05 July 2020

News Flash

प्रज्ञा-जागृती

प्रज्ञायुक्त प्रेम हे स्थलकालातीत असते. आज प्रेम आणि उद्या द्वेष असा बदल त्यात होऊच शकत नाही. तसेच एका गोष्टीसंबंधी प्रेम व दुसऱ्यांसंबंधी द्वेष असा दुजाभावही

| May 18, 2013 01:01 am

प्रज्ञायुक्त प्रेम हे स्थलकालातीत असते. आज प्रेम आणि उद्या द्वेष असा बदल त्यात होऊच शकत नाही. तसेच एका गोष्टीसंबंधी प्रेम व दुसऱ्यांसंबंधी द्वेष असा दुजाभावही त्यात असू शकत नाही. अशा प्रेमातच प्रज्ञेचा वृक्ष फोफावत जातो व एका वेगळ्याच आयामातील जीवनाची सुरुवात करतो.
एकदा एका माणसाने एक माकड आणून त्याला प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु खूप खटाटोप करूनही ते काहीच शिकेना. अनेक प्रकारच्या यातना देऊनसुद्धा काहीच उपयोग होईना. शेवटी त्या माणसाला एक युक्ती सुचली. त्याने एका रिकाम्या खोलीत केळीचा एक घड छताला टांगून ठेवला व कोपऱ्यात एक काठी ठेवली. मग त्या खोलीत त्याने त्या माकडाला कोंडून ठेवले. माकड खोलीत काय करत आहे हे अधूनमधून पाहण्यासाठी त्याने खोलीच्या दरवाजाला एक मोठे छिद्र पाडलेले होते. त्याची अपेक्षा होती, की माकडाला जेव्हा भूक लागेल तेव्हा ते केळी मिळवण्याचा प्रयत्न करेल व त्या प्रयत्नात ते काठीचा उपयोग करायला शिकेल. स्वत:च्या युक्तीवर खूश होऊन तो माणूस आपल्या इतर कामाला लागला. थोडय़ा वेळाने तो येऊन बघतो तर काय, ते माकडच त्या छिद्रातून त्याच्याकडे बघत होते व त्या केळीच्या घडाकडे त्याचे लक्षही गेले नव्हते. त्या माणसाने दिलेल्या यातनांमुळे ते माकड त्याच्यावरच नजर ठेवायला शिकले होते.
वरील कथेतील विनोद सोडला तरी विविध गोष्टींचा परस्परसंबंध जोडण्याची क्षमता प्राण्यांमध्ये काही प्रमाणात व माणसांमध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालेली दिसते. सर्व सजीवांवर त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीचे आघात होत असतात. हे आघात त्यांच्या आत संवेदना निर्माण करतात. प्राथमिक स्वरूपाच्या जीवांमध्ये या संवेदनांची फक्त जाणीव निर्माण होते व त्यातूनच त्यांना जिवंतपणाची अनुभूती होत असते. जैविक उत्क्रांतीद्वारा हळूहळू हे जीव त्यांच्या आत निर्माण होणारी संवेदना व ती उत्पन्न करणारे बाहेरील आघात यांची सांगड घालायला शिकतात व त्यातून मग त्यांच्यात बाहेरील परिस्थितीची जाणीव निर्माण होऊ लागते. अशी जाणीव निर्माण झाल्यानंतरच या जीवांच्या बाह्य़ परिस्थितीच्या संदर्भातील हालचालींचा विकास सुरू होतो.
जिवंत असण्याची संवेदना ही प्रत्येक सजीवासाठी महत्त्वाची असते. कारण तीच त्याला निर्जीवापासून वेगळे म्हणजे सजीव बनवत असते. ही संवेदना ज्या देहातून अनुभवास येते तो देहही त्या सजीवासाठी महत्त्वाचा होतो व त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही त्या सजीवाची मूलभूत प्रवृत्ती बनते. माणूस हा देखील एक सजीव प्राणी असल्यामुळे स्वसुरक्षितता निश्चित करण्याची प्रवृत्ती त्याच्यातही दिसून येते. माणसाला अन्य सजीवांपासून वेगळा करणारा घटक म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता.
