ch04आई होणे हा अनुभव सुखद असला तरी अनेकींना तो अनुभव ताणाचाही असू शकतो. प्रसूतीनंतर येणारे गंभीर स्वरूपाचे नैराश्य १० ते १५ टक्के गरोदर स्त्रियांमध्ये दिसून येते. सुरुवातीला नुसत्या तणावाच्या लक्षणांसारखी दिसणारी लक्षणे गंभीर नैराश्यात केव्हा बदलतात हे पटकन लक्षात येत नाही. त्यासाठी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे
आ पण अलीकडेच पेपरात एक हृदयद्रावक व अंगावर काटा आणणारी बातमी वाचली. त्या बातमीने सर्वाचा थरकाप उडाला. एका ४२ वर्षांच्या सुविद्य स्त्रीने आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला गळा चिरून मारले व नंतर स्वत:ही आत्महत्या केली. तिच्या घरात तिने एका चिठ्ठीत आपण स्वत: नैराश्येमुळे ही टोकाची कृती करीत आहोत, असे लिहून ठेवले होते. भारतीय संस्कृतीत अशा कृत्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
स्त्रीसाठी मातृत्व मिळणे म्हणजे जगातले सर्व सुख मिळाल्यासारखे असते. आई झाल्यावर ती ‘बाळा होऊ कशी उतराई’ म्हणत मातृत्व देणाऱ्या बालकाचे आभार मानते. ज्यांना मातृत्व लाभत नाही त्या स्त्रिया आपल्या दुर्दैवापुढे हैराण झालेल्या आढळतात. सर्वसाधारणपणे मातृत्व लाभणे ही आनंदाची गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर स्त्री आपल्या मातृत्वासाठी अधीर झालेली असते. आईपणात स्त्रीला तृप्त वाटते. आजी-आजोबा, मामा-मावशी सारे या नव्या पाहुण्याच्या आगमनाने व मिळालेल्या नव्या नात्यांमुळे आनंदी असतात; पण जन्मदात्या स्त्रीला मात्र काही वेळा हा निव्र्याज आनंद उपभोगता येईलच असे नाही. या काळात स्त्रीला बाळंतपणानंतरचे विविध मानसिक विकार होतात. वरील उदाहरणात त्या स्त्रीने चिठ्ठीत लिहून ठेवल्याप्रमाणे तिला औदासीन्याचा किंवा डीप्रेशनचा आजार झाला असावा. तो गंभीर स्वरूपाचा असल्यास वरीलप्रमाणे टोकाचे परिणाम दिसून येतात. सर्वसाधारणपणे बाळंतपणानंतर स्त्रियांमध्ये तीन महत्त्वाचे मानसिक आजार आढळतात-
१) बेबी ब्लू (ताणतणावाची लक्षणे)
२) उदासीनतेचा वा नैराश्येचा आजार
३)सायकॉसिस वा विचित्र वागणुकीचा आजार
बऱ्याच स्त्रियांना बाळंतपणानंतर कमी-जास्त प्रमाणात तणावाची लक्षणे दिसतात. सतत थकवा संभवतो. हुरहुर लागते. जीव अस्वस्थ होतो. झोप नीट लागत नाही. डोळे उगाचच भरून येतात. भूक लागत नाही. प्रसूतीनंतर तीन ते चार दिवसांत ही लक्षणे दिसू लागतात. बाळाच्या अतीव काळजीने ती त्रस्त होते. स्वत:ची व बाळाची काळजी घेताना तिचे लक्ष लागत नाही. ३० ते ७५ टक्के मातांमध्ये ही लक्षणे दिसतात. तीन ते चार महिन्यांपूर्वी आमच्या ओळखीतल्या एक तरुण बाई आपल्याला बाळ सांभाळायला जमणार नाही या भावनेने त्रस्त झाल्या होत्या. बाळाला आपल्या हातात घेताना व तिला दूध पाजताना त्यांना कुणी ना कुणी जवळ असले की बरे वाटत असे. तसे पाहिले तर त्या बाळाचे तसे व्यवस्थित