‘जमाना बदल रहा है’ या वाक्याचा रोजच्या जगण्यात कितीतरी वेळा प्रत्यय येत असतो आपल्याला.. मला मुलगी होईपर्यंत माझी हीच समजूत होती की बालगीतं किंवा बडबडगीतं ही आई-बाबा, आजी-आजोबा यांच्याकडून येताजाता खेळता खेळता गमतीत शिकायची गोष्ट असते. फार तर शाळेतल्या बाईंकडून किंवा मग पुस्तकातून.. पण जमाना प्रत्येकच क्षेत्रात कसा बदलयाय हे माझ्या मुलीला बालगीतं (ऱ्हाईम्स) शिकवतानाही लक्षात आलं.. शिकवताना कसलं.. ती इंटरनेटवर दाखवताना कळलं. मला माहिती नसलेली, कधी न ऐकलेली कितीतरी इंग्रजी-मराठी-हिंदी गाणी सुंदर अशा अ‍ॅनिमेशनसह सापडली आणि एक मोठा खजिना सापडल्यासारखं वाटलं. लहानांचंच काय.. मोठय़ांनाही ती गाणी, त्यांचं दृश्य स्वरूप खिळवून टाकणारं असतं.
एकदा अशीच नवीन नवीन बालगीतं शोधताना हुपलाकिड्झ डॉट कॉमवर एक वेगळंच गाणं कानावर पडलं. त्याचं अ‍ॅनिमेशन, त्याचे शब्द-सूर अक्षरश: भुरळ घालणारे होते. त्या दिवशी आणि त्यानंतरही ते गाणं मी कितीवेळा ऐकलं असेल ते मोजायलाच नको. त्याची सुरुवात अशी होती..
My Bonnie lies over the ocean
My Bonnie lies over the sea
My Bonnie lies over the  ocean

O’ Bring back my Bonnie to me
Bring back, bring back
bring back my Bonnie to me….
अथांग पसलेल्या समुद्रासमोर एका कडय़ावर उभं राहून एक छोटी मुलगी हे गाणं म्हणते आहे. संध्याकाळच्या कातरवेळेपासून रात्रीपर्यंत कोणाची तरी वाट पाहत मोठय़ा अधीरतेने ती तिथे उभी आहे. आणि या पाश्र्वभूमीवर कातर करणारे हे शब्द आणि सूर.. ते ऐकले आणि अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. इतके साधे शब्द, पण विलक्षण अशा सुरांमधून प्रकटणारे त्या शब्दांचे कितीतरी अर्थ.. कोण असेल ही मुलगी? ही कोणाची वाट पाहातेय? हा बॉनी कोण? हिचा बाबा, हिचा भाऊ, हिचा कुत्रा ?  काय काय मनात आलं..
एवढं मात्र खरं की शब्द-सुरांच्या त्या जादूने जणू अर्थाचं विशाल आकाश कवेत घेतलंय असं वाटलं.. जेव्हा जेव्हा हे गाणं मी ऐकायचे तेव्हा तेव्हा गलबलून जायचे..
त्या गाण्याचे पुढचे शब्द होते..
Last night as I lay on my bed
Last night as I lay on my pillow
I dreamed that my Bonnie was dead…
O’ Bring back, bring back, bring back
my Bonnie to me…..

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

O Blow ye winds over the ocean
O Blow ye winds over the sea
O Blow ye winds over the ocean
And bring back my Bonnie to me…..
O’ Bring back, bring back,
Bring back my Bonnie to me…..
विलक्षण आर्ततेने भरलेले हे शब्द कोणाचे असतील? कोणाला उद्देशून हे लिहिलं असावं? आणि हे गाणं बालगीतांमध्ये काय करतंय? असे प्रश्न परत परत पडले.
प्रत्येक वेळी हे गाणं ऐकताना मानवी नात्यांमधल्या कितीतरी छटा जाणवत होत्या. बाळाची आठवण काढून हेलावलेले आई-बाबा हे गाणं म्हणत असतील? आपल्या जिवलगाच्या आठवणीने व्याकुळ झालेले प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांच्या मनातलं हे गाणं असेल? बोटीवरच्या-विमानातल्या अपघातात नाहीशा झालेल्या आपल्या नवऱ्याच्या, भावाच्या-वडिलांच्या आठवणीने स्फुंदणारी एखादी बायको, मुलगी.. असं काय काय मनात येऊन गेलं..
