मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘मुलं शाळेत येण्याच्या आधीपासून मातृभाषा किंवा परिसरभाषा ऐकत असतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूत वेगवेगळ्या संकल्पना त्याच भाषेतून तयार झालेल्या असतात. साहजिकच ती त्याच भाषेत विचार करतात, त्याच भाषेत त्यांना प्रश्न पडतात आणि त्यांची कल्पनाशक्तीही त्याच भाषेत चालते. उलट ती अधिक विकसित होत जाते, त्यामुळे ती त्याच भाषेत स्वत: गोष्ट रचून सांगू शकतात,’’ सांगताहेत नाशिकमध्ये २२ वर्षांपासून सुरू असलेल्या ‘आनंद निकेतन’ या मराठी शाळेच्या संस्थापक विनोदिनी पिटके-काळगी.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

राज्यात अनेक मराठी शाळा बंद पडत असतानाही बावीस वर्षांपासून ठामपणे उभी असलेली आणि इतरांसाठी उदाहरण घालून देणारी शाळा म्हणजे  नाशिकची ‘आनंद निकेतन’ शाळा. या शाळेची स्थापना इंग्रजी माध्यमाचं वर्चस्व वाढलेलं असताना झाली. त्या काळात मराठी माध्यमाची शाळा सुरू करणं धाडसाचंच म्हणावं लागेल. त्यामागची कारणं जाणून घेण्यासाठी शाळेच्या संस्थापक, संचालक आणि शिक्षिका विनोदिनी पिटके-काळगी यांची मुलाखत घेतली.

विनोदिनी सुरुवातीपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. काही र्वष शाळा आणि महाविद्यालयात अध्यापन केल्यावर त्यांना त्यातील त्रुटी प्रकर्षांनं जाणवू लागल्या. शिक्षणामुळे मुलांचा व्यक्तिगत विकास होण्याबरोबरच त्यातून पुढे चांगला समाज घडणं महत्त्वाचं आहे, असं मानणाऱ्यांपैकी त्या एक आहेत. कोल्हापूरच्या लीलाताई पाटील आणि ‘सृजन आनंद विद्यालय’ यातून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर ‘आनंद निकेतन’ ही शाळा सुरू केली. महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षणाच्या प्रसार आणि सक्षमीकरणाच्या चळवळीत व्याख्यानं, लेख आणि प्रशिक्षण या स्वरूपात विनोदिनी यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या ‘सहज शिक्षणाची प्रयोगशाळा’ या पुस्तकाला ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा उत्तम शैक्षणिक साहित्य पुरस्कार मिळाला आहे. शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. प्रवाहाविरुद्ध जाऊन मराठी शाळा चालवण्यामागची त्यांची आणि सहकाऱ्यांची भूमिका, अनुभव आणि आजच्या मराठी शाळांबद्दलचे विचार त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी व्यक्त के ले.

  प्रश्न : इंग्रजी शाळांबद्दलचं आकर्षण वाढत असताना तुम्ही मराठी माध्यमाची शाळा सुरू केलीत आणि बावीस वर्षांनंतरही त्याचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही याचं कारण काय?

