16 January 2021

News Flash

दुधाची वाटी

मॅऽऽऽव मॅऽऽऽव करत मांजरीने आजोबांचं धोतर दातात धरलं आणि ओढत ओढत त्यांना देवघरात आणलं. आजी निपचित पडल्या होत्या. आजोबा विलक्षण घाबरले. त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न

| December 6, 2014 01:01 am

मॅऽऽऽव मॅऽऽऽव करत मांजरीने आजोबांचं धोतर दातात धरलं आणि ओढत ओढत त्यांना देवघरात आणलं. आजी निपचित पडल्या होत्या. आजोबा विलक्षण घाबरले. त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण..
पहाट झाली. पूर्वदिशेला गुलालाची उधळण झाली. पाखरांच्या किलबिलाटानं आसमंतात चैतन्य पसरू लागलं. वाऱ्याचा सूर धरून झाडावेलींच्या फांद्या भक्तिगीतं गाऊ लागली. अंधार-उजेडाच्या सीमारेषेवर धरणीमाय रेंगाळत होती..
पण, आजीच्या घरात मात्र आज अजून अंधारच होता. रोज या वेळेपर्यंत आजी देवाजवळ भूपाळय़ा म्हणण्यात दंग असतात. समोर गोपालकृष्णासाठी ठेवलेली नैवेद्यांची दुधाची वाटी असते आणि डोळे मिटून आजी भक्तीभावाने भूपाळ्या म्हणतात आणि पाठोपाठ हरिपाठ! पण आज मात्र आजीच्या उठण्याची कुठलीच चाहूल नव्हती.
रोजसारखी मांजर खिडकीतून आत आली. देव्हाऱ्यासमोर थांबली. आजी नाही. दूध नाही. ती घरभर फिरली. आजीच्या झोपायच्या खोलीत गेली. आजी झोपल्या होत्या. मॅऽऽऽव मॅऽऽऽव तिने आजीला आवाज दिला. पण आजीने लक्षच दिलं नाही. पुन: मॅऽऽऽव मॅऽऽऽव.
‘आलीस का गं तू मने, आज लवकर आलीस का गं? की मलाच उशीर झाला.’
‘मॅऽऽऽव मॅऽऽऽव’
‘अगं, उठते गं बाई. पण खरं सांगू मने.. आज ना मला उठावंसंच वाटत नाही बघ. डोकं जड झालंय्. थोडंसं उदासही वाटतंय. काल नातवाचा फोन आला न गं!’
‘मॅऽऽऽव मॅऽऽऽव..’
‘अगं हा, उठते उठते.’ असं म्हटलं खरं, पण आजी उठल्याच नाहीत. पांघरूण ओढून पडून राहिल्या. काल अमेरिकेहून आलेल्या नातवाचा फोन त्यांच्या कानामनात घुमू लागला.
‘आजी.. आजी.. कशी आहेस तू?’ – नातू
‘मी ठीक आहे रे राजा. पण तुझा आवाज असा काय येतोय?’ -आजी
‘हो. ताप आलाय मला’- नातू
‘ममा कुठेय तुझी?’- आजी
‘ती ऑफिसला गेलीय’ – नातू
‘आणि तुझे पपा?’- आजी
‘ते आहेत न इथे माझ्याजवळ. काल ममाने सुट्टी घेतली होती, आज पप्पांनी सुट्टी घेतलीय. उद्या मी जाईन डेकेअरला.’
‘अरे, पण तुला बरं नाहीय न? तुझ्या पपाला फोन दे बरं.’
‘काय रे, सोहमला काय झालंय? आणि उद्या लगेच डेकेअरला कशाला पाठवतोस? अरे लहान आहे तो. बरं नसताना आईबाबा जवळ असावेत, आपले त्यांनी लाड करावेत, मायेनी जवळ घ्यावं असं वाटण्याचंच वय आहे ना रे त्याचं?’
‘अगं आई, एवढं काहीही झालेलं नाहीय. थोडी सर्दी झालीय त्यामुळे अंगात थोडीशी कणकण आहे. उद्यापर्यंत बरं वाटेल. तू उगाचंच काळजी करू नकोस?’
फोन बंद झाला, पण आजीला काळजीच्या धाग्यात गुंतवून..
आजी नातवाच्या काळजीने सैरभैर झाली. एवढंसं पोर, तिकडे बरं नाहीय त्याला. इथे असता तर..! त्याच्याजवळ बसून राह्य़ले असते. मऊ मऊ दूधभात भरवला असता. त्याच्या आवडीची गोष्ट सांगितली असती. तापातही त्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाने आजी आत आत सुखावली असती. पण इतक्या दूर..’
आजीचा पुन्हा डोळा लागला. मांजर खिडकीत जाऊन बसली. आजीच्या उठायची वाट पाहात.
