पुष्पा भावे

आपण मुलांना शाळेत पाठवतो ते त्यांच्या सामाजिकीकरणासाठी. मुले शाळेत, वर्गात जातात, मैदानावर खेळतात, नवे नवे मित्र करतात. पण याच प्रक्रियेत धार्मिक हेटाळणी आघात करू लागली तर काय होईल? विशेषत: ज्या मुस्लीम घरात मुलांना ‘मुस्लीम’ म्हणून वाढवलं जात नाही, त्या घरातील मुलांवर या प्रक्रियेमुळे मानसिक आघात होतो तेव्हा काय होतं? प्रसिद्ध लेखिका नाझिया इरम यांनी त्यांना जाणवणाऱ्या अशा अंधाऱ्या कोपऱ्यांचा अभ्यास प्रत्यक्ष प्रसंग, मुलाखती, शाळांशी संवाद या अनेकविध माध्यमांतून केला असून त्यातूनच ‘मदरिंग अ मुस्लीम’- ‘द डार्क  सिक्रे ट इन अवर स्कू ल्स अ‍ॅण्ड प्लेग्राऊंडस्’ हे पुस्तक तयार झाले आहे. एकूण समाजमनाचा यात विचार असला तरी त्यातून व्यक्त होणारी मूलभूत काळजी आईची आहे..

नाझिया इरम यांचे ‘मदरिंग अ मुस्लीम’- ‘द डार्क  सिक्रे ट इन अवर स्कू ल्स अ‍ॅण्ड प्लेग्राऊंडस्’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं आणि कोवळ्या मुलांच्या जगातही हास्यविनोदांच्या किंवा वरवर सौम्य वाटणाऱ्या हेटाळणीच्या स्वरूपात भेदभाव कसा आतपर्यंत भिनला आहे, याचा भीषण पैलू त्यातून समोर आला. अगदी शाळांमध्ये आणि क्रीडांगणांमध्येच निर्माण होणारे हे ‘अंधारे कोपरे’ या आईच्या नजरेतून उलगडले गेले आहेत..

लेखिका सांगतात,  ‘‘२०१४ मध्ये आई झाल्यावर मी विचार करायला लागले.. तेव्हा अल्पसंख्य मुस्लीम समुदायात भय जाणवत होते. आपला देश धार्मिक भेदाने विभागला होता. मी माझ्या छोटय़ा मुलीला- मायराला  हातात घेतले तेव्हा भयाने ठाव घेतला. मला तिला मुस्लीम नाद असलेले नाव ठेवायचेही भय वाटले. पण मी शिक्षित, नागरी बाई असल्याने मला हे चेहरा नसलेले भय नाकारायचे होते. माझ्या मुलीसाठी मला सकारात्मक भविष्य हवे होते, ते शक्य होते की नाही ठाऊक नव्हते.  मी माझ्या आसपासच्या संवादाला कान दिला, तर त्यात मुस्लीम आईपणाकडे पाहाण्याचा नागरी मध्यमवर्गीय दृष्टिकोन काही ऐकू येत नव्हता. मला समजून घ्यायचे होते, की मुस्लीम आईची काळजी ख्रिश्चन, शीख, हिंदू मातांपेक्षा वेगळी होती का? तिच्यासमोर असणाऱ्या आव्हानांविषयी मी काहीच कसं ऐकलं नव्हतं? म्हणून मग त्या रिकाम्या अवकाशात मी शोध सुरू केला. तो हा प्रवास आहे.. ’’