विचार करण्याच्या क्षमतेमुळे माणसातील जिवंतपणाची अनुभूती वैविध्यपूर्ण बनलेली असली तरी या क्षमतेतून काही वेगळ्याच प्रकारच्या समस्या त्याच्या जीवनात निर्माण झालेल्या दिसतात. उदाहरणार्थ, आपल्या आत निर्माण होणाऱ्या संवेदनांच्या आधारे आपण बाह्य़ परिस्थितीचे ज्ञान मिळवत असतो. परंतु विचार करण्याच्या क्षमतेमुळे मनुष्य बाह्य़ परिस्थिती तशी नसतानादेखील तशा प्रकारच्या संवेदना आपल्या आत निर्माण करतो व त्या संवेदनांच्या आधारे बाह्य़ परिस्थितीचे अनुमान करून त्यानुसार वागतो. त्यातूनच मग अनेक प्रकारचे भ्रम त्याच्यात निर्माण होतात. भ्रम म्हणजे बाह्य़ परिस्थिती तशी नसतानादेखील ती तशी समजणे व त्याप्रमाणे वागणे. एखादा सधन मनुष्य जेव्हा आपली संपत्ती संपली तर आपले काय होईल असा विचार करू लागतो तेव्हा तो आपल्या आत भीतीची संवेदना निर्माण करतो. या भीतीच्या संवेदनेच्या आधारे तो अनुमान काढतो, की बाह्य़ परिस्थिती अशी आहे की, त्याची संपत्ती लवकरच संपू शकते. म्हणून मग तो अधिकाधिक संपत्ती गोळा करण्याच्या मागे लागतो – इतका की कितीही संपत्ती गोळा केली तरी त्याच्यातील ती भीतीची संवेदना संपत नाही.
विचारांची आणखी एक क्षमता म्हणजे निष्कर्ष काढणे. हे निष्कर्ष जेव्हा बाह्य़ परिस्थितीला धरून असतात तेव्हा ते बाह्य़ परिस्थितीचा सामना करण्यात उपयोगी पडतात. परंतु हेच निष्कर्ष जेव्हा केवळ आपल्या आतील संवेदनांवर आधारित असतात, तेव्हा ते भ्रामक असू शकतात. कारण त्या संवेदना बाह्य़ परिस्थितीच्या निर्देशक नसून विचाराने कल्पनेद्वारा निर्माण केलेल्या असू शकतात. यावरून असे दिसते की, विचार हा जेव्हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीला धरून असतो तेव्हा तो सुसंगत व तर्कशुद्ध असतो आणि परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ असतो. पण जेव्हा तो कल्पनांवर व स्वनिर्मित संवेदनांवर आधारित असतो तेव्हा तो भ्रामक असण्याचाच जास्त संभव असतो. असा विचार परिस्थितीचा निचरा करण्याऐवजी तिला अधिकच चिघळवतो.
विचारांच्या विविध गोष्टींची सांगड घालण्याच्या गुणधर्मातूनदेखील अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ही सांगड जोपर्यंत वस्तुस्थितीच्या निकषावर पारखलेली असते, तोपर्यंत ती योग्य असते. परंतु जेव्हा ती स्वनिर्मित कल्पना व पूर्वग्रहांवर आधारित असते, तेव्हा ती फसवीच असण्याची दाट शक्यता असते. आपल्या आत उमटणारे भावनिक तरंग व विचारांनी निर्माण केलेल्या विविध प्रतिमा यांची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा आपल्या आत एक मानसशास्त्रीय आशय निर्माण होतो जो विविध प्रकारच्या मानसशास्त्रीय अनुभवांना जन्म देतो. हे मानसशास्त्रीय अनुभव मग आपल्या विविध मानसिक अवस्थांचे व त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या विचारांचे आधार बनतात. असे मानसशास्त्रीय विचार हे तर्कशुद्ध नसतात व आपल्या अनुमानांना पूर्वग्रहदूषित बनवितात. अशा प्रकारे मानवी चेतनेचा आशय विविध मानसशास्त्रीय अनुभवांनी व कल्पनांनी भरला जातो व त्यामुळेच मानव हा तर्कशुद्ध व सुसंगतपणे विचार करण्याची क्षमता हरवून बसतो.
विचारांची तर्कशुद्धता व सुसंगतता पुनस्र्थापित करणे हे प्रज्ञा-जागृतीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. पण त्यासाठी आपण गोळा करून ठेवलेल्या असंख्य मानसशास्त्रीय अनुभवांचा व कल्पनांचा निचरा होणे आवश्यक आहे. कोणत्याही मानसशास्त्रीय अनुभवाचे घटक म्हणजे शारीरिक संवेदना, भावनिक तरंग व विचारनिर्मित कल्पना यांच्यात विचाराने निर्माण केलेले परस्परसंबंध. या परस्परसंबंधांमुळे विचार हा अधिकाधिक दृढ होत जातो व संवेदना आणि भावना यांना सातत्य मिळत राहते. त्यामुळेच अनुभव निर्माण करणारी बाह्य़ परिस्थिती बदलली तरी व्यक्तीच्या जीवनात