रत्नाकर मतकरी

pratibha.matkari@gmail.com

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पुरुषाला स्वत:ची स्त्री मिळाली, तरी त्याचे इतर स्त्रियांविषयी आकर्षण संपतच नाही. बहुतेक वेळा परिस्थितीमुळे त्याला परस्त्रीशी (मनात असूनही) संबंध ठेवता येत नाही. तरीही ज्यात बिलकुल धोका नाही अशी संधी मिळाल्यास किंवा एखाद्या स्त्रीनेच पुढाकार घेतल्यास, पुरुष, सच्छीलतेची आडकाठी येऊ देत नाही. किंबहुना त्यात आपला काही नैतिक प्रमाद आहे, असेही त्याला वाटत नाही. सारा दोष त्याच्या ‘लिट्ल ब्रदर’चा असतो आणि तोही तात्पुरता!

पुरुषाने पुरुषांविषयी लिहिणे तसे जरा कठीणच! आज दिवस आहेत ते स्त्रियांनी स्त्रियांविषयी ‘स्त्रीवादी’ लिहिण्याचे! तेव्हा पुरुषांविषयी लिहिण्याला काय महत्त्व? त्यातून पुरुषाने लिहायचे म्हणजे अडचणीचेच! विरोधात लिहिले, तर पुरुष असूनही पुरुषांचे दोष दाखवतो, असं होईल. बाजूने लिहिले तर तो पक्षपात! शिवाय ‘पुरुषवादी’ असा काही प्रकार नसतोच! तेव्हा काय लिहावे आणि कसे लिहावे?

त्यातून माझ्यासारख्या एखाद्याला ‘पुरुष’ आणि ‘स्त्री’ असे वर्गीकरण करणे नेहमी जमतेच असे नाही. मी आपला सरसकट सर्वाना ‘माणूस’ समजतो. त्यांच्यात जे काय असतील ते मानवी स्वभावधर्म समजतो. त्यातून काळ बदलत गेला. समाज बदलत गेला. तसे पूर्वीचे पुरुष-स्वभावधर्म आणि स्त्री-स्वभावधर्म हेही बदलत गेले. त्यांची सरमिसळही झाली. पूर्वापारपासून, पुरुषांनी कमवायचे आणि स्त्रीने घर-मुले सांभाळायची, ही वाटणी देखील बरीचशी बदलली. म्हणजे पुरुष कमवायचे थांबले किंवा त्यांनी घर-मुले यांचा पत्कर घेतला, असे फारसे झाले नाही. परंतु स्त्रीने शिक्षण घेतले, वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडी मारली आणि संसार, मुले सांभाळून ‘करिअर’ करता करता स्वत:ची दमछाक करून घेतली. त्याबरोबरच, पुढाकार घेणे, पराक्रम गाजवणे, डोके चालवणे ही पुरुषांचीच समजली जाणारी खाती आता स्त्रीनेही कवेत घेतली, त्यामुळे ‘पुरुषार्थ’ ‘मर्दुमकी’, ‘मर्दानगी’ इत्यादी शब्द भाषेतून नाहीसे होण्याची वेळ आली. नाही म्हणायला विविध स्थानांवरून सत्ता गाजवणे हे मात्र अजून तरी पुरुषांनी मोठय़ा प्रमाणावर जमवले आहे. घरातली सत्ता कमी झाली, तरी अजूनही राजकारण, निर्मिती क्षेत्रे, उद्योगधंदे इत्यादी अनेक ठिकाणी पुरुषांची सत्ता अजूनही मोठय़ा प्रमाणावर आहे!

त्यामुळे प्रश्न पडतो की विचार करायचा तो कुठल्या पुरुषोत्तमांचा? अनेक प्रकारचे पुरुष डोळ्यांसमोर येतात. धडपडणाऱ्या कलावंतांपासून थोर कलामहर्षीपर्यंत.. व्यसनाधीन पुरुषांपासून ते साधू साधकांपर्यंत.. समाजसुधारक, पराक्रमी फौजी, शास्त्रज्ञ, खेडय़ापाडय़ात सेवा पोहोचवणारे डॉक्टर्स, शिक्षक आणि इतर अनेक त्यागमूर्ती! बरे, असेही असू शकते की एखादा व्यसनी पुरुष हा मोठा कलावंत असू शकतो. एखादा समाजसुधारक स्त्रीलंपट असू शकतो! माणसा माणसामध्ये आणि एकाच माणसामध्येदेखील इतके परस्परविरोधी गुण-अवगुण असतात की, पुरुषजात हे कशाकशाचे मिश्रण आहे, हे ठरवणेच अवघड व्हावे! तरीही सर्वसाधारणपणे काही निरीक्षणे नोंदवावीत आणि पाहावे ‘पुरुष’ नावाच्या प्राण्याचा आकार कसा दिसतो, ते!

