News Flash

परी पुतळारूपी उरावे!

जवळजवळ पाच वर्षांनंतर ब्रम्हे आणि त्याची बायको, घराला कुलूप लावून संध्याकाळी निवांतपणे बाहेर पडत होती. घरी परत येण्याचीही घाई नव्हती

| December 21, 2013 07:57 am

आपटे आणि त्याचा उंची पोशाखातील मुलगा आणि सून आल्यागेल्यांचे सुहास्य स्वागत करत होते. जातींने प्रत्येकाला काय हवे नको ते बघत होते. प्रत्येक जण त्याच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करत होता. तेथे ठेवलेल्या आरामखुर्चीत एक वृद्ध इसम पेपर तोंडासमोर धरून वाचत बसले होते आणि एक वृद्ध स्त्री बाजूच्या खुर्चीवर वाती वळताना दिसत होती. इतर पाहुण्यांबरोबर तो आणि तीही अचंब्याने ते दृश्य पाहात आहेत, असं वाटत होतं..
जवळजवळ पाच वर्षांनंतर ब्रम्हे आणि त्याची बायको, घराला कुलूप लावून संध्याकाळी निवांतपणे बाहेर पडत होती. घरी परत येण्याचीही घाई नव्हती, असा योग जवळजवळ पाच वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात येत होता. गेल्या पाच वर्षांत घराला एकही दिवस कुलूप लागले नव्हते. ब्रम्हेचे वडील तीन वष्रे अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे दिवसवार होऊन जरा कुठे उसंत मिळते तोवर त्याच्या आईने अंथरूण धरले. चांगली दोन वष्रे त्या कुटुंबाची सत्त्वपरीक्षा पाहिल्यानंतर तिनेही जगाचा निरोप घेतला, तिचेही दिवसवार पार पडले आणि आता कुठे त्या दोघांना निवांतपणा मिळाला होता. इतक्या वर्षांत दोघांनीही कुठेही जाणे नाही आणि येणे नाही. कुठल्याही कार्यक्रमाला एकाने कोणीतरी सवड काढायची आणि गेल्या पावली परत यायचे. असाच दिनक्रम होता.
    एकुलता एक मुलगा दूर देशी अमेरिकेत. फोनवरून चौकशी करणारा, धीर देणारा, पशाचे पाठबळ उभे करणारा. स्वत:चं वृद्धत्व विसरून उसन्या उमेदीने आई-वडिलांचे शेवटचे आजारपण कसेबसे त्या दोघांनी पार पाडले आणि आज दोघं जरा निवांतपणे घरा बाहेर पडत होती. दोघेही त्याच्या ऑफिसमधला त्याचा मित्र आपटेच्या मुलाने घेतलेल्या नवीन आलिशान घराच्या वास्तुशांतीसाठी आयोजित कार्यक्रमाला निघाली होती. हा आपटे त्याच्याचबरोबर त्याच्या ऑफिसमध्ये लागलेला आणि जवळजवळ त्याच्याचबरोबर वर्ष-दीड वर्षांच्या फरकाने सेवानिवृत्त झालेला. वागण्यात अत्यंत काटेकोर आणि काटकसरी. बरेच वेळा ऑफिसमध्ये थट्टेचा आणि चच्रेचा विषय ठरण्याइतका टोकाचा काटकसरी आणि काटेकोर.
 आठवडय़ातून दोनदाच दाढी करायची, एखाद्या दिवशी एखाद्या मोठय़ा सोहळ्याला जाण्याच्या वेळी दाढी वाढलेली असली तरी तो तसाच जाई पण सोहळा आहे म्हणून मुद्दाम दाढी करणार नाही. त्याचे खर्चाचे बजेट पक्के ठरलेले असे, त्यात कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही कारणास्तव तडजोड करणे शक्य नाही. सकाळी घेतलेले दूध काही कारणाने नासले तर नंतरचा चहा त्याच्या घरी बिनदुधाचा, कोराच प्यायला जाणार.
