माता, पत्नी अशा अनेक भूमिकांतील स्त्रियांच्या जबाबदारी व समर्पणाचे आपण जेवढे कौतुक करू तेवढे कमीच. पण त्याची किंमत मात्र स्त्रीला प्रचंड प्रमाणात द्यावी लागते. ती स्वत:च्या आरोग्याची मात्र अक्षम्य हेळसांड करते. आणि शारीरिक आणि मानसिक आजार तिला भेडसावू लागतात.

का ही दिवसांपूर्वी, माझ्या शाळेतील मैत्रीण भेटली. जवळच्या मराठमोळया हॉटेलात चहा घेत शिळोप्याच्या गप्पा मारता मारता बराच वेळ कसा गेला हे कळलेच नाही. शालेय जीवनातल्या आठवणींची निरागस मजा औरच असते. मग काही वेळ आम्ही आमच्या वर्गातील इतर मैत्रिणी काय करताहेत व कुठे आहेत याचा आढावा घेत बसलो. फार थोडय़ा मैत्रिणींचे जीवन सुखाधीन होते असे म्हणता येईल. बहुतेकजणींनी आयुष्यात खूप कष्ट केले होते. संसारातल्या खस्ता काढल्या होत्या. तसा माझ्या वयाच्या अवतिभोवतीचा आमचा मैत्रिणींचा चमू हा घरसंसार व करिअर सांभाळताना तारेवरची कसरत करतच पुढे आला होता. बोलताबोलता मी माझ्या मैत्रिणीला सहज तिच्या तब्येतीबद्दल विचारले. त्यावर तिने सांगितले की ती तशी बरी होती. पण गेली आठ-दहा वर्षे तिला रक्तदाबाचा त्रास सुरू असून त्यावर उपचार चालू आहेत. अलीकडे तिने काही तपासण्या केल्या होत्या तेव्हा आलेल्या रिपोर्ट्समध्ये तिचे कोलेस्टेरॉल वाढल्याचे दिसून आले होते. अर्थात ही गोष्ट तशी गंभीर होती. म्हणून मी तिला याबाबत डॉक्टरी सल्ला घेतला आहे का, याची विचारपूस केली. यावर तिने जे उत्तर दिले ते ऐकून मीच गंभीर झाले. ती म्हणाली, ‘‘आता बघ, काय आहे ना, रक्तदाबाचा त्रास मला आहेच. मी साधारण एक किंवा दोन महिन्यांनी रक्तदाब तपासते. आता डॉक्टरकडे जायला पाहिजे यात वादच नाही. पण सध्या घरी खूप कामं आहे. मुलीची ‘फायनल लॉ’ची परीक्षा आहे तेव्हा तिची परीक्षा संपली ना की मग डॉक्टरकडे जाईन म्हणतेय. आता उगाच आणखी काय गुंतागुत दिसली तर तिलाही त्रास आणि मलाही रुखरुख लागेल.’’
खरे तर रक्तदाब हा गंभीर आजार आहेच, पण कोलेस्टेरॉल वाढले तर जोखीम आणखी वाढते हे माझ्या मैत्रिणीला माहीत होते, तिला ते पटलेही होते. तरीही तिची टाळाटाळ चालू राहिलीच होती. अशी विचारधारा ही आरोग्याच्या बाबतीत धोक्याची आहे. एकंदरीत आरोग्याविषयीच्या स्त्रीच्या कल्पना विरोधाभासाच्या वाटतात. बऱ्याच स्त्रियांबाबत आपल्याला अशी विचारसरणी दिसून येते. आरोग्याच्या बाबतीत आपण सतर्क असायला हवे हे त्यांना माहीत असते. घरातील मुलांना थोडे काही झाले तर डॉक्टरांकडे जाईपर्यंत तिचा जीव वरखाली होतो. थोडेसे खुट्ट झाले तरी ती कामावर सुट्टी टाकून मुलांना डॉक्टरकडे घेऊन जाईल. पतिपरमेश्वराला काही झाले तरी ती रात्रीचा दिवस करून त्याची सेवा करेल. सगळी पथ्यं औषधांच्या वेळा सांभाळेल किंबहुना बऱ्याच स्त्रिया आपल्या सुट्टय़ा या मुलांच्या वा घरच्यांच्या आजारांसाठीच राखून ठेवतात. माता, पत्नी अशा अनेक भूमिकांतील स्त्रियांच्या जबाबदारी व समर्पणाचे आपण जेवढे कौतुक करू तेवढे कमीच. आपण सारे  कौतुक करतोच; पण त्याची किंमत मात्र स्त्रीला प्रचंड प्रमाणात द्यावी लागते. एक मातृवत्सल व कुटुंबवत्सल स्त्री कुटुंब घडविते आणि त्या अनुषंगाने एक समाज घडविते हे खरे असले तरी आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ती स्वत:च्या आरोग्याची मात्र हेळसांड करते. स्त्रिया आपले अशा प्रकारचे आजार जेवढय़ा गांभीर्याने घ्यायला हवेत तेवढे घेत नाहीत हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. साधे असेल वा गंभीर असेल दुखणे खूप काळ अंगावर काढायचे, सगळ्यांचे हवे-नको ते पाहावयाचे, सगळ्यांच्या अडचणी सांभाळायच्या आणि मग इतर कोणाला काही गैरसोय होणार नाही हे पाहून डॉक्टरकडे जाण्याचा मुहूर्त काढायचा, अशी रीत होऊन बसते. किती महत्त्वाचा वेळ फुकट जातो या साऱ्या खटाटोपीत आणि जेव्हा ती स्त्री डॉक्टरकडे पोहचते तेव्हा बऱ्याच वेळा मूळ आजारांमुळे आणखी बऱ्याच वैद्यकीय गुंतागुंती झालेल्या असतात.  किंबहुना या आणखी झालेल्या गुंतागुंतीमुळेच तिला डॉक्टरकडे नाइलाजाविना का होईना, पण पोचणे भाग पडते आणि डॉक्टरांना मात्र डोक्याला हात लावायची पाळी येते.
