शीला काळे – kale.s.sheela@gmail.com

‘भगिनी निवेदिता सहकारी बँक’ आणि संस्थापक मीनाक्षी दाढे  हा आता जोडशब्दच बनला आहे. मात्र १९७३च्या काळात स्त्रियांनी चालवलेली बँक ही कल्पनाच पचनी पडणारी नव्हती.  त्यामुळे शंभर रुपये किमतीचा एक समभाग विकण्यासाठी अक्षरश: तीनचार मजले चढउतार करणं, एकाच घरी १० ते १२ वेळा जाणं,  या गोष्टी कराव्या लागल्या.  कचरा काढणाऱ्या, भाज्या- गजरे विकणाऱ्या कष्टकरी स्त्रियांना डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेल्या या बँके मुळे आज त्यांची घरं झालीत, घरात वैभव आलंय, तर अनेक उद्योजिकाही तयार झाल्या आहेत. वर्षांला सुमारे १४०० कोटी  रु पयांची उलाढाल असणाऱ्या या बँकेच्या संस्थापक आणि अनेकांसाठी दीपस्तंभ ठरलेल्या  मीनाक्षी दाढे  यांचं नुकतंच निधन झालं.  त्यांच्याविषयी ..

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
infants with spina bifida surgery possible in the mother s womb
आईच्या गर्भातच होणार बाळावर शस्त्रक्रिया; स्पायना बीफिडाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा

माझ्या आणि ‘वहिनीं’च्या अर्थात मीनाक्षी दाढे यांच्या पहिल्या भेटीचा दिवस माझ्या चांगला लक्षात आहे. १९७३ चा सप्टेंबर महिना होता तो. माझे यजमान मला म्हणाले, ‘‘उद्या मी माझ्या एका मित्राला, विवेक दाढे याला सपत्नीक जेवायला बोलावलंय.’’ त्यांच्या या ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ मित्राबद्दल, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल मी बरंच ऐकलं होतं. त्यामुळे मी त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होते. त्या दिवशी रंगलेल्या गप्पांमध्ये या दाम्पत्यानं त्यांच्या मनातली एक अभिनव संकल्पना आमच्यासमोर मांडली. त्यांना पुण्यात पूर्णत: स्त्रियांद्वारे संचालित केली जाणारी स्वतंत्र बँक सुरू करायची होती.

त्यांच्यापाशी अहमदनगर येथील सहकारी बँकेच्या स्थापनेचा अनुभव होता आणि हे नवं पाऊल उचलण्याची जिद्दही. माझे पती तेव्हा ‘स्टेट बँके’त अधिकारी असल्यानं त्यांच्याकडे बँकिंग क्षेत्रातला उदंड अनुभव होता. झालंच तर पुण्यातला आमचा प्रचंड गोतावळा, माझ्या सासऱ्यांचं- म्हणजे रावसाहेब काळे यांचं समाजातलं स्थान या गोष्टीही लोकांचा विश्वास मिळवण्याच्या दृष्टीनं अनुकूल होत्या. या महत्त्वाकांक्षी योजनेत मी सहभागी व्हावं यासाठी माझ्या पतीनं मला उद्युक्त केलं. मुलं शाळेत जाऊ लागल्यानं हाताशी मोकळा वेळ होता, त्यामुळे मीही अशा एखाद्या संधीच्या शोधात होतेच. माझ्या होकारासरशी तिथल्या तिथे आमच्या येऊ घातलेल्या बँकेची पायाभूत ‘टीम’ ठरली. या चौकडीतल्या आम्ही दोघी स्त्रिया आघाडीवर आणि आमच्या जोडीदारांची ‘न धरी शस्त्र करी मी’ ही भूमिका. या खातेवाटपावरही तिथे शिक्कामोर्तब झालं.