आपटेला दोन भाऊ होते. तिघेही टोकाचे काटकसरी आणि टोकाचे काटेकोर म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी आपसात चार चार महिन्यांसाठी वाटून घेतले होते. त्यांना एका भावाकडून दुसऱ्या भावाकडे हलविण्याची तारीख आणि वेळ कुठल्याही परिस्थितीत चुकणार नाही याची सर्व भाऊ कटाक्षाने काळजी घेत. थंडी वारा, पाऊस, पूर, आजारपण कशानेही त्यात फरक पडत नसे. त्यांच्या शेवटच्या आजारपणातदेखील त्या वेळापत्रकात काही बदल झाला नव्हता. त्याबाबतीत त्या वृद्धांच्या भावनांना आणि मतांना त्यांच्या घरात शून्य किंमत होती.
 आपटेने सर्व काटकसर आणि काटेकोरपणा त्याच्या एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणासाठी पसा कमी पडता कामा नये या हेतूने केला होता. पण त्याचा मुलगा फार शिकलाच नाही. त्याने व्यवसाय सुरू केला, अर्थात हे सर्व आपटेच्या मनाविरुद्धच घडत होते. पण मुलाने त्याच्या व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केली. त्याच्या व्यवसायात मोठे यश संपादन केले, मोठमोठय़ा मासिकांतून त्याच्या मुलाखती छापून येऊ लागल्या, टीव्हीवर दिसू लागल्या. त्यांनी मुंबईच्या उपनगरात एक मोठा बंगलेवजा फ्लॅट घेतला होता आणि त्याच्या वास्तुशांतीसाठी ब्रम्हे पती-पत्नी निघाली होती. ती दोघं तिथे पोहोचली तेव्हा पाहुणे यायला सुरुवात झाली होती. त्याच्या प्रतिष्ठेला साजेशी उच्चभ्रू पाहुणे मंडळी आपापल्या आलिशान गाडय़ांतून उतरून घरात येत होती. फ्लॅटचा खूप लांब रुंद हॉल सिनेमात दिसणाऱ्या एखाद्या अप्रतिम हॉलप्रमाणे सजवलेला होता. उंची, देखणे फíनचर, पायाखाली गुबगुबीत गालिचा, छताला मध्यभागी लावलेल्या मोठय़ा झुंबराच्या लोलक मण्यांतून पाझरणाऱ्या नेत्रसुखद प्रकाशाने हॉलचा कोपरा नि कोपरा झगमगत होता.
अप्रतिम रंगसंगती साधणारे भिंतींचे रंग आणि त्याला साजेसे खिडक्यांचे पडदे. भिंतीवरची उच्च अभिरुची दर्शविणारी मॉडर्न आर्टमधील चित्रं सारे कसे अगदी अत्यंत श्रीमंत घराला साजेसे. अद्ययावत शयनगृह, सर्व आधुनिक आयुधांनी परिपूर्ण स्वयंपाकघर, मुंबई सारख्या शहरात अप्रूप वाटावी अशी बऱ्यापकी लांबरुंद उघडी बाल्कनीही त्या घराला होती, त्यात तीन माणसे ऐसपस बसू शकतील असा गुबगुबीत आसने असणारा वर छपराला कनात असलेला हळुवार झोके घेणारा झोपाळा. सर्व घर वातानुकूलित झुळकांनी आल्हाददायक थंडगार झाले होते. पाहुणे मंडळी हातातील डिशमधील रुचकर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत घेत ते वैभव डोळे भरून पाहात होती.
  आपटे आणि त्याचा उंची पोशाखातील मुलगा आणि सून आल्यागेल्यांचे सुहास्य स्वागत करत होते. जातींने प्रत्येकाला काय हवे नको ते बघत होते, सर्व घर फिरून दाखवत होते. खाण्यापिण्याचा आग्रह करत होते. प्रत्येक जण बाल्कनीत गेल्यावर तेथील दृश्य पाहून अचंबित होत होता आणि त्याच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करत होता. तेथे ठेवलेल्या आराम खुर्चीत एक वृद्ध इसम पेपर तोंडासमोर धरून वाचत बसले होते आणि एक वृद्ध स्त्री बाजूच्या खुर्चीवर वाती वळताना दिसत होती. इतर पाहुण्यांबरोबर तो आणि तीही अचंब्याने ते दृश्य पाहात आहेत असं वाटत होतं..
