‘इथल्या टेलरला सांगून ठेवलंय मी, बायकांचे गळे कापलेस, की कापडाचे तुकडे टाकू नकोस. हल्ली बायकांचे ब्लाऊज अंगातल्यापेक्षा कापून टाकण्यातच जास्ती जातात ना!’ आई मिस्कील हसत भाचेसुनेसाठी खास काही बनवण्यासाठी स्वयंपाकघरात वळली. माझ्या डोळ्यात मात्र बायकांच्या त्या उघडय़ा पाठी, पाठी लागल्यासारख्या झाल्या..
‘तुझ्या पाठीच्या तुकडय़ांचं काय करतेस?’ नवीनच लग्न झालेल्या आणि मे महिन्यात कोकण पाहायला आपल्या भाचेसुनेला माझ्या आईने विचारलं. आईच्या या प्रश्नावर ती अवाक्  होऊन पाहातच राहिली. ‘‘बरेच असतील ना तुझ्याकडे? तुझ्या साडय़ा काय भारीतल्याच असणार? आईची लाडकी लेक आणि सासरची लाडकी सून! मग काय हौसेमौजेला तोटा नाही?..’’ आईच्या बोलण्याचा अर्थबोध न झाल्याने वहिनी संभ्रमित चेहेऱ्याने आईकडे पाहातच राहिली. ‘‘अगं मी शिवणकाम करते ना, त्याला हे तुकडे खूप उपयोगी पडतात. चांगले मोठे मोठे असतात ना! त्यातून रंगसंगती साधत लहान मुलांची झबली, टोपरी, कुंच्या, दुपटी.. काय काय बनवते मी. फार डोकं चालतं माझं या कामात! हल्ली तुम्हा मुलींच्या ब्लाऊजच्या पाठी मला फारच उपयोगी पडतात. छान मोठे मोठे तुकडे मिळतात! थांब, दाखवतेच तुला..’’ असे म्हणत आईने वहिनीसमोर बाळंत विडय़ावरच्या छान छोटय़ा कपडय़ांची चळतच मांडली.
‘‘इथल्या टेलरला सांगून ठेवलंय मी, बायकांचे गळे कापलेस, की कापडाचे तुकडे टाकू नकोस. हल्ली बायकांचे ब्लाऊज अंगातल्यापेक्षा कापून टाकण्यातच जास्ती जातात ना!’’ आई मिस्कील हसत भाचेसुनेसाठी खास काही बनवण्यासाठी स्वयंपाकघरात वळली. माझ्या डोळ्यात मात्र बायकांच्या त्या उघडय़ा पाठी, पाठी लागल्यासारख्या झाल्या. हल्ली या उघडय़ा गळ्यांची स्पर्धाच लागलीय की पूर्वी ब्लाऊज म्हणजे कसा बंद गळा, व्ही कट नाहीतर स्टॅण्डपट्टी.. लांब बाह्य़ा.. आणि उंची? ती साडीत खोचता येईल एवढी.. कंबरेपर्यंत अबब!
मग बायकांना त्यांचा कंटाळा येऊ लागला. प्रथम त्यांनी उंची कमी करायला सुरुवात केली. सपाट पोटाच्या आणि वळ्यांसकटच्या सगळ्या बायकांनी ही फॅशन उचलून धरली. तेव्हा आपल्या प्रख्यात विनोदी लेखक वि. आ. बुवांनी त्याला पो.टी.मा. असं नाव दिलं. म्हणजे ‘पोटावर टिचकी मारा!’ गंमत म्हणजे पुढे या फॅशनचे नावच ‘पोटिमा’ ब्लाऊज असं रूढ झालं! अगदी त्याच धर्तीवर माझ्या मनात आताच्या ब्लाऊजला पा.टि.मा.. म्हणजे ‘पाठीवर टिचकी मारा’ असं ठेवावंस वाटलं. खरंच गोऱ्या बायकांच्या या उघडय़ा पाठी पाहिल्या ना की अगदी मोह पडतोच हो माझ्यासारख्या बाईलाही.. ‘हळूच त्या उघडय़ा पाठीवर थाप मारावी छानशी किंवा हात फिरवावा पाठीवरून मायेचा!’
