मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

कार्यक्रम जवळ आला; कुजबुजी, चर्चा वाढल्या, ‘‘यंदा काय म्हणे तिकीट लावून कार्यक्रम?’’ ‘‘कोणाचं डोस्कं हे?’’ ‘‘मुलांना तरी फ्री ठेवा म्हणावं १२ वर्षांच्या खालच्या.’’ ‘‘तिकीट लावता तर चहा-नाश्ता फुकट द्या म्हणावं.’’ असं बरंचसं ‘म्हणावं’ झालं तरी म्हणावी तशी तिकिटविक्री झाली नाही. घराघरांत आदल्या दिवसांमध्ये एवढय़ा अडचणी आल्या, संकटं ठाकली, की कोपऱ्यावरच्या सभागृहात येणंही कोणाला झेपेना. शेवटी कार्यक्रमाच्या दोन तास अगोदर ‘सर्वाना मुक्त प्रवेश’ अशी पाटी कॉलनीच्या फाटकापाशी लावली तेव्हा कुठे सभागृहाबाहेर रांग लागली..

कॉलनीचा वार्षिकोत्सव जवळ आला होता. त्याच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करायला मुलामुलींचा एक घोळका गच्चीवर आला तेव्हा गच्चीच्या एका कोपऱ्यात बामअंकल शांतपणे वारं खात वाचत बसले होते. कुठला तरी ऐतिहासिक विषय, त्यावरून प्रेरक कार्यक्रम अभिवाचन, मध्येच ‘हर हर महादेव’, मध्येच लावणी, मध्येच पोवाडा अशी काही तरी मोट वळली जात्येय एवढं बामअंकलना कळत होतं. तो लुटुपुटीचा दिग्दर्शक, ती अभिनय घालायला टपलेली पोरं, त्यांच्या उत्साहाला खतपाणी घालणाऱ्या थिरकत्या पोरी असताना बामअंकल वाचनात कुठले रमायला? आपलं जराही लक्ष नाहीये असं दाखवत बारकाईने बघायला लागले.

उत्साहाच्या प्रमाणात अभ्यास, वाचन अर्थातच अजिबात नव्हतं. ‘जवळी’च्या खोऱ्यातली गोष्ट सुरू होती. सिद्दी जोहर ‘सिद्धी’ म्हणून ओळखला जात होता. म्लेंच्छांनी मराठय़ांना रंजीस आणले. या  वाक्यासोबत त्या कुणा रंजीला हाताला धरून आणल्याचा अभिनय सुरू होता. तो पाहून, हसू दाबत, बामअंकल गंभीरपणाची पराकाष्ठा करत म्हणाले, ‘‘कुठल्या पुस्तकातून घेतलंत रे पोरांनो हे?’’

‘‘नेटवर सगळी माहिती भेटते ना आंकल, तीपण फ्रीमध्ये.’’

‘‘खरंय, नेटवर नुसती माहिती भेटते रे. चांगल्या पुस्तकांमध्ये जितीजागती माणसं भेटतात. कॅरॅक्टर्स, व्यक्तिरेखा, नाही का?’’

‘‘कुड बी! पण बुक्स मिळवा, वाचा, एवढा टायम नाही आपल्यापाशी. बुक्स एक्स्पेन्सिव्हपण पडतात ना अंकल?’’ एक फाटक्या जीन्समधला आणखी फाटका हिरो म्हणाला. त्याच्या हातातला मोबाइल सहज पंधरा-वीस हजारांचा असणार होता, पण तो त्याच्या बापाला एक्स्पेन्सिव्ह वाटला असणार, या पठ्ठय़ाला फ्रीच तोही, हे ओळखून  हसून बामअंकल म्हणाले, ‘‘इतिहासावर शेकडो पुस्तकं  आहेत मराठीत, मी देतो तुम्हाला एखादं विकत आणून.  एवढं करताय, तर मुळापासून नीट वाचून, समजून घेऊन करा रे.’’