पुरुषांची, वरवर पाहिले तरी काही काही वैशिष्टय़े दिसतात. एक म्हणजे त्यांची ‘रिलॅक्स’ होण्याची – श्रमपरिहाराची कल्पना! दिवसभर काम केल्यानंतर पुरुषाला मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत दारू प्यायला आवडते. अगदी तळागाळातला कष्टकरी ते श्रीमंत कलावंत-राजकारणी यातले कोणीही. परिस्थितीप्रमाणे गुत्ता, बार, पब, फाइव्ह स्टार हॉटेल, रिसॉर्ट असे स्थळबदल होऊ शकतात. दारूही गावठीपासून स्कॉचपर्यंत कुठल्याही दर्जाची असू शकते. परंतु, मद्याचे आकर्षण हा पुरुषाचा स्थायिभावच! एखादी मोहीम पार पडली की श्ॉम्पेन उघडली जाते, नाटकाचा प्रयोग संपला की त्याच्या ‘पुढचा अंक’ सुरू होतो, नवीन कॅम्पेन सुरू करण्याआधी त्यावर बोलण्यासाठी ‘बसावे’ लागते. कुठलाही पुरुष फार तर कमी-जास्त पिईल किंवा अजिबात पिणार नाही. (तरी ‘त्या’ मंडळीत बसेलच) पण असे म्हणणार नाही की फार दमलो बुवा, आता एखादे सुंदरसे पुस्तक घेऊन आराम करतो.. किंवा अंथरुणात अंग टाकून सुरेल संगीत ऐकतो. याउलट तो श्रमपरिहारार्थ, अधिक जागरण करून, डोके भरकटून घेणेच पसंत करील. दारूमुळे अनेक प्रकारचे गुन्हे आणि अपघात होतात हे लक्षात घेऊन प्रत्येक सरकार दारूबंदीचे यथाशक्ती प्रयत्न करीत आले आहे. (या प्रयत्नांच्या सरकारी बैठकींनादेखील..) पण फार प्राचीन काळापासून (अगदी देवादिकांनी सोमरस इत्यादी प्राशन करण्यापासून) ते आजच्या पब्स-बार्सच्या जमान्यापर्यंत पुरुषवर्गाने दारू पिणे सोडलेले नाही. कुठल्याही समाजात, कुठल्याही देशात!

‘आई’ हा पुरुषाचा ‘वीक पॉइंट’ – हळवा, अतिशय हळवा कोपरा! जन्मापासून आईवर शारीरिकरीत्या अवलंबून असलेला पुरुष, पुढेही मानसिकरीत्या का होईना, पण आईवर अवलंबून राहतोच. आईच्या खालोखाल बहिणींवर त्याची माया असते. म्हणूनच त्याला दुखवायचे असल्यास त्याला शिव्या दिल्या जातात, त्या आई-बहिणींवरूनच्या. आणि बायको? ते सत्तास्थान म्हणून तिच्याकडे दुसऱ्या कोणी डोळा वर करून पाहिलेले त्याला सहन होत नाही!

पुरुषाचा दुसरा वीकनेस म्हणजे त्याचा मित्र! स्त्रियांनाही मैत्रिणी असतात, पण ‘मित्र’ ही पुरुषाची जन्मभराची गरज असते. अगदी लहानपणापासून वृद्धापकाळापर्यंत! आपली (घरच्या कोणालाही न सांगता येणारी) गुपिते सांगण्यासाठी, गप्पा मारत दारू पिण्यासाठी, वैध-निषिद्ध ठिकाणी भटकण्यासाठी,  संकटात हाक मारण्यासाठी, एकंदर भरवसा ठेवण्यासाठी, त्याला एक मित्र लागतोच! तो त्याला कधी फसवत नाही; त्याच्याकडून कधी फसवला जात नाही! ‘यारी’, ‘दोस्ती’ ही कशी जिवापाड महत्त्वाची असते, हे समजून घ्यायचे असेल तर कुठलेही हिंदी चित्रपट पाहावेत!

पुरुषाची अंतर्बाह्य़ शरीररचना ही स्त्रीच्या मानाने कमी गुंतागुंतीची असते. त्यामुळे त्याचे उठणे, बसणे, वागणे फार काय विचार करणेही अधिक सरळसोट असते, असे म्हटले तर ते स्त्रीवर्गाला पटेल का?.. त्याचा मुख्य ‘प्रॉब्लेम’ फक्त त्याच्या पुरुषेंद्रियाचा असतो. वयात आल्यापासून किंबहुना त्याच्या थोडे आधीपासूनच त्याला जाणवायला लागते की या अवयवापासूनच आपल्याला आनंदही मिळतो आणि याच अवयवापासून आपला जास्तीत जास्त छळवाद होतो! त्याला हेही वाटू लागते की इतर अवयवांप्रमाणे हा आपले ऐकत नाही. त्याला स्वत:चे मन आहे आणि त्याप्रमाणे स्वत:ची हालचालही आहे! हळूहळू  पुरुष हे सारे स्वीकारतो आणि स्वत:च्या सोयी-गैरसोयी ठरवतो. एका परीने त्याला कधी त्याचे ऐकणारा, तर कधी न ऐकणारा असा एक मित्र मिळतो. मनातल्या मनात तो या अवयवावर प्रेम करू लागतो, इतरांच्या तुलनेत याचा आकार लहान आहे की काय, असे वाटून कधी कधी स्वत:ला दोषही देतो. पण बहुतेक वेळा त्याला ‘लिट्ल ब्रदर’, ‘छोटा भाई’ असे संबोधून त्याचे लाडही करतो.