तेवढय़ात ब्रrोचा मित्र आणि त्याचा मुलगा तेथे आला आणि सर्वाना उद्देशून म्हणाला, ‘कशी वाटते ही कल्पना?’ बघणारे त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागताच त्याने खुलासा केला, ‘‘माझे आजी-आजोबा आज हयात नाहीत, पण आजी-आजोबांशिवाय मला घरातील सर्व वैभव अपुरे आहे असे वाटू लागले, माझ्या इंटिरिअर डिझायनरला सांगून मी माझ्या आजी-आजोबांचे हे असे हुबेहूब पुतळे बनवून घेतले. गरजेनुसार आपण त्यांना कुठेही हलवू आणि ठेवू शकतो. रोज मी त्यांच्या हातातले वर्तमानपत्रही बदलतो. कधी तरी आजीला मी स्वयंपाक घरात ठेवतो म्हणजे बायको किंवा माझी आई तिच्या मार्गदर्शनाखाली स्वयंपाक करत आहेत असा ‘फील’ येतो. रोज बाहेर पडताना त्यांच्या पाया पडून सर्व जण कामधंद्याला बाहेर जातो.’’ एक मिस्कील माणूस म्हणाला, ‘काय हुबेहूब पुतळे बनविले आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले भाव पाहिल्यावर असे वाटते की त्यांना काही सांगायचंय.’
त्यावर आपटेचा नातू निरागसपणे म्हणाला, ‘पण ते बोलत नाहीत! आमच्या शेजारचे आजोबा खूप कटकट करून वैताग आणतात.’ त्यावर तेथे एकच हशा पिकला. तो मुलगा मात्र बुचकळ्यात पडला. आपटेकडे ब्रrोने हेतुपूर्वक नजर टाकली. आपटेचा चेहरा एकदम कावराबावरा झाला. त्याने आणि तिने स्वीट डिश आणि लोण्यासारखे मऊ गारेगार आइस्क्रीम संपवले आणि आपटेला आणि त्याच्या कुटुंबीयांना सदिच्छा देऊन त्यांचा निरोप घेऊन ती दोघे घरी जाण्यासाठी बाहेर रस्त्यावर आली.
 ब्रम्हेची बायको त्याला म्हणाली, ‘तुम्हाला ती आई-वडिलांच्या पुतळ्यांची कल्पना कशी वाटली?’ तो म्हणाला, ‘मलाही तोच प्रश्न तुला विचारायचा होता. अगं, श्रीमंतांच्या ऐसपस घरात हे सर्व ठीक आहे. आपल्यासारख्यांच्या घरात पुतळे काय आणि माणसे काय दोन्हीही अडगळच. ती मिस्कीलपणे म्हणाली, ‘मग अर्धपुतळे करायचे. तिच्या या कल्पनेवर दोघेही मनमुराद हसली, घराचे कुलूप काढता काढता ब्रम्हेची बायको म्हणाली, ‘आपल्या मुलाचे अमेरिकेतील घर असेच ऐसपस आहे नाही का हो?’ त्यावर ब्रम्हे म्हणाला, ‘त्या इंटिरिअर डिझायनरचे कार्ड आहे माझ्या खिशात. उद्याच फोन करून ऑर्डर देऊया..’
  दोघेही घरात गेली आणि दोन खुच्र्या एकमेकांसमोर ठेवून, एकमेकांसमोर हसरी पोज देऊन बसून राहिली. अगदी पुतळ्यासारखी! समोरच्या भिंतीवरच्या फोटोत त्याचा मुलगा, सून आणि
नातू आज जरा जास्तच आनंदाने हसताना भासत होती..    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 7:57 am

Web Title: my blog apte bramhe family
Next Stories
1 पाटय़ा तपासून पाहा!
2 वादळवारं मनाचं
3 सात राजकन्या
Just Now!
X