विनोदिनी पिटके-काळगी :  मातृभाषेतून शिक्षण घेणं आम्हाला का महत्त्वाचं वाटतं ते सुरुवातीला सांगते. मुलं शाळेत येण्याच्या आधीपासून मातृभाषा किंवा परिसरभाषा ऐकत असतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूत वेगवेगळ्या संकल्पना त्याच भाषेतून तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्याच भाषेत ती विचार करतात, त्याच भाषेत त्यांना प्रश्न पडतात आणि त्यांची कल्पनाशक्तीही त्याच भाषेत चालते. उलट ती अधिक विकसित होत जाते, त्यामुळे मुलं त्याच भाषेत स्वत: गोष्ट रचून सांगू शकतात. इंग्रजी माध्यमात जाणाऱ्या मुलांनाही प्रश्न पडतात, पण अनेकदा त्यांना ते विचारायचा धीर होत नाही. कारण इंग्रजी. त्याचा सरावच नसतो. साहजिकच विचारणं बंद झालं, की हळूहळू प्रश्न पडणंही बंद होतं. मग कल्पनाशक्तीला आळा बसत जातो आणि स्वतंत्र विचार करण्यापेक्षा प्रवाहाबरोबर जाणारी मुलं आणि पर्यायानं तसा समाज तयार होतो. म्हणून मातृभाषेतून शिक्षण आवश्यक आहे. आम्ही शाळा सुरू केली तेव्हा आम्हाला मिळालेल्या प्रतिक्रिया फारशा उत्साहवर्धक नव्हत्या. पहिली चार-पाच र्वष तर आम्हाला विद्यार्थी मिळवायला खूपच प्रयत्न करावे लागले. फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास असलेल्या व्यक्तींनीच आपल्या मुलांना आमच्या शाळेत घातलं. तीन-चार वर्षांच्या आमच्या प्रयत्नांमुळे इतर लोकांच्याही लक्षात यायला लागलं, की या शाळेतली मुलं वेगळी आहेत, त्यांच्यात आत्मविश्वास आहे, शाळेत ती खुशीनं जातात वगैरे. मग मुलांची संख्या वाढायला लागली. आता गेली दोन-तीन र्वष तर आम्ही सोडत पद्धतीनं प्रवेश देतो इतकी संख्या वाढली आहे. ही शाळा दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमाची आहे. शाळेस सरकारी मान्यता आहे, पण सरकारी अनुदान मात्र घेतलं जात नाही. प्रवेश देताना आम्ही पालकांना शाळेची तत्त्वं समजावून सांगतो आणि ती मान्य असतील तरच प्रवेश घ्यावा असं सुचवतो. उदा. दहावीपर्यंत सर्व विषय मराठीतूनच शिकवले जातील, स्पर्धेपेक्षा सहकारावर जास्त भर असेल, पूर्ण समाजाला पुढे न्यायचं असल्यामुळे एकटय़ाच्या यशावर भर दिला जाणार नाही, समाजातील सर्व स्तरातील आणि सर्व जातिधर्मातील मुलं इथे असतील, इत्यादी.

प्रश्न : कोणत्या गोष्टींमुळे पालक या शाळेकडे आकर्षित होतात असं वाटतं?

विनोदिनी : आमच्या शाळेत मुलांना अनेक गोष्टी स्वत: करून बघता येतात. अभ्यासाचं ओझं होत नाही. खेळ, कला, कार्यानुभव यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. अभ्यासासाठी शिकवणी लावावी लागत नसल्यामुळे इतर गोष्टी करायला, छंद जोपासायला वेळ मिळतो. तसंच काही पालकांना मुलांमध्ये समता, न्याय, बंधुता ही संविधानातील मूल्यं रुजावीत, विज्ञाननिष्ठ, विवेकी माणूस घडावा असं आवर्जून वाटतं, ते पालकही मुलांना आमच्या शाळेत घालण्यासाठी उत्सुक असतात.

 प्रश्न : ‘आनंद निकेतन’चे विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात जातात तेव्हा माध्यम बदलाला आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे एकू ण दृष्टिकोनातल्या बदलाला ते कसे सामोरे जातात? महाविद्यालयातली बहुतेक मुलं स्पर्धेच्या जगात सहकारापेक्षा आपला स्वत:चा टिकाव कसा लागेल, या विचाराभोवती केंद्रित झालेली असणार. ‘आनंद निकेतन’च्या मुलांना हा बदल कसा मानवतो?