आपल्या या खास अवयवाशी दोस्ती होते न होते, तोच पुरुषाला स्त्रीचे आकर्षण वाटू लागते. मग पंचाईत वाढते. मैत्री, प्रेम इत्यादी त्या त्या वयात जी जी सोयीची ठरेल, ती ती उपाधी देऊन तो या आकर्षणाचे समर्थन करू लागतो. ही वयाची-शरीराची गरज आहे हे मान्य करून चालण्यासारखे नसते. कारण ही गरज निर्माण करण्याची जेवढी अपरिमित साधने आहेत – म्हणजे जाहिरातींपासून पोर्नोग्राफीपर्यंत – त्यांच्या मानाने ती भागवण्याची साधने फारच कमी! त्यातून सामाजिक दर्जा, माता-पित्यांपासून सर्वच नातेवाइकांच्या अपेक्षा, इत्यादींमुळे संयम राखण्याची सक्ती होते आणि पुरुष कुचंबतो. अशा वेळी आधार असतो तो मित्रांचा – पण तो फक्त बोलण्यापुरताच!

संस्कारांवर खूप काही असते; पुरुषमाणूस त्यातून संयम ठेवायला शिकतो. नंतर – म्हणजे विवाहानंतर पुरुषाची गरज नियमितपणे भागू लागते. तो पत्नीवर प्रेम करायला, तिच्याविषयी निष्ठा बाळगायला शिकतो. पण शिक्षणच ते! बाह्य शिक्षण आणि उपजत भावना यात फरक असणारच! त्यामुळे पुरुषाला स्वत:ची स्त्री मिळाली, तरी त्याचे इतर स्त्रियांविषयी आकर्षण संपतच नाही. बहुतेक वेळा परिस्थितीमुळे त्याला परस्त्रीशी (मनात असूनही) संबंध ठेवता येत नाहीत. तरीही ज्यात बिलकुल धोका नाही अशी संधी मिळाल्यास किंवा एखाद्या स्त्रीनेच पुढाकार घेतल्यास, पुरुष, सच्छीलतेची आडकाठी येऊ देत नाही. किंबहुना त्यात आपला काही नैतिक प्रमाद आहे, असेही त्याला वाटत नाही. सारा दोष त्याच्या ‘लिट्ल ब्रदर’चा असतो आणि तोही तात्पुरता! प्रत्यक्षात काही त्याने आपल्या पत्नीशी बेइमानी केलेली नसते – जन्मभरासाठी तो ‘तिचा’च असतो. मात्र केवळ पत्नीशी प्रतारणा करायची नाही, म्हणून इतर एक वा अनेक स्त्रियांशी संबंध ठेवण्यापासून – तेही संधी असताना- परावृत्त होणारे पुरुष विरळा! बहुतेक जण स्त्रीसंबंधाची शक्यता कायमच शोधत असतात. त्यातूनच आपल्याला तळागाळातले बलात्कारादी गुन्हे, ते उच्च स्तरावर सत्तेचा फायदा घेऊन – हाताखालच्या स्त्रियांचे केले जाणारे विनयभंग अशा घटना अगदी दररोज घडताना दिसतात.