बँकेच्या बीजारोपणाच्या या सभेनंतर महिन्याभरातच जेव्हा आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून सहकारी बँक सुरू करण्यासाठी लागणारा परवाना मिळाला तेव्हा मी आणि वहिनींनी आनंदानं एकमेकींना मिठीच मारली. त्या दिवसापासून वहिनींच्या उत्साहाला उधाण आलं. दहावी-बारावीपर्यंत शिकलेल्या काही गरजू होतकरू मुलींना आम्ही एकत्र आणलं आणि वहिनींच्या घरात बँक स्थापनेची पूर्वतयारी सुरू झाली. पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच कठीण टप्पा म्हणजे समभाग विक्री! १९७३ च्या काळात पुण्यामध्ये संपूर्णपणे स्त्रियांनी चालवलेली बँक ही कल्पना कुणाच्याच पचनी पडणारी  नव्हती. शंभर रुपये किमतीचा एक समभाग (शेअर) विकणंही आव्हानात्मक होतं. परमेश्वरावर आणि आपल्या सत्कर्मावर विश्वास ठेवून आमचं मिशन ‘शेअर कलेक्शन’ सुरू झालं. आम्ही कधी पायी, तर कधी सायकलनं घरोघर जात असू. रोज नवे अनुभव येत. कधी तीन-तीन जिने चढून गेल्यावरही स्त्रिया आमचं म्हणणं ऐकून, समजून घ्यायला तयार नसत. काही जणी शंभर रुपयांच्या एका शेअरसाठी दहा ते पंधरा रुपयांच्या हप्त्यांची सवलत मागत. म्हणजे एका शेअरसाठी कधी-कधी दहा फेऱ्या माराव्या लागत. बऱ्याचदा प्रवेश फीचे दोन रुपये मागणंही आमच्या जिवावर येई. अशा वेळी पदरमोडीवाचून गत्यंतर नसे. दिवसभर तंगडतोड झाली की  संध्याकाळी आम्ही वहिनींच्या घरी जमून आमचा हिशेब द्यायचो. कधी कधी तर एकही शेअर विकला गेला नाही अशी वस्तुस्थिती असे; पण या धडपडीच्या काळात आमच्या मनातली उत्साहाची ज्योत वहिनींमुळे जागती राहिली. त्या सांगत, ‘‘आपली संस्था नवीन आहे. लोकांचा विश्वास बसायला वेळ लागेल. तुम्ही आधी ओळखीच्या माणसांकडे, नातेवाईकांकडे जा, त्यांना सभासद करून घ्या. नेटानं काम करत राहिलो तर यश नक्की मिळेल, उद्दिष्ट पूर्ण होईल.’’ त्यांच्या अशा आश्वासक शब्दांनी आम्हाला नवसंजीवनी मिळत असे.

कस पाहणाऱ्या या प्रक्रियेत आम्हाला एकत्र बांधून ठेवण्यात वहिनींच्या प्रेमळ, आतिथ्यशील स्वभावाचा मोठा वाटा होता. घरी आणि बाहेर काम करणाऱ्या आम्हा

२०-२५ जणींसाठी त्या पोटापाण्याची तजवीज करून ठेवत, तेही स्वत:ची वणवण सांभाळून. एकदा माझ्या मुलाला ताप आल्यानं मी त्यांच्याकडे जाऊ शकले नाही, तर  इतर मुलींना कामं देऊन त्या भर दुपारी सायकलवरून माझ्या घरी बँकेचं दप्तर

( महत्त्वाची कागदपत्रं) घेऊन आल्या. म्हणाल्या, ‘‘शीला, आज आपण इथेच सारंगजवळ बसून काम करू. काम होणं महत्त्वाचं, कामाचं ठिकाण नव्हे.’’

एकजुटीनं, मनापासून केलेल्या कामाचं फळ आमच्या पदरात पडलं. चार-पाच महिन्यांत ठरलेलं दोन लाख रुपयांचं उद्दिष्टय़ सफल झालं. दाढे पती-पत्नी यांनी पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा  घेतली. संचालक मंडळाची स्थापना झाली. २४ मार्च १९७४ या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नारायण पेठेतल्या राष्ट्रभाषा सदनाच्या इमारतीत भाडय़ानं जागा घेऊन आमची बँक सुरू झाली- ‘भगिनी निवेदिता सहकारी बँक’. वहिनी बँके च्या अध्यक्ष असूनही रोज बँकेत येत असत. माझीही रोजची फेरी ठरलेली. त्या येताना आम्हा सर्वासाठी चहा आणि खाणं घेऊन येत, कारण त्या वेळी कर्मचाऱ्यांना एक वेळचा चहा देण्याचीही बँकेची ऐपत नव्हती.

वहिनी जात्याच अत्यंत हुशार; गणित आणि संस्कृत घेऊन ‘बी ए’ झालेल्या. गणितात पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची आपली परंपरा त्यांनी शाळेपासून पदवीपर्यंत राखली. बँकिंगचं ज्ञानही त्यांनी सहज आत्मसात केलं आणि आम्हाला शिकवलं. सुरुवातीला बँकेच्या कामाचा अनुभव असणारे निवृत्त अधिकारी आम्ही घेतले, पण ती पहिली दोन-तीन र्वष सोडल्यास आजतागायत आमच्या बँकेची सर्व जबाबदारी पूर्णपणे स्त्रियाच निभावत आहेत; अगदी शिपायापासून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालकांपर्यंत!

