News Flash

स्मृती आख्यान : विस्मरण समज-गैरसमज

एकाच वेळी अनेक कामं पूर्ण करण्याचा ताण, कमी झालेली झोप, मनाची अस्वस्थता अशा अनेक गोष्टींमुळे तरुण आणि मध्यमवयीनांनीही काही गोष्टी विसरणं साहजिक आहे.

सर्वसाधारण विस्मरण ही लगेच घाबरून जाण्यासारखी गोष्ट नसली तरी त्याच्या कारणांकडे लक्ष देऊन त्यात बदल करणं आरोग्याच्या हिताचंच आहे.

मंगला जोगळेकर – mangal.joglekar@gmail.com

एकाच वेळी अनेक कामं पूर्ण करण्याचा ताण, कमी झालेली झोप, मनाची अस्वस्थता अशा अनेक गोष्टींमुळे तरुण आणि मध्यमवयीनांनीही काही गोष्टी विसरणं साहजिक आहे. याबरोबरच गॅजेट्स आणि त्यावरील  माहितीच्या ‘ओव्हरलोड’ने आता सगळ्यांचा ताबा घेतला आहे. सर्वसाधारण विस्मरण ही लगेच घाबरून जाण्यासारखी गोष्ट नसली तरी त्याच्या कारणांकडे लक्ष देऊन त्यात बदल करणं आरोग्याच्या हिताचंच आहे. स्मरणशक्तीचे प्रश्न सतत पाठपुरावा करत असतील तर मात्र वेळीच उपाययोजना करायला हव्यात. कारण पंधरा-वीस वर्षांनी पुढे जाऊन हे प्रश्न काय स्वरूप घेतील हे आताच सांगता येणार नाही.

आजच्या लेखापासून विस्मरण हा विषय समजून घ्यायला आपण सुरुवात करू या. ‘सर्वसाधारण’ विस्मरणाकडे कुठल्या दृष्टीनं बघावं, त्याची कारणं काय आहेत आणि जीवनशैलीतील बदल त्यावर कसा परिणाम करतात, हे जाणून घेऊ.

विस्मरण- एक स्वाभाविक अनुभव

अगदी आठवणीनं टेबलावर ठेवलेली किल्ली अचानक कु ठेतरी गायब होणं, ऑफिसमधून येताना करायचीच म्हणून ठरवलेली गोष्ट पूर्ण विसरून जाणं, एखाद्या माहीत असलेल्या चेहऱ्याचं नाव मेंदूला ताण देऊनही न आठवणं.. घडतातच ना असे प्रसंग तुमच्या-आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात? तेसुद्धा अगदी पदोपदी! अशा प्रसंगांची यादी मारुतीच्या शेपटासारखी वाढू शकेल. यातील काही प्रसंग छोटे असतात तर काही मोठे, काही गमतीशीर तर काही गंभीर. बहुतेक सर्व नको तेव्हा घडणारे, त्रास देणारे, चिडचिड वाढवणारे. इतरांवर दोषारोप करायला लावणारे तर काही अंतर्मुख करणारे. गेल्या आठ दिवसांत तुमच्या आयुष्यात घडलेले अनुभव आठवा बरं जरा.. त्यांच्याकडे पाहिलं तर असं दिसेल की प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. परंतु ते नेमके एखाद्या व्यक्तीच्याच बाबतीत का घडतात याचं स्पष्टीकरण देणं केवळ अशक्य.

यावरून आपण लक्षात घ्यायचं, की विस्मरण हा लहान मुलांपासून मोठय़ा व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला येणारा एक स्वाभाविक, नैसर्गिक अनुभव आहे. मग ती व्यक्ती एखाद्या मोठय़ा कंपनीचा प्रमुख कार्यकारी अधिकारी असो वा एखादा कॉलेजकुमार असो. दुसरं असं, की तरुण, मध्यमवयीनांच्या जीवनात घडणारे प्रसंग बहुविध असले तरी गांभीर्याच्या दृष्टीनं विचार केल्यास सहसा ते ‘साधारण स्वरूपाचंच विस्मरण’ असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे अनुभव येत राहिले तरी आपल्याला ‘अल्झायमर्स’, ‘डिमेंशिया’ झाला आहे किंवा होणार आहे, असा विचारही कोणी मनात आणण्याची आवश्यकता नाही. आजकाल झालंय काय, की थोडय़ा काही अशा घटना घडल्या की आपल्या मनात संशयाचं भूत संचार करायला लागतं. जेव्हा विस्मरण तरुण वयामध्ये घडताना दिसतं तेव्हा विस्मरणाचा आजार हे त्याचं कारण असण्याची शक्यता जवळपास नसतेच.