मृत्यूची आर्त वेदनाच या शब्दांतून जाणवली असं नाही तर मुळात काहीतरी निसटून गेल्याची, हरवल्याची जी छाया या साऱ्या कवितेवर भरून राहिली आहे, तो खरं तर या कवितेचा प्राण म्हटला पाहिजे.
आपल्या आयुष्यातही कितीतरी गोष्टी काळाच्या ओघात मागे राहून जातात. हातून निसटून जातात.. नकळत.. शाळा-कॉलेजचे दिवस, आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, आपलं आवडतं माणूस, वस्तू, प्राणी.. आवडती ठिकाणं, त्या ठिकाणांशी जोडलेल्या आठवणी.. आपली स्वप्नं..आपल्या आकांक्षा..यातलं बरंच काही मागे राहातं.. ते हवंहवंसं वाटणारं सारं जग मग एक नॉस्टॅल्जिया बनून राहातं.. कदाचित परत कधीच न येण्यासाठी.. तरी परत फिरून त्यात जावंसं वाटतं.. रमावंसं वाटतं.. ते वाटणं म्हणजेच ही कविता असावी.
ही मूळ कविता काही मला स्वस्थ बसू देईना. मग या कवितेबद्दल शोधाशोध सुरू केली. ही मूळ कविता म्हणजे एक स्कॉटिश लोकगीत आहे. लोकगीत म्हटलं की अर्थातच ते मौखिक परंपरेने चालत आलेलं.. त्याप्रमाणेच या कवितेचा कर्ताही अज्ञात आहे. मूळ बॉनी हा स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ आहे, प्रीटी, ग्रेसफुल, ब्युटिफुल, हॅण्डसम.. हा शब्द स्त्रीलिंगी असला तरी स्त्री-पुरुष कोणासाठी वापरावा याबद्दल काही स्पष्टता नाही. हे कोणी रचलं हे माहिती नसलं तरी या गाण्याची लिखित स्वरूपातली सांगीतिक रचना १८८१  मध्ये चार्ल्स प्रॅट यांनी एच. जे. फल्मर आणि जे. टी. वूड या टोपणनावाने प्रकाशित केली. हे गाणं त्या काळात तरुण वर्गात विशेष लोकप्रिय झालं अशी माहिती सापडली.
हे गाणं कम्पफायर साँग म्हणूनही प्रसिद्ध आहे. स्काऊट ग्रुपमधे शेकोटीचं गाणं म्हणून ते गायलं जातं. या कारणामुळेच की काय; वरच्या कडव्यांसी अर्थाअर्थी अजिबात न जुळणाऱ्या अनेक कडव्यांच्या रचना मूळ कवितेपुढे जोडलेल्या आपल्याला दिसतात किंवा मूळ कवितेवर अनेक विडंबनंही रचली गेली आहेत. त्यामुळे त्यातल्या एक्स्प्रेशनच्या अंगाने चालीतही अनेक फरक दिसून येतात.
यू टय़ूबवर हे गाणं शोधताना असं दिसलं की या गाण्याने अनेक नामवंत संगीतकार-गायक-गायिकांना भुरळ घातली आहे. १९०१ सालापासून ते आता आतापर्यंतच्या अनेकांच्या आवाजातली, वाद्यांवर वाजवलेली गाण्याची धून आपल्याला दिसून येईल. हेडन क्वार्टेट (१९०१), डीन रिड (१९७९), मिच मिलर, रे चार्ल्स, लॉरा राईट ही त्यापैकीच काही प्रसिद्ध नावं.. १९६१ साली ‘टोनी शेरिडॉन’ या मूळ इंग्लिश रॉक अ‍ॅँड रोल सिंगर आणि गिटारिस्टने हे गाणं रेकॉर्ड केलं. १९६२मध्ये ‘बिटल्स ग्रुप’ जो तेव्हा ‘बिट ब्रदर्स’ नावाने प्रचलित होता;  त्यांच्या साथीने टोनी आणि बिटल्सने ‘माय बॉनी’ नावाचा अल्बम प्रसिद्ध केला. अर्थात यातल्या ‘माय बॉनी’ गाण्याची चाल अतिशय वेगळ्या ढंगातील आहे. मूळ स्कॉटिश लोकगीताचा प्रभाव एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असेल याचं खरोखर आश्चर्य वाटलं..