स्थापनेनंतरचं आव्हान होतं ते लोकांना व्यवहारासाठी बँकेकडे वळवण्याचं. त्या वेळी समाजात स्वतंत्रपणे व्यवसाय करणाऱ्या किंवा बँकेत                जाऊन स्वत:च्या नावावर खातं उघडणाऱ्या स्त्रियांची संख्या कमी होती. या समस्येवर मात करण्यासाठी सर्व स्तरांतल्या स्त्रियांपर्यंत बँकेचे फायदे पोहोचणं गरजेचं होतं. मग आम्ही प्रचाराचा धडाका सुरू केला. महिला मंडळात, तसंच हळदीकुंकू समारंभांमध्ये जाऊन स्त्रियांना भेटायला सुरुवात केली. त्यांच्यासमोर विविध पर्याय ठेवले. त्या वेळची एक धडक मोहीम माझ्या चांगली लक्षात आहे. तेव्हा नवरात्रीत पुण्यातल्या चतु:शृंगी देवीच्या यात्रेसाठी त्या डोंगराच्या पायथ्याशी मोठी जत्रा भरत असे. त्या जत्रेत सर्वसामान्य पुणेकर मोठय़ा संख्येनं येत. ही संधी साधण्यासाठी आम्ही रीतसर भाडं देऊन मोक्याच्या जागी स्टॉल लावायला सुरुवात केली. त्या गर्दीत ध्वनिक्षेपकावरून दिवसभर आमची घसाफोड सुरू असे. ‘महिलांद्वारा सर्वासाठी चालवलेली पुण्यातली पहिली आणि एकमेव बँक- भगिनी निवेदिता सहकारी बँक. या आणि आपलं खातं उघडा. लक्षात ठेवा, स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण झाल्या, तरच कुटुंब, पर्यायानं समाज, राष्ट्र सबल होईल’ इत्यादी इत्यादी.

आमचा भर विशेष करून आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गावर होता. वहिनींना गोरगरिबांविषयी कमालीचा कळवळा. त्यांचं भलं झालं तर आपल्या धडपडीला अर्थ आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. बँकेत वा घरी त्यांना कुणीही कधीही भेटू शकत असे. ‘वहिनी’ या विशेषणाची उत्पत्तीही त्यांच्या हृदयातल्या जिव्हाळ्यातून झालेली.  त्या वेळी सावकारी कर्जाच्या पाशात गरीब जनता अडकलेली होती. यात मुख्यत्वे रस्ते झाडणाऱ्या किंवा रस्त्याच्या कडेला भाजी, गजरे विकणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त होती. या बायका रोज सकाळी कुणा तरी तथाकथित दादाकडून ५० ते १०० रुपये उचलत आणि संध्याकाळी ६० ते १२० रुपये त्यांना परत देत. म्हणजे दिवसाला दहा टक्के व्याज! या शोषणातून त्यांची सुटका करण्यासाठी आम्ही वहिनींच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणच्या वस्त्यांवर जात असू. अशा अनेक स्त्रियांची आम्ही खाती उघडली. त्यांना कमी दरानं भांडवल दिलं. त्यामुळे त्यांची स्वत:ची घरं झाली, घरात टीव्ही, फ्रिज आले, मुलांची लग्नकरय पार पडली. या परिवर्तनामुळे आज त्या बायाबापडय़ा वहिनींना देवस्वरूप मानतात. यापुढचं पाऊल म्हणजे मदतीच्या या हातानं अनेक उद्योजिका घडल्या. अभिमानानं सांगावी अशी गोष्ट म्हणजे प्रारंभी पाच ते दहा हजार रुपये कर्ज घेऊन भाजी अथवा  माशांचा व्यवसाय करणाऱ्या आमच्या काही उद्योजिका दरवर्षी कर्जाची रक्कम वाढवत आणि ते मुदतपूर्व फेडत. आता काही कोटी रुपयांची उलाढाल त्या करत आहेत. अशा यशस्विनींना आम्ही ‘भगिनी निवेदिता उद्योजिका पुरस्कारा’नं गौरवतो.