पूर्वी ‘पेन बाम’च्या जाहिरातीतल्या बाईला ‘पाठमोरी’ दाखवायचे, दोन्ही हात कमरेवर ठेवून ‘कमरदर्द’ म्हणून विव्हळणारी! पण तिच्या अंगात अख्खं पोलकं असायचं! आताही जाहिरातीत बाईच असते पण तिची अख्खी पाठ उघडी असते. पाहा ‘किती सोसते बाई!! लोकांपासून काय लपवणार? पाठीमागे काही लपवायचं नसतं! दुखण्याला ‘पाठीशी घालून’ काय होणार?
पाठमोऱ्या बाईचं पूर्वी एक छान सुंदर सोज्ज्वळ चित्र असायचं.. भरदार अंबाडा, खांद्यावरून पदर लपेटून घेतलेला नऊवारी साडीची कासेच्या काठाची पट्टी..पायघोळ ओचे! रवींद्रनाथाचं एक छान पुस्तक वाचत होते, ‘पोरवय’. लहानपणीच्या आठवणींचं! पुलंनी अनुवाद केलेलं. त्यात ते लिहितात, ‘बायकांचं बाहेर येणं-जाणं असायचं तेही बंद दारांच्या पालख्यातल्या अंधारातून! गाडीतून जाणं म्हणजे भलताच निर्लज्जपणा होता. एखाद्या बाईच्या अंगावर पोलका, पायात बूट दिसले की ती ‘मेम साहेबी’. लाजलज्जा गुंडाळून ठेवलेली! बाई चुकून परपुरुषापुढे झाली तर झटदिशी तिच्या डोकीवरचा घुंगट खाली यायचा नाकाच्या शेंडा ओलांडून! जीभ चावून ती चटकन पाठ फिरवून उभी राहायची. मोठय़ा घरातल्या लेकीसुनांच्या पालखीवर तर कापडाचा आणखी एक टोप चढलेला असायचा- दिसायचं जसं काही ते एक चालणारं थडगंच!’
बापरे!  बाईच्या बंदिस्तपणाचं हे एक टोक आणि माझ्या डोळ्यांसमोर सिग्नलला थांबलेल्या स्कूटी झळकल्या. केसांचा बॉयकट, मानेपासून खाली १०/१२ इंच सगळा मोकळा देह.. त्याखाली ब्लाऊजची एक पट्टी.. पदर खांद्यावर पिनअप केलेला.. हे दुसरं टोक!! टोकाला पोचल्याशिवाय बदल होत नाहीत हे ‘ऐतिहासिक सत्य’ आहे!
मी मैत्रिणीला विचारलं, ‘महिलावर्ग एवढय़ा पाठी उघडय़ा का टाकू लागल्यात?’ तर ती म्हणाली, ‘अगं तो कलंदर सौंदर्याचा आविष्कार आहे! शिवाय त्या एका चित्रकार बाईने आपल्या रसिक नवऱ्याला आपली ‘उघडी पाठ’ कशी आवडायची याचं चविष्ट वर्णन लिहिलंय ना आपल्या आठवणींच्या पुस्तकात! त्या वाचून.. कलावंत नसलेल्या बायकाही..’
माझी आश्चर्यचकित मुद्रा बघून मैत्रीण म्हणाली, ‘अगं आपल्याला जमेल.. तेवढं उचलतात बायका!’ मला आठवली आईने सांगितलेली एक गोष्ट. माझा छोटा भाऊ जन्माला आला, तेव्हा आईचं बाळंतपण करायला आलेली मावशी म्हणाली, ‘हिच्या पाठीला कुंकू लावा.’ तेव्हा मी म्हणे जोराने रडू लागले होते. कुंकू का? तर माझ्या पाठीवर भाऊ झाला म्हणून (तसा हा माझा तिसरा भाऊ होता, तरीसुद्धा!). अशी ही पाठीची महती! तेव्हा पायगुणासारखा ‘पाठगुण’सुद्धा असतो!   