मनोमन ‘हर हर महादेव’ करत बामअंकलनी गावातल्या एका प्रसिद्ध पुस्तकालयाकडे कूच केली.  सागरी मालवाहतुकीच्या उद्योगात असल्याने ते महिनोन्महिने समुद्रावर असत. असा अवचित संपर्क आला की, त्यांना ‘किती करू आणि किती नको’ असं होई. त्यांच्या परिचयातलं जुनं पुस्तकालय आता भलतीच कात टाकून उभं होतं. ग्राहकांना प्यायला कॉफी, भेट द्यायला कॉफी मग्ज. सीडीज, पोस्टर्स, पेनड्राइव्ह वगैरेंच्या झगमगीत मांडणीमध्ये पुस्तकं बिचारी अंग चोरून बसली होती. त्यात दारातच स्वागत झालं. ‘‘कापुचिनो घेणार की लाटे सर?’’

‘‘लाटे सर नाही, मी बामसर, इथं पुस्तकं मिळतात असं वाटलं म्हणून.’’

‘‘मिळतील ना सर, कापुचिनो बाय केली तर, चांगलं डिस्काऊंटही देऊ ना सर.’’

‘‘पुस्तकांवर डिस्काऊंट? नवीनच ऐकतोय.’’

‘‘द्यावा लागतो सर. तशा तर पाव किमतीला पायरेटेड कॉप्या मिळतातच कुठे कुठे. त्या सोडून ग्राहक इथवर आला, की पहिले १० टक्के सवलत तर सुरूच होते. मग स्किमा काढायच्या की बुवा, २६ जानेवारीला २६ टक्के सवलत, १ मे ला एकावर एक फ्री, ३१ डिसेंबरला..’’

‘‘३६५ टक्के सवलत?’’

‘‘तुमचा सेन्स ऑफ ह्य़ुमर बरा आहे सर, कॉमेडी लिहून बघा. त्यातल्या त्यात कॉमेडी चालेल मार्केटला. आपणपण ५ वर्षांमध्ये पहिली एडिशन खपवून दाखवू, ५०० प्रतींची.’’

‘‘१२ कोटींच्या महाराष्ट्रात ५ वर्षांमध्ये ५०० प्रती खपवून दाखवणार तुम्ही? कमाल आहे, मानलं तुम्हाला.. सहज विचारतो, पुस्तकावर सवलत मागणारे तुमच्या त्या खिसेकापूचिनोवर,  आयमीन कॉफीवर डिस्काऊंट मागतात का हो?’’

‘‘तसं कसं? ते स्टॅण्डर्ड प्रॉडक्ट पडतं ना सर?’’

‘‘अच्छा.. म्हणजे मराठी पुस्तकं स्टॅण्डर्ड नसतात का?’’ बामअंकल पुटपुटले. तरीही ‘स्टॅण्डर्ड नसलेलं’ एक गाजलेलं मराठी शिवचरित्र त्यांनी विकत घेतलंच. २० टक्के डिस्काऊंट ‘भेटलं’. लाटेच्या लाटेवर स्वार झाले असते तर २५ टक्क्यांचे मानकरी झाले असते. एखादा गड जिंकल्याच्या उत्साहात हातात नवंकोरं पुस्तक घेऊन घराच्या रस्त्याला लागतात तोच त्यांना कॉलनीचा सेक्रेटरी भेटला. त्याला आपली खरेदी दाखवत फुशारकीने म्हणाले, ‘‘आपल्याच सोसायटीतली पोरंबाळं धडपड करताहेत एवढी, म्हटलं करावी मदत. मी काय म्हणतो, यंदा एखादा छानसा हॉलबिल भाडय़ाने घेऊन करायचा का वर्धापन दिनाचा कार्यक्रम?’’

‘‘स्पॉन्सर मिळवणार असलात तर पुढे बोलू या.’’

‘‘आपली मुलं.. आपली सोसायटी.. बाहेरचा स्पॉन्सर कशाला?’’

