रेश्मा भुजबळ – reshmavt@gmail.com

खनिज तेलाच्या जोरावर अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या ‘संयुक्त अरब अमिराती’नं (‘यूएई’) नुकतीच राबवलेली मंगळ मोहीम जगभरात चर्चिली गेली. अवकाश संशोधनात नवीन असलेल्या या देशानं सोडलेल्या मंगळयानाचं कौतुक होत असताना आणखी एक चेहरा प्रकाशझोतात आला. तो म्हणजे या मोहिमेच्या प्रकल्प उपव्यवस्थापक आणि यूएईच्या प्रगतविज्ञान राज्यमंत्री साराह अल्-अमिरी यांचा. लहान वयातच अवकाशाशी नातं जोडू पाहणाऱ्या आणि तरुण वयात हे स्वप्न पूर्ण करून दाखवणाऱ्या साराह यांच्याविषयी..

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
Prostitution by pretending of Lotus Spa in Nagpur
नागपुरात ‘लोटस स्पा’च्या आड देहव्यापार…

स्थळ- जपानमधील तानेगाशिमा लाँच पॅड

वेळ- सकाळी ६ वाजून ५८ मिनिटं..

आकडय़ांचं ‘काऊंटडाऊन’ संपलं आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच ‘यूएई’चं पहिलं यान २० जुलै रोजी मंगळाच्या दिशेनं झेपावलं. यूएईच्या या अभियानाच्या उपप्रमुख साराह अल्-अमिरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागला. सहा र्वष सुरू असलेली मेहनत यशात परावर्तित झाल्यानं साराह यांनी आपल्या मंगळ मोहिमेतल्या सहकाऱ्यांचं, यूएईच्या अवकाश संस्थेचं आणि ‘मोहंमद बिन रशिद स्पेस सेंटर’मधल्या सहकाऱ्यांचं  मन:पूर्वक अभिनंदन केलं..

केवळ खनिज तेलाच्या जोरावर अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीनं गेल्या काही दशकांपासून पर्यटनावरदेखील लक्ष केंद्रित केलं होतं. मात्र अवकाश संशोधन हे त्या देशासाठी संपूर्णत: नवं क्षेत्र होतं. आतापर्यंत अमेरिका, रशिया, काही युरोपीय देशांसह भारतानं या क्षेत्रात संशोधन केलं आहे. असं असताना देशासाठी अस्पर्शित असणाऱ्या क्षेत्रात- तेही एका स्त्रीच्या नेतृत्वाखाली इतका मोठा प्रकल्प यशस्वी करून दाखवणं नक्कीच भूषणावह आहे.

साराह अल्-अमिरी या संयुक्त अरब अमिरातीच्या ‘मंगळ मोहीम’ या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रकल्प उपव्यवस्थापक. मुख्य म्हणजे त्या यूएईच्या प्रगत तंत्रज्ञान राज्यमंत्री आहेत.

संयुक्त अरब अमिराती हा मंगळावर यान ँपाठवणारा पहिला मुस्लीम देश ठरला आहे. ‘अल्-अमल’ म्हणजेच ‘होप- आशा’ या यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर यूएईचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्याबरोबरच

साराह अल्-अमिरी या प्रसिद्धीझोतात आल्या. साराह या १२ वर्षांच्या असताना त्यांनी ‘अन्ड्रोमेडा’ आकाशगंगाचं छायाचित्र पाहिलं. ती आकाशगंगा पृथ्वीपासून २.५ अब्ज प्रकाशर्वष दूर आहे. त्या लहान वयात त्यांना त्यासंबंधी खूप प्रश्न पडले आणि अवकाश त्यातील तारे, ग्रह, आकाशगंगा याविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यामागचं गणित, भौतिकशास्त्र किंवा एकंदरच त्यामागचं विज्ञान, तोपर्यंत झालेलं संशोधन याची माहिती घ्यायची असं साराहचं स्वप्न होतं; पण त्या जशा-जशा शिक्षणाचे टप्पे पार करत होत्या तसं त्यांना जाणवलं, की अंतराळ संशोधनात काही देशांचीच मक्तेदारी आहे. आपल्या देशात अजून तरी अवकाश संशोधनाबाबतचा कोणताही प्रकल्प दृष्टिक्षेपात नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या करिअरसाठी त्यांचा दुसरा आवडता पर्याय निवडला- तो म्हणजे संगणक अभियंता होण्याचा. साराह यांनी ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ शारजा’मधून संगणकशास्त्राची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. असं असलं तरी साराह यांचं अवकाश अभ्यासाविषयीचं आकर्षण, आवड जराही कमी झाली नव्हती. उलट ती वाढतच होती.