‘मॅऽऽऽव मॅऽऽऽव’ आजी काही उठली नाही पण, आजोबा मात्र चिडूनच म्हणाले, ‘कशाला झोपमोड करतेस गं सकाळी सकाळी. फार लाडावून ठेवलंय आजीने तुला! चल जा बरं इथून.’ मांजर चूपचाप समोरच्या दोन्ही पायात मान घालून तिथेच बसून राहिली.
कशाबशा आजी उठल्या. खोली बाहेर जायला लागल्या. तशी मनीही त्यांच्या मागोमाग गेली.
‘आता बैस बरं मुकाटय़ानं. मी येते.’ म्हणत त्या वळल्या. एखाद्या आज्ञाधारक मुलीप्रमाणे मांजर देव्हाऱ्याजवळ येऊन बसली. आजी अंघोळ करून आल्या. कपाटातील दूध नैवेद्याच्या वाटीत वाढलं आणि गोपालकृष्णाला नैवेद्य दाखवला.
‘गोपाळा, आज उशीर झाला रे दूध द्यायला. रागावू नकोस बाबा.’ समोरच्या फळीवर असलेलं लोकरीचं आसन काढून आजी त्यावर बसल्या. भूपाळय़ा सुरू झाल्या. मांजर त्यांच्यापासून थोडय़ा दूर अंतरावर रोजच्या सारखीच समोरच्या दोन पायावर मान टाकून बसून राहिली.
उठा उठा हो सकळिक। वाचे स्मरावा गजमुख ।। रिद्धि सिद्धीचा गणनायक। सुखदायक भक्तांसी।।
गणपतीची भूपाळी झाली. रामाची भूपाळी सुरू झाली.
‘उठोनिया प्रात:काळी। जपा रामनामावळी।। स्वये ध्यातो चंद्रमौली। शैलबाळी समवेत॥
भूपाळय़ा संपल्या. आजींनी हरिपाठाचे अभंग म्हणायला सुरुवात केली.
अभंग म्हणता म्हणता आजीचा आवाज कमी कमी होत गेला. मांजरीने बघितलं, आजी अजून आसनावरून उठल्या नव्हत्या. म्हणजे दूध प्यायला अजून वेळ आहे तर. पुन्हा मांजरीने पाय पोटाशी घेतले आणि निमूट बसून राहिली.
आजी अभंग म्हणतच होत्या पण, खोल खोल आवाजात! पुटपुटल्या सारख्या. रोजच्यासारखा खणखणीत आवाज नव्हता आणि म्हणता म्हणता आजी एकदम मागच्यामागे पडल्या. धपकन् आवाज आला तसे मांजरीने डोळे उघडून आजीकडे बघितलं. ‘मॅऽऽऽव मॅऽऽऽव..मॅऽऽऽव मॅऽऽऽव’ आजी नुसत्याच पडून. तिच्या मॅऽऽऽव ला आजीचा काहीच प्रतिसाद आला नाही. तशी मांजर आजीजवळ गेली. त्यांचा पदर तोंडात धरला, पण आजी उठल्याच नाही की बोलल्या नाही.
‘मॅऽऽऽव मॅऽऽऽव’ करत मांजर आजोबांच्या पलंगाजवळ गेली. जोरजोरात आवाज देऊ लागली.
‘काय कटकट लावलीय ग सकाळपासून. झोपूही देत नाही. ते ओरडले पण, मांजरीचं मॅऽऽऽव मॅऽऽऽव करणं काही थांबतच नव्हतं.
शेवटी मांजरीने आजोबांचं पांघरून ओढलं. ‘मने, अगं तुझी आजी कुठे आहे? आज माझ्यामागे का लागलीस ग?’ मॅऽऽऽव मॅऽऽऽव करत मांजरीने आजोबांचं धोतर दातात धरलं आणि ओढत ओढत त्यांना देवघरात आणलं. आजी निपचीत पडल्या होत्या. आजोबा विलक्षण घाबरले. त्यांनी आजीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण आजीने हूं नाही केलं की चू. आजोबांना काय करावं सुचेचना. त्यांनी शेजारच्या घरातील लोकांना मोठय़ांदा आवाज दिला. शेजारी धावून आले. आजींना दवाखान्यात नेलं.
 शेजारांच्या मदतीने आजींना घरी आणलं तेव्हा मांजर व्हरांडय़ात बसून होती. आजी येताच तिने मॅऽऽऽव मॅऽऽऽव म्हणून आवाज दिला.
पण यावेळेस आजोबा मांजरीवर चिडले नाही की ओरडले नाही. त्यांना आजीचे शब्द आठवले-
‘प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंत:करणात ईश्वर असतो.
मी त्याचीच पूजा करते.’
    या मांजरीत असलेल्या ईश्वरानेच तर आज आजीला वाचवलं होतं ना? आजोबांनी दुधाची वाटी नैवेद्यासारखी मांजरीसमोर ठेवली..    ल्ल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2014 1:01 am

Web Title: my blog bowl of milk
टॅग Milk
Next Stories
1 संवाद शरीराशी
2 प्रवाही नातं
3 अतिनिद्रा
Just Now!
X