मुंबईत येणाऱ्या बेला किंवा माझ्यासारख्या लाखोंची गोष्ट ही मुंबईची, आमची आणि आमच्या महत्त्वाकांक्षांची गोष्ट आहे. आणि या तिन्हीचं आपसातलं नातं आमच्या आमच्या गोष्टींचे दु:खान्त किंवा सुखान्त ठरवेल. म्हणूनच मुंबईचं आणि माझं नातं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मी ते कधीच गृहीत धरलेलं नाही..
त्या दिवशी सात बंगल्याच्या समुद्रकिनारी चित्रीकरण चालू होतं माझं. सकाळचे आठ वाजले असावेत. कॅमेरा, लाईटस् सेट होईपर्यंत मी समुद्रकिनारी फेरफटका मारायला निघाले. थोडी पुढपर्यंत गेले. किनाऱ्यावर फारसं कुणीच नव्हतं. हळूहळू शूटिंगचे लोकही मागे पडत गेले, दूर राहिले. चालता चालता दूर एक आकृती अस्पष्ट हलताना दिसली. थोडी पुढे गेले तर लक्षात आलं ती एक मुलगी होती. तिच्या आसपास कुणीच नव्हतं. तरी तिचे बोलल्यासारखे हातवारे दिसत होते. अजून पुढे गेल्यावर ती नीटच दिसली. जीन्स, त्यावर हिरवा स्लीव्हलेस टी शर्ट, त्यावर काळं खिशांचं स्लीव्हलेस जॅकेट, कुरळे केस. नाकात रिंग. दिल्लीच्या सुंदर डोळ्यांच्या मुली बऱ्याचदा घालतात तसं डोळ्यात सुरम्याचं काजळ. जवळून पाहिल्यावर लक्षात आलं, वय चाळिशीच्या आसपासचं असावं. पेहराव मात्र तरुण होता. तरुण दिसण्यासाठी धडपडणारा.. तिच्यापासून थोडय़ा अंतरावर मी थांबले. तिचं ते स्वत:शी बोलणं पाहत. भीती वाटली. ती दिसायला वेडी दिसत नव्हती. पण आत्ता तिला कसलंच भान नव्हतं. माझंही. तिचा समुद्राएवढा एकटेपणा तिच्या डोळ्याखालच्या काळ्याशार अर्धवर्तुळात साचून राहिला होता. ती मधेच ओरडल्यासारखं करत होती, मधेच स्वत:शी काही तरी पुटपुटत होती. कान देऊन ऐकल्यावर जाणवलं, ती खूपच घाणेरडय़ा शिव्या देत होती. बोलता बोलता मध्येच फे ऱ्या घातल्यासारखं चालत होती. चालण्यातली तरतरी पाहून दारूच्या नशेत नसावी असं वाटत होतं. वेगळ्या कुठल्या ‘तरतरी आणणाऱ्या’ नशेत असेलही कदाचित. ती तिथे रात्रभर होती का.. तिला मुंबईत कुणीच नाही का. तिच्यापर्यंत काहीच पोचू शकणार नाही असं वाटत होतं.. तीसुद्धा. तिच्या हातातनं बरंच काहीसं निसटून चाललेलं.. त्याचा बेफाम हतबल राग.. तिला तिची एक गोष्ट होती. तिच्या विचित्र स्वत:शी बडबडण्यात आणि हातवाऱ्यांत ती दिसत होती. ती गोष्ट आहे गावागावाहून, कुठून कुठून ‘मोठं’ होण्याची स्वप्नं घेऊन मुंबईत आलेल्यांची गोष्ट! कित्येकांची गोष्ट. त्या अनेक गोष्टींचे सुखान्तही पाहिलेत. पण माझ्यासमोरच्या त्या एकटय़ा जीवाचं अस्पष्ट बरळणं आणि शिव्या जी गोष्ट सांगत होती, ती खचितच दु:खान्ताकडं निघालेली..
राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात असताना मी एक नाटक केलं होतं. ‘बेला मेरी जान!’ स्वानंद किरकिरेनं लिहिलं होतं. ही होती सांगलीसारख्या छोटय़ाशा गावाहून मुंबईला नाव कमवायला आलेल्या बेला या शास्त्रीय गायिकेची गोष्ट. बेला लौकिकार्थानं प्रचंड यशस्वी होते. तिच्या यशाच्या रस्त्यावर ती वेगवेगळ्या टप्प्यांवरची मुंबई पाहते. रस्त्यावरच्या छक्क्यापासून ते एका सुपरस्टार नटापर्यंत. गावाहून आलेली ती जबर महत्त्वाकांक्षी मुलगी मुंबईमध्ये बदलत बदलत जाते. यशाच्या आणि तिच्यामध्ये आलेली प्रत्येक गोष्ट ती बाजूला करते. त्यासाठी एकाचा जीवही घेते. बारमध्ये नाचते. गावाहून तिची धाकटी बहीण गायिका बनण्यासाठी येते. तेही तिला सहन होत नाही. तिच्या यशात कुणीही वाटेकरी नको आहे तिला, बहीणसुद्धा. अनेक माणसांचा वापर करत अखेर ती यशस्वी होते. तिचा अल्बम सुपरहिट होतो. तोच तिच्या लहान बहिणीनं मुंबईत जीव गमावला आहे, असं बेलाला कळतं आणि ती भानावर येते. आता ती लौकिकार्थानं यशस्वी आहे. पण एकटी. मला बेलाची महत्त्वाकांक्षा आकर्षक वाटते. ती माझ्यातही आहे. तिच्या पायी आहे नाही ते सर्वस्व पणाला लावायची तिची ताकद मला स्तीमित करणारी आहे. पण तिचे रस्ते मात्र मला पूर्ण अनोळखी आहेत. मलाही यश आवडतं, खूप, पण यशाकडे जाणारे रस्ते फक्त एकटेच नसतील; दुकटेही असतीलच की! मी मुंबईत बरेच दुकटे रस्ते शोधले आहेत, शोधते आहे. मुंबईत येणाऱ्या बेला किंवा माझ्यासारख्या लाखोंची गोष्ट ही मुंबईची, आमची आणि आमच्या महत्त्वाकांक्षांची गोष्ट आहे. आणि या तिन्हीचं आपसातलं नातं आमच्या आमच्या गोष्टींचे दु:खान्त किंवा सुखान्त ठरवेल. म्हणूनच मुंबईचं आणि माझं नातं माझ्यासाठी फार फार महत्त्वाचं आहे. मी ते कधीच गृहीत धरलेलं नाही. मी बेलाची भूमिका केली तेव्हा मुंबई मला पूर्ण अनोळखी होती. तेव्हा मुंबई दूर होती. मी दिल्लीच्या राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून तिच्याकडे पाहायचे तेव्हा दुरून ती खूप काही वाटायची. चमचमणारी, भव्य, खूप जास्त मोठ्ठी, भीतिदायक, प्रचंड आकर्षक, उर्मट, सडेतोड, अजून खूप काही. आता गेली इतकी र्वष मुंबईत राहूनही ती अजूनही मला वेगवेगळं काय काय वाटतेच आहे. अजूनही मी ‘मुंबईला’ शिकते आहे. म्हणजे, मुंबई मला ‘मुंबई’ हा विषय फार उत्तम शिकवते आहे. मुंबईतल्या सगळ्या एकटय़ा दुकटय़ा रात्री, दिवसांसकट मुंबई मला छान मोठं करते आहे. तिचं माझं काहीच नातं नाही असं वाटवणारा एखादा दिवस अजूनही येतो. पण असाही एक दिवस असतो, तेव्हा कुठल्याशा प्रयोगानंतर कुठल्याशा थिएटरबाहेर पाणीपुरी खाऊन तुम्ही लोकल स्टेशनच्या दिशेनं चालत असता आणि अचानक आतून शांत आनंदात वाटतं, ‘हे माझंच शहर आहे! ही मुंबई माझी आहे.. किती बरं झालं मुंबई या जगात आहे.. नाही तर मी कुठे राहिले असते!’ तेव्हा मुंबईला घट्ट मिठी मारावीशी वाटते!
इतक्या वर्षांनंतर, इतक्या ओळखीनंतर अजूनही कधी कधी मुंबईची भीती वाटते. एखाद दिवशी वाटतं, मुंबई खूप जास्त मोठी आहे आणि मी फार फार लहान किंवा कुणीच नाही.. सुदैवानं या ‘कुणीच नाही’च्या क्षणी माझा समतोल जागवणारी किती तरी माणसं मला माझ्या आयुष्यानं आणि या मुंबईनच भरभरून दिलीत. त्या सर्वानी मला मुंबईला तिच्या आहे त्या आकारात आणि मलाही माझ्या आहे त्या आकारात बघायला शिकवलं आहे. मी अजूनही ते शिकते आहे. नुकतीच ते शिकवणारी एक गोड मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे. अजून लौकिकार्थानं ती सर्वाना माहीत नाही, प्रसिद्ध नाही. ती पण कुठल्याशा कानाकोपऱ्यातल्या गावाहून मुंबईला आली आहे. माझ्या एका मित्राची मैत्रीण. तो मित्र मला म्हणाला, ‘‘तिला जरा मार्गदर्शन कर.’’ मी म्हटलं,‘‘हट रे! मला नाही येत असं काही!’’  