त्यातून निर्माण झालेल्या अनुभवांची पुनरावृत्ती सुरूच राहते. ती थांबायची असेल तर हे विचारनिर्मित परस्परसंबंध तुटणे आवश्यक आहे. पण ते मुद्दाम जाणूनबुजून तोडता येत नाहीत. तसे केले तर मनुष्य हा असंवेदनक्षम, भावनाशून्य व विचारहीन असा जीव बनेल. या तीन घटकांतील हा गुंता तोडून सोडवता येणार नाही तर अवधानाच्या प्रखर प्रकाशात अवलोकनाद्वारेच तो सुटू शकतो. अवधान म्हणजे लक्ष देणे, संपर्कात असणे, समवेत जगणे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे अवधानपूर्वक बघतो तेव्हा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत असतो, त्या गोष्टीच्या संपर्कात असतो, त्या गोष्टीसमवेत जगत असतो; किंबहुना आपण त्या गोष्टीहून निराळे नसतोच. तेथे केवळ ती गोष्टच असते. अवधान म्हणजे विचारनिर्मित प्रमाणिबदूपासून बघणे नव्हे. तेथे कोणतेही प्रमाण, कोणताही संदर्भ, कोणतीही दिशा नसते. तेथे केवळ तेच असते-निखळपणे बघणे. अशा अवधानाच्या प्रखर प्रकाशात विचारनिर्मित गुंता आपोआपच सुटत जातो व हे तिन्ही घटक त्यांच्या शुद्ध स्वरूपात वेगवेगळे होतात. शारीरिक संवेदना व भावनिक तरंग आपापला जीवनकाल जगून संपून जातात व मागे उरतो तो निव्वळ माहितीचा सांगाडा. विचारयंत्रणेला त्या सांगाडय़ाची निर्थकता लक्षात येते व तीही त्यासंबंधी कोणताही खटाटोप न करता शांत होते. विचारयंत्रणा शांत होणे म्हणजे ती शिथिल पडणे नव्हे. किंबहुना ती इतकी तल्लख अथवा कार्यशील होणे, की कोठे कार्यान्वित व्हायचे व कोठे नाही याची तिला जाण येणे व या जाणिवेतूनच ती शांत असली तरी गरज पडल्यास पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित होण्याची तिची तयारी असणे. अशा प्रकारे तयार झालेल्या चेतनेच्या क्षेत्रातच मग प्रज्ञेचा उदय होतो.
निव्वळ तर्कशुद्धता एखाद्याला एक उत्तम वैज्ञानिक बनवू शकेल, पण त्याच्यात भावनेचा ओलावा असेलच असे नाही. नुसताच भावनेचा ओलावा असलेल्या व्यक्तीत तर्कशुद्धता असेलच असे नाही व केवळ शारीरिक संवेदनांच्या मागे लागलेली व्यक्ती ही सुख-दु:खाच्या गत्रेत खोलवर रुतत जाण्याचीच शक्यता अधिक असते. परंतु प्रज्ञेचा एक स्पर्शदेखील माणसाचे जीवन बदलून टाकण्यास समर्थ असतो. प्रज्ञा म्हणजे प्रेममय, करुणामय तर्कशुद्धता. हे प्रेम म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात अनुभवास येणारे प्रेम नव्हे – ते तर केव्हाही द्वेषात बदलले जाऊ शकते; तसेच ते व्यक्तिनिष्ठही असते. प्रज्ञायुक्त प्रेम हे स्थलकालातीत असते. आज प्रेम आणि उद्या द्वेष असा बदल त्यात होऊच शकत नाही. तसेच एका गोष्टीसंबंधी प्रेम व दुसऱ्यांसंबंधी द्वेष असा दुजाभावही त्यात असू शकत नाही. ते सर्वासाठी सर्वकाळ प्रेमच असते. अशा प्रेमातच प्रज्ञेचा वृक्ष फोफावत जातो व एका वेगळ्याच आयामातील जीवनाची सुरुवात करतो. प्रज्ञा-जागृती हाच मानवी जीवनाचा अंतिम उद्देश आहे का? प्रज्ञेचा उदय म्हणजे मानवी जीवनाचा शेवट नसून त्याची नव्याने झालेली सुरुवात आहे.
किशोर खैरनार
संचालक, कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्ट.
संपर्क : ‘‘्र२ँ१ी19@ॠें्र’.ूे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2013 1:01 am

Web Title: more attention towards particular thing make you live with that thing
टॅग Life,Philosophy
Next Stories
1 गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि ब्रेक्स
2 अनसूया
3 कीर्तनानंद
Just Now!
X