‘‘मग.. अहो, आता डोहाळ जेवणांना आणि बारशांनाही स्पॉन्सर मिळवायची वेळ दूर नाहीये. मागे लावायचा एक बॅनर.’’

‘‘घराघरांत बारसं, घर गणराज डेव्हलपर्सचं!’’ किंवा ‘‘गती ऑटोमोबाइल्सने पंख दिले, सुनेला लागले डोहाळे, टिंगटाँग!’’

‘‘छे.. छे.. तुम्ही फारच करता बुवा.. हेटाळणी.’’

‘‘बोटीवर राहून नुसत्या समुद्राच्या लाटा बघून हे कळणं कठीण आहे, बामअंकल. सगळं

फु कटात लाटायचा ट्रेंड इकडे असा जमिनीवर दिसणार बरं का.. बरं समजा, घेतला हॉल.. पुढे?’’

‘‘पुढे काय, माफक तिकीट लावायचं.. तेवढंच बूस्टिंग पोरांचं.’’

‘‘आणि काय रिकाम्या हॉलसमोर कार्यक्रम करायचा? एकेक तिकीट घ्यायला लोक जीव काढतील.. कोणत्याही कार्यक्रमाच्या जाहिरातीतलं सगळ्यात आयआयएमपी वाक्य कोणतं, सांगा बरं..’’

‘‘ऑफकोर्स, स्टारिंग अमुकतमुक.’’

‘‘छे हो! स्टारबीर ना बघायला कोणी नाही कडमडणार. ते बापडे ती करायला आता गुरुवारी नाक्यानाक्यांवर झोळ्या घेऊन टोळ्या करून उभेच असतात. या रे आमच्या सिनेमाचे तिकीट घ्या रे.. नुसतं, सर्वाना मुफ्त प्रवेश, एवढं वाक्य येऊ द्या. चेंगराचेंगरी होणारंच! जे फुकटात, जे लुटतात.’’

‘‘मला वाटतंय तुम्ही जरा जास्तच ताणताय. एकदा करून तर बघा. पैशांची करू जमवाजमव. तुम्ही फंक्शन ग्रॅण्ड करा. वाटलं तर एखादी स्टारबीर अ‍ॅड करा.’’

‘‘बघू.. आधी तुम्हीच बघा.. हाराकिरीची हौस वगैरे आवरा.’’

सेक्रेटरीने सर्वतोपरी सावध केलं तरी सततच्या किरकिरीपेक्षा एकदाची हाराकिरी बामआंकलनी पत्करली. चांगली पुस्तकं- चित्रपट- नाटकं- संगीत  मैफली- चित्रप्रदर्शनी याला एकूण जगण्याच्या रखरखाटामधल्या सावलीच्या जागा आहेत, असं मानत- अनुभवत ते इथवर आले होते.  लहानपणाच्या त्यांच्या घरच्या ओढग्रस्तीतही दिवाळीच्या खरेदीत फराळ-फटाके यांच्यासोबत दोन तरी दिवाळी अंक विकत घ्यायचे. त्यांच्या घरचे (तेही सवलत न मागता) नाटय़ महोत्सवाचं एक तरी तिकीट काढून घरातली चार माणसं चार वेगवेगळ्या नाटकांना एके कटी जाऊन यायची. एरवी सर्वाना एकत्र नाटकं बघणं खिशाला झेपत नसे. गाण्याच्या मैफलीला फार तर भारतीय बैठकीचं तिकीट परवडायचं; पण कुठेही फुकटेगिरीची बैठक नव्हती रसिकतेला. फुकटखाऊपणाचा राग तरी यायचा नाही तर लाज तरी वाटायची. आता निर्लज्जपणा, कोडगेपणा तर स्पॉन्सर होत नाहीये?