विसरण्याच्या अनुभवाचा पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरजही नसते. अनावश्यक माहितीचा निचरा होणं हे आठवण राहाण्याइतकंच महत्त्वाचं आहे आणि तेदेखील मेंदूचंच काम. म्हणजे बघा, तुम्ही रेल्वेमधून प्रवास करता तेव्हा आजूबाजूला बसलेले सगळे जण तुमच्या लक्षात असतात. त्यांचे नुसते चेहरेच नव्हे, तर त्यांच्याशी झालेलं संभाषण, त्यांचं वागणं, बोलणं सगळं आपला मेंदू टिपत असतो. ते सगळं चार, आठ दिवस लक्षात असतं, पण कालांतरानं आपण ते सर्व विसरून जातो. कारण आपल्याला या माहितीचा काही उपयोग नसतो. म्हणूनच विस्मरण हासुद्धा मेंदूचा एक मोठा गुणधर्म आहे हे समजून घ्यायला हवं. याशिवाय जसं अडगळीचं सामान माळ्यावर टाकल्यावर त्याची आठवण आपण विसरून जातो, त्याप्रमाणे ज्या माहितीचा आपल्याला उपयोग नसतो त्या आठवणी लांबच ठेवल्या जातात. ज्याप्रमाणे विस्मरणाचे अनुभव येतात त्याप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता दाखवणारेही अनुभव येतात. उदा. माझ्या भाचीचा लेख आंतरराष्ट्रीय ‘जर्नल’मध्ये छापून आला, माझ्या शेजारणीनं पाककला स्पर्धेत बक्षीस मिळवलं, ‘मेमरी क्लब’मधले पाटील काका कॅरमच्या स्पर्धेत पहिले आले, अशा रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी लक्षात राहिल्या आणि गप्पा मारताना नेमक्या आठवल्या की ते आपल्याला सुखावून जातं. तर कधी काही प्रसंगांतून आपला मेंदू कामावर आहे याची पावतीच मिळते. उदाहरणार्थ अनुजला कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना एक प्रेझेंटेशन द्यायचं होतं. प्रेझेंटेशनच्या फक्त अर्धा तास आधी त्याला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सुचला. मीटिंगची बाजी अनुजनं जिंकली ती त्या मुद्दय़ाच्या आधारावर. प्रेझेंटेशनवर भरपूर मेहनत करून आपल्या हे लक्षात कसं आलं नाही आणि बरोबर वेळेवर ते कसं सुचलं याचा विचार अनुज करत राहिला. आपल्या मेंदूचे त्यानं अनेक वेळा आभार मानले.

विस्मरण का घडतं ?

बहुतेक सगळ्यांच्याच बाबतीत ताण, चित्त शांत नसणं, एकाच वेळी अनेक गोष्टी करणं, हीच विस्मरणाची कारणं असतात असं दिसून येतं. लग्नकार्यामध्ये सगळं व्यवस्थित निभावण्याचा ताण असतो. त्या ताणापायी काय काय गोष्टी राहून गेल्या हे ज्यांच्या घरी लग्न आहे त्या मातापित्यांना विचारा! ताणाबरोबर झोपही व्यवस्थित होत नसेल तर अशा घटना हमखास घडणारच. आता बघा, सचिन गेले दहा दिवस कामाच्या ‘डेडलाइन’मुळे बारा, चौदा तास काम करत होता. जेमतेम चार-पाच तास झोप मिळाली तर मिळाली, असं चाललं होतं. ऑफिसमधून येताना तो ‘एटीएम’मध्ये पैसे काढायला गेला. कार्ड मशीनमध्ये घातलं, पण त्याला स्वत:चा पिन नंबर काही केल्या आठवेना. पाठीमागच्या लोकांना उगीच शंका नको म्हणून त्यानं कार्ड काढून घेतलं. त्या विचारात जरा काळजीतच तो घरी आला. डोकं शांत झाल्यावर त्याला ‘पिन’ आठवला आणि त्याला हुश्श झालं.

