23 February 2019

News Flash

मी शाळा बोलतेय! – मैत्रीचा अवकाश

शाळा ही प्रयोगशाळाच असते आणि प्रयोगशाळेची कार्यशाळा होते. म्हणजे व्हायला हवी. मुलांना संधी देणं एवढंच आपलं काम. या संधी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या

| January 4, 2014 06:41 am

‘प्रयोग’ करायला हवेत. काय हाती लागलं त्यातून? काय घडतं? मूल किती समजतं? कसं बदलत जातं? याचं प्रत्येक मुलाच्या बाबतीत उत्तर मिळायला हवं. ते मिळतंही. हे सारं कसं करायचं त्याविषयी इथे शाळाच बोलतेय. शाळेला जे करायचंय ते शाळा आपल्याकडून करून घेणार आहे. आपण आपल्या परिसरानुसार त्यात भर घालणार आहोत, बदल करणार आहोत. ऐकूया, मैत्रीचाच एक अवकाश असणारी शाळा काय म्हणतेय ते.. दर पंधरवडय़ाने.
शाळा ही प्रयोगशाळाच असते आणि प्रयोगशाळेची कार्यशाळा होते. म्हणजे व्हायला हवी. मुलांना संधी देणं एवढंच आपलं काम. या संधी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, विषयातल्या आणि मुलांच्या घडण्यातल्या. खरं तर त्यासाठी शिक्षणाची नवी रचना ‘शिकणं’ घडवायला हवीय. इंग्रजीत सांगितलं की जरा पटकन लक्षात येतं. म्हणून असं म्हणूया की शाळा ही ’ीं१ल्ल्रल्लॠ चं क्षेत्र व्हायला हवं. जरी इमारत लहान वाटली तरी आपण समजून घेऊ तेवढा अवकाश यात भरून जातो.
प्रवास करताना जेव्हा खूप दूरवरचं दृश्य मी बघते. यात उंच डोंगर असतात तशी मलोन् मैल पसरलेली शेतभातं असतात, रंगीबेरंगी पक्षीही असतात नि इवली इवली रानफुलं मला दिसतात. मला गंमत अशी वाटते की, डोळे एवढेसे पण केवढा अवकाश मावतो त्यात! शाळेचं तसंच आहे! दिसतात वर्ग, तुकडय़ा, अनेक इमारतींपैकी एक इमारत! पण ठरवलं तर असा खूप व्यापक आशय त्यात मावतो. जेवढा आशय निर्माण करू त्याला जागा कमीच पडते. शाळा कोणतीही असो. एखाद्या वाडीवस्तीवरची असो किंवा शहरातील पंचतारांकित. मुलं मुलंच असतात नि मुलांमध्ये असणाऱ्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला, ऊर्मी-ऊर्जेला, ताकदीला आकार देण्यासाठी अवकाश इथेच मिळायला हवा.
म्हणूनच ‘प्रयोग’ करायला हवेत. काय हाती लागलं त्यातून? काय घडतं? मूल किती समजतं? कसं बदलत जातं? हे प्रत्येक मुलाच्या बाबतीत उत्तर मिळायला हवं. ते मिळतंही. प्रयोग म्हटली की आपल्या डोळ्यापुढे येतात उपकरणं, वस्तू, इतर साधनसामग्री, पण असं काहीच नाही लागत. काहीही नसताना आपण खूप काही करू शकतो. आपण करत नाहीच तर मुलं करतात आपण फक्त ही संधी द्यायची असते. असे प्रत्यक्षात केलेले प्रयोग मांडावे हा हेतू आणि गंमत अशी असते की हे प्रयोग कुणालाही कुठेही करता यावेत. ‘शास्त्रज्ञ’ आधी मनात असतो मग असा माणूस विचारांची प्रयोगशाळा आधी उभी करतो, शोधक होतो, साधन मिळवत जातो. तसंच आहे. मुलांमध्ये ही विचारप्रक्रिया असतेच, त्यांचा ती शोध घेत असतात, आपण फक्त प्रयोगांच्या रूपानं आपण संधी द्यायची. रचना आपण करायचा प्रयत्न करायचा. आशय मुलं मुलांचा भरतील. हे प्रयोग घरातल्या शाळेतही करता येतीलच. का नाही येणार? शाळा घरापर्यंत मुलांकडून पोहोचतेच नि घरं शाळेपर्यंत पोहोचतात. या प्रवासात काय काय असतं, काय काय घडतं ते आपण जाणून घेऊ म्हणजे मुलं जाणता येतील आणि त्यांच्यातल्या विविधांगी ताकदीला आकार मिळेल.
आधी शिक्षण शिक्षण मग जगणं जगणं असं घडतं. खरं तर शिकणं म्हणजेच जगणं, यातून आपलं नि मुलांचाही आनंदाचा कोशंट जाणवतो. शाळा-जिथं असतो काळा फळा अन् सगळ्या प्रकारची, सगळ्या वयाची मुलं एकत्र गोळा होतात. कधी सक्तीने, कधी भक्तीने, शिक्षणाशी त्यांचं सख्य जुळतंच असं नाही. पण वर्गाच्या निमित्तानं खेळायला समवयस्कांचा गट मिळतो. एकत्र बसायला मिळतं, बोलायला मिळतं. मानलं तर शिकण्याची ही रचना खूप छान आहे. पुस्तकं, शिक्षक, शिकवणं हे लक्षात किती राहतं हे प्रत्येकाचं मन वेगळं, पण मैत्री मात्र खूप काळ टिकून असते. शाळा म्हणजे मैत्रीचाच एक अवकाश म्हणूया.