करीत होत्या; पण त्यांचे मन शांत नव्हते. त्या हळव्या झाल्या होत्या. त्यांना सतत जाणवत होते की, हे नवे नवे आलेले आईपण त्यांना सोसवत नव्हते; पण पुढच्या महिन्या-दीड महिन्यात त्यांच्यात छान सुधारणा झाली. त्या बाळाची व स्वत:ची नीट काळजी घेऊ लागल्या. प्रसूतीनंतरची ही ‘हळवी’ लक्षणे किंवा पोस्टपार्टम ब्ल्यू थोडय़ा दिवसांत आपोआप बरे होते; पण दरम्यानच्या काळात घराच्यांनी अशा स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली पाहिजे. गर्भारपणातून व प्रसूतियातनांतून बाहेर आलेल्या स्त्रीसाठी तो पुनर्जन्म असतो, असे म्हणतात. त्या दृष्टीने ते खरेही आहे. गर्भारपणात होणारे शारीरिक बदल व त्रास, याशिवाय बाळ झाल्यानंतरही बाळाला सांभाळताना होणारी दगदग, निद्रानाश या गोष्टींमुळे हा ताणतणाव व भावनिक हळवेपणा जाणवू शकतो. तरीसुद्धा यातील २० टक्के स्त्रियांना प्रसूतीनंतरच्या पहिल्या वर्षांत गंभीर स्वरूपाचे नैराश्य येऊ शकते.
प्रसूतीनंतर येणारे गंभीर स्वरूपाचे नैराश्य १० ते १५ टक्के स्त्रियांमध्ये दिसून येते. बाळ झाल्यावर पहिल्या सहा आठवडय़ांतच औदासीन्याची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला नुसत्या तणावाच्या लक्षणांसारखी दिसणारी लक्षणे गंभीर नैराश्येमध्ये केव्हा जातात हे पटकन लक्षात येत नाही. सामान्य प्रमाणात जाणवणारे वरील मानसिक त्रास कमी होत जातात, तर नैराश्येची लक्षणे मात्र अधिक तीव्र होत जातात.
सुरुवातीला सुमन बाळ सांभाळताना त्याने दूध नीट प्यायलंय का? त्याचे पोट भरले असेल का? त्याला भूक लागली असेल का? असे सततचे प्रश्न उभे करी. यामुळे ती खूप अस्वस्थ वाटायची. चेहऱ्यावर सततची चिंता व काळजी यामुळे तिला स्वत:च्या खाण्या-पिण्याचे भानही राहत नसे. नीट झोप येत नसे. ती विश्रांतीही घेऊ शकत नव्हती. नंतर नंतर ती बाळाकडेच बसून राहू लागली. काही कारणाशिवाय जोरजोरात रडू लागली. आता तिला भूक लागेना, तिचे वजन कमी होऊ लागले, कशातही तिचे लक्ष लागेना. तिच्या नवऱ्याला सुटी घेऊन घरी बसावे लागले. आपल्याला बाळाला नीट सांभाळता येत नाही, असे तिला वाटू लागले. त्यामुळे मनात अपराधीपणाची भावना येऊ लागली. सुमन तिच्या नवऱ्याला आता म्हणू लागली, मला मूल सांभाळता येत नाही तर मुलाला जन्म द्यायची चूक मी करायला नको होती. आता बाळाला कोण सांभाळणार? बाळाचे पुढे कसे होणार? या विचारांनी ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिची प्रचंड घालमेल होऊ लागली. याशिवाय तिचे लक्ष लागत नसल्याने खरोखरच तिला बाळाचे करायला जमेना. तिचा आत्मविश्वासच कमी होऊ लागला. शेवटी तिच्या आईला बोलावून घ्यावे लागले. या महत्त्वाच्या नाजूक काळात मातेचे मानसिक स्थर्य व प्रसन्न मन खूप आवश्यक आहे; पण नैराश्येमुळे स्त्रियांना ना त्यांचे मातृत्व आनंदाने अनुभवता येते ना बाळाला व्यवस्थित सांभाळता येते.