हळूहळू कार्यक्रम बसत गेला. हॉल, वेळ, तिकीट दर यथावकाश जाहीर झालं. प्रयोगाच्या प्रॉपर्टीमध्ये दोन-तीन ऐतिहासिक वस्तू लागणार होत्या त्याबद्दल बामअंकलनी एका नाटकवाल्या दोस्ताला फोन केला तर तो सुरुवातीलाच म्हणाला, ‘‘बाम्या.. लेका, बाकी काही माग, फ्री पासेस मागू नकोस. बंद म्हणजे एकदम बंद आहेत.’’

‘‘बस्का.. एवढंच ओळखलंत होय आम्हाला?’’

‘‘आता कोणाचाच भरवसा राहिला नाही ना.. आमचं कितीही उच्च प्रॉडक्शन असो, लोकांचे हात खिशात जाणं कठीण.. नाटकांचं तिकीट महाग.. नाटकांनंतर पिझ्झा खाल्ला तर त्यावर जादा चीज मागायची तयारी! त्याच तोंडाने ‘लायन किंग्ज’, ‘माऊसट्रॅप’चं गुणगान गायला मोकळे. आपल्या कद्रूपणाच्या ट्रॅपचं काय करता, बोला.’’

नाटकवाला भलताच पेटला होता, बोल म्हणत असला तरी बोलू देणार नव्हता, हे स्पष्टच होतं. त्याच्याकडून हवी ती एक-दोन चिलखतं, सिंहासन वगैरे पदरात पाडून बामअंकल दूर झाले. चिलखतं, सिंहासनं घेतली म्हणून वार सोसायलाच हवेत का?

कार्यक्र म जवळ आला, कुजबुजी, चर्चा वाढल्या, ‘‘यंदा काय म्हणे तिकीट लावून कार्यक्रम?’’

‘‘कोणाचं डोस्कं हे?’’

‘‘मुलांना तरी फ्री ठेवा म्हणावं १२ वर्षांच्या खालच्या.’’

‘‘एवढय़ा पैशांत एक तरी स्टार बसेल.’’

‘‘आपल्याच मुलांना बघायला पैसे कोण देणार?’’

‘‘तिकीट लावता तर चहा-नाश्ता फुकट द्या म्हणावं.’’

असं बरंचसं ‘म्हणावं’ झालं तरी म्हणावी तशी तिकिटविक्री झाली नाही. घराघरांत आदल्या दिवसांमध्ये एवढय़ा अडचणी आल्या, संकटं ठाकली, की कोपऱ्यावरच्या सभागृहात येणंही कोणाला झेपेना. शेवटी कार्यक्रमाच्या दोन तास अगोदर ‘सर्वाना मुक्त प्रवेश’ अशी पाटी कॉलनीच्या फाटकापाशी लावली तेव्हा कुठे सभागृहाबाहेर रांग लागली. मध्यंतराच्या चहा-बिस्किटांच्या आमिषासाठी प्रायोजकांनी आपल्या जाहिरातींची, प्रोमोजची चौफेर घुसडपट्टी केली. एकमेव निमंत्रित स्टारकन्यकेने शिवकालीन भव्य वातावरणाच्या सेटवर ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’ या अत्यंत चपखल गाण्यावर स्फोटक डॅन्स  करून शिवरायांच्या घोडदळातून रिक्षा घुमवण्याची किमया करून दाखवली. लोकांनी ना घोडय़ांचं मनाला लावून घेतलं ना त्या डान्स करणारीचं! एकूण इव्हेंट बेस्ट होऊ लागला.

पण एका टप्प्यावर बामअंकलना हे सगळं असह्य़ व्हायला लागलं. घोडय़ांच्या टापांखाली चिरडावं.. अंगावरून रिक्षा जावी किंवा प्रमोशनचं होर्डिग टाळक्यावर पाडावं, असं वाटू लागलं. बहुसंख्य लोकांना याचं काही वाटू नये याचंच जास्त वाटायला लागलं.  मोफत मिळाल्याचा दर्जा काहीही असो, नसो, आपल्याला फरक पडत नाही, एवढे कसे मोफतलाल झालो आपण सगळे? हा कार्यक्रम साधाच होता, कबूल आहे; पण जीव ओतून दीर्घ साधनेतून एखादी कला सादर केली तरीही पैसे टाकायला माणसं मागेपुढेच बघणार का? अशाने कलासंस्कृती कशी बहरणार? पुढच्या पिढय़ांना देण्याजोगं कोणतं संचित उरणार? बामअंकल कासावीस झाले.

