News Flash

आहे अटळ, तरीही..

आपल्या अगदी आसपासच वावरतोय की काय, असं वाटत राहातंय. आपल्याला सगळ्यांनाच त्याच्या हाका ऐकू येतायत

संज्योत देशपांडे  sanjyot_d@hotmail.com

सध्या करोनामुळे मृत्यूचा वास सर्वत्र अटळपणे भरून राहिलेला जाणवतो. आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनं शोकाकु ल होणं ही मनाची फक्त काही काळ चालू राहणारी अवस्था नाही, तर दु:ख करणं ही एक प्रक्रिया आहे. कोलमडलेल्या मनाची पुनर्बाधणी करणारी, स्वत:च्या मनाचे विखुरलेले तुकडे गोळा करायला लावणारी, आयुष्याकडे, स्वत:कडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडणारी प्रक्रिया! मृत्यू अटळ असतो आणि काळ कुणासाठी थांबत नसतो. म्हणूनच त्याचं पुढचं पाऊल म्हणजे या वियोगाच्या दु:खाला, त्यामुळे आलेल्या आपल्या आयुष्यातल्या बदलाला आपल्या जगण्यात सामावून घेऊन पुन्हा नव्या उमेदीनं आयुष्य सुरू करणं.. 

यापूर्वी आपली आणि त्याची नक्कीच ओळख होती. म्हणजे आपण ओळखत असतोच त्याला. तो आपल्याला भेटला नाही किंवा दिसला नाही तरीही! तसा तो नेहमीच त्याच्या अस्तित्वाची, तो असण्याची जाणीव करून देतच असतो या ना त्या कारणानं.. ‘मी असतोच- मी अटळ आहे..’ त्याचं हे अजरामर वाक्य आपण अनेकदा अनेकांच्या तोंडून ऐकलेलं असतंच; पण त्याबरोबरच त्याची न बोललेली किंवा न बोलताही समजून घ्यावीत अशी अनेक वाक्यं असतात जी ज्याची त्यालाच ऐकू येतात.. तो असतो मृत्यू!

मृत्यू ज्या वाटेवरून, ज्या वळणावर आपल्याला भेटतो, त्यानुसार आपण आपल्या मनामध्ये त्याची एक संहिता लिहायला सुरुवात करतो. मरण माणसाला स्वत:मध्ये डोकावून पाहायला भाग पाडतं. स्वत:च्या जाणिवांना शोधायला भाग पाडतं, नात्यांच्या इतिहासाची उजळणी करायला भाग पाडतं आणि स्वत:च्या जगण्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतं. ‘करोना’च्या या दुसऱ्या लाटेत मृत्यू  आपल्या अगदी आसपासच वावरतोय की काय, असं वाटत राहातंय. आपल्याला सगळ्यांनाच त्याच्या हाका ऐकू येतायत. कधी खूप दुरून आवाज ऐकू येतो त्याचा! बऱ्याचदा आपलं असं कुणी गेलेलं नसतं, पण त्या व्यक्ती ओळखीच्या असतात; कधी खूप वर्षांपूर्वी भेटलेल्या. कळत नकळतपणे त्यांचा वावर, त्यांची एक उपस्थिती असते आपल्या आयुष्यात. अशा व्यक्ती जातात. मनात येतं, त्यांना आपण इथून पुढच्या आयुष्यातही भेटलोच नसतो कदाचित.. पण तरीही त्यांचं जाणं मनात हळहळ निर्माण करत राहातंय आणि त्यांची ती रिकामी झालेली जागा दिसत राहातेय. अगदी जवळचं, लांबचं, कुणाचं कुणीतरी, ओळखीचं, अनोळखी.. काहीही झालं तरी तो मृत्यूच! एका व्यक्तीचं अस्तित्व कायमचं पुसून टाकणारा.. पण सध्या त्याचंच अस्तित्व जाणवत राहातंय इकडेतिकडे.

मरण माणसाला खूप आर्त बनवतं, आकांती बनवतं, अगतिक बनवतं. अशी किती तरी उदाहरणं..

‘‘बाबा गेले आमचे हॉस्पिटलमध्ये; पण आम्ही कुणीच जाऊ शकलो नाही. भाऊ एकटाच गेला. आईला कसं सांगायचं? सांगायचं की नाही?  सांगितलं तर काय होईल? केव्हा सांगू?’’

‘‘आई गेली. तिला नुसतं लांबूनच दाखवलं त्यांनी. जवळही जाता आलं नाही.’’ ‘‘आजीनं ‘येते लवकर,’ म्हणून निरोप घेतला होता; पण..’’