तर ‘एकदा भेटच’ म्हणून अडून बसला. म्हणून तिला एके दिवशी संध्याकाळी सहाची वेळ दिली. मुंबईच्या पार टोकाच्या उपनगरातून तीन-चार तास प्रवास करत ती बरोबर सहाला दोन मिनिटं कमी असताना दारात. आल्या आल्या अगदी सहजपणे माझ्या हातात अबोलीच्या फुलांचा सुंदर गजरा दिला. कुठल्याशा स्पर्धेत तिला ‘फुलराणी’ नाटकातला एक उतारा सादर करायचा होता. तो कागद उघडला. मी ती भूमिका आधी केलेली असल्यानं त्याविषयी तिला काही सांगावं अशी अपेक्षा होती. निर्मळ, प्रसन्न, हसरा चेहरा. कोवळा आवाज. सहज तिच्याविषयी विचारावं म्हणून म्हटलं,‘‘आई- बाबा कुठे असतात तुझे?’’ तितक्याच सहजपणे ती म्हणाली,‘‘आई-वडील नाहीत. अनाथाश्रमात वाढले.’’ माझा चेहराच बदलला. म्हटलं,‘‘अगं.. मग आता कुठे राहतेस.. एकटीच.. का म्हणजे..’’  ‘‘मैत्रिणीबरोबर एका फ्लॅटमध्ये राहते.’’ मी तिला ‘फुलराणीतल्या’ त्या उताऱ्याबद्दल सांगायला घेतलं. ‘‘हे बघ, या स्वगताआधी ती मुलगी बालकवींची ‘फुलराणी’ कविता म्हणत असते, त्या कवितेत ती ‘आईच्या मांडीवर बसूनी झोके घ्यावे गावी गाणी’ या ओळीपाशी थबकते. कारण तिची आई लहानपणीच गेलेली असते. आईच्या मांडीवर बसणं तिनं कधी अनुभवलंच नाही.. कविता म्हणता म्हणता ते तिला जाणवतं. आणि ती थबकते. कळलं?’’ ती शांतपणे माझ्याकडे बघत म्हणाली, ‘‘हो, कळलं.’’ मी बंद पडल्यासारखी थांबले. न राहवून म्हटलं, ‘‘चांगला होता ना गं आश्रम? हल्ली किती काय काय ऐकू येतं. अनाथाश्रमांबद्दल..’’   
ती उत्साहानं म्हणाली, ‘‘नाही नाही, आमचा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा होता, खूप चांगला आश्रम होता. मला खूप छान छान गोष्टी शिकवल्यात तिथे.’’ जम्मूहून म्हणे तिला महाराष्ट्रातल्या कुठल्याशा अनाथाश्रमात आणलं गेलं. सुंदर त्वचा. लांब केस.. तिला तिच्या अनाथाश्रमाने एक फार छान सवय लावली आहे, रोज रात्री डायरी लिहिण्याची. त्याशिवाय ती कधीच झोपत नाही. ती उत्तम स्वयंपाक करते. मोदक, पुरणपोळ्यांपासून सगळं. त्यामुळे मैत्रिणी तिच्यावर खूश असतात. पैशांसाठी सध्या कुठल्याशा शाळेत शिकवते. तिच्या घराला गच्ची आहे. या गच्चीत तिनं एकशे एक्कावन्न झाडं लावली आहेत. तिथंच एक लव्ह-बर्डस्चा पिंजराही आहे. ते पक्षी सतत चिवचिवत असतात. ती तिची लिखाणाची आवडती जागा आहे. घरी तिला एकटं वाटू नये म्हणून तिनं कुत्री पाळलीत दोन. ती खूप वाचते. कविता करते. तिच्या कविता वाचल्यावर जाणवलं, तिची शब्दांशी मैत्री आहे. तिच्या मी वाचलेल्या दोन्ही कविता गरीब आणि एकटय़ा राहणाऱ्या बायांवर होत्या. त्या बायकांच्या जगण्यात मला त्या मुलीचीच मूल्य दिसत होती. जगणं एकटं असलं तरी सुंदर करायची. निघताना म्हणाली, ‘‘मुंबईत कधी कधी खूप एकटं वाटतं. रडू येतं. चिडचिड होते. पण मी ठरवलं आहे, रडू आलं की पटकन मनाला दुसरीकडे न्यायचं. मोजून सत्तर मिनिटं ठरवून वेगळी काही तरी गोष्ट करायची. मी काय करते, वाचन करते. कुठलंही एक पुस्तक सतत माझ्याबरोबर असतच. मला रडू येतं आहे, एकटं वाटतं आहे असं वाटलं की मी लगेच ते पुस्तक काढून वाचायला घेते. कुठंही, अगदी लोकलमध्येही. मग सत्तर मिनिटं मी वाचते. रडू जातं. चिडचिड कमी होते. अर्थात जिथे चिडायला पाहिजे तिथे मी भरपूर चिडतेपण! पण मी माझ्या चिडचिडीला ‘यूज’ करते, माझ्या चिडचिडीला मला ‘यूज’ करू देत नाही..’’ मी म्हटलं, ‘‘अभिनयात करायचं आहे तुला करिअर? लिहितेसपण छान..’’ तर म्हणाली, ‘‘मनापासून प्रयत्न करून आतून जे जे वाटतं ते सगळंच करणार. झालं तर छानच. नाही तर जे काही करेन ते मनापासून करेन. काम माझ्या आवडीचं असेल नाही तर नावडीचं; मी ते नीट आणि मनापासूनच करणार!’’ तिचा रस्ता तिला लौकिक यशाकडे नेणार की नाही ते काळच सांगेल. पण ती मुंबईला ‘यूज’ करेल; मुंबई तिला नाही, हाच विश्वास या क्षणी मला दिलासादायक वाटतो आहे.   

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !