूनच मेंदूलाही जणू चित्रांचं आकर्षण असते. चित्रांच्या तुलनेत शब्द अपुरे पडतात. म्हणून आपण टी.व्ही.समोर तासन्तास खिळून बसतो. एरवी गोंधळ करणारी मुलं टी.व्ही.समोर गुपचूप बसून राहातात, त्याचं कारणही हेच. मेंदू चित्र लक्षात ठेवतो, पण शब्दजंजाळ परिच्छेद लक्षात ठेवणं त्याला अवघड पडतं. म्हणूनच लहान मुलांची पुस्तकं चित्रमय असतात, समजायला अवघड गोष्टी पुस्तकांत आकृतिबद्ध केलेल्या असतात. नाव लक्षात राहिलं नाही तरी माणसाचा चेहरा आठवतो. डोळे हे माणसाचं सर्वात शक्तिशाली ज्ञानेंद्रिय आहे. त्याच्याकडून येणारी माहिती मेंदूला जास्त महत्त्वाची वाटत असल्यामुळे ती अधिक स्मरते की काय कुणास ठाऊक! परंतु डोळ्यांनी जे बघितलं ते सहजासहजी विसरलं जात नाही, याचा अनुभव प्रत्येक जणच वर्षांनुवर्ष घेत असतो.

आजची ही माहिती नक्कीच रोचक वाटली असेल ना?  पुढच्या लेखात (३ एप्रिल) आपल्या मेंदूच्या अशाच आणखी काही आश्चर्यकारक क्षमतांविषयीची माहिती घेऊ.

mangal.joglekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:08 am

Web Title: memory card in brain process of memory formation zws 70
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : या रिंगणाबाहेर पडायला हवं..
2 जोतिबांचे लेक  : कोई नाम न दो..
3 गद्धेपंचविशी : आणि शिल्प घडत गेलं..
Just Now!
X