News Flash

आजार शरीराचा त्रास मनाचा!

भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते.

आयुष्यातील तणावपूर्ण घटनांमुळे अनेकदा प्रचंड डोकेदुखी जाणवते, अंग दुखते, विलक्षण थकवा जाणवून आजारी असल्यासारखे वाटते. भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे असे शारीरिक आजारात रूपांतर होते. पण तो असतो मानसिक आजार.

अ नेक प्रकारची दुखणी वा छोटे-मोठे आजार सगळ्यांना होतच असतात. कधी सामान्य तर कधी दुर्धर, कधी मजेशीर तर कधी कधी चमत्कारिक वाटणाऱ्या दुखण्यांचे अस्तित्व हे माणसाच्या जिवंत असण्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण अनेक वेळा ही सगळी दुखणी व लक्षणे जरी शारीरिक आजार म्हणून रुग्ण सांगत असले तरी वैद्यकीय शास्त्रातला माहीत असलेला आजार मात्र या रुग्णांमध्ये सापडत नाही. इतकी अनेक प्रकारची लक्षणे असतात की, कुठलाही एक अमुक आजार आहे म्हणून लक्षात येत नाही.

आमच्या बाह्य़ रुग्ण विभागात अशीच एक रुग्ण सुमित्रा नावाची मध्यमवयीन बाई. ६-८ महिन्यांतून एकदा आमच्या वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट होतच असे. सुरुवातीला तिच्या पोटात नुसत्या कळा येत असत. त्यामुळे तिला उठता यायचे नाही, घरातला स्वयंपाक करणे, दैनंदिन स्वच्छता ठेवणे यापकी ती काहीच करत नसे. अशा वेळी तिचा नवरा खाणावळीतून डबा मागवत असे. ती हॉस्पिटलमध्ये असली की पंधरा-एक दिवस त्याला त्याच्या ऑफिसच्या कामातनं सुटी घेऊन तिच्याबरोबर थांबावे लागत असे. दुसरे कोणी नातेवाईक मुंबईत नव्हते. तिच्या माहेरचे व सासरचे सगळे नातेवाईक विदर्भात, गावाकडे राहात असत. बरी होऊन सुमित्रा गेली की आठएक महिने ते वर्षभर ती बरी असे. सणासुदीला तिचा नवरा तिला गावाकडे घेऊन जात असे. एक्स-रे, सोनोग्राफी, सीटीस्कॅन यासारख्या सगळ्या तपासण्या आधीच झालेल्या होत्या. बऱ्याचशा स्पेशालिस्ट तज्ज्ञ डॉक्टरनी तिला पाहिलेले होते. खूप पैसाही खर्च झाला होता, पण कुणाला तिच्या त्या विविध लक्षणांमुळे ओळखता येईल, असे वैद्यकीय निदान करता येत नव्हते. माहिती असलेला कुठला आजारही दिसत नव्हता. कधी पोटात गोळा येतो, कधी कळा येतात, अपचन होते, जेवण जात नाही, चक्कर आल्यासारखे वाटते, थकल्यामुळे उठून बसायचीही ताकद नाही. या तिच्या शारीरिक तक्रारी होत्या. आता आमच्याकडूनही मानसिक उपचार चालूच होते. या सगळ्या लक्षणांमध्ये तिची सातत्याने होणारी चिडचिड आणि नवऱ्यावरचा प्रचंड राग आमच्या लक्षातही आला होता.

सुमित्रासारख्या स्त्रियांमध्ये अशा प्रकारचे आजार पूर्ण आयुष्यभर राहू शकतो. कालांतराने या तक्रारींचे प्रमाणही वाढत जाते. आधुनिक वैद्यकशास्त्र, आयुर्वेद, जडीबुटी यापकी जे कुणी सुमित्रासाठी सुचविले तिकडे ती गेली होती. या सर्व फेऱ्यातून डॉक्टर्सना मात्र योग्य निदान होत नव्हतं, एवढंच नाही तर तो तिचा शारीरिक आजारच नाही, असे ते सांगत असत.