विस्मरणाचं आणखी एक कारण म्हणजे एका वेळी एकापेक्षा जास्त गोष्टी करणं. अष्टावधानी वृत्ती असते एकेकाकडे. परंतु कालांतरानं प्रत्येकातच ती कमी होताना दिसते. ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये गुंग झाल्यावर दूध उतू जाण्याचे प्रसंग कोणाकडे घडत नाहीत? गाडी चालवताना फोनवर बोललं तर लक्ष विचलित होणारच. शिस्त कमी पडणं हेदेखील विस्मरणाचं आणखी एक कारण. ‘स्वत:ला शिस्त लावा नाहीतर परिणाम भोगा’ असा फलक मध्यंतरी मी  बघितला होता. खरंच नाही का ते? निरीक्षणाचा अभाव हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. परीक्षेला गेल्यावर सूचना नीट न वाचल्यामुळे एखादा प्रश्न सोडवण्याचं मुलंमुली विसरून येतात. सामान आणायला गेल्यावर पैसे किती परत दिले आहेत हे नीट न बघितल्यामुळे हिशेबात खोट खाण्याचे प्रसंग तुमच्या बाबतीतही घडले असतील. तात्पर्य काय, की विस्मरणाच्या प्रत्येक अनुभवाच्या मागे काहीतरी कारण असतंच- मनात असलेल्या विचारांचा झिम्मा, काम वेळेत पूर्ण करण्याचा ताण, घरात चाललेला मुलांचा धिंगाणा किंवा दुसरं काही..

जीवनशैलीमुळे विस्मरण?

अलीकडे मध्यमवयीन गटामध्ये स्मरणशक्तीचे प्रश्न वाढताना दिसून येत आहेत. अभ्यास लक्षात राहात नाही अशी तक्रार विद्यार्थी करत आहेत. जीवनशैलीतील बदल हे सगळ्याच प्रश्नांमागचं कारण आहे का? आहारविहारातील बदल, व्यायामाचा अभाव आणि वाढता तणाव हे आपले शत्रू आहेत का? हे सध्या तरी आपलं आपण ठरवून त्यानुसार पावलं उचलायची आहेत. एका सोळा वर्षांच्या मुलीचे प्रश्न मी नुकतेच वाचले. ते असे होते- ‘‘मी माझ्या खोलीत कशासाठी आले होते, अशासारख्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी मी सारखी विसरते. मी शाळेत जाते, क्लासेसना जाते. रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करते. माझं डोकं सारखं दुखतं. मला अभ्यासाचा ताण सोसत नाही. माझी प्रगती समाधानकारक आहे असं मला वाटत नाही..’’

या परिस्थितीचं विश्लेषण करताना मानसोपचारतज्ज्ञांना असं दिसतं, की मित्रमैत्रिणींची साथ, एकत्र खेळणं, कार्यक्रमांना हजेरी लावणं, वाचन, गाणी, गप्पांचे कट्टे, इत्यादी आणि रिकामटेकडेपणासुद्धा, या सगळ्यांनी अविस्मरणीय अनुभव जुन्या पिढीच्या पदरी टाकले. आतासारखे अभ्यासाच्या पाठीमागे अख्खा दिवस लागलेले पूर्वी किती असायचे? दिवसभर खेळण्यानं व्यायाम व्हायचा, भूक लागायची, झोप यायची. मोठय़ा व्यक्तींचा आधार असायचा. मुळातच ताण कमी वाटायचा. आता हे सगळंच बदललं आहे.

स्मरणशक्तीचे प्रश्न असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या एका व्यक्तीची हकिगत बघा, ‘‘ काम पूर्ण करायची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. कामात चुका होत राहातात. बॉस समजून घेत नाही. कामाच्या ताणाखाली कौशल्यं वाढवायला वेळ मिळत नाही. नोकरी टिकेल की नाही ही चिंता सतत वाटते. घरी दुसरं कमावणारं कोणी नाही. या विचारांमुळे रात्र-रात्र झोप लागत नाही..’’