बँकेला सरला रेगे, सुमित्रा गोवईकर , प्रमिला गरुड, मीरा देशपांडे, नीला वासवानी, मंगला व नलिनी आदमणे अशा समविचारी आणि समर्पित संचालक लाभल्या. आम्ही सर्वानीच  सुरुवातीपासून वहिनींचा कित्ता  गिरवत निरपेक्षपणे काम केलं आणि करत आहोत. बँकेच्या पैशांचे आपण केवळ विश्वस्त आहोत, ही भावना त्यांनी सर्वाच्या मनात रुजवली. सर्व कारभार पारदर्शी ठेवल्यानं आम्हाला कुठल्याही सरकारी कामासाठी वा परवान्यासाठी कधीही  पाच रुपयेही सरकवावे लागले नाहीत. सहकारी बँक अडचणीत आल्याच्या बातम्या येतच असतात; पण आम्हाला सर्वाना अतिशय अभिमान वाटतो, की वहिनींच्या दूरदृष्टीमुळे आम्ही बँकेत कधी कोणत्याही राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना आमंत्रित केलं नाही. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना बँकेत नोकरी वा कर्ज द्यायचं नाही, हा ‘रिझव्‍‌र्ह बँके’चा नियम काही फटके बसल्यावर आला; पण ही कलमं स्थापनेपासूनच आमच्या कार्यप्रणालीत समाविष्ट केल्यानं आणि आम्ही सर्व संचालिकांनी डोळ्यात तेल घालून त्यांची अंमलबजावणी केल्यानं संचालक मंडळातल्या तथाकथित भांडणांसाठी आमच्याकडे मुद्देच नव्हते. तसंच ‘गुणवत्तेनुसार काम’ या धोरणामुळे नोकरी वा कर्जासाठी चिठ्ठी घेऊन  येणाऱ्या कोणाचीही डाळ आमच्याकडे शिजली नाही.

वर्षांला १,३५० कोटी रुपयांची उलाढाल, २० ते २२ कोटींचा नफा आणि गेली २० वर्ष शून्य टक्के  ‘एनपीए’ (अनुत्पादित र्कज) असा लौकिक मिळवणाऱ्या आमच्या बँकेचा विस्तार आता स्वत:च्या जागेतल्या १८  शाखांमध्ये झालाय. आमची बँक सरकारची ‘सीएसआर’ योजना येण्याआधीपासूनच नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या संकटग्रस्तांच्या पाठीशी उभी राहात आहे. बँकेच्या यशात अर्थातच अनेक कार्यक्षम कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा वाटा आहे. बँकिंग कामकाजात अत्यंत प्रवीण अशा आमच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा भट यांचा वारसा आजच्या तितक्याच धडाडीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे समर्थपणे पुढे नेत आहेत. सध्याच्या अध्यक्ष जयश्री कुरुंदवाडकर, उपाध्यक्ष रेवती पैठणकर यांचं अमूल्य मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. या सर्व जणी  वहिनींच्या कष्टांना मानतात हे महत्त्वाचं!

वहिनींचं जेवढं बँकेवर प्रेम तेवढंच मुक्या प्राण्यांवरही. बँकेनंतर त्यांच्या बोलण्याचा विषय म्हणजे त्यांच्या मांजरी! सर्व मांजरींना त्यांनी लाडाकोडाची नावं ठेवली होती. त्यांचं आजारपण, बाळंतपण, सगळं त्या आईच्या ममतेनं करत. माया ही पोटातच असावी लागते, हे विधान त्यांच्याकडे पाहाताना पटे. आजवर बँकेला आणि त्यांना वैयक्तिक स्तरावरही अनेक पुरस्कार मिळाले. लेखा परीक्षणात बँकेचा ‘अ’ वर्ग कायम राहिला. हजारो समभागधारकांच्या पदरात १५ टक्के ‘डिव्हिडंड’चं घसघशीत दान पडलं. जसं पेरलं तसं उगवत गेलं.

वहिनींच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी भरून येणं अशक्य. मात्र त्यांनी लावलेल्या वृक्षाच्या अनेक पारंब्या आज भक्कम उभ्या आहेत. बँकेचा वाढलेला पसारा पेलण्याचं सामथ्र्य त्यांच्या अंगी पुरतं बाणलं गेलंय. मीनाक्षी दाढे नावाचा दीपस्तंभ त्यांना सतत प्रेरणा देत राहील यात शंका नाही. आता एकच इच्छा, की आम्ही अपत्याप्रमाणे सांभाळलेल्या आमच्या बँकेला काटेकोर जपणारी वहिनींसारखी नि:स्पृह माणसं यापुढेही जोडली जावीत. ती जोडली जातीलच.. तशी पुण्याई  वहिनींनीं बँके च्या गाठीशी बांधली आहेच..

(लेखिका मीनाक्षी दाढे यांच्या पूर्वीपासूनच्या सहकारी आणि ‘भगिनी निवेदिता बँके’च्या माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत.)

भगिनी निवेदिता सहकारी बँक लि. (एक दृष्टिक्षेप)

सध्याचा  व्यवसाय – १४०० कोटींपर्यंत

ग्राॉस एनपीए – १.५ टक्क्य़ांपेक्षा कमी

नेट एनपीए- ० टक्के (गेल्या १८ वर्षांपासून)

डिव्हिडंड- १५ टक्के (गेली २० वर्षे)

नक्त मूल्य – २०० कोटी

बँकेच्या शाखा- १८

कर्मचारी संख्या- २८०