News Flash

व्यर्थ चिंता नको रे : मन मनास उमगत नाही..

माणसाची उत्क्रांती आणि त्याबरोबरीनं माणसाच्या मनाच्या घडवणुकीचा सुरू झालेला प्रवास समजून घेताना मेंदू आणि मनाचे कंगोरे तपासावे लागतील.

मनाचा हा तऱ्हेवाईकपणा माणसालाही ‘वेड’ लावणाराच होता.

डॉ. आशीष  देशपांडे – dr.deshpande.ashish@gmail.com

माणसाची उत्क्रांती आणि त्याबरोबरीनं माणसाच्या मनाच्या घडवणुकीचा सुरू झालेला प्रवास समजून घेताना मेंदू आणि मनाचे कंगोरे तपासावे लागतील. मन म्हणजे नेमकं  काय, या गहन प्रश्नापासून सुरुवात करून एखाद्याचं मन, त्याचा स्वभाव कसा तयार होत जातो आणि मनाला अस्वस्थता येते म्हणजे काय होतं, हे जाणून घ्यायला हवं. बेचैनी आणि उदासी या विषयांचं मूळ याच अभ्यासात दडलेलं आहे. स्वत:च्या मनाची करून घेतलेली अशी ओळखच मनाच्या बेचैनीवर उपाय शोधताना उपयोगी पडेल.

दगडी अवजारं बनवत संवादक्षम बनलेला माणूस निसर्ग निरीक्षणाबरोबरच निसर्ग ‘घडवू’ लागला हे आपण मागच्या लेखात पाहिलं. अहिंस्रीकरणातून समूहविश्वास, कुटुंबवत्सलता, प्रेमभाव, सर्जनशीलतेतून अभिव्यक्ती नि नवे शोध.. आणि जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञभाव. या सगळ्याचं त्याच्या ‘असण्यातलं’ महत्त्व तो समजून घेत होता. या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये त्याचा मेंदू केवळ मूक पांथस्थ नव्हता. माणसाच्या निसर्ग-समूहाच्या नात्यात तो घडत होता नि घडवतही होता.

आपल्या आयुष्यातली अनिश्चितता कमी करण्यासाठी प्राणीसुलभ प्रतिक्षिप्त वागण्यापासून माणसाचा मेंदू फारकत घेत होता. जनुकांवर बेतलेली मेंदूची रचना नि कार्यप्रवणता बहरण्यासाठी सर्जनशीलता, मोजका धोका पत्करण्याची निकड, नवीन शिकण्याचा खटाटोप, कलासक्ती, संवादकौशल्य नि परस्पर संबंध, आहारनियमन, व्यायाम, अनंत हस्ते देणाऱ्या निसर्गाबद्दल कृतज्ञता, श्रद्धा आणि या सगळ्या गोष्टींची सतत जाण राहावी, समतोल राहावा यासाठी ध्यानधारणा आणि चिंतन अशी ती ‘जैविक गरज’ घडत गेली, प्रस्थापित झाली आणि आवश्यक झाली, हे आपण आतापर्यंत पाहिलं.

अल्बर्ट आइनस्टाईन म्हणायचा, ‘शास्त्राला ‘मन’ समजलं की आणखी काही समजायचं राहणारच नाही’. माणसाचं वागणं घडवणारं ‘मन’ असतंच असं अचंबित करणारं. भक्तिरसात बहरून पोटच्या पोराला तुडवणारं, सत्तेच्या लालसेनं ‘ध’चा ‘मा’ करणारं, जन्नतच्या स्वप्नांनी निरपराधांना स्वर्गात धाडणारं आणि स्वर्ग-नरकाच्या भूलथापांनी शतकानुशतकं शोषण करणारंसुद्धा मनच! प्रेमापोटी ताजमहाल बांधणारं नि अ‍ॅसिड फेकणारं, स्वतृप्तीसाठी ओरबाडणारं नि निरपेक्ष होणारं, स्वहट्टापायी महायुद्धं घडवणारं आणि अहिंसा-असहकाराच्या असामान्य ताकदीची जाणीव जनमनात करून विश्वसत्तेला नमवणारं, सर्जक मन नि संहारी मन, कलात्मक मन नि कलंकित मन, नादी मन नि अनादीही मन, घडवणारं नि बिघडवणारंही मनच. वैश्विक सत्याचा शोध घेणारं आणि मुलांच्या यशात आपली स्वप्नं पाहणारं, कधी हसणारं, रुसणारं, रोमांचित होणारं, कधी रागावणारं, दुखावणारं, कधी सुखावणारं!