 वयानुसार मैत्रीचं रूप बदलतं! साधारण पहिली ते चौथीचं. मुलं-मुली एकत्र वावरतात, खेळतात, हातात हात घालून फिरताना त्यांना काहीच वाटत नाही, पाचवीत गेल्यावर एकदम काय होतं? एकमेकांपासून दूर वावरू लागतात. मुलगा-मुलगी म्हणून त्यांच्यात अंतर पडतं. एकमेकांशेजारीही बसायला तयार होत नाहीत. सहावी-सातवीत याचा उच्चांक होतो. मुलं विरुद्ध मुली असेच जणू तट पडतात. भांडणं सुरू होतात. मुली ‘मोठय़ा’ होतात. एकमेकांना टोपण नावाने चिडवू लागतात. आठवीत म्हणजे लाजणं सुरू होतं. निरोप द्यायचा झाला तरी त्यात संकोच. मनातून मात्र कुणाकुणाकडे पाहावंसं वाटतं. नववीत मित्र-मैत्रिणींना बोलावंसं वाटतं. सगळ्यांसमोर बोलायची लाज वाटते. वर्गात नजरा एकमेकांना शोधायला लागतात. बसायच्या जागा बदलतात. हळूच वही देणं सुरू होतं. दहावीत मात्र जरा धीटपणा या नात्यात येतो. अभ्यासाचं निमित्त. पण अगदी तसं सर्रास बोलणं सुरू होतं. उपक्रम, कार्यक्रमातून यातून मैत्रीला आकार मिळतो. आपल्या दृष्टीनं ते ‘उरकणं’ असतं, पण मुलांच्या त्या आठवणी असतात हे सगळे मैत्रीचे टप्पे जपणारी शाळा. या टप्प्यावरच आपल्याला काम करायचं आहे. हे झालं शाळेचं- शाळेतलं हळवं, भावमधुर रूप. आपण मोठे झालो ते हे अनुभवतंच. थोडाफार स्वरूप, धीटपणा यात काळाचा बदल असेल, पण भावनिक बाजू तीच असते. म्हणूनच शाळेत आपण मैत्रीवर बोलायला हवं. ते आपण अनुभवाच्या मांडणीतून बोलणार आहोत.
शाळेचं दुसरं रूप म्हणजे शाळेतली शिक्षणाची ‘यंत्रणा’. ही यंत्रणा न होता ‘शिकण्याची रचना’ होऊ शकते का? काही गोष्टी आपल्या सगळ्यांना करता येणं सहजशक्य आहेत. या गोष्टीच आपण इथे मांडणार आहोत. परिसर, पर्यावरण यांचा विचार करूनच शाळेच्या इमारती आहेत त्या ‘बजेट’मध्ये होऊ शकतात. बऱ्याच गोष्टी आपण ‘टिकाऊ’ करून टाकतो नि त्या ‘टाकाऊ’ होतात. शाळाच ‘टाकाऊ’होते. ऑइलपेंटने कायमच्या भिंती रंगवण्यापेक्षा मुलांच्या बोटातून भिंती चित्रित झाल्या तर! प्रश्न विचारण्यासाठी प्रश्ननिर्मिती कोपरा करता येईल तर किती मजा येईल? मनातल्या शंका विचारायची लाज वाटते. त्यात नावानिशी तर खूपच! यातले जवळजवळ सर्व प्रश्न हे प्रस्थापित अभ्यासेतरच असतात. हे जाणण्यातूनच आज समाजात निर्माण झालेले प्रश्न आपण सोडवू. प्रत्येक शाळेत हवी एक प्रश्नपेटिका.
  मुलांच्या मनातला आशय म्हणजे हिमनगासारखीच गोष्ट. ती अव्यक्तच राहते. मुलांच्या अभिव्यक्तीला संधी देता येता ती अभिव्यक्ती फलकातून. बघा ना एकाच वाक्याच्या असंख्य अर्थाचे तरंग मुलांच्या मनात उमटलेले असतात. हे कसे जाणवणार आपल्याला! त्या तरंगातूनच पाण्याचा- मुलांच्या मनाचा शोध घेता येतो. म्हणून हवे अभिव्यक्ती फलक. ग्रामसचिवालयाचा प्राण म्हणजे ग्रामसभा. तसा ज्ञानसचिवालयाच्या (शाळेचा) प्राण म्हणजे विद्यार्थीसभा असते. संधी दिली तर मुलं आपलं मत अगदी निर्भीडपणे व्यक्त करतात.
 हे सारं कसं करायचं त्याविषयी इथे शाळाच बोलतेय. आपण थेट शाळेचेच मनोगत ऐकणार आहोत. हॅलो, मी शाळा बोलतेय. शाळेला जे करायचंय ते शाळा आपल्याकडून करून घेणार आहे. आपण करणार आहोत. आपल्या परिसरानुसार त्यात भर घालणार आहोत, बदल करणार आहोत आणि शाळा सांगतेय त्या गोष्टी एकदा करून थांबल्या तर शाळा अबोल होते, त्याच त्या पद्धतीने केल्या तर यंत्रणेचा जन्म होतो. पण विचाराने केल्या तर बदल दिसतो जो सृजनाचा जन्म असतो.
ऐकू या शाळा काय म्हणतेय ते! आणि घेऊया अव्यक्त मनाचा शोध!     

First Published on January 4, 2014 6:41 am

Web Title: mi shala boltey space of frienship