या व्यतिरिक्त आपण गृहस्वामिनी आहोत, आपणही आजारी पडू शकतो या सत्यावर विश्वास ठेवणे तिला आवडत नाही. घरातल्या इतरांना तर हे सत्य पचनीही पडत नाही. आईने आजारी पडून कसे चालेल, घराचे काय?  मुलांना कोण सांभाळेल? तिचे आजारी पडणे घरात कोणालाच परवडणारे नसते. संसाराचा डोलाराच कोसळेल, अशा साधारण प्रतिक्रिया असतात. या शब्दात तिचे कोडकौतुक दिसत नाही. तिच्या सांसारिक कर्तृत्वाचा सन्मान तर नक्कीच सापडत नाही. तिने संसाराचा रगाडा घाण्याच्या बैलासारखा चालवावा एवढेच अपेक्षित आहे. हा रगाडा चालवताना अनेक समस्या समोर असतात. खऱ्या अर्थाने ती पूर्णवेळ संसार व्यवस्थापन करीत असते. त्यात आर्थिक वजाबाकीपासून, सगळ्यांच्या दैनंदिन खास गरजा सांभाळायच्या, सामाजिक व्याप सांभाळायचे आणि हे करताना स्वत: मात्र खंबीर व कणखर राखायचे. यात आजारी पडायची परवानगी घरचे देत नाहीत.
 माझ्या मैत्रिणींसारख्या अनेकांच्या मैत्रिणींनाही ही फिलॉसॉफी खरीच वाटायला लागते. किंबहुना ही विचारशैली दुर्दैवाने स्त्रीच्या मनात मुरलेली पाहायला मिळते. त्यांनाही वाटते की, आपण आजारी पडता कामा नये, नाहीतर इतर सगळ्यांचे हाल होतील. मग ती वेळीच आरोग्य सेवेपर्यंत पोहचत नाही. केव्हा कोलमडून पडते याचे भान तिला राहत नाही. ती आतल्या कोषातून बाहेर पडू शकत नाही, मग दोष तरी कोणाला द्यायचा.
कधी नवरा बरोबर नाही, तर कधी तेवढे पैसे आपल्याला आजारावर खर्च करणे शक्य नाही, अशी अनेक कारणे ती पुढे करते. सगळी थातूरमाथूर कारणे. आयुष्य स्वत:चे, आरोग्य स्वत:चे पण का तिला गरज लागते दुसऱ्याच्या परवानगीची? अगदी थोडेफार कमावती मैत्रीणसुद्धा स्वत:च्या आजारावर खर्च करण्यास तयार नसते. इतका भावनिक दबाव तिला का वाटतो, याचे उत्तर तिच्या स्त्री असण्याच्या मानसिकतेत आहे. एक समर्पित स्त्री म्हणून अनेक भूमिकातून जाताना ती स्वत:चे नैसर्गिक अस्तित्व विसरते. इतरांना जगवताना स्वत:च्या जगण्याकडे तिचे लक्ष राहत नाही.  या प्रवृत्तीला स्वत:च आव्हान द्यायला हवे. सामाजिक दृष्टिकोन केव्हा बदलेल माहीत नाही, पण स्वत: मात्र निकोप व निरोगी राहायचे हे स्वत:लाच ठरवावे लागेल. यासाठी सखीने आपल्या साऱ्या कुटुंबाची मनोभावे काळजी घेताना स्वत:चीसुद्धा तितकीच काळजी घ्यायला हवी.    

Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?