मनाचा हा तऱ्हेवाईकपणा माणसालाही ‘वेड’ लावणाराच होता. मन कवटीतल्या मेंदूत आहे की कविकल्पनेप्रमाणे हृदयात? वागण्याला जबाबदार माणूस, की देवदानवांचं तर्कट? धर्म, तत्त्वज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांच्या अहमहमिकेत मन इसवी सनापूर्वीदेखील अडकलं होतं नि अजूनही अडकलं आहे. रेने डेकार्टिस, चार्ल्स ब्रोनेट, फ्रान्झ गॉल, एडमंड ब्रोका, सिग्मंड फ्रॉइड यांनी धर्माच्या कक्षेबाहेर जाऊन मनाचा कारभार समजून घेण्याचा प्रयत्न केला. या दिग्गजांपैकी सिग्मंड फ्रॉइडचा (१८५६-१९३६) प्रभाव ५ ते ६ दशकं अबाधित राहिला. फ्रॉइडनं तयार केलेल्या मनाच्या संकल्पनेच्या कित्येक विचारधारा अजूनही तग धरून आहेत. फ्रॉइडनं ‘असा मी, कसा मी?’ या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न शक्य आहे, हे पहिल्यांदा दाखवून दिलं. ‘सायकोअ‍ॅनॅलिटिकल थिअरी’ म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या या विचारशृंखलेत ‘इद’, ‘इगो’ आणि ‘सुपरइगो’ या तीन नवकल्पना आढळतात. ‘इद’ म्हणजे आपल्या प्राथमिक नैसर्गिक गरजा पूर्ण करण्यास सदैव तत्पर असा मनाचा भाग. सदैव सुखासीन! आपल्यातल्या प्राण्याचा लवलेश. ‘सुपरइगो’ म्हणजे ‘संस्कृती रक्षक’. आकलनवयापासून योग्य-अयोग्याचे धडे देणारे आई-बाबा! सतत अवखळ ‘इद’ला रोखणारे, सांभाळणारे. ‘इगो’ म्हणजे ‘इद’ नि ‘सुपरइगो’ दोघांनाही व्यवस्थित ओळखणारा आणि प्राणिजन्य गरजा सामाजिक मर्यादा न ओलांडता पूर्ण कशा करायच्या हे समजावणारा मोठा भाऊ! ज्या पद्धतीने ‘सुपरइगो’ हा प्रयत्न सफाईनं करतो त्या पद्धती म्हणजे ‘डिफेन्स मेकॅनिझम्स’. हा मनाचा व्यवहार जाणिवेच्या पलीकडला असतो, पण अजाणतेपणी घडलेला नसतो तर तोही व्यक्ती-व्यक्तींत काही नियम पाळत असतो. या जाणिवेपलीकडल्या नियमांनी व्यक्तिमत्त्व बनत असतं. जाणिवेपलीकडच्या या साम्राज्यातच मनाची अथांगता लपलेली आहे. आपल्या वागण्यातली अतार्किकता याच पोकळीत अर्थाचा शोध घेत असते. सायकोअ‍ॅनॅलिटिकल थिअरी या पोकळीत शोध घेऊन आपल्या वागण्याचा अर्थ समजून बदल करण्यास मदत करते.

