‘‘माधव यांनी माझ्या आईला माझ्या गाण्याविषयी दिलेला शब्द आजपर्यंत पाळला. ते स्वत: कलाकार असल्याने कलाकार स्त्रीशी लग्न केल्यानंतर करावी लागणारी तडजोड, समजून घेणे, प्रोत्साहन देणे, साथ देणे याची त्यांना जाण होती. मी गाण्याच्या दौऱ्यावर गेल्यावर मुलांवर चांगले संस्कार करणे, चांगले वळण लावणे हे सारे काही या क्षणापर्यंत त्यांनी खंबीरपणे सांभाळले. सांगलीतल्या आशा नावाच्या कळीला माधवाने साद घातली व आता आशा आणि माधव फुलांच्या पायघडय़ांवरून चालत आहेत. एकमेकांना दिलेला शब्द जोजावत! या आयुष्याच्या िदडीत भक्तीचा, प्रेमाचा सूर भरून राहावा हीच मनोमन इच्छा आहे.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर आपले पती   माधव खाडिलकर यांच्याबरोबरच्या ३९ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
सांगलीत माझ्या माहेरी ‘गुरुकृपा’ वाडय़ाच्या अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला! वाडय़ाच्या शेजारच्या रस्त्यावरून जाणारा-येणारा प्राजक्ताच्या दरवळानं भारलेला! १९६९ साली याच रस्त्यावरून दोन तरुण चालले होते. त्यातल्या एकाने सांगितले की, ‘या ‘गुरुकृपा’ वाडय़ातल्या एका मुलीशी केव्हा तरी माझे लग्न होणार. तू लिहून ठेव.’ त्यावर   थट्टामस्करी होऊन दोघेही आपापल्या कामाला निघून गेले. त्या वेळी वाडय़ातली ‘ती’ मुलगी अवघी चौदा वर्षांची होती. (हे अर्थात मला नंतर कळलं.)
  १९७४ ला विटय़ाच्या जोगळेकर वकिलांची मुलगी, वासंती आमच्या वाडय़ात बी.एड. करण्यासाठी राहायला आली. तिची आणि माझी चांगलीच गट्टी जमली. तिच्या आजोळपासून सर्वाशीच माझ्या आई-दादांचा जिव्हाळ्याचा परिचय होता. मी माझी शाळा, अभ्यास, गाण्याचा रियाज झाला की तिच्या खोलीत जाऊन बसायची. एक दिवस दुपारी बाराच्या सुमाराला जर्मनीहून परतलेला तिचा मामा तिला भेटायला खोलीवर आला. तिने माझी ओळख करून दिली, ‘हे माधव खाडिलकर. माझे मामा, माधवमामा!’ त्यानंतर पाच-दहा मिनिटांतच मी माझ्या घरी पळून आले. मामाचं व्यक्तिमत्त्व देखणं होतं, एवढंच माझ्या लक्षात राहिलं. मी तेव्हा बी.ए.च्या तिसऱ्या वर्षांला होते. दोन दिवसांनी मला वासंतीनं हळूच सांगितलं की, माझा मामा लग्नाचा विचार करतो आहे व त्याला गाणारीच बायको करायची आहे. मग त्याच्या बी.कॉम.पर्यंतच्या शिक्षणाबद्दल, त्याने एनएसडीमध्ये नॅशनल स्कॉलरशिप मिळवून नाटय़विषयक पदवी मिळविली व त्यानंतर जर्मनीची इंटरनॅशनल थिएटरची स्कॉलरशिप मिळवून, दीड वर्ष तेथे राहून आता, ‘मुंबई मराठी साहित्य संघा’मध्ये नाटय़शाखेचे प्रमुख म्हणून काम करतो आहे. वगरे माहिती वासंतीनं मला सांगितली. नंतर काही दिवसांतच तिच्या आईनं माझ्या वडिलांना आमच्या लग्नाबद्दल विचारले. त्या वेळी नाटय़ व्यवसायाला स्थर्य नसल्यामुळं, जावयाला कायमस्वरूपी नोकरी असावी, हा माझ्या वडिलांचा आग्रह होता. खरं तर मी त्या वेळी त्यादृष्टीने स्वत:कडे नीट पाहिलेही नव्हते!  