२००६ मध्ये यूएईनं त्यांचा अवकाश संशोधनाविषयीचा पहिला प्रकल्प जाहीर केला. त्या वेळी साराह यांचं शिक्षण सुरू होतं. त्यांना या प्रकल्पात सहभागी होऊन आपलं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि तशी संधी साराह यांना मिळाली. २००९ मध्ये या प्रकल्पात त्या संगणक ‘प्रोग्रॅमर’ म्हणून सहभागी झाल्या. ‘इमिरेट्स इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी’ इथे सुरू असलेल्या त्या प्रकल्पात त्यांच्याबरोबर काम करणारे सगळेच अभियंते विशीतले होते. प्रत्येकाला उपग्रहाबाबत संशोधन करण्यासाठी जे शिकता येईल ते शिकण्याची मुभा होती. त्याबरोबरच प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारीही देण्यात आली होती. तिथेच इतर चमूबरोबर साराह यांनी ‘दुबई सॅट-१’ आणि ‘दुबई सॅट- २’च्या निर्मिती आणि प्रक्षेपणासाठी काम केलं. अवकाश तंत्रज्ञानाविषयी जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं साराह यांनी दिवसरात्र मेहनत करून मिळवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकल्प पूर्ण होत असतानाच यूएईनं त्यांचा मंगळावर यान सोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला. मुळातच अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधनात नवख्या असलेल्या देशानं असा प्रकल्प जाहीर करणं अतिशय आश्चर्यकारक होतं. नोव्हेंबर २०१३ मध्ये मंगळ मोहिमेची आखणी करण्याची जबाबदारी साराह यांच्या गटावर सोपवण्यात आली. त्यासाठी त्यांना १०० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतरचे शंभर दिवस अगदी १६ ते १८ तास काम करून साराह आणि त्यांच्याबरोबरच्या चमूनं या मोहिमेसाठी काय लागेल आणि प्रकल्प पुढे कसा नेता येईल याची आखणी केली.

त्या दिवसांचं वर्णन करताना साराह सांगतात, की सगळे मित्रमैत्रिणी, नातेवाईक जेव्हा बाहेर जेवणाचा, चित्रपटांचा, संगीताचा, गप्पांचा आनंद घेत असत, तेव्हा मी माझा लॅपटॉप घेऊन त्यावर काम करत असे. माझं जेवणही त्यासमोर बसूनच होत असे. या मोहिमेत सहभागी झालेल्यांचे दिवस आणि रात्रीही मोठय़ा होत्या, म्हणजे आम्ही दिवसा १२ ते १५ तास काम करायचो, शिवाय अनेकदा पहाटे ४ वाजेपर्यंतही आखणीसाठी चर्चा चालायच्या. एकदा तर सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री ३ च्या सुमारास संपली होती. मंगळ मोहिमेसारख्या प्रकल्पांसाठी तो जाहीर झाल्यापासून तो पूर्णत्वाला जाईपर्यंत सर्वसाधारणपणे १० वर्षांचा कालावधी लागू शकतो. यूएईला त्या देशाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांपूर्वी (म्हणजे डिसेंबर २०२१) यान मंगळावर पाठवायचं होतं आणि त्याची जबाबदारी प्रथमच एका स्त्रीकडे- म्हणजे साराह यांच्याकडे देण्यात आली. अमेरिका, रशिया, भारतासारख्या देशांच्या मंगळ मोहिमेत अनेक गोष्टींचा ऊहापोह झाला होता. मग या लाल ग्रहाविषयी यूएईचे संशोधक वेगळं काय अभ्यासणार, हेही या गटालाच ठरवायचं होतं. मग त्यावर सखोल विचार सुरू झाला. मंगळावर पूर्वी नद्या, समुद्र होते, मात्र ते नष्ट होऊन तिथे धुळीचं साम्राज्य पसरलं. यामागची कारणं, वातावरणातले बदल हे शोधून काढण्यासाठी यूएईचं मंगळयान उपयोगी ठरेल, असं मंगळ मोहिमेतल्या संशोधकांनी ठरवलं.