फ्रॉइडनं ज्या काळात आपले विचार मांडले तेव्हा शास्त्राची एकूणच झेप तोकडी होती. मनाच्या या संकल्पनेत वैद्यकीय भाषा वेगळी होती, तर्क वेगळे होते आणि आजारांची मीमांसाही वेगळी होती. मन शरीरशास्त्रापासून फारकत घेत होतं. मनावर बोलण्याचा अधिकार शरीरशास्त्राकडून हिरावला जात होता. अवयव चूपचाप काम करतात आणि जेव्हा बिघडतात तेव्हा वैद्यकीय मदत अनिवार्य होते. पण ‘मन’ जागेपणी सदोदित आपल्यासोबत असतं म्हणून त्यावर अधिकारानं बोलणं कोणालाच वावगं वाटत नाही. मेंदू शरीरात असूनही मनाचा अभ्यास शरीरशास्त्रात नाही, तर तो कला, साहित्य नि धर्मशास्त्राशी निगडित झाला. अजूनही मानसशास्त्र हा विषय आपल्याकडे कला शाखेत शिकवला जातो आणि मानसोपचारांकडे बघायचा वैद्यकशाखेचा नूर काही वेगळाच असतो. कित्येक डॉक्टरांनाच माहीत नसतं की मेंदुशास्त्रापासून (न्युरॉलॉजी) मेंदुमनशास्त्रापर्यंतचा (न्युरोसायकॉलॉजी) प्रवास संपूर्णपणे रसायनशास्त्रानंच होत आहे. फ्रॉइडच्या संकल्पना जशाच्या तशा जरी अणुरेणूंच्यम उभ्याआडव्या रिंगणात उलगडत नसल्या तरीही मार्गदर्शक तरी नक्कीच ठरतात.

मानवी मेंदूला त्याच्या कामाच्या वैविध्यानुसार वाटलं तर एक अख्खं क्रिकेटचं मैदान भरेल. ही कामांची झालेली उत्क्रांतीतली वाढ आदिमानवापासून मेंदुमनाला बदलत आहे नि प्रोत्साहितही करत आहे. या रचनांचा वापर नि त्यातील यशाचा आनंद मेंदुमनातल्या ‘बक्षीस-उमेद रचने’शी (रिवॉर्ड अँड मोटिव्हेशनल सर्किट) जोडलेला आहे. आवडणाऱ्या गोष्टी परत परत कराव्याशा वाटणं हा याच रचनेचा भाग आहे. स्वसंरक्षण, स्वास्थ्य, जवळची नाती, ऐहिक अपेक्षापूर्ती, समूहात मिळणारा मानसन्मान नि संतृप्ती या क्रमानं होणाऱ्या वाटचालीत हीच रचना कारणीभूत असते नि प्रोत्साहित करते. स्वहित सर्वतोपरी जपणाऱ्या या मेंदूच्या कार्यप्रवणतेत (न्युरोनल पोटेन्शियल), सर्जनशीलता, संवादकौशल्य आणि परस्पर संबंधकौशल्य, स्वास्थ्य, यांतील आनुवंशिकतेचा प्रभाव सर्वज्ञात आहे नि त्यात आमूलाग्र बदल घडवणं आपल्या प्रयत्नकक्षांच्या बाहेर आहे, हेही आपण ओळखून आहोत. पण ३० दिवसांत सवय जडते, नि ९० दिवसांत जीवनशैली बनते, या अनुभव-नियमानं विविध कला/ खेळ/ साहित्याबद्दल प्रेम, कुतूहल नि विचारशोधाची सवय लावणारी छंदांची आवड, शरीरधर्माची बूज राखणारी नि ती राखताना मनुष्यस्वभावाची जाण ठेवणारी ‘समजूतदार’ शिस्त या आनुवंशिकतेला उभारी नक्कीच देऊ शकतात. या जैविक गरजा भागवण्यासाठीची माणसाच्या मेंदूची रचना ३५ ते ४० हजार पिढय़ांच्या अनुभवानं जनुकांत कोरली गेलेली आहे. आणि म्हणूनच वाढत्या वयात शिकायची राहून गेलेली यातली एखादी सवय कुठच्याही वयात आपण परत शिकू शकतो. बालपणीचा अनुभव नक्कीच फायदेशीर असतो, पण नसला तरीही काही हरकत नसते.

गर्भाशयात नियतीच्या इच्छाशक्तीनं जीव धरतो आणि जगण्याची तीव्र ताकद (लिबिडिनल फोर्स) त्याला निराकारातून आकार देते. आठ ते बारा आठवडय़ांत तयार होणारी मेंदूची नळी (न्युरल टय़ूब) जनुकांच्या जादूगारीतनं भविष्यातल्या मेंदूचा संपूर्ण आराखडा तयार करते. या नळीतली पेशीन्पेशी अक्षरश: भारावून जाऊन कामाला लागतात. ज्ञानेंद्रियांपासून मेंदूपर्यंतचे मज्जासंस्थेचे विविध घटक एखाद्या वाद्यवृंदाप्रमणे आपलं अस्तित्व सहजपणे उलगडत असतात आणि पुढच्या संरचनेची सम गाठत असतात. ४ ते ६ महिन्यांत संपूर्ण मज्जासंस्थेची ‘दिंडी’ बसवायची असते त्यांना! पुढे भाषा-भावना नि जाणिवा-नेणिवा यांचं वैविध्य जपत, त्यांतील सूक्ष्म दुवे विणत एक पिंड (टेंपरामेंट) घेऊन जन्म होतो. अंत:स्थ वैविध्याला आता अनुभवविश्वाच्या वैविध्याची जोड लाभते. अस्तित्वाच्या जाणिवेनं स्मरणशक्तीला वेढा घालेपर्यंत आठवणी पुसट राहतात. सहज म्हणून लक्षात येत नाहीत

(प्री-कॉन्शियस). वेढा पक्का पडला की अनुभवांची जाणीवही पक्की होते आणि त्यामागचा विचारही! (कॉन्शियस). हे मनाचं ‘मीपण’, इंद्रियांच्या कामाची सुरुवात, आकलनाच्या पायऱ्यांचा ओनामा आणि निर्णय/ कृतीसाठी लागणाऱ्या सक्षमतेची कुणकुण या प्रक्रिया समांतर वाढत असतात. अनंत तुकडय़ांच्या ‘जिग्सॉ’प्रमाणे स्वत:हून उलगडत जाणारं हे कोडं बालपण, पौगंडावस्था ओलांडून प्रौढावस्थेत पोहोचतं. साहजिकच या जडणघडणीत बऱ्याच गोष्टी जाणिवेच्या नजरेतनं निसटतात, पण त्यांचे आराखडे किंवा ओरखडे त्यानंतर झालेल्या संरचनांना दिशा देतात किंवा त्यांवर आपली छटा उमटवतात. या विसरलेल्या गोष्टी नसतात, तर ‘जाणिवेच्या आधीच्या’ असतात (अनकॉन्शियस).

जगण्याच्या तीव्र इच्छेत (लिबिडिनल फोर्स) स्वसुरक्षा, प्रजनन प्रवृत्ती/ संप्रेरणा (इन्स्टिंक्ट्स) असतात. या संप्रेरणांच्या संवर्धनासाठी गर्भावस्थेत जे काही संप्रेरकांचं (हॉर्मोन्स) वितरण मेंदूत/ शरीरात होतं, त्यातून सुखासीनता (हेडोनिझम), लैंगिकता (सेक्शुअ‍ॅलिटी) माणसाच्या ‘नसानसांत’ भिनते. अगदी शब्दार्थानं आणि मथितार्थानंही! या रचना बनत असताना गर्भावस्थेत संप्रेरकांचे जे उतारचढाव होतात त्यातून लैंगिकतेचा जो आराखडा तयार होत असतो, त्यातून समलिंगी किंवा विभिन्नलिंगी आकर्षण तयार होतं. लैंगिकतेचा लवलेशही नसताना बाल्यावस्थेत जे अद्भुत आकर्षण तरळून जातं (इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि एडिपस कॉम्प्लेक्स) त्यातूनच बालक-पालक नात्याला विश्वासाचं वेगळंच कोंदण मिळतं.

बेचैनी/ उदासी म्हणजे  तृप्ततेच्या रसायनांची मेंदूतली कमतरता. ताणतणाव, अपेक्षाभंग, संकटं, आजार-मृत्यू नि नकारात्मक अनुभव यांनी ही रसायनं कमी होतात. दर रात्रीच्या झोपेनं ती पूर्ववत झाली नाहीत तर ती उतरण भावनिक भागांत पेशींचं कामच बदलते. मग माणसाच्या भावना परिस्थितीनुरूप वाटत नाहीत. अनाहूत भीती, अस्वस्थता, बेचैनी, काळजी मनात घर करून बसते. मेंदूच्या इतर गरजा भागवणं अशक्यप्राय वाटायला लागतं. स्वत:वरचा नि परिस्थितीवरचा भरवसाच जणू कमी होतो. अकारण असुरक्षिततेमुळे छातीत धडधड, घाम फुटणं, हातपाय गार पडणं, तोंडाला कोरड पडणं, त्याला कुठल्याच गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहू देत नाही. सगळ्याच गोष्टी हाताबाहेरच्या वाटायला लागतात. न्यूनगंड, अनुभव पराङ्मुखता नि त्यातून येणारी पराभूत एकटेपणाची मानसिकता, वैफल्य नि आत्महत्येचे विचार. ही रासायनिक कमतरता भरून काढण्यासाठी मेंदूच्या उत्क्रांतीत दडलेल्या जैविक गरजांची माहिती म्हणूनच तर उपयोगी पडते. या गरजा जेव्हा भागतात तेव्हा भावनेच्या मेंदूत  काही विशेष रसायनं तयार होतात. ती रसायनं जर पुरेशी असली तर त्रास थांबतो वा कमी होतो. नसली तर ती वाढवण्यासाठी औषधांशिवाय पर्याय नसतो.

जनुकीय कारणांनी झालेला रसायनांचा अभाव औषधांशिवाय बरा होणं कठीणच असतं. पण ‘जाणिवेच्या नजरेतनं निसटलेल्या मनाच्या ओरखडय़ांमुळे’ तयार झालेला, ३-५ वर्षांच्या नाजूक वयात तरळून जाणाऱ्या अद्भुत आकर्षणाच्या अपूर्ततेमुळे घडलेला रसायनांचा अभाव जगण्याच्या अनुभवावर हल्ला करतो. परिस्थिती, नाती, संवाद यांतील अनुभूती नकारात्मक बनते नि संतृप्तीच्या रसायनांना धक्का देते. हा धक्का औषधांनी कसा बरा होणार? म्हणतात ना, ‘स्वभावाला औषध नसतं.’

हा रासायनिक बदल भरून काढण्यासाठी समुपदेशनाची गरज असते. या समुपदेशनात आहार, व्यायाम, विविध कला, छंदांचं महत्त्व सांगितलं जातंच, पण त्याचबरोबर मोजका धोका पत्करण्याची निकड, नवीन शिकण्याचा खटाटोप, संवादकौशल्य नि परस्पर संबंध, अनंत हस्ते देणाऱ्या निसर्गाबद्दल कृतज्ञता, श्रद्धा नि या सगळ्या गोष्टींची सतत जाण राहावी, समतोल राहावा यासाठी ध्यानधारणा/ चिंतन या सगळ्याचा वापर असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 6:39 am

Web Title: mind heart emotions and brain vyartha chinta nako re dd70
Next Stories
1 मी, रोहिणी.. : सारं कसं शिस्तबद्ध!
2 वसुंधरेच्या लेकी : बालीच्या बालिका
3 गद्धेपंचविशी : पाय जमिनीवर ठेवणारी ‘पंचविशी’!
Just Now!
X