याशिवाय त्यांना आपल्याला असे काही तरी विपरीत अनुभव येत आहेत याची खंत वाटते. आयुष्य व जगणे नकोसे वाटते. आत्महत्येचे विचार यायला लागतात. बाळाचे आपल्यानंतर हाल होतील, कोणी पाहाणारे नसेल, या भावनेने बाळाचे आयुष्यसुद्धा संपवावे व मग आपण आपले वेडेवाकडे करून घ्यावे, असे टोकाचे विचार स्त्रियांच्या मनात या काळात येतात. बाळंतपणानंतर येणाऱ्या नैराश्येची लक्षणे कशी ओळखावी?
० बाळाच्या जन्मानंतर बारा महिन्यांमध्ये आईला प्रचंड घालमेल झाल्यासारखे वाटते. आपण आई झालो आहे हे खूप कष्टप्रद आहे असे सर्वसामान्य स्त्रियांना वाटते; पण नैराश्येमध्ये मात्र आपण बाळाला सांभाळू शकणारच नाही, असा पराकोटीचा विचार तिच्या मनात येतो.
० या काळात तिला सतत रडू येते, अस्वस्थ वाटते, कशातही आनंद वाटत नाही, झोप लागत नाही. चिडचिड होते. भूक लागत नाही. बाळाची अतिकाळजी वाटते. त्याला काही तरी होईल असे वाटते किंवा बाळाची काही काळजीच करू नये असे वाटते. माझ्या एका रुग्णाला बाळाला पाजावे, त्याच्या जवळ जावे असे काही केल्या वाटेना. घरातले सर्व यामुळे चिडले. शेवटी सासूबाईंनी बाळाला आपल्याबरोबर घेऊन जायचे ठरविले, कारण ही अशी निष्ठुर कशी? बाळाला भूक लागते, ते रडते तरी तिच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही, असे विचार नातेवाईकांच्या मनात येत असत; पण भावनाच बधिर झाल्यामुळे त्या नवमातेला असे वाटू शकते. ते लक्षण तिचे हृदय पाषाणाचे झाल्याने होत नाही, तर तिला नैराश्येचा गंभीर आजार झाल्याने असे वाटते. बाळाबरोबर भावनिक जवळीक होत नाही असे वाटते. खरे तर तिचा आत्मा यामुळे खोलवर दु:खी झालेला असतो. तिच्या सुन्न मनालाच कळत नाही तिला असे का होते. यामुळे तिच्या मनात अपराधीपणाची भावना येत असते. या सगळ्या परिस्थितीतून तिला खरे तर दूर पळून जावेसे वाटते. कधी कधी आपल्या अशा वागण्यामुळे आपले बाळ आपल्यापासून कुणी हिरावून घेईल का, अशी भीतीही वाटते. कधी एकदा या भावनांच्या गत्रेतून आपण बाहेर येतो याची वाट ती आतुरतेने बघत असते.
० बाळंतपणानंतरचा सायकॉसिस किंवा ज्याला वेडेपणाचा झटका आला, असे म्हणतात ही अधिक गंभीर प्रकारची मनोविकृती आहे. बाळंतीण काही तरी असंबद्ध बोलते, विचित्र वागते, झोपत नाही, उत्तेजित होते. कधी कधी बाळाला मारायला जाते. तिला आपले बाळ आपले नाहीच असे वाटते. कुणा चेटकिणीचे किंवा राक्षसाचे बाळ असेल असे तिला वाटते. कधी ते जिवंत नाही असे वाटते. एकदा एका स्त्रीने तिच्या बाळाच्या आवाजातून गावातले वेशीवरचे भूत रडते असे वाटले म्हणून बाळाचे तोंडच फडक्याने बांधले, तर दुसऱ्या एका बाळंतिणीने आपले बाळ मृत झाले असे समजून सगळ्यांच्या नकळत त्या बाळाला एका मोठय़ा पातेल्यात ठेवले व त्यावर मोठी परात ठेवून बंद केले. घरच्यांच्या वेळीच लक्षात आले म्हणून ही दोन्ही बाळे वाचली. याशिवाय सायकॉसिसची इतर लक्षणेही या स्त्रियांत दिसतात. शिवीगाळ करणे, आक्रमक होणे, भ्रमात व भासाच्या जगात वावरणे, अंगावरचे कपडे फाडणे आदी पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांमध्ये येणारे बाळाबद्दलचे विचित्र भ्रम वा भास, बाळाकडे दुर्लक्ष करणे या लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून बाळांना गंभीर दुखापतीपासून वाचविता येईल.