विनोदिनी : मुलं शाळेतून बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या आवडीचा, क्षमतेचा उत्तम अंदाज आलेला असावा, यासाठी आम्ही दक्ष असतो. मुलांनी केवळ प्रवाहाबरोबर जात कोणतंही क्षेत्र निवडू नये, आपल्याला आवडत असेल तेच क्षेत्र निवडावं अशी आमची अपेक्षा असते. यासाठी पालकांची मानसिकता तयार करण्यात आम्ही बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत. मुलांना वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती मिळावी म्हणून आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींना मुद्दाम शाळेत मुलांशी गप्पा मारायला बोलावतो. त्यातून त्यांनी हे क्षेत्र का निवडलं, पुढे त्यात किती वाव आहे, अशा सगळ्या गोष्टींची कल्पना मुलांना येते. आम्ही मुलांना देत असलेले गृहपाठही त्यांना जास्त कृतिशील राहायला उत्तेजन देतात. या सगळ्यामुळे मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांत जाताना दिसतात. इंग्रजी आम्ही एक भाषा म्हणून शिकवतो आणि सगळ्याच इतर भाषा- म्हणजे हिंदी, संस्कृत, तशीच इंग्रजीही मुलांना उत्तम प्रकारे यावी असा आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे मुलं जेव्हा महाविद्यालयात जातात तेव्हा त्यांना भाषेचा प्रश्न येत नाही. मात्र इतर मुलांच्या दृष्टिकोनाचं त्यांना थोडं आश्चर्य, थोडं वाईटही वाटतं. पण मुलं म्हणतात, की आम्हाला जे बरोबर वाटतं तेच आम्ही करतो. आमच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे.

प्रश्न :  इंग्रजीचा जास्त वापर असणाऱ्या व्यावसायिक क्षेत्रांत या मुलांचा  कसा जम बसतो?

विनोदिनी : आमच्या शाळेतली मुलं अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य, व्यवस्थापन यांसारख्या लोकप्रिय क्षेत्रांबरोबरच पत्रकारिता, कला, हॉटेल मॅनेजमेंट, परकीय भाषा, राज्यशास्त्र अशा विविध क्षेत्रांमध्ये आपलं कौशल्य अजमावत आहेत. दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमात शिकूनही तिथे चांगली कामगिरी करत आहेत. शाळेत आम्ही मुलांच्या विचारशक्तीला खूप चालना देतो, त्यांना मतं मांडायची मुभा असते, उद्योजकतेला वाव दिला जातो. आमच्या असं लक्षात येत आहे, की शाळेच्या सुरुवातीच्या काही वर्गातल्या अनेक मुलांनी स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. ते यशस्वी झाले की नाही, हे ठरवायला अजून काही अवधी जायला हवा. पण या मुलांना नोकरीपेक्षा उद्योग सुरू करावासा वाटणं हे उत्साहवर्धक आहे.

 प्रश्न : राज्यातल्या इतर मराठी माध्यमाच्या शाळांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काय करता येईल? शाळेची तत्त्वं, बंधनं पाळूनही त्यांना काही बदल करता येतील का, की ज्यामुळे पालक मुलांना मराठी शाळेत घालायला कचरणार नाहीत?