हसताखेळता माणूस. अचानक करोनाची लागण झाली. प्रकृती बिघडायला लागली म्हणून रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि मग तिथे असताना आपल्या त्या प्रिय व्यक्तीबरोबर झालेला शेवटचा चॅट, फोन कॉल, कधी व्हिडीओ कॉल, हेच काय ते जपून ठेवायचे शेवटचे क्षण आहेत आता अनेकांकडे! आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपण नव्हतोच ‘त्या’ शेवटच्या क्षणांना, ही जाणीव मग वेदनेला जन्म देते. अकस्मात आलेल्या मृत्यूपुढे माणसाला नेहमी हताश, असाहाय्य वाटत आलं आहे; पण अशाच क्षणांमुळे मृत्यू समजतो. मृत्यू समजणं म्हणजे मृत्यूची अटळता (inevitability), मृत्यूची परिपूर्णता (finality) समजणं, हे जग आता आपल्यासाठी पूर्वीसारखं असणार नाही (irreversability) हे समजणं. त्यामुळे मृत्यू कठोर वाटतो; पण ते सत्य पचवण्याचं मोठं आव्हान आजच्या या करोनाच्या काळात कित्येक मुलामुलींच्या (ज्यांनी अजून वयाची तिशी, विशीही ओलांडली नाही, काही जण तर त्याहून लहान आहेत.) समोर येताना दिसतं. या कित्येक मुलांचे दोन्ही पालक गेले आहेत. काही  दिवसांच्या अंतरानं त्यांनी दोघांनाही गमावलंय. काही घरांमधली एकाहून अधिक माणसं गेली. कुणाचे वडील गेले, पण त्यांचं दु:ख करत बसायला वेळ नाही, कारण आई अतिदक्षता विभागात आहे. काही पालकांवर त्यांच्या चाळिशीतल्या किंवा त्याहीपेक्षा तरुण मुलांच्या वियोगाचा प्रसंग आलाय. त्यांचे अर्धवट झालेले संसार.. अर्धवट वयातली मुलं.. कसं सामोरं जायचं या सगळ्याला?

मृत्यूमुळे होणारा वियोग, त्यामुळे होणारं दु:ख, अति शोक ही मनाची काही काळ चालणारी अवस्था नाही. दु:ख ही एक प्रक्रिया आहे. कोलमडलेल्या मनाची पुनर्बाधणी करणारी, स्वत:च्या मनाचे विखुरलेले तुकडे गोळा करायला लावणारी, आयुष्याकडे, स्वत:कडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडणारी प्रक्रिया!  शोक वेदनादायी असतो.  माणसाला दु:ख होतं, कारण त्या व्यक्तीत त्याच्या खूप साऱ्या भावना  गुंतलेल्या असतात. म्हणूनच त्याचं पुढचं पाऊल म्हणजे या वियोगाच्या दु:खाला,आपल्या आयुष्यातल्या या बदलाला सामावून घेऊन आयुष्य पुन्हा नव्या उमेदीनं सुरूकरणं. अर्थात तो काळ त्या त्या व्यक्तीसाठी अवघड असतोच. सध्याच्या करोनाकाळात हाच मृत्यू आणि वियोगाचं दु:ख वेगळीच आव्हानं घेऊन येताना दिसतो आहे. आपण सर्वानीच याची दखल घेण्याची गरज आहे, कारण या सर्व घटनांचे काही दूरगामी परिणामही असू शकणार आहेत.

*  दु:खाचा पेलवता येणार नाही असा भार – करोनाच्या काळात- मुख्यत: दुसऱ्या लाटेत मृत्यूचं तांडव दिसतं आहे. एकाच दिवशी हजारोंच्या संख्येनं माणसं मरताना आपण ऐकतो आहोत. (यापूर्वी अपघातांमध्ये किंवा दहशतवादी हल्लय़ांमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती मरण पावल्याच्या घटना ऐकलेल्या आहेत; पण सध्या आपण रोजच्या रोज या अशा बातम्या ऐकतो आहोत. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती एकामागोमाग एक म्हणजे अगदी काही दिवसांच्या अंतरानं जाणं ही परिस्थिती मागे राहाणाऱ्यांसाठी किती आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची होऊन जात असणार याची कल्पनाच के लेली बरी. अशा वेळी दु:खाचं ओझं इतकं  वाढतं की, ते आपल्याला पेलवणार नाही अशी अवस्था येते.  ((bereavement overload हा शब्द तीस वर्षांपूर्वी मानसशास्त्रज्ञ कास्तेनबाउन यांनी सांगितला आहे.) त्यामुळे अशा दु:खाला हाताळणं अवघड होऊन बसतं.