‘‘माझ्या संशोधनासाठी १२ शहरांतील १४५ कुटुंबांकडे मी गेले. केवळ मुस्लीम मोहल्ल्यात राहणाऱ्या कुटुंबाकडे मला जायचे नाही, याविषयी माझ्या मनात स्पष्टता होती. माझ्यासारख्या मिश्र वस्तीत राहणाऱ्या, भारत ही संकल्पना वास्तवात जगणाऱ्या कुटुंबांकडे मला जायचे होते. शिक्षित स्त्रीच्या अनुभवांकडे मला जायचे होते. माझ्या संशोधनात मला खूप सच्च्या मुस्लीम बायका भेटल्या, प्रसूतितज्ज्ञ, ‘गूगल’मध्ये  नोकरी करणारी, बालमानसशास्त्रज्ञ, आखूड केस कापलेली, पोहणारी स्त्री, अशा अनेक जणी भेटल्या. यात एक खासदार आणि एक स्त्रीवादी विचारांची स्त्रीसुद्धा  होती.  तुम्ही लक्ष दिलंत तर तुमच्या अवतीभवतीही त्या होत्या. पण त्या सगळ्या काळजीत होत्या. त्यांची मुले ‘इस्लामोफोबिया’ची शिकार होतील, शाळेत आणि क्रीडांगणावर त्यांना सामावून घेतले जाणार नाही, याची भीती त्यांना वाटत होती. अनेकींना तसे अनुभवही आले होते. त्यांनी मला त्या कथा सांगितल्या, पण त्याविषयी कुठे बोलू नकोस असा इशाराही दिला. पण अशा घटनांचे वारंवार घडणे, शाळांनी त्याची दखल न घेणे, याचे प्रमाण इतके होते की गप्प बसणे मला कठीण होते. मला भेटलेल्यांपैकी ८० टक्क्यांवर मुले त्यांना वर्गात, खेळाच्या मैदानावर धर्मामुळे त्रास झाल्याचे सांगत होती. पण मुस्लीम समाजातही त्याची चर्चा होत नव्हती. ’’

आपल्या या शोधासाठी लेखिकेने दिल्लीतल्या प्रमुख शाळांची यादी केली आणि सगळ्यांशी संपर्क सुरू केला. काही पालक मुलांना असा काही त्रास होतो हेच नाकारत. तर काही जण सांगायचे की त्यांच्या मुलांना ‘अतिरेकी’, ‘पाकिस्तानी’, असे संबोधिले जायचे, पण आम्हीच मुलांना त्याची वाच्यता करू द्यायचो नाही. इरम सांगतात, ‘‘मी ११८ अशा मुस्लीम कुटुंबांशी बोलले, ज्यांची मुले पाच ते २० वर्षांची होती. ती दिल्ली, नोएडा, गुरुग्राममध्ये (पूर्वीचे गुरगांव) शिकत होती. शंभरावर मुले म्हणाली, की त्यांना ‘पाकिस्तानी’ वा ‘अतिरेकी’ असे कधी ना कधी म्हटले गेले. हा आकडा दचकवणारा होता. त्यामुळे मी त्यामागील कथा शोधू  लागले. माझी शेजारीण अरिफा ही ४५ वर्षांची कलातज्ज्ञ आहे, दोन मुलांची आई आहे. ही मुले नोएडामधील आंतरराष्ट्रीय शाळेत शिकत होती. आदल्या रात्री एक मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. अरिफाचा साद त्या वेळी दहा वर्षांचा- पाचवीत होता. इंग्लिशचा तास सुरू व्हायचा होता आणि शिक्षिकेच्या टेबलवर वृत्तपत्र पसरले होते. शिक्षिका वर्गात आली, त्या वृत्तपत्रातील हल्ल्याची बातमी तिने वर्गात वाचून दाखवली. ‘जगात काय काय होते आहे,’ असे म्हणून ती खाली बसली आणि अचानक एक विद्यार्थी, ‘साद, तू हे काय केलेस!’ असं मोठय़ाने ओरडला.  वर्गात शांतता पसरली, पण शिक्षिका त्यावर काहीच म्हणाली नाही. त्या काही बोलतील म्हणून गळ्यातला आवंढा गिळत साद वाट पाहात होता. पण काहीच घडले नाही. अरिफा म्हणते, की २०१४ च्या राष्ट्रीय निवडणुकीनंतर बदल दिसू लागले. लोक तुमच्या तोंडावर मुस्लिमांविषयी बोलू लागले. त्याचे पडसाद शाळेतल्या मुलांच्या बोलण्यात उमटू लागले. एकमेकांना चिडवणे शाळेत पूर्वीही होते. पण आता मुस्लीम विद्यार्थ्यांना धार्मिक बाबतीत हिणवले जाऊ लागले. बातम्यांमधील भाषा शाळेत येऊ लागली. १९९० पूर्वीही शेरे मारले जात होते, पण १९९० नंतर त्याची तीव्रता, सूर चढा झाला. आता त्याची वारंवारिता वाढली आणि विनोदाची जागा शत्रुत्वाने घेतली. विनोदाने असे शेरे चालू शकतात असे नाही, तरीही अतिरेकी कारवाया आणि मुस्लीम यांचा संबंध लोकांच्या मनात किती घट्ट आहे ते कळते. आता संदर्भ बदलले आहेत. जगातील अतिरेकी हल्ल्यांचे विशेष त्यात मिसळले आहेत. अशा प्रसंगात काही मुस्लीम मुलांच्याही प्रतिक्रिया वेगळ्या असतात. रफतला अरिफाचे बोलणे पटत नसे. ‘ते आम्हाला अतिरेकी म्हणतात काय, मग दाखवतो.’ असे म्हणून तो मारामारी करतो. घरच्यांना त्याला आवरावे लागते. ‘ज्यांना तर्क कळत नाही त्यांच्याशी तर्काने काय भांडायचे,’ असे त्याचे म्हणणे असते. तर काही मुले सारं विसरून पुन्हा खेळ खेळायला लागतात.’’  लेखिका म्हणते, ‘‘मी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत शाळेतल्या मुलाखती घेतल्या, पण इतर स्तरांतील परिस्थिती आणखी वाईट असणार. शाळेतल्या वरच्या वर्गात मुलांना, तुमचे वडील तालिबानी आहेत का?  ते बॉम्ब बनवतात ना? किंवा मुलींना- तुझे उघडे पाय वडिलांना चालतात का? असे प्रश्न विचारले जातात. काही पालकही शारीरिक  इजेला महत्त्व देतात, पण शाब्दिक हल्ल्यांकडे लक्ष देत नाहीत.’’