वरील प्रकारच्या मनोविकारात लवकरात लवकर स्त्रियांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू करणे आवश्यक आहे. सायकॉसिस किंवा गंभीर डिप्रेशनमध्ये दवाखान्यात दाखल करून उपचार करावे लागतात. इलोक्ट्रोकनव्हल्सीव्ह उपचार दिल्यास आजार लवकर काबूत येऊ शकतात. याशिवाय आज उत्तम औषधोपचारही आहेत. लक्षणे काबूत आली म्हणून औषधोपचार डॉक्टरी सल्ल्याशिवाय थांबवू नयेत. काही वेळा हे आजार बाळंतपणानंतर सुरू होतात व इतर मनोविकारांप्रमाणे दीर्घकाल राहू शकतात, तर काही स्त्रियांच्या बाबतीत ते पुढच्या बाळंतपणात पुन्हा उद्भवू शकतात. लवकरात लवकर या मानसिक आजारांवर नियंत्रण मिळवून, आईचे व बाळाचे अमूल्य नाते जुळावे यासाठी डॉक्टरांना प्रयत्न करावे लागतात. दरम्यानच्या काळात बाळाची काळजी इतर नातेवाईकांनी करावी, ज्यामुळे आई तणावमुक्त राहून लवकरात लवकर मानसिकदृष्टय़ा सक्षम होईल.
बाळंतपणानंतरचे हे आजार शारीरिक बदलांमुळे, हार्मोन्सचा समतोलपणा कमी झाल्याने किंवा बाळंतपणाच्या तणावाने होऊ शकतात. याशिवाय आधीपासूनच काही मानसिक आजार असतील तर ते या काळात डोके वर काढतात. शिवाय बाळंतपणात काही वैद्यकीय आजार असेल, रक्त कमी झालेले असेल, शरीर नाजूक झालेले असते व इतर वैद्यकीय गुंतागुंत असेल, वैवाहिक व घरगुती समस्या वा ताण असेल, घरच्यांचा आधार नसेल तर उद्भवू शकतात. आजकाल नातेवाईकांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह झाला, तर नातेवाईक या जोडप्याला तोडून टाकतात. गर्भारपणात स्त्रीला कठीण परिस्थितीतून जावे लागते. खूप अडीअडचणी असतात. वर्तमान स्थितीत स्त्रियांवर आíथक जबाबदारीही प्रचंड असते. या सर्वाचा ताण स्त्रीवर गंभीर प्रमाणात होतो. म्हणून तिच्या हितचिंतकांनी, पालकांनी स्त्रीला भावनिक आधार द्यावा. जमल्यास माहेरीही न्यावे.
आजकाल ही प्रथा आधुनिक बदलांमुळे व एकत्र कुटुंब नसल्याने शक्य होत नाही. तरीही तिच्या नातेवाईकांनी तिची खूप काळजी घ्यावी. तिला उत्तम आहार व विश्रांती मिळेल असे पाहावे. तिला समाधान व प्रसन्न वाटेल यासाठी तिच्या प्रियजनांनी तिला मदत करावी. ती भावनिकदृष्टय़ा सक्षम झाली की बाळाची काळजी घ्यावयास लवकरच समर्थ होईल. नवरेमंडळींनी तर आपल्या पत्नीस या काळात मनापासून जपावे. ती जशी आपली प्रिय सखी आहे. तशीच ती आपल्या लाडक्या बाळाची आता आई आहे, तर तिच्यावरचे प्रेमही तेवढेच वाढले पाहिजे व तिच्याबद्दलचा आदरही वाढला पाहिजे.
डॉ. शुभांगी पारकर – pshubhangi@gmail.com
Too many of us are not living our dreams because we are living our fears.
-Les Brown

Whatever the mind of man can conceive and believe, it can achieve.
-Napoleon Hill

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?