या गाण्याला ऐतिहासिक संदर्भही आहे. हा बॉनी म्हणजे चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट ऊर्फ बॉनी प्रिन्स चार्ल्स (१७२०-१७८८) इंग्लंड, स्कॉटलंड, आर्यलडच्या सिंहासनावर हक्क सांगणारा स्टुअर्ट घराण्यातला जॅकोबिट राजपुत्र. ग्रेट ब्रिटनच्या या गादीवर स्टुअर्टना अधिकार मिळावा यासाठी १७४५ मध्ये जॅकोबिट्सनी केलेल्या उठावाचा प्रणेता म्हणून याचं नाव घ्यावं लागेल. युरोपच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या ‘बॅटल ऑफ क्लोडेन’मध्ये हा बॉनी चार्ल्स पराभूत झाला. जॅकोबिट्सचा उठावही अयशस्वी ठरला. नंतर बरीच वर्षे हा राजपुत्र फ्रान्समध्ये विजनवासात जाऊन राहिला. पराभूत झालेला हा बॉनी चार्ल्स युरोपच्या इतिहासात एक आख्यायिका बनून राहिला. त्याच्या सन्मानार्थ त्याची आठवण म्हणून जॅकोबिट सपोर्टर्सनी हे गाणं रचलं असावं असं म्हटलं जातं.
या गाण्याच्या मागे इतकं काही दडलेलं असेल याची कल्पनाच नव्हती आणि हे गीत बालगीत (ऱ्हाईम), अंगाई (लुलाबी) म्हणून कसं लोकप्रिय झालं काय माहिती? कदाचित त्याच्या मन शांत करणाऱ्या चालीमुळे-सुरांमुळे की काय माहिती नाही. सहज साधे सोपे शब्द आणि कुणालाही गुणगुणता येईल अशी चाल.. या साधेपणानेच काळजाला भिडण्याइतकी ताकद त्यात आणली असावी.
यू टय़ूबवर या गाण्याच्या खाली जगभरातील अनेकांनी अनेक प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. वास्तविक पाश्चात्त्य देशातलं हे बालगीत ऐकून कित्येकांना त्यांचे लहानपणचे दिवस आठवले. कोणी लिहिलंय की माझी आजी माझ्यासाठी हे गाणं म्हणे. एकाने लिहिलंय की या गाण्याची गिटारवरची धून मी माझ्या आजोबांकडून शिकलो. तर एक जण म्हणते, आमच्या आजीच्या फ्युनरलच्या वेळी आम्ही हे गाणं तिची आठवण म्हणून म्टटलं. नुकतीच आजी झालेली एकजण लिहिते, माझ्या मुलीला आत्ताच एक मुलगी झालीय. तिचं नाव बॉनी ठेवलंय. तिच्या स्वागतासाठी मी हे गाणं म्हटलं.
खरं तर अंतरीची वेदना प्रकट करणारं हे गाणं.. पण बऱ्याच जणांसाठी लहानपणच्या मुग्ध आठवणी जागवणारं, आनंद देणारं ठरलं.
बडबडगीत आणि आजी-आजोबा हे एक अतूट असं समीकरण आहे. पहिल्या आणि तिसऱ्या पिढीतलं हे निव्र्याज, निरपेक्ष प्रेम आणि त्याला बडबडगीतांचा संदर्भ हे समीकरण जगाच्या पाठीवर भाषा-धर्म बदलले तरी सारखंच आहे, वैश्विक आहे. याचा प्रत्यय यातल्या बऱ्याच प्रतिक्रिया वाचताना आला.
भूतकाळात रमणं किती चांगलं, किती वाईट ठाऊक नाही. आयुष्यात काही दिवस फिरून परत येत नाहीत. पण आठवणीतून ते सारे दिवस परत भेटू शकतात.. असं कधीतरी ‘रेंगाळणं’ एक वेगळाच आनंद देणारं असतं हे नक्की..    
adjos28@gmail.com