तरुणांमधील स्मरणशक्तीचे प्रश्न थोडेफार वाढत असल्याचं संशोधनात दिसून येत आहे. ताण, अपुरी झोप आणि त्यामुळे मेंदूला न मिळणारी विश्रांती याचा उल्लेख वर आलाच आहे. ही स्थिती तात्पुरती असेल तर चांगलंच आहे, परंतु सातत्यानं ताणाखाली काम करण्याचा परिणाम नैराश्यापर्यंत पोहोचला आहे का, हे बघणंही आवश्यक आहे. नैराश्य आणि स्मरणशक्ती यांचा एकमेकांशी संबंध आहे, ही आता सर्वमान्य बाब आहे. रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्याकडेही तरुणांनी लक्ष द्यायला हवं, असंही संशोधनातून दिसतं. म्हणूनच तरुणांच्या बाबतीत घडणाऱ्या प्रसंगांकडे गांभीर्यानं बघायला हवं. स्मरणशक्तीचे प्रश्न पाठपुरावा करत असतील तर वेळीच उपाययोजना करायला हव्यात. कारण पंधरा-वीस वर्षांनी पुढे जाऊन हे प्रश्न काय स्वरूप घेतील हे समजायला आपल्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही. या बदलत्या चित्राकडे शास्त्रज्ञ नजर ठेवून आहेतच. आपणही त्याबाबत सावधानता बाळगायला हवी.

आपल्याला असंही दिसतं, की नवीन पिढी ‘डेटा ओव्हरलोड’ची शिकार झाली आहे. त्याखाली भरडली गेली आहे. वीस वर्षांपूर्वी जेवढी माहिती आपण मेंदूला पुरवत होतो त्यापेक्षा अनेकपटींनी माहिती आपण मेंदूला क्षणोक्षणी देतो. पूर्वी दूरचित्रवाणीच्या एखाद्दुसऱ्या वाहिनीचे कार्यक्रम आपण ठरावीक वेळ बघायचो. त्याऐवजी आता आपण अनेक वाहिन्यांच्या कार्यक्रमांत दिवसभर रममाण होतो. मालिका नुसत्या चवीचवीनं बघत नाही, तर सगळं लक्षातही ठेवतो. याशिवाय स्मार्ट फोन, कॉम्प्युटर, व्हिडीओ गेम्स, टॅबलेट आणि अनेक ‘ओटीटी प्लॅटफॉम्र्स’ हे सगळं आहेच. अभ्यास असो, जेवणखाण असो वा कोणाशी बोलणे असो, हातात कुठलं तरी गॅजेट विराजमान असतंच. एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला गेलो, तरी त्याचे फोटो काढण्यात आपण गर्क असतो. जी गोष्ट करत असतो तिच्याकडे किती लक्ष दिलं जातं हा विचार कोण करतं? मग ती लक्षात राहिली नाही तर स्मरणशक्तीला दोष कसा द्यायचा?

स्मरणशक्तीचे प्रश्न साधारण साठीच्या पुढे वाढीस लागतात असं समजलं जातं. जीवनशैलीतील बदलांमुळे हे वय अलीकडे सरकलं आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे. ‘करोना’च्या काळात सर्वाच्या बाबतीतच हे प्रश्न प्रकर्षांनं पुढे येत आहेत. त्याचा उल्लेख गेल्या वेळी केला गेला आहे. संशोधनातून त्याची प्रचीती मिळते आहे. चाळिशीत, पन्नाशीत स्मरणशक्तींच्या प्रश्नांची वाढ फार नाही, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. असो.  पुढील लेखात (६ फेब्रुवारी) ज्येष्ठांमधल्या विस्मरणावर चर्चा करू या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 1:41 am

Web Title: memory loss facts and myths smruti akhyan dd70
Next Stories
1 जगणं बदलताना : डोळे हे जुलमी गडे!
2 पुरुष हृदय बाई : आम्हा पुरुषांचे ‘प्रांजळ’ मनोगत..!
3 जोतिबांचे लेक : नव्या वाटा रुळवणारा संवादी!
Just Now!
X