इथेही पुरुषाला मित्राचा आधार असतोच! तळागाळातले लैंगिक गुन्हे कधी कधी मित्र-मित्र एकत्र मिळूनसुद्धा करतात ते सोडून देऊ! किंवा उच्चपदस्थांना आपल्या अधिकारामुळे मित्रांची गरजही वाटत नाही, तेही बाजूला ठेवू. पण सर्वसामान्य पुरुष, चांगली नोकरी करणारा, मुले-बाळे असलेला, सुविद्य पत्नीचा पती, केवळ गंमत म्हणून – हॉटेलात जावे त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या स्त्रियांशी संबंध ठेवून पुन्हा रात्री, पत्नीशी दिनक्रम किंवा निशाक्रम म्हणून शय्यासोबत करतो, तेव्हा बऱ्याच वेळा त्याला, हे सारे माहीत असलेला, त्यात कधी त्याला साथही देणारा मित्र आधारभूत वाटतो. माझ्या ‘तन-मन’ नाटकातील मानसी, आपला नवरा कॉल गर्लकडे नियमितपणे जातो, हे कळल्यानंतर आश्चर्यचकित होऊन त्यांच्या ‘कॉमन’ मित्राला विचारते, ‘हे तुला ठाऊक होतं?’ मित्र म्हणतो, ‘‘४० टक्के पुरुष अशा ठिकाणी जातात. आणखी २० टक्क्यांची इच्छा असते, पण जमत नाही. जे नेहमी जातात त्यांच्या मित्रांना ते माहीत असतं, पण ते पुरुषा-पुरुषांमधलं सीक्रेट असतं. पुरुष आपल्या शरीराविषयी आपापसात खूप बोलतात (चावट विनोद करतात, अश्लील शिव्या देतात- जे स्त्रियांसमोर टाळतात) त्यातून ते तयार होतं! पुरुष आपल्या खासगी गोष्टी मित्राला सांगतो – तो त्या कधीच कुणाला सांगणार नाही, या भरवंशावर!’’ मानसीला हे अनैतिक वाटते. पण मित्र म्हणतो, ‘‘हा स्त्रीच्या आणि पुरुषाच्या नजरेतलाच फरक आहे. मित्राच्या स्वैराचाराचा कोणीच बाऊ करत नाही, कारण परस्त्रीचं आकर्षण तोही समजू शकतो. काही पुरुषांना संधी मिळते, काहींना नाही- पण हे सगळं अनैतिक आहे असं एखाद्या स्त्रीला वाटेल, तसं पुरुषाला नाही वाटत!’’

बहुपत्नीत्व हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. राजेमहाराजांच्या काळात एकीला पट्टराणीचा मान असे, तरीही जनानखान्यातील अनेकींशी शरीरसंबंध असत. अर्थात राजा त्या सर्वाचीच, त्यांच्या मुला-बाळांचीही संपूर्ण जबाबदारी घेत असे. पुढे हे परवडेनासे झाले. सामान्य पुरुषाच्या तर ते आटोक्याबाहेरच असे. परंतु असे अनेक सधन रसिक असत की जे ‘अंगवस्त्र’ बाळगत. कलावंतिणीशी संबंध असलेला ‘मृच्छकटिका’तला चारुदत्त किंवा ‘संशयकल्लोळा’तला आश्विनशेठ, आश्रमकन्येला ‘आपली’च मानणारा राजा दुष्यंत, या सर्वाना साहित्यात नायकाचे स्थान मिळालेले आहे. साहित्याचे सोडा, पण प्रत्यक्ष आयुष्यात, अगदी माझ्या पाहण्यातही असे काही ‘शेठ’ आहेत, की ज्यांनी जन्मभर आपल्या पत्नीबरोबरच काही कलावंत स्त्रियांनाही जन्मभर आधार देऊन, त्यांच्या मुलांना मार्गी लावून, शिवाय त्यांची कला बहरावी यासाठी सारे काही करून, एका परीने कलाक्षेत्राला ऋणात ठेवले! या पुरुषांचा उदारपणा वाखाणावा तेवढा थोडाच! त्यांच्या लग्नाच्या बायकांनीही अधिकच उदारपणाने पतीच्या बाह्य़संबंधांचा स्वीकार केला. त्यांना सवतीहूनही वरचे स्थान दिले. अर्थात, त्यांनी जोवर लग्नाचा आग्रह धरला नाही, तोवरच!

असो. पुरुष जातीचे गुण थोडे आणि वैगुण्ये अधिक सांगितली. पण माझी खात्री आहे, की त्याचे कुठल्याही पुरुष वाचकाला फारसे वैषम्य वाटणार नाही. कारण लहानसान गोष्टी मनावर न घेणे, हेही एक पुरुषी वैशिष्टय़च आहे!

आज जो पुरुष आपण समाजात पाहतो आहोत. तो सातत्याने स्त्रीच्या तुलनेत पाहिला गेला. दोषारोप केले गेले तेही त्याच तुलनेत. स्वतंत्र पुरुषजात या दृष्टीने पुरुषांचा फारसा विचार केला गेलेला दिसत नाही. का आहे पुरुष असा? तो असा का घडला असावा? कोण कोण कारणीभूत आहे त्यासाठी? समाज, संस्कार, शारीरिक फरक, विज्ञान, भावनिक-मानसिक रचना, की आणखी काही ? पुरुषाची स्वत:ची अशी बाजू, विचार आहे का? हे तपासून पाहणारं – पुरुष हृदय ‘बाई’ – हे खणखणीत सदर. पुरुषांनीच लिहिलेलं, त्यांना समजलेला पुरुष त्यांच्याच शब्दांत मांडणारं , दर शनिवारी.