अल्बम म्हणजे आठवणीच. या अल्बमला वयाचं कुठलंच बंधन नसतं. त्यांत आपले आई-वडील, आजी-आजोबा.. मुलं-नातवंड असतात, जे आज आपल्यात नसतात. अन् एक दिवस आपणच आयुष्यातून डिलीट होऊन दुसऱ्याच्या मेमरीमध्ये जाऊन बसतो! अल्बम बंद, तोवर निर्जीव. क्लिक केलं की, सोडून गेलेली आपल्यापेक्षा लहान-मोठी सगळीच माणसं जिवंत होऊन येतात.
नेहा.. माझी १७ वर्षांची नात. माझ्या मुलीची म्हणजे मुक्ताची मुलगी. सुंदर कविता करते त्याही इंग्रजीतून. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी म्हणून इंग्रजीतून. एरवी भावनेला भाषेचं बंधन नसतंच. पस्तीस र्वष शाळेतून मराठी शिकविताना, विद्यार्थ्यांना मी सांगायचे, ‘भाषा हे फक्त साधन असतं, भावना चिरंतन असतात.’ शाळेत ज्या कविता मी शिकवायचे त्यातल्या काही नेहा भेटली की तिलादेखील शिकवायचे. त्या कविता तिला आवडायच्यादेखील. ती वयाच्या अकरा-बाराव्या वर्षांपासूनच कविता करायला लागली.. पण इंग्रजीतून. त्या दिवशी धावपळीत कशीबशी परीक्षेला गेली होती. बारावीचा शेवटचा पेपर. एरवी पोरगी नीटनेटकी, पण त्या दिवशी टेबलावर अभ्यासाचा पसारा. तिचं टेबल आवरताना तिच्या एका वहीतून एक कवितेचा कागद डोकावला. कुतूहलानं मी उभ्या-उभ्याच ती वाचू लागले..
Mamma my dear,
you are Beyond this world. so far,
Within my heart. so near.
With a smile in one eye,
And other with a tear.
You have never gone,
I can feel you everywhere,
I am sure, with lots of love and care,
Mamma, you will always be there.
इतकं वाचून मी स्तब्ध झाले. कविता पुढेदेखील होती, पण मला वाचवेना, अक्षरं भिजल्यासारखी अस्पष्ट दिसू लागली. मी चष्मा काढून उगाचच पदराला पुसला.. मग लक्षात आलं. सहसा असं हल्ली होऊ देत नाही मी. मग तिथंच बसले, तिच्या खुर्चीवर.. किती बदललीय पोरगी गेल्या दिडेक महिन्यांत. खरं तर दोन वर्षांत. एरवी नेहाची कविता म्हणजे चांदण्यांची बरसात, पावसाचं झाड, हिरवंगार रान अन् आनंदाचे झरे..! दाखवत नाही, पण अकाली प्रौढ झालीय पोरगी, आईच्या जीवघेण्या आजारपणात.. सहनशक्तीचा कडेलोट करणारं मुक्ताचं आजारपण. दोनेक वर्षांपूर्वी आजाराचं निदान झालं तेव्हा, नेहाची दहावीची परीक्षा महिन्यावर आली होती. सलिल, माझा जावई तर हबकूनच गेला होता. त्यांत वर्षभरापूर्वीच एका अपघातात त्यानं आई-वडील गमावल्यानंतर तो हळवा झाला होता. अन् आता समोर जेमतेम चाळिशी पार पडलेल्या मुक्ताचं हे आजारपण. त्याला मुक्तानंच धीर दिला, सावरलं. त्यानंतर त्याची जिवाच्या आकांतानं तिच्या आजारावर मात करण्यासाठी, तिच्या आयुष्यासाठीच धडपड सुरू झाली! सुरुवातीला मुक्तानं जशी जमेल तशी नोकरी चालूच ठेवावी, तिचं मन गुंतण्यासाठी, असं त्यांनी ठरवलं. सलिलनं मला मुंबईला गेल्या गेल्याच विचारलं.. खरं तर सांगितलंच, ‘‘आई, तुम्ही आता आमच्याबरोबरच राहा, पुण्यात एकटं राहण्यापेक्षा. मुक्तासाठी.. नेहासाठी. मुंबईची सवय होईल तुम्हाला आमच्यात राहिलं की. यात माझादेखील स्वार्थ आहेच.. मलादेखील आई नाहीये.’’ सांगताना त्याचा आवाज कापरा झाला होता. खरं तर तो माझ्या मनातलंच बोलला होता. तसं माझंदेखील या तिघांशिवाय कोण होतं ? माझ्या शाळेतल्या नोकरीतून निवृत्तीनंतर वर्षभरातच मुक्ताचे बाबा गेले. सगळेच पाश तुटल्यागत झालं होतं. मुक्ता-सलिल-नेहा मुंबईत आहेत. पण आता कुठं गुंतून राहणं नको असं मन सांगू लागलं. पण आपण ठरवू तसं कधीच घडत नसतं, हा अनुभव पुन्हा आला! त्या सुमारास एक छोटा कोर्स पूर्ण करून, मी एका मूक-बधिर मुलांच्या शाळेत, विनावेतन शिकवू लागले होते. मुक्ताच्या आजारपणाचं कळल्यानंतर मात्र मन थाऱ्यावर राहीना.. सरभर झालं. सुरू झालेल्या सामाजिक सेवेतून निवृत्त होऊन, पुन्हा लेकीचा संसार सावरण्यासाठी मन प्रवृत्त झालं. योग्य की अयोग्य, जे असेल ते असो. पण सलिलनं स्वत:हून विचारल्यावर निर्णय घेणं सोपं झालं, एवढं खरं. अन् मग सुरू झालं, मुक्ताच्या जीवघेण्या आजाराविरुद्ध अथक प्रयत्न !
सलिल सॉफ्टवेअर इंजिनीअर. त्याचे रात्री-अपरात्रीचे तास-तास चालणारे इंटरनॅशनल कॉल्स. दिवसभर मुक्तासाठी धावपळ. त्यात नेहाचं अकरावी-बारावीची र्वष. जेव्हा रोगाचं निदान झालं तीच ‘अ‍ॅडव्हान्स स्टेज’ होती. तेव्हा तत्काळ करावं लागलेलं मोठं ऑपरेशन. नंतर रेडिएशन केमोथेरपीच्या वेदना, त्याच्या रिअ‍ॅक्शन्स, रेग्युलर चेकप्स.. त्या वेळचं टेन्शन, रोगाच्या पंजांतून सुटका होतेय असं वर्षभरानंतर वाटू लागतंय तोच पुन्हा रोग उलटल्याचं निदान.. दुष्टचक्र सुरूच राहिलं. दुसऱ्या ऑपरेशनचा फायदा होईल का नाही, यावर सेकंड ओपिनियन घेऊनही निर्णय होईना. तेव्हा मुक्तानंच होकार दिला. त्यामागे तिची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीच होती, पण तेही ऑपरेशन अखेर निष्फळ ठरलं! या दोन वर्षांत आईची ‘ममा’ची दुर्दम्य इच्छाशक्ती अन् बाबांची अथक धडपड पाहतच, नेहा खूप समंजस अन् प्रगल्भ होत गेली. याला मुख्य कारण म्हणजे तिला तिच्या दहावीच्या परीक्षेनंतर, तिच्या आईबाबांनी परिस्थितीची जाणीव हळूहळू करून दिली होती. वेळप्रसंगी मुक्तानं तिला तिच्यावर नंतर पडणाऱ्या जबाबदारीची जाणीवदेखील करून दिली होती. तेव्हा तिच्या कोवळ्या मनावर काय आघात झाले असतील? खेळणं तर केव्हाच बंद झालं होतं. बाहेर जाणं बंद. बाहेर जाणं म्हणजे आईला घेऊन हॉस्पिटलांत घेऊन जाणं, वेळ पडली तर तिथंच राहणं.. ती ममाची जिवाभावाची मत्रीणच झाली होती! या काळात नेहा मनस्वी होत गेली. तिचा कवितेचा छंद वाढत गेला. कविता पूर्ण झाली की आईला वाचून दाखवायची. आशावादी, निसर्गावरच्या कविता. आईला धीर देणाऱ्या, तिला स्वत:ला उभारी देणाऱ्या. माझ्या लेकीचा तो अनंताकडे चाललेला प्रवास.. पावलोपावली वेदना, यातना देणारा. कधी अनावर झालं की मुक्ता माझ्या कुशीत