बीएनंतर मुंबई-पुण्यात जाऊन गुरूंकडून संगीताचं शिक्षण घ्यावं, खूप रियाज करावा हे माझं स्वप्न होतं, पण त्यासाठी माझ्या वडिलांना सांगलीत एकटय़ाला ठेवून आई माझ्याबरोबर येऊ शकत नव्हती. माधव खाडिलकरांशीच माझं लग्न व्हावं, असा आग्रह निरनिराळ्या पण अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीसुद्धा करत होत्या. अचानक एके दिवशी ‘ह्य़ांचं’ पत्र दादांना आलं. ‘ह्य़ांना’ देना बँकेत पीआरओ म्हणून नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी त्या पत्रात होती. आईनं मला परत माझं मत विचारलं. मला लहानपणापासूनच श्रीमंती, पसा, बंगला, गाडी याचा लोभ नव्हता. मी आईला सांगितलं की, ‘माझं गाणं जपणारा, प्रोत्साहन देणारा असा चांगल्या मनाचा व रसिक माणूस मला मिळावा.’ या घटनांच्या अगोदर मी त्यांना पाहिलं होतं, पण भेटले बोलले नव्हते. शेवटी माझ्या वडिलांच्या होकारानंतर आमचं लग्न ठरलं. त्यानंतर माझी मोठी बहीण नलिनी जोशी, माधवना भेटायला साहित्य संघाच्या नाटय़शाखेत गेली. तेव्हा माधव एका लोकनाटय़ाचं दिग्दर्शन करत होते. माझी बहीणही कलाकार व पुरोगामी विचारांची असल्यानं आमच्या लग्नावर शिक्कामोर्तब झालं. माधवनेही माझ्या आईला माझ्या गाण्याविषयी शब्द दिला आणि आजपर्यंत पाळला. ते स्वत: कलाकार असल्याने कलाकार स्त्रीशी लग्न केल्यानंतर करावी लागणारी तडजोड, समजून घेणे, प्रोत्साहन देणे, साथ देणे याची त्यांना जाण होती. मी गाण्याच्या दौऱ्यावर गेल्यावर मुलांवर चांगले संस्कार करणे, चांगले वळण लावणे हे सारं काही या क्षणापर्यंत त्यांनी खंबीरपणे सांभाळलं आहे. हे सर्व माधव अगदी सहजपणे करत. याचं कारण म्हणजे, १९४८ मध्ये गांधीवधानंतर सांगली परिसरातील ब्राह्मणांची घरे जाळली गेली. त्यामध्ये माझ्या सासरचे जायगव्हाण येथील तीन मजली घर, दागदागिने सर्व आगीच्या खाईत नष्ट झाले. सारं कुटुंब बेघर झालं. सर्व मुले पोटासाठी दहा दिशांना पांगली. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच माधव, वर उल्लेख केलेल्या विटय़ाच्या माझ्या नणंदेकडे म्हणजेच जोगळेकर वकिलांकडे राहू लागले. त्यानंतर वयाच्या आठव्या वर्षांपासून माधवना शिक्षणासाठी गावोगावी एकटं राहावं लागलं. त्या वेळेपासून त्यांची वणवण सुरू झाली. शिक्षणासाठी एकटे राहून, स्वहस्ते स्वयंपाक करून, भांडी घासून व आणखी असंख्य कष्टाच्या कामांना, प्रसंगी अर्धपोटी राहून तोंड द्यावे लागले. त्यांनी स्वत:चं आयुष्य स्वत: घडविलं आहे. मी मात्र त्या मानाने खाऊनपिऊन सुखी. मला कष्टाची किंवा कामाची फारशी सवय नव्हती. सर्व कष्टप्रद जीवनातून वाटचाल करताना माधवना अनेक व्यक्तींनी, मित्रांनी आधार दिला होता. वेळप्रसंगी अन्न-वस्त्र-निवारा दिला. याची जाणीव आजही त्यांना आहे. त्यामुळे लग्नापूर्वीच माधवनी मला सांगितले की, ‘आशा! हा माझा जीव असंख्य मित्रांच्या सहकार्यावर वाढला आहे, तेव्हा माझी एवढीच अपेक्षा आहे की, आपल्या घरात रात्री बारा वाजता जरी कोणी आले तरी त्याला काहीतरी जेवू घाल!’ मीदेखील ते व्रत या क्षणापर्यंत सांभाळले आहे. अगदी मनापासून!