फॅशन कशी फोफावते माहीत नाही, पण अनेकांनी ही पाठी उघडय़ा टाकण्याची फॅशन अंगीकारली आणि मग त्यांना पाठी वळून पाहावं लागलं नाही! त्यांना चॅनेल्सवरच्या मालिका सटासट मिळत गेल्या. ‘पाठीमागे’ कोणी काही का बोलेनात! नाहीतरी खूप जणांना ‘पाठ वळली’ की कुजबुजायची सवय असते! पण सगळ्या बायकांच्या टीव्हीवरच्या उघडय़ा पाठी पाहिल्या ना की लक्षात येतं ‘पोट हे पाठीवर अवलंबून असतं!’ आता जुनी म्हणही खरं तर बदलायला हवी, ‘‘पोटावर मारा पण पाठीवर मारू नका!’’
‘‘टीव्हीवरच्या कार्यक्रमातले पुरुष, अँकर्स सगळे अंगभर कपडे घालतात. मग बायकाच कशा काहीतरी कुठेतरी कापलेले, दंड, पाठी सारं उघडं टाकणारे कपडे घालतात हो बाबा?’’ माझ्या मुलाच्या प्रश्नावर त्याच्या बाबांनी उत्तर दिलं, ‘‘अरे बायकांना जास्त उकडतं. त्यामानाने पुरुष ‘थंड’ प्रकृतीचे असतात. शिवाय त्यांना असली ‘टंचाई’ नसते दाखवण्यासारखी! कुणीतरी अंगभर कपडे घालायला हवेतच ना! नाहीतर ‘बापूजीं’च्या या देशात इतक्या वर्षांत गरिबी मुळीच हटली नाही, असं साऱ्या जगाला वाटेल ना!’’ या ‘चतुर’ उत्तरावर मी मनापासून मान डोलावली!
एकंदरीत या पाठीचा बराच ‘पाठपुरावा’ माझ्या डोळ्यांत चालला होता. नव्या वहिनीचं खाणं-पिणं, सारी सरबराई झाली होती. आईने शिरा करता करता, खुशीखुशीने तिची सर्व माहिती काढून घेतली होतीच. खूप दिवस मला एक प्रश्न छळत होता,‘‘पाठीचा इतका मोठा भाग गायब झालेला ब्लाऊज अंगात घट्ट बसतो कसा? निसटत कसा नाही?’’ पण तो विचारायचं धाडस मी केलं नाही. उलट वहिनीची अगदी अंगासरशी नेसलेली साडी, छान ब्लाऊज, प्रमाणबद्ध बांधा यांचं मी कौतुक केलं. वहिनीही खूश झाली. ‘‘मावशींकडे यायचं म्हणून मुद्दाम साडी ‘घालून’ आले.’’ ती छान हसून म्हणाली. ‘नेसणं’ क्रियापद आता हळूहळू लुप्त होणार असं मला उगीचच वाटून गेलं.
‘‘तेवढं टेलरला सांग बरं का तुझ्या पाठीच्या तुकडय़ाचं! अगं शंभर दीडशेचा ब्लाऊज पीस.. शिवाय तेवढीच शिलाई.. एवढं महागडं कापड कापून टाकायचं म्हणजे.. जिवावर येतं गं आमच्या सारख्या काटकसरीने राहणाऱ्या जुन्या बायकांना..’’ आई आता अजून काय काय बोलत राहील म्हणून माझा जीव कसनुसा झाला. काळाबरोबर बदलायचं कधी कळणार आहे हिला?‘‘येत जा, गावाला आलीस की अशीच.. नक्की ये’’ वहिनीची ‘पाठ’ फिरेपर्यंत.. आईने तिला पुन:पुन्हा सांगितलं.. मीही आत वळले आणि खोक्यात ठेवलेले ‘पाठकोरे’ कागद पुढे ओढले. पा.टि.मा चा विषय डोक्यात होता ना!