मला वाटते, या पालकांना १९९०च्या पुढे मुलं वाढवताना मुस्लिमांबद्दलच्या नकारात्मक भावनेला सतत तोंड द्यावे लागले. आजच्या मुस्लीम मुलांचे आजी-आजोबा फाळणीच्या वेळी लहान होते अथवा फाळणीनंतर जन्माला आले असतील. त्यामुळे आताच्या मुलांना  फाळणीच्या कथा दूरवरच्या आहेत. ते आता भारताचा मातृभूमी म्हणून विचार करतात. मग त्यांना पाकिस्तानी अथवा अतिरेकी म्हटल्यावर कसे वाटत असेल? त्यांना त्यांचे भविष्य घडवताना आपण काय देतोय?

‘‘अशा घटनांच्या पाश्र्वभूमीवर सेइलाने एक सकारात्मक गोष्ट सांगितली.’’ नाझिया सांगतात, ‘‘ तिचा मुलगा शिकत असलेल्या ‘शिव नाडर शाळे’त अशा घटना झाल्यावर त्या फार सुंदर प्रकारे हाताळल्या गेल्या. त्यांनी ही संधी घेऊन ‘आपण आणि ते’ ही सर्वनामे वेगवेगळ्या संदर्भात वापरली. भेद, विषमता ही राष्ट्रभर किती प्रकारची असते, ते वर्गात समाजावून सांगितले. धर्म हा त्यातला एकच भेद आहे हे ठसवले. इतका मोकळा प्रतिसाद माझ्या संशोधनात मी प्रथमच पाहिला. नाही तर मुले बोलत नाहीत, पालकांना कळले तरी ते बोलत नाहीत आणि गोष्टी घडतच राहातात, ’’असं ही लेखिका सांगते. ‘‘अशा गोष्टी दिल्लीत फारच आहेत. पण भारतभर नैनितालपासून बंगळूरुच्या वसतिगृहांत त्या पसरल्या आहेत. एका शिक्षकाने मुस्लीम विद्यार्थ्यांची विभागणी अशी केली, की ते इतर धर्माच्या मुलांबरोबर  एकत्र असणार नाहीत. मुंबईतही हे घडत असते, पण ते खाण्याच्या संदर्भात. पण एकू णच हे प्रकार