*  अचानक, अनपेक्षित होणारे मृत्यू – करोनाकाळातले मृत्यू हे अचानक, अनपेक्षित आहेत. ध्यानीमनी नसताना उद्भवलेली ही परिस्थिती आपल्या सगळ्यांवर लादली गेलेली आहे. त्यात आपली प्रिय व्यक्ती रुग्णालयात असते, आपण त्या वेळी तिथे नसतोच आणि असं काही होईल याची मनाची तयारीसुद्धा झालेलीच नसते. अशा वेळी जर मृत्यू सामोरा आला तर मागे राहिलेल्या व्यक्तीचं जग एका क्षणात पूर्ण बदलून जातं. बऱ्याचदा कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जाण्याची आपली जी क्षमता असते, त्यावर घाला घातला जातो. मन सुन्न होऊन जातं आणि आपण नि:शंकपणे गृहीत धरलेल्या किती तरी गोष्टींना तडा जातो. अशा वेळी तीव्र दु:खाची स्थिती, काळ लांबण्याची शक्यता जास्त असते.

*  मृत्यूनंतर करण्याचे विधी – दु:ख हलकं व्हावं, त्यातून माणसानं बाहेर पडावं, यासाठी प्रत्येक धर्मात काही विधी केले जातात. मृत्यूनंतर होणारे अंतिम संस्कार आणि त्यानंतर केले जाणारे विधी, याची अनेकांना दु:ख काही प्रमाणात हलकं  होण्याच्या प्रक्रियेत मदत होताना दिसते. ती व्यक्ती आता पुन्हा कधीही परत येणार नाही हे नकोसं सत्य या अंत्यसंस्कारांमुळे आपल्याला पचवणं भाग पडतं; पण करोनाकाळात आपल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांना आपल्याला उपस्थित राहाता येईलच असं नाही. किं बहुना मृतदेह नातेवाईकांपर्यंत पोहोचत नाहीत किं वा त्या व्यक्तीला स्पर्श करता येत नाही, असंही घडतं आहे. टाळेबंदीमुळे  सांत्वनासाठी, आधारासाठी एकमेकांना भेटता येत नाही. खरं तर इतरांच्या अशा भेटण्या-बोलण्यामुळे नातेवाईकांमध्ये आलेली रितेपणाची भावना हाताळायला मदत होते; पण आताचा काळ या माणसांना माणसांपासून वंचित ठेवत आहे. त्याचा दु:खाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

*  राग – करोनाकाळात आपल्या माणसाचा वियोग अनुभवताना राग ही भावनाही मनात ठाण मांडून राहू शकते. परिस्थितीचा राग, ‘हे माझ्या बाबतीत का घडलं?’ यातून  येणारी अन्यायाची भावना, देवावरचा राग (‘त्यानं असं करायला नको होतं..’), गेलेल्या व्यक्तीबद्दलचा राग (‘सांगूनही तिनं नीट काळजी घेतली नाही.’), आरोग्यव्यवस्थेवरचा राग, यंत्रणांवरचा राग, स्वत:वरचा राग.. अशा या रागाच्या अनेक छटा; पण हा राग या दु:ख कमी होण्याच्या प्रक्रियेत मदत करत नाही. त्यामुळे कधी दु:ख तीव्र होतं.

*  अपराधीपणाची भावना –

करोनाच्या काळात असे मृत्यू अनुभवताना काही जणांना अपराधी भावनेनंही ग्रासून टाकलेलं असू शकतं. ‘मी माझ्या प्रिय व्यक्तीला वाचवू शकले असते का?’, ‘मी या नाही, त्या रुग्णालयात न्यायला हवं होतं’, ‘मी रुग्णालयात न्यायला उशीर केला का?’, ‘मी लक्ष दिलं नाही का?’ अपराधीपणाची भावना ही दु:ख कमी करण्याच्या प्रक्रियेला खीळ घालणारी ठरते. तसंच ‘मी मागे जिवंत राहिले! आम्ही गेलो असतो तरी चाललं असतं.’ ही भावना त्रासदायक ठरू शकते.

*  सध्याचं आपलं बदललेलं जगणं – सध्याच्या  निर्बंध लादले गेल्याच्या काळात आपला दिनक्रम, आपल्या कामांचं, काम करण्याच्या पद्धतीचं स्वरूपच बदलून गेलं आहे. घराबाहेर न पडता अनेक कामे करावी लागत आहेत. वर्क  फ्र ॉम होम हा परवलीचा शब्द झाला असल्यानं ऑफिसमधलं मोकळं वातावरण, सहकारी, मित्रमैत्रिणींचं भेटणं थांबलेलं आहे. पूर्वी याच बाहेर जाण्यामुळे, लोकांना भेटण्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीच्या वियोगाच्या काळात दु:खाला सामोरं जायला मदत व्हायची. ती नसल्यानं मनावर नकारात्मक परिणाम होतो आहे.