शिरायची. अश्रूंना वाट करून द्यायची.. तिला जपलं पाहिजे, म्हणून मी मनावर दगड ठेवून, डोळे कोरडे अन् भावनांवर ताबा ठेवीत तिला थोपटत राहायचे. शेवटचे आठ दिवस मुक्ता कोमात होती. दीड महिन्यांपूर्वीच एका रात्री तिनं अखेरचा श्वास घेतला हॉस्पिटलमध्ये. तिथून सलिलचा फोन आला, तेव्हा नेहा मन लागत नव्हतं तरी अभ्यासाचा प्रयत्न करत होती. ती बाहेर आली. ‘आजी, बाबाचा फोन ना ?’ मी काहीही न बोलता नुसतं तिला जवळ घेतलं.. ती समजून चुकली! हमसून रडू लागली, आवरून ठेवलेला बांध फुटल्यासारखी. तिची आई.. अन् माझी लेक.. पण आता शोक कुणासाठी? नेहाला सांभाळलं पाहिजे, सलिल तिथं एकटा आहे, आता त्यालादेखील सावरलं पाहिजे. आपल्याला आता पुन्हा उभं राहायचंय.. मी माझे डोळे कोरडे केले. आज दीड महिन्यांनंतर हे सारं पुन्हा समोर आलं, नेहाच्या या कवितेमुळे!
तिचं टेबल लावून मी बाहेर आले अन् बेल वाजली. नेहाच असणार.. आल्या आल्या तिनं माझे हात हातांत धरत विचारलं, ‘आजी, तू घरी एकटी असतेस.. ममाची आठवण आली की काय करतेस?’‘अगं हो, हो. बसशील तर जरा. पेपर कसा होता ते तर सांगशील.’
‘पेपर काय छान होता, आजी.. ममाला शब्द दिला होता, तो पाळला.’
‘बाबाला फोन करून सांगितलंस?’
‘ते कसं मी विसरीन? लगेच घरी येतो, म्हणाला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस?’
‘अगं कसला प्रश्न.. अन भूक नाही का लागली?’
‘आता बाबा आल्यावरच बसू जेवायला.. या परीक्षेला मी बसले नसते तर ममाला आवडलं नसतं, म्हणून मी दीड महिना फक्त अभ्यासावर लक्ष दिलं.. आता मला बोलू दे आजी जरा तुझ्याशी निवांतपणे. सांग ना, ममाची आठवण आली की तू काय करतेस?’
‘मी काय करणार बाळा, तिची आठवण आली की मी तुझ्यात तिला पाहते. पण मला जास्त काळजी वाटते तुझ्या बाबाची.. एकावर एक तीन आघात. माझं आयुष्य आता कितीसं उरलंय? तुझं शिक्षण, लग्न, होऊन सासरी जाशील.. बाबा मात्र मग एकटा पडेल. त्याचीच काळजी वाटते! तुला तुझा मामा आठवतो कधी.. विशूमामा ? मीच वेडी.. कसा आठवेल.. तो गेला तेव्हा तू ममाच्या पोटात होतीस.’ ‘हो पण फोटोत ओळखते मी, आईबाबांच्या लग्नाच्या अल्बममधला. आजी, तुझा तर तरुण मुलगा गेला तेव्हा अपघातात, आजोबा गेले.. अन् आता मुलगीदेखील!    
 तरीही तू खंबीर उभी आहेस आमच्यासाठी. म्हणूनच विचारते, ममाची आठवण आली की तू काय करतेस?.. कुणापाशी शेअर करतेस तुझं दु:ख?’
‘दुख बोलून हलकं होतं, असं म्हणतात गं, पण ते तेवढय़ापुरतं असतं. पुन्हा आपण एकटे असतो तेव्हा, जुन्या आठवणी तितक्याच वेगानं उफाळून येतात, त्या नाही विसरता येत. विसरूपण नाहीत.. त्या आठवणींना कमी लेखायचं नसतं कधी. त्याच तर आपल्या जगण्याचा आधार असतात. ही आठवणच जर नसती तर? दोन र्वष झगडत स्वत:च्या मृत्यूला सामोरं जायला तुझ्या ममाला कुठून एवढं बळ मिळालं असेल? आपण तर केवळ तिला सपोर्ट करत होतो. तिची लढाई तर तीच लढत होती..