साराह सांगतात, की आम्ही सगळे विशीतले तरुण होतो. अभियंते, संशोधकांचं सरासरी वय होतं २७. इतक्या तरुण वयातही सगळ्यांचं काम मात्र अतिशय अनुभवी संशोधकांप्रमाणे सुरू होतं. असं म्हणतात, की एक स्त्री सर्वसमावेशक विचार करून आपल्यासह सर्वाना पुढे घेऊन जाऊ शकते आणि हेच साराह यांच्या नेतृत्वानं या प्रकल्पामध्ये सिद्ध केलं.  या प्रकल्पाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यूएईचे ७५ नागरिक या प्रकल्पात सहभागी असताना त्यात ८ स्त्रियांचा समावेश होता. म्हणजे ३४ टक्के स्त्रिया प्रकल्पात कार्यरत होत्या. यूएईमध्ये केवळ २८ टक्के स्त्रियाच बाहेर पडून काम करत असताना या प्रकल्पासाठीचं स्त्रियांचं हे योगदान नक्कीच वाखाणण्याजोगं होतं आणि याचं एक कारण साराह याही होत्या.

साराह यांनी या मोहिमेविषयी दिलेल्या अनेक मुलाखतींतून आपली आणि आपल्या देशाची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. त्या सांगतात, की अवकाश तंत्रज्ञान किंवा यान प्रक्षेपणाबाबत आम्ही उशिरानं जागतिक स्पर्धेत सहभागी झालो आहोत. त्यामुळे लोकांना हा आमचा वेडेपणा आहे असं वाटू शकतं; पण माझ्यासाठी विज्ञान हे सहकार्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे. त्याला मर्यादा नाहीत, सीमा नाहीत. अतिशय लहान वयात साराह यांच्यावर त्यांच्या देशानं विश्वास दाखवत मंगळ मोहिमेव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.

२०१६ मध्ये त्यांची ‘इमिरेट्स सायन्स कॉन्सिल’च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली, तेव्हा त्या २९ वर्षांच्या होत्या. तत्पूर्वी त्या हवामानबदल आणि पर्यावरण मंत्रालयात कार्यरत होत्या. २०१७ मध्ये त्यांच्याकडे प्रगत तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीच्या संसदेत असणाऱ्या नऊ स्त्री मंत्र्यांमध्ये साराह यांचा समावेश आहे.

मंत्री म्हणून विज्ञान आणि अर्थव्यवस्थेची सांगड घालताना साराह म्हणतात, की जेव्हा आपण पुढच्या ३० वर्षांसाठी यूएईच्या अर्थव्यवस्थेबद्दल चर्चा करतो, तेव्हा त्याचा आधार केवळ खनिज तेल नाही, तर त्याचा एक आधार विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. कारण आपल्याला ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था हवी आहे. उत्पादनाचं ज्ञान, उपयोजित ज्ञानावर आधारित हवी आहे. जगातल्या सर्वात मजबूत अर्थव्यवस्था अशाच प्रकारे कार्यरत आहेत.

साराह यांचं नेतृत्व यूएईमधील अनेक तरुण-तरुणींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितासारख्या विषयांत करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणारं आहे.

मध्य-पूर्वेतल्या इतर मुस्लीम देशांमध्ये स्त्रियांवर असणारी बंधनं पाहता साराह यांचं कार्य नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं, की मध्य-पूर्व आशियामध्ये एक स्त्री म्हणून काम करणं आव्हानात्मक वाटतं का? यावर साराह सांगतात, ‘‘मला स्वत:ला तरी स्त्री म्हणून काम करणं आव्हानात्मक वाटत नाही. यूएईमध्ये जास्तीत जास्त विज्ञान पदवीधर या स्त्रियाच आहेत. मुख्य म्हणजे आम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्थांना भेट देतो, तेव्हा अनेकदा तिथे मी एकमेव स्त्री असते.’’

मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर साराह यांचं भविष्यातलं कार्य अधिक व्यापक होणार आहे. सध्या तरी मंगळ मोहिमेतून मिळणारी माहिती, त्याचं विश्लेषण हेही आव्हानात्मक आहे. भविष्यातल्या योजना नक्कीच अधिक महत्त्वाकांक्षी असतील, असं त्या सांगतात.

त्या म्हणतात, की आपण, आपली पृथ्वी अवकाशातला अतिशय लहान बिंदू आहोत. अवकाशात अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयी जाणून घ्यायचं आहे.

त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याचबरोबर देशाची एक मंत्री म्हणूनही देशाचं भवितव्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी मला खूप प्रयत्न करायचे आहेत.