हे सर्व मृत्यू जसे अचानक होत आहेत, तसेच ते अकालीसुद्धा आहेत. अर्धवट वयात पालक जाण्यानं जगण्यात एक विचित्र पोकळी निर्माण होते, कारण अजूनही आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांना (शिक्षणाचे टप्पे पार करताना, करिअरची सुरुवात, लग्न, मूल, पहिली गाडी, घर घेताना) त्यांनी असायला हवं होतं, किंबहुना ते असणारच आहेत हे आपण गृहीत धरलेलं असतं. त्यांच्या अशा जाण्यानं कायमची एक कमतरता निर्माण होते. आपण आता पोरके झालो आहोत, ही भावना निर्माण होते. तर वयात आलेलं मूल जाणं ही उतारवयातल्या पालकांसाठी सहन न होणारी गोष्ट असते.   मुलांचं-मुलींचं जाणं ही निसर्गनियमाच्या विरोधात झालेली घटना वाटते आणि त्यामुळे आयुष्य अर्थहीन वाटू लागतं. आपण हरलो असं वाटतं आणि न भरून येणारी पोकळी आयुष्यात निर्माण होते. याबरोबरच कुणी मित्र-मैत्रिणी गमावल्या आहेत, कुणी आपली भावंडं, पण सध्याच्या काळात या सगळ्यांची योग्य दखल घेतली जातेच असं नाही.

*  दु:ख गुंतागुंतीचं होतं तेव्हा –  करोना विषाणूच्या प्रसाराची भीती असल्यानं अशा अनुभवातून जाणाऱ्या व्यक्तींच्या दु:खाची, वियोगाची इतरांकडून योग्य दखल घेतली जातेच असं नाही आणि त्याचाही त्रास त्यांना होऊ शकतो. आपण एकटे आहोत. कोणी सांत्वनाला आलं तर नाही, पण साधा फोनही के ला नाही, असं त्यांना वाटून दु:ख अधिक वाढू शकतं. जेव्हा दु:ख हलकं होत नाही, तेव्हा ते गुंतागुंतीचं होऊन जातं. त्यातून बऱ्याच जणांना नैराश्याचाही त्रास होऊ शकतो.

*  कणखरपणाचा बुरखा -वियोगाचं दु:ख हे खूप वेदना निर्माण करणारं असल्याने अति खाणं, व्यसनाधीनता, कधी ताण कमी करण्याच्या गोळ्यांचा/औषधांचा वापर, अशा आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणाऱ्या उपायांचा वापर करण्याकडेही काही जणांचा कल वाढतो. कधी ‘मी ठीकच आहे’  किंवा ‘मला असं करून चालणारच नाही’ असा कणखरपणाचा बुरखाही पांघरला जातो. या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या ठीक वाटल्या, तरी त्याचे दूरगामी परिणाम असू शकतात. त्यासाठी आपण आपला हा वियोग योग्य पद्धतीने हाताळतो आहोत ना, यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची मदत जरूर घ्यायला हवी.

जेव्हा आपण एकापेक्षा अधिक व्यक्तींचा वियोग सहन करत असतो, तेव्हा त्या प्रत्येक नात्यासाठी वेळ द्यायला हवा, कारण त्या प्रत्येक नात्याचा आपल्या मनातला आलेख, आपली भावनिक गुंतवणूक, त्या नात्याचा पोत  वेगवेगळा असतो. म्हणून प्रत्येक नात्याची शोकाची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.

आपल्या सर्वामध्ये पुन्हा उठून उभं राहाण्याची क्षमता नक्कीच असते, यावर विश्वास ठेवा. स्वत:ची काळजी घ्याच, पण आपल्या आजूबाजूच्या अशा शोकाकुल माणसांची जाणीवपूर्वक काळजी घ्या. फोनवरून का होईना संवाद चालू ठेवा. त्याचीच सर्वाधिक गरज आहे.

(लेखिका मानसतज्ज्ञ असून गेली २५ वर्षांपासून मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात समुपदेशक, लेखक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:07 am

Web Title: mental health staying positive during the covid 19 pandemic zws 70
Next Stories
1 स्मृती आख्यान : विस्मरणाचे रोजचे अनुभव
2 आई नावाची बाई
3 करोनाविरुद्धची लढाई; ‘आशा’झाल्या माता
Just Now!
X