अन् हार अटळ आहे, हे तिलाही माहीत होतं. ती तर मृत्यूशी लढत होती. आपल्याला तर फक्त जगण्याशी लढायचं असतं. तिची आठवण आली, की तिच्यापासून हे बळ मला मिळतं. अन् तिची आठवण नाही, असा तर क्षणही नसतो. फक्त कामात असले की, ती आठवण मनाच्या तळाशी असते एवढंच. काम संपलं की वर उफाळून येते.. जसा आता तुझा अभ्यास संपल्यावर तुला आठवण आली तशी, खरं ना? अभ्यासात होतीस तेव्हा तू ममाला थोडंच विसरली होतीस?’
 ‘खरंय आजी. पण खरं सांगू, मला आजदेखील जाणवतं, ममा सतत माझ्याबरोबर आहे.. सगळीकडे.’
‘अगं वेडे, ती तुला सोडून जाईलच कशी? With lots of love and care, She will always be there… खरं की नाही?’
नेहा एकदम चमकली अन् म्हणाली, ‘आजी तू माझी कविता..’
‘माझी नात छान कविता करते, तिनंदेखील मला शिकवलं, दु:ख सहन करायला. गेलेलं माणूस आपल्याभोवती वावरत आहे, असं मानलं की मनाला उभारी येते. कुणाची आई, कुणाची मुलगी, कुणाची पत्नी.. एकच व्यक्ती, अनेक नाती. माणूस गेलं म्हणून नाती कधी संपत नाहीत..’ अन् स्वत:शीच पुटपुटले. ‘..अन् नाळ काही तुटत नाही!’ बोलता बोलता माझ्या नकळत माझे डोळे पाणावले. ‘आजी ममा गेल्यानंतर प्रथमच मी तुझ्या डोळ्यांत पाणी पाहतेय, गं.’
‘मला वाटायचं, आता अश्रू आटले असतील.. पण तसं नसतं गं. एकटं असलं की अश्रू दाटतातच. मन पुन्हा मूळ पदावर येतंच.. किती हाकला हाकला फिरुनी येतं पिकावर.. तसं, अन् प्रकर्षांनं जाणीव होते जगण्याची !.. जग जग माझ्या जिवा, असं जगणं तोलाचं, उच्च गगनासारखं, धरतीच्या रे मोलाचं..’
‘आजी ही तुझी बहिणाबाई अशिक्षित, पण खरंच ग्रेट होती गं! असं लिहिणं जमलं पाहिजे.. अन् असं जगणंदेखील जमलं पाहिजे! परवा रात्री जाग आली आली, तेव्हा पाहिलं, बाबादेखील एकटाच बसला होता, त्यांच्या लग्नाचा अल्बम घेऊन.. सुन्न. डोळे मिटले तरी अश्रू येतातच.. ना आजी!’ ‘येणारच ना, आपलं मनदेखील एरवी निर्जीव असणाऱ्या अल्बमसारखं असतं. अल्बम म्हणजे आठवणीच. या अल्बमला वयाचं कुठलंच बंधन नसतं. त्यांत आपले आई-वडील, आजी-आजोबा.. मुलं-नातवंड असतात, जे आज आपल्यात नसतात. अन् एक दिवस आपणच आयुष्यातून डिलीट होऊन दुसऱ्याच्या मेमरीमध्ये जाऊन बसतो! अल्बम बंद, तोवर निर्जीव. क्लिक केलं की, सोडून गेलेली आपल्यापेक्षा लहान-मोठी सगळीच माणसं जिवंत होऊन येतात.’
 ‘कोण येतंय जिवंत होऊन, आजी?’  नुसत्याच लोटलेल्या दारातून आत येताच सलिलचा हसत हसत प्रश्न.
‘बाबा, ममा आली तर..’  
‘ती जर गेलीच नसेल तर..’ अन् बाप-लेकीचा संवाद सुरूच राहिला..    

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…