वत्सला वहिनींशी बोलायला लागले.

‘‘मॅडम, मी फार ढवळून निघालोय हो.’’

‘‘इथे शारीरिक आरोग्य हाताळलं जात नाही.’’

‘‘नाही नाही, मी मानसिक आरोग्याचंच म्हणतोय. तेही माझं कोणा एक टय़ाचं नाही. बहुसंख्यांचं! मला सांगा, आपल्याला सगळा सांस्कृतिक उत्कर्ष फुकटात पदरात पाडून घ्यायची घाणेरडी सवय का लागलीये?’’

‘‘आपण गरीब पडलो ना.’’

‘‘कुठे पडलो? मोबाइल-मॉल-मल्टिप्लेक्स सगळ्यांना आश्रय देतोय की आपण.’’

‘‘हो.. पण ते काय.. उगाच आपलं गरिबीमध्ये जमेल तेवढे.’’

‘‘जगभरात पर्यटकांमध्ये आपण पुढे असतो, प्रतिष्ठेसाठी मुलांच्या महागडय़ा शाळा आपण लावतो. फक्त मराठी पुस्तकं, नाटकं यांनीच काय पाप के लंय?’’

‘‘गरिबी माणसाला पाप करायला लावते.’’

‘‘तुम्ही सगळं गरिबीवर ढकलू नका हो.  ऐपत ही गोष्ट वेगळी असते, दानत ही गोष्ट वेगळी असते.’’

‘‘हो का? आपण गरीब ना म्हणून बचत करतो. जाऊ द्या ना सर. एका कॉलनीच्या छोटय़ा कार्यक्रमाचा इतका काय इश्यू करताय?’’

‘‘एक  तर मोठय़ांची गोष्ट वेगळी नाहीये आणि दुसरं ही आपली पोरंबाळं होती ना? त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायला करायला हवं. अशाने ते तरी जीव ओतून काही तरी करतील का?’’

‘‘गरिबांची मुलं गरीबच राहणार ना सर.. बरं, आज जरा घाईत आहे. लवकर संपवू का काऊन्सेलिंग? मी काय म्हणते, तुकारामांनी म्हटलंच आहे ना, जे जे होईल ते ते पाहावे.’’

‘‘अशाने फार चांगलं, उत्कट नेक काही पाहायलाच मिळणार नाही.’’

‘‘आज किनई आम्ही हेल्पलाइन लवकर बंद करतोय. काय आहे, यंदाचा नॅशनल अ‍ॅवॉर्ड विनिंग मराठी सिनेमा टी.व्ही.वर दिसणार आहे ना सात वाजता? तो बघावा म्हणतोय.’’

‘‘जो  पाहिला नाही थिएटरमध्ये तो  इथे मोफत पहाणारए?’’

‘‘घ्या.. तिकीट काढून बघण्याएवढं काही नसतं हो त्यात. तरी फुकटात टीव्हीवर येताजाता, खातापिता बघितला तरी चालतं. तशा पुलाखाली दोनशे रुपयांना पायरेटेड कॉप्यापण मिळतात बऱ्याच सिनेमांच्या; पण आम्ही बाई टी.व्ही.वरच बघतो.. कोण त्या चादरीवरच्या सीडय़ा घ्यायला जाणार?’’ वत्सलावहिनी उत्साहाने म्हणाल्या.  बामअंकलना उत्तरादाखल काही बोलावंसंही वाटलं नाही. याला गतीने आपली बरीचशी संस्कृती हळूहळू पुलाखालच्या चादरीवर सस्त्यात विकायला येऊन पडेल याला कल्पनेने त्यांची वाचा खुंटली.