मला मुंबईत कोणीच ओळखत नव्हतं. आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला माझ्या गाण्याचा कार्यक्रम करून माधवनी एक अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली. साहित्य संघाच्या पुरंदरे हॉलमध्ये आमचा स्वागत समारंभ झाला. नाटय़ क्षेत्रातली, संगीत क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला हजर होती. सुरुवातीला दोन तासांचा गाण्यांचा कार्यक्रम झाला, त्यानंतर सर्वाना भोजन. माझ्या गाण्यावर सर्वजण खूष झाले. डॉ. बाळ भालेराव, कै. तात्या आमोणकर, दाजी भाटवडेकर यांनी आमच्यावर अपार माया केली. या समारंभात ‘नाटय़दर्पण’चे सर्वेसर्वा सुधीर दामले आले होते. त्यांच्या सूचनेवरून पहिल्या ‘नाटय़दर्पण रजनी’त मी गायले. टाळ्या आणि वन्समोअरच्या वर्षांवात माझं मुंबईत नाव झालं, स्वागत झालं. माधवनी माझ्या जीवनाची वाट खुली करून दिली.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक मराठीत करावं ही संकल्पना, जर्मनीतील माधवचे मित्र फ्रिट्स बेनीविट्झ यांच्याशी चर्चा करून, माधवनी साहित्य संघात मांडली.  फ्रिट्स बेनीविट्झ व विजया मेहतांनी हे नाटक दिग्दíशत केलं. माधव सहदिग्दर्शक व कलावंत होते. या नाटकाचे जर्मनी आणि स्वित्र्झलडमध्ये १४ प्रयोग झाले. ‘सातासमुद्रापलीकडे गेलेलं हे पहिलं मराठी नाटक ठरलं.’ स्वत:ला जे जे मिळालं ते इतरांनाही मिळावं यासाठी माधव नेहमीच प्रयत्नशील असतात. एवढे रूपवान, गुणवान, कल्पक, योजक, शिक्षक असलेल्या माधवनी आपल्याला काय मिळते याची कधीच तमा केली नाही. ‘स्वामी’ नाटकात माधवरावांची भूमिका करण्याची त्यांची हुकलेली संधी आणि त्याच दिवशी देना बँकेतील नोकरीचा पहिला दिवस हा योगायोगही देवाच्या इच्छेनं घडला. त्यानंतर ‘सागरा प्राण तळमळला’ या नाटकात सावरकरांची भूमिका करण्याचा एक दैवी योग माधव यांच्या जीवनात आला. माधव लहानपणापासूनच स्वातंत्र्यवीर सावरकर विचारांनी भारलेले होते. त्या नाटकात मी माई सावरकरांची भूमिका करत असे. स्वा. सावरकर जन्मशताब्दीनिमित्त माधवनी ‘अनादि मी अनंत मी!’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या  ज्वलंत जीवनदर्शनाचं नाटक लिहिलं. मी त्याचे संगीत दिग्दर्शन केलं. पाल्र्यातील कलाकार तरुण-तरुणींना एकत्र करून तीन महिने तालमी करून त्याचे ११० प्रयोग भारतात व इंग्लंड, अमेरिका, कॅनडामध्ये सादर केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘अनादि मी अनंत मी!’ या नाटकाची मनसोक्त स्तुती करणारी प्रस्तावना दिली. या ‘अनादि मी अनंत मी!’ नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन लंडनमध्ये स्वा. सावरकरांच्या क्रांतिकार्याने भारलेल्या इंडिया हाऊसमध्ये झाले. ‘जयोस्तुते’ हे गीत गायला लागल्यावर समोरील पन्नास लोकही आमच्याबरोबर गायला लागले. सगळ्यांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू होते. तो आमच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण होता.