कुठपर्यंत जाऊ शकतात?’’ लेखिका सांगते, ‘‘माझा नवरा बंगल्यात चोरी झाली म्हणून तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनवर गेला. तर तिथला अधिकारी म्हणाला, ‘तुमच्यातल्या एकाचे नाव यासर, दुसऱ्याचे सैफ आणि तिसऱ्याचे महंमद. तुमच्याविषयी तक्रार लिहू की तुमची तक्रार घेऊ?’ हे ऐकून ते तिघे परतले, पण व्यवस्थेविषयी भय घेऊनच. ’’

‘‘या क्रिया-प्रतिक्रिया फार गुंतागुंतीच्या आहेत. त्याचा अधिक अभ्यास व्हायला हवा. निधर्मी जोडप्याने वाढवलेले मूल अचानक धर्माचरण करायला लागते तेव्हा पालकही गोंधळून जातात. हे बाहेरचे संस्कार कु ठून येतात ते कळत नाही. ती कोडी नाजूकपणे सोडवावी लागतात. तर कधी पालक विनाकारण साशंक होतात. आपल्या मुलाने दाढी वाढवली म्हणून चिंता करणारे पालकही दिसतात. काही वेळा मानसिकदृष्टय़ा खचत जाणारे तरुण-तरुणी धार्मिक होत जातात. कधी हे धर्मकारण तात्कालिक असते तर कधी ते बोगद्यातून लांब जाते. त्यामुळे सजग पालकांना काळजी वाटतेच.

खरं पाहायला गेलं, तर अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या भारतीय तरुणांची संख्या इतर देशातील मुस्लिमांपेक्षा कमी आहे. पण बहुतेक वेळा अधिक शिक्षित, चांगल्या वातावरणात वाढलेली मुले अशा कारस्थानाला बळी पडतात तेव्हा काळजी वाटते. अर्थात याविषयी काळेगोरे विधान करणे अवघड आहे. मदरसामधून  शिकलेल्या मुलांविषयी फार बोलले जाते, पण ‘इसिस’मधील फक्त पाच टक्के विद्यार्थी तरुण मदरशातून आले आहेत. बाकी सगळे इतर शाळांतून आले आहेत. आंतरराष्ट्रीय अतिरेकी कृत्यात गुंतलेले अनेक उच्चशिक्षित आहेत. ९/११ मध्ये गुंतलेला महंमद अटा कैरो विद्यापीठात वास्तुशिल्प शिकला होता. त्याच कृत्यात सहभागी जियाद जारा श्रीमंत कुटुंबात वाढला होता आणि जर्मनीत हवाई अवकाशशास्त्र शिकला होता. त्यामुळे निधर्मी पालकांना काळजी वाटणे साहजिक होते.

या पुस्तकात एकाच बाजूचे पुरावे वा उदाहरणे नाहीत. खूप वेगवेगळी उदाहरणे आहेत. या स्वरूपाचे पुस्तक महाराष्ट्राविषयी कु णीतरी लिहायला हवे. मुस्लीम धर्मातील लहान मुलांना आणि दलित वर्गातील लहान मुलांना होणारा त्रास शेजारी ठेवूनही पाहिला पाहिजे.

नाझिया इरमने ज्या छोटय़ा मायराला हाती धरून काळजी करायला सुरुवात केली, तिच्याकडे ती लांबच्या वाटेने परत येते. नाझियाची आई गोड आवाजात कुराण वाचायची, ते वाचन संपत आले की मुले दुवा घ्यायला यायची. आता मायरा मोठी होते आहे, तिची आई कुराण वाचीत नाही. पण मायरा बाहेरच्या जगाशी संपर्क साधून आहे. हळूहळू एक एक बोट सुटते आहे. नाझिया म्हणते, की आता मला आईची आठवण येते. ती दुवा द्यायची तेव्हा बाहेरच्या जगापासून आम्हाला सुरक्षित ठेवायची. आज मीही मायराला बाहेरच्या जगाशी नवनवे संबंध जोडून देते आहे. सुरक्षित ठेवते आहे.