विनोदिनी : आमच्या शिकवण्याच्या पद्धतीचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी इतर शाळांमधून मंडळी येतात. आमचे उपक्रम आणि शिक्षणपद्धतीची सर्वाना माहिती मिळावी यासाठी शाळेनं ‘शाळा एक मजा’ ही संकल्पना पुस्तिका आणि ‘सहजशिक्षणाची प्रयोगशाळा’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. चौकटीत राहूनही कित्येक बदल करता येण्यासारखे आहेत. पाठय़पुस्तकांबरोबर पूरक साहित्य वापरता येऊ शकतं. अनेक जिल्हा परिषदांच्या शाळा असे बदल करत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे पालक आता मराठी शाळांकडे वळत आहेत. मात्र बहुतेक मराठी शाळा शिक्षकांनी आपल्याला फार काही करता येणार नाही, असं गृहीत धरलं आहे, असं मला वाटतं.  बहुतेक मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या संचालकांची आणि शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमात जातात.  मग ते इतरांना त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात घालण्यास कसं सांगणार? आपल्या मातृभाषेतून शिक्षण देणं हे मुलांसाठी उत्तम आहे हे त्यांनी स्वत: आधी मनापासून स्वीकारायला हवं. आमच्या सर्व शिक्षकांची मुलं आमच्या शाळेत आहेत. लोकांची गल्लत झाली आहे, की इंग्रजी येण्यासाठी सेमी-इंग्लिश किंवा इंग्रजी माध्यमातच घालायला हवं.  कोणतीही नवीन भाषा शिकवताना आधी ती भरपूर कानावर पडली पाहिजे, मग हळूहळू बोलणं, मग वाचन आणि नंतर लेखन याच पायऱ्यांनी ती शिकली गेली पाहिजे. आम्ही सगळ्या भाषा याच टप्प्यांनी शिकवतो. म्हणजे बालवाडीत आम्ही लिहायला शिकवत नाही, पण मुलं खूप गप्पा मारतात, गोष्टी ऐकतात, मग स्वत: त्या गोष्टी सांगतात, कधी बदलून सांगतात. त्यामुळे भाषा समृद्ध झालेली असते. इंग्रजी भाषा आम्ही पहिली-दुसरीपासून याच टप्प्याने शिकवतो. शब्द आणि कृती शिकवणं- मग त्यात ‘शिवाजी म्हणतो’ खेळ इंग्रजीत खेळणं, मुलांना आधी माहीत असलेल्या गोष्टीच इंग्लिशमध्ये ऐकणं अशा पद्धतीनं मुलांची ऐकून ऐकून इंग्रजीशी ओळख होते. त्यात बोलणं अगदी जुजबी असतं आणि लेखन तर नसतंच. मग तिसरीपासून हळूहळू शब्दलेखन सुरू होतं. संस्कृत आम्ही आठवीपासून शिकवतो, पण तीही याच पद्धतीनं. संस्कृत बोलणारे लोक येऊन आठवीच्या मुलांचा दोन आठवडय़ांचा संभाषण वर्ग घेतात. कुठलीही भाषा आधी कानावर पडली, तर त्यातले शब्द माहीत होतात, मग ती बोलायला कठीण जात नाही. तुमची मातृभाषा जर पक्की असेल आणि कोणतीही नवीन भाषा शिकायची कशी हे माहीत असेल, तर मुलांना कोणत्याही भाषेचा प्रश्न येत नाही, मग ती इंग्रजी, हिंदी, फ्रें च असो वा जर्मन. आमच्या शाळेतली मुलं सातवीत ‘ब्रिटिश काउन्सिल’तर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘यंग लर्नर’ परीक्षेला बसतात. त्यात ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं अशा चारी कौशल्यांची परीक्षा घेतली जाते आणि मुलं उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होतात. म्हणजे भाषा हा मुळी प्रश्नच नाहीये. त्यामुळे आमची मुलं विज्ञान शाखेला गेली तरी त्यांचं विज्ञान पक्कं असल्यानं पर्यायी शब्द कोणते वापरायचे एवढंच त्यांना शिकावं लागतं. आता खरी परिस्थिती अशी आहे, की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधल्या अनेक शिक्षकांना इंग्रजी बोलता येत असलं तरी बऱ्याच वेळा विषय नीट येत नसतो. त्यामुळे मुलांचं नुकसान होतं.

प्रश्न : नुकतंच केंद्र सरकारनं नवीन शिक्षण धोरण जाहीर केलं. त्याबद्दल आपलं मत काय आहे? त्याच्यामुळे पालक मातृभाषेतून शिक्षण देण्याकडे वळतील का?

विनोदिनी : केंद्र सरकारनं पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षणाची घोषणा केली असली, तरी त्यात ‘शक्यतो’ हा शब्द घातला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा काही स्वत:हून मराठी किंवा इतर स्थानिक भाषांतून शिकवणार नाहीत. मातृभाषेतून शिक्षण हे पुढच्या शिक्षणात आडकाठी नसून ते उपयुक्तच आहे, हे पालकांनाच जाणवायला हवं.

धोरण प्रत्यक्षात यायला समाजाचाच रेटा आवश्यक आहे. त्याशिवाय कुठलाच बदल होणार नाही.