माझ्या गाण्याविषयी माधव खूप जागरूक असतात. मी एखादी नवीन बंदिश केली किंवा चाल लावली तर सर्वप्रथम मी माधवना ऐकवते. एखाद्या नवीन कार्यक्रमाची रूपरेषा ठरवताना मी त्यांचे मत घेते. माधवही काहीही लिखाण केले तर ते प्रथम मला ऐकवतात. माधव जेव्हा नाटय़शिबिरात शिकवतात ते बघणे व ऐकणे हा कमालीच्या आनंदाचा अनुभव मी अनेक वेळा अनुभवलेला आहे. ‘होरी रंगरंगिली’, ‘सावन रंग’, ‘रचनाकारको प्रणाम’, ‘समर्थ वाणी’ असे रचनात्मक दहा कार्यक्रम आम्ही सेवाभावाने स्वर-संवाद बनून सादर केले.
लग्न होऊन मुंबईत आल्यावर आम्हाला राहायला घर नव्हते. १९७५ ते १९७८ या तीन वर्षांत आम्ही आठ ठिकाणी भाडय़ाच्या घरातून राहिलो. आमच्याकडे स्वत:चे घर नाही, आपण श्रीमंत नाही असल्या क्षुद्र गोष्टी आमच्या मनाला कधीही शिवल्या नाहीत. आम्ही खूपच आनंदात होतो. आमची कला, आमच्यावर प्रेम करणारी असंख्य माणसं, रसिक या सर्वानी आमच्या वाटेवर सुखाची पखरण केली होती. आम्ही एका लोभस अशा धुंदीत पुढे चालत राहिलो. मी माधव खाडिलकर यांच्याशी लग्न करून मुंबईत येत आहे हे कळल्यावर डॉ. वसंतराव देशपांडे यांना अतिशय आनंद झाला. तसाच आनंद पु. ल. देशपांडे यांनाही झाला. लग्नापूर्वी सतत तेरा वष्रे पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे माझे गायनाचे शिक्षण झाले. बालगंधर्व स्पध्रेच्या निमित्ताने पु. ल. देशपांडे, हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी यांचे आशीर्वाद मला लाभले. लग्नानंतर तर भारत सरकारची शास्त्रीय गायनाची शिष्यवृत्ती मिळाली. कै. पंडिता माणिक वर्मा यांच्याकडे मला माधव घेऊन गेले. माझे स्वप्न पूर्ण झाले. माणिकताईंच्यानंतर मी पंडित यशवंतबुवा जोशी आणि नव्या बंदिशींसाठी पं. शंकरराव अभ्यंकर यांच्याकडे गाण्याची तालीम घेऊ लागले. माझा दूरदर्शनवरील ‘गजरा’ कार्यक्रम पाहून सी. रामचंद्र यांनी मला बोलावून घेतले. मराठीतल्या उत्तम कविता निवडून ‘रसयात्रा’ नावाचा कार्यक्रम आम्ही सादर केला. त्याचा पहिला प्रयोग कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसाठी तर एक कार्यक्रम माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील बंगल्यावरही झाला. डॉ. वसंतराव देशपांडे यांनी ‘शाकुंतल ते मानापमान’ या कार्यक्रमात सहगायिका म्हणून माझी निवड करून माझ्यावर जो विश्वास दाखविला त्यातून माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला. पं. जितेन्द्र अभिषेकींकडे शिकण्याचा व मार्गदर्शन घेण्याचा भाग्ययोग मला लाभला. ‘मत्स्यगंधा ते महानंदा’ कार्यक्रमात अभिषेकीबुवांनी माझी निवड केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या रंगमंचावर गेली २८ वष्रे सातत्याने संगीत महोत्सवात गायन सादर करण्याचे भाग्य मला लाभले आहे.