या सगळ्या शारीरिक लक्षणांबरोबर तिचा भावनिक उद्रेक पाहाता आम्ही तिची कौटुंबिक पाश्र्वभूमी हळूहळू जाणून घ्यायचा प्रयत्न केला. सुमित्राचा विवाह तिच्या नात्यातच तिच्या आतेभावाशी झाला होता. तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. सुरुवातीपासूनच तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत पशाची मागणी होत होती. प्रत्येक सणासुदीला ते सोन्याचा दागिना मागत असत. सुमित्रा चार थोरल्या भावांची एकटी व धाकटी बहीण. यामुळे माहेरी तिला अत्यंत प्रेमाने वाढवले होते. सासरी तिच्यावर होणाऱ्या या अशा छळामध्ये तिचा नवरा तिला अजिबात साथ देत नव्हता. उलट, हे सगळे निमूटपणे पाहात तो तिच्याकडे मुद्दामच दुर्लक्ष करीत असे. सासरच्या मंडळींच्या दबावाखाली त्याने ते लग्न केले होते. इतकेच काय त्या काळात त्याने मुंबईत येऊन नोकरी मिळवली व तो एकटाच तिला तिच्या छळणाऱ्या सासू-सासऱ्यांच्या हाती सोडून मुंबईत राहू लागला. बरं लग्न जवळच्या नात्यात असल्याने दोन्ही घरात धुमश्चक्री सुरू झाली. आठ-नऊ वष्रे तिच्या सासर-माहेरची झुंज काही संपता संपेना. नवऱ्याने आईच्या सांगण्यावरून तिला सोडचिठ्ठी द्यायचे निश्चित केले. या वेळी तिच्या भावाने तिच्या उदरनिर्वाहासाठी व भविष्यासाठी भलीमोठी रक्कम मागितली. त्यांना ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे तिला सासरी राहणे भाग होते. नवरा तिकडे शहरात तर ही इकडे संतापलेल्या सासू-सासऱ्यांकडे. त्यातच तिचे दोन-तीन गर्भपात झाले. सासरच्या मंडळींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सुमित्रा चारीबाजूने एकटी पडली. माहेरच्या मंडळींनी या सगळ्या उद्वेगातून आपले अंग काढून घेतले. त्या दरम्यान सुमित्राने तिच्या नवऱ्याच्या खूप विनवण्या केल्या तरी नवरा तिला मुंबईत नेईना. कारण त्याचे स्वत:चे घरही नव्हते. अशा तऱ्हेने पिडलेल्या आणि हैराण झालेल्या सुमित्राला बेहोषीचे झटके

वारंवार येऊ लागले. आता मात्र सासरच्या मंडळींना तिला सांभाळता येईना. त्यामुळेच की काय त्यांनी तिला तिच्या नवऱ्याकडे मुंबईला पाठवून दिले. आता त्याने भाडय़ावर घर घेतले व सुमित्राला आपल्याबरोबर ठेवले.

डॉक्टरांच्या थोडय़ाफार उपचारांनी सुमित्रा हळूहळू बरी झाली. बेशुद्ध होण्याचे झटकेही थांबले होते. दोनएक वर्षे ती बरी होती. आता सासरचा जाच नव्हता व नवराही तसा बरा वागत होता. पण ती सासरी जायचे पूर्णपणे टाळू लागली. सणासुदीला म्हणून नवरा तिला सासरी घेऊन गेला. मुळात सासरच्यांत आणि तिच्यात शीतयुद्ध चालूच होते. काही तरी बाचाबाची झाली. ती मुंबईत आल्या आल्या तिला पोटात प्रचंड कळा येऊ लागल्या. आम्ही तिला अ‍ॅडमिट केले व तिच्यावर उपचार केले. ती बरी होऊन जायची व जेव्हा जेव्हा सासरच्या लोकांशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष काही वाजले की तिची सगळी दुखणी सुरू व्हायची. त्यामुळे नवऱ्याला सुटी घ्यायला लागायची. आजारात तिच्या मागेमागे करत त्याचेही हाल व्हायचे. आता तर सासरच्यांनी तिच्या नवऱ्याला त्यांच्या संपत्तीसंदर्भात भांडणे झाल्याने

त्रास द्यायला सुरुवात केली. हळूहळू सुमित्राने तिची ही कथा आम्हाला सांगितली. या लोकांनी माझा इतका प्रचंड छळ केला आहे ना, म्हणून मी अशी आजारी पडते.

शारीरिक आजार तिला जाणवत होता. पण ज्ञात असलेल्या ठरावीक शारीरिक आजाराचे निदान मात्र करता येत नव्हते. सुमित्राला जाणवणारा त्रास खोटा नव्हता किंवा तिचे नाटकही नव्हते. मग तो आजार जो आहे असेही म्हणता येईल व नाही असे म्हणता येईल असा कुठला आजार होता? तिला शारीरिक लक्षणे तर होतीच, पण खऱ्या अर्थाने हा तिचा मानसिक आजार होता. तो तिने खूप काळ सोसला होता. अशा आजाराला सोमॅटोफॉर्म डीस ऑर्डर असे म्हणतात. थोडक्यात, मानसिक व भावनिक ताणाचे काही शारीरिक लक्षणात रूपांतर होते. म्हणजेच भावनिक उद्रेकाचे किंवा दीर्घकालीन भावनिक प्रक्षोभाचे शारीरिक आजारात रूपांतर होते. या ठरावीक आजारामध्ये काही लक्षणे प्रामुख्याने दिसतात. त्याला सोमेटायझेशन असे म्हणतात.

बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यातील काही तणावपूर्ण घटनांमुळे जसे की, कर्जबाजारीपणा, अचानक नोकरी जाणे, जवळच्या प्रिय व्यक्तीला दीर्घकालीन दुर्धर आजार होणे किंवा वैवाहिक समस्या आदी आपल्याला प्रचंड डोकेदुखी जाणवते, छातीत दुखू लागते, सांधे दुखू लागतात, पाठदुखी होते, विलक्षण थकवा आल्यासारखे वाटते, आपण खूप आजारी असल्यासारखे वाटते. असे ताणाची व दु:खाची शेवटी शारीरिक आजारात होणारी प्रक्रिया स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. शरीर व मन यांचं नातं तसं अनोखं आहे. समजून घ्यायला गुंतागुंतीचं आहे आणि आजही ते नातं आपल्याला पूर्णपणे कळलेलं नाही. बऱ्याच वेळी घरीदारी, कामाच्या ठिकाणी काही बाचाबाची झाली किंवा समस्या आल्या तर बऱ्याच वेळा डोकं गच्च वाटतं, भूक लागत नाही, पोटात मळमळतं, जुलाब होतात, असे अनुभव आपल्या सर्वाना नेहमीच येतात. हे अनुभव खरे असतात. त्यात काल्पनिकता नसते व तसे फसवेही नसतात. रुग्णाला ते जाणूनबुजून निर्माण करायचेही नसतात. त्यांना आपलीही लक्षणे खरे वैद्यकीय आजारच वाटतात. पण ते मानसिक आजार असतात.

सुमित्रासारख्या इतर रुग्णांनासुद्धा खरीखुरी मानसिक लक्षणे विचारली तर ती जाणवत नाहीत. त्यांना तणावही जाणवत नाही. सुमित्रा व सुमित्राचा नवरा आम्हाला सतत सांगत होते की, सगळे त्रास आणि समस्या पूर्वी होत्या आणि आज आम्हा दोघांमध्ये कसलाही ताण नाही. जसं जसं मानसिक तणाव कमी होत जातो, नकारात्मक घटना कमी होत जातात व परिस्थिती सुधारत जाते तस तसे शारीरिक लक्षणेपण कमी होतात. अर्थात सुमित्रासारख्या काही रुग्णांच्या बाबतीत मात्र सोमटायझेशनची लक्षणे कायम दिसून येतात. जणू त्यांच्या मनाने खूप काळापूर्वी झालेल्या त्रासाची ही लक्षणे त्यांच्या शरीरावर कायमची कोरलेली असतात. ती जणू त्यांच्या शरीरात भिनलेली असतात. बऱ्याच भगिनींना ही लक्षणे त्यांच्या मानसिक समस्येशी निगडित असतील असे चुकूनसुद्धा वाटत नाही. किंबहुना त्यांना त्या लक्षणांना मानसिक त्रास म्हटल्याचे आवडत नाही. कारण मानसिक त्रास होणं म्हणजे मानसिक विकलता असणं असा सामाजिक समज आहे आणि तो स्वीकारायला आपले रुग्ण तयार नसतात. त्यामुळेच या खऱ्याखुऱ्या मानसिक त्रासाला आपल्या भूतकाळात दडपून टाकायचा प्रयत्न अनेक स्त्रिया करतात व त्याचेच रूपांतर पुढे शारीरिक लक्षणांमध्ये होते.

शारीरिक लक्षणांमुळे या स्त्रिया डॉक्टरकडे जाऊ शकतात व कौटुंबिक व सामाजिकदृष्टय़ा त्यांना सहानुभूतीही मिळते. म्हणूनच प्रथमदर्शनी असंख्य शारीरिक लक्षणांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या स्त्रियांच्या कौटुंबिक व सामाजिक पाश्र्वभूमीचा आणि त्यांच्या मनात दडलेल्या मानसिक त्रासाचा पूर्ण परामर्श घेऊनच अशा मानसिक आजारांचे निदान केले जाते. यासाठी रुग्णांशी खोलवर संवाद साधणे आवश्यक आहे. त्यांच्या मनाशी टय़ुिनग करणेही आवश्यक आहे.

पुढच्या लेखात आपण या आजाराविषयी आणखी जाणून घेऊ या.

(क्रमश:)
डॉ. शुभांगी पारकर – pshubhangi@gmail.com.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 2:30 am

Web Title: mental illness afflict the body
टॅग : Mental Illness
Next Stories
1 मंत्रचळ
2 अचपळ मन माझे- भयगंड
3 भीती अनामिक भीतीची!
Just Now!
X