 नोकरी आणि माझं गाणं सांभाळताना माधवनी स्वत:चा विचार केला नाही. त्यांच्याएवढय़ा कर्तृत्ववान, सक्षम व सुशिक्षित अशा कलावंताला ज्या संधी मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत याचं मला वाईट वाटतं! आकर्षक व्यक्तिमत्त्व, श्रवणीय वाणी, संवादाची उत्तम जाण असलेल्या चांगल्या कलावंताला रसिक मुकले असं मात्र मला व अनेकांना वाटतं. पण त्यामुळे न खचता माधवनं सामाजिक बांधिलकीतून सांस्कृतिक कार्य हाती घेतलं. ‘सूरसंवाद’ ह्य़ा शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या आमच्या संस्थेतर्फे जागतिक कीर्तीच्या कलावंतांचे कार्यक्रम आम्ही सातत्याने पाच वष्रे सादर केले व पं.  भास्करबुवा बखले यांना या कार्यक्रमातून स्वरवंदना दिली. अशा वळणावर अमेरिकेतील मनुकाका पंडितांनी एक फुंकर घातली आणि त्यातून ‘उत्तुंग’ नावाचं एक कमळ फुललं. सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व कलांची जपणूक करणारे, स्वत:ला सोडून इतर शेकडो कलावंतांचे कार्यक्रम ‘उत्तुंग’च्या माध्यमातून आम्ही सादर करू लागलो. यातून असंख्य अद्वितीय कलावंतांची कला सादर करण्याचं, गुरूजनांचा सन्मान करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. उत्तुंग सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन, राष्ट्राभिमानाचं जागरण होऊ लागलं. एक सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ आकार घेऊ लागली. कार्यक्रमाची संकल्पना मांडण्यापासून लिखाण, आयोजन, पत्रव्यवहार, जनसंपर्क, कार्यक्रमाची आखणी, नेपथ्य, प्रकाशयोजना, सजावट, सादरीकरण आणि लाखो रुपयांचं निधीसंकलन या सर्वाची रेखाचित्रे माधवच्या डोळ्यासमोर तयार असतात व त्यानुसार अत्यंत शिस्तीने, नीटसपणे, आखीव-रेखीव कार्यक्रम यशस्वीपणे सादर करण्यात माधवना मनस्वी आनंद मिळतो. या सगळ्यात मी माझ्यापरीने जे सहकार्य करता येईल ते करते. यावर्षी डिसेंबरमध्ये ‘उत्तुंग’ला वीस वष्रे पूर्ण होत आहेत. ‘उत्तुंग’ची ही मफल यशवंतराव पंडित आणि जिवाभावाच्या २५ प्रतिनिधी मित्रांच्या सहकार्याने रंगत गेली. या वीस वर्षांत उत्तुंगने दीड हजार कलावंतांच्या सहभागाचे २५० कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य दिले आहेत. १५०हून अधिक मान्यवरांचे सत्कार केले आहेत. वयात आलेल्या या पाल्याकडे बघताना आता डोळे भरून येतात आता. मनोमन दृष्ट काढावीशी वाटते.  गेली चाळीस वष्रे मी गाते आहे. आमच्या संसारालाही एकोणचाळीस वष्रे झाली, कळलेच नाही. आतापर्यंत सुखदु:खाच्या िहदोळ्यावर झुललो. कधी खचलो तरीही परत उभारीने उठलो. आमच्या लाडक्या मुलांनीही संपूर्ण सहकार्य केले. समाजाला बरोबर घेऊन एक सुसंस्कारित, सुंदर  असं जीवन आम्ही सजवू शकलो.    
सांगलीतल्या आशा नावाच्या कळीला माधवाने साद घातली व आता आशा आणि माधव फुलांच्या पायघडय़ांवरून चालत आहेत. एकमेकांना दिलेला शब्द जोजावत! या आयुष्याच्या िदडीत भक्तीचा, प्रेमाचा सूर भरून राहावा हीच मनोमन इच्छा आहे. आयुष्यात भेटलेली देवमाणसं, मायबाप रसिक यांच्याविषयी कृतज्ञतेनं मन भरून आलं आहे.  आमची सून प्राजक्ता सीए असून उत्तम नृत्यांगना आहे. तिचे आई-वडील आमच्या मफलीत सामील झाले आहेत. ओंकार व वेदश्रीने गाण्याचा व अभिनयाचा वारसा जपला आहे. डॉ. विद्याधर ओक यांच्या कुटुंबात वेदश्रीला सासरही संस्कारांनी भरलेलं असं लाभलं आहे. आमचा जावई आदित्य ओक हा अप्रतिम कलावंत आहे. आयुष्यातील हा सुसंवाद असाच राहावा. वैष्णवी व आदिती या आमच्या नातींची, सुंदर उमलत्या कळ्यांची सुंदर, टवटवीत, सुगंधित फुलं होवोत हीच प्रार्थना!     

Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!