नेहा लिमये – nehaalimaye@gmail.com

‘एक स्त्री आणि एक पुरुष कधीही फक्त मित्र होऊ शकत नाहीत..’ पिढय़ान्पिढय़ा आपण हे वाक्य ऐकत आलो आहोत. डोक्यात पाचर मारून बसलेल्या या ‘संस्कारा’मुळे अनेकांनी  आयुष्याच्या प्रवाहात सहजपणे आलेली निर्मळ भिन्नलिंगी मैत्री नाकारलीही असेल! पण आताच्या जगात केवळ नव्या पिढीसाठीच नाही, तर याआधीच्या पिढय़ांसाठीही स्त्री-पुरुष मैत्रीकडे पाहण्याची परिमाणं बदलली आहेत. ‘ते’ दोघं मित्र असले तरी त्यांच्यात कधीतरी ‘तसलं’ काही घडू शकतं, ही समजूत हळूहळू का होईना, पण मागे पडून मैत्री मोकळीढाकळी होतेय.. या बदलत्या नात्याचा वेध घेणारे दोन लेख उद्याच्या (२ ऑगस्ट) मैत्री दिनानिमित्तानं..

chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
The dog acted like a dead and saved from kidnapper
VIDEO : चक्क मरणाचे नाटक करून कुत्र्याने वाचवला चिमुकलीचा जीव, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल

‘‘आई, जसं ‘लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट’ असतं, तशीच ‘मैत्री अ‍ॅट फर्स्ट साइट’ असते का गं?’’

‘‘म्हणजे गं?’’

‘‘अगं, म्हणजे मला एखादा मुलगा आपला बॉयफ्रें ड असावा असं पहिल्याच भेटीत वाटू शकतं, तसंच एखादा मुलगा पहिल्याच भेटीत आपला मित्र व्हावा,असावा, असं वाटू शकतं का गं?’’

‘‘हो, असू शकतं की.. फक्त मैत्री असू शकतेच की. पण, ‘अ‍ॅट फर्स्ट साइट’ वगैरे हे नवीनच आहे. विचार करायला हवा.’’

‘‘आई, अगं किती टेन्शन घेतेस? चिल! मी सहज विचारत होते.’’

वृंदा हे सहज म्हणून गेली खरं, पण माझ्या डोक्यात ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते’ हे घासून गुळगुळीत झालेलं वाक्य ‘डॉल्बी साऊंड’मध्ये वाजत राहिलं. त्यात मातृसुलभ अशी लेकीबद्दलची काळजी असली तरी स्त्री-पुरुष मैत्रीभोवतालचा युगानुयुगं असलेला गुंताही वर आलाच. दोन भिन्नलिंगी माणसांमध्ये प्रेमच असू शकतं, शारीरिक आकर्षण तर असतंच असतं, निखळ मैत्री शक्यच नसते हेच तर वाचत, बघत, ऐकत आलोय. शिवाय हिंदी-मराठी चित्रपटांतून स्त्री-पुरुषांत जे एकच एक ‘जनम जनम का साथ’ असलेलं नातं मेंदूत फिट्ट झालंय, की त्यांच्यात सहज, सोपं, साधं नातंवजा काहीतरी असू शकतं हेच विसरायला झालंय. मैत्र गरजेचं आहे यात दुमत नाही, पण त्या मैत्राला लिंग जोडलं गेलं की त्याचे संदर्भ अचानक बदलू लागतात. त्यामुळे खरंच अशी मैत्री होऊ शकते, असू शकते आणि टिकूही शकते, यावर पटकन विश्वास बसत नाही.

‘मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस’ या पुस्तकाचा लेखक म्हणतो, की पुरुषाचा मेंदू हा आधी बाईमधली मादी, तिचं सौंदर्य बघतो, आणि नंतर तिच्या आवडीनिवडी, स्वभाव वगैरे. त्यामुळे पुरुष स्त्रीशी मैत्री करतो त्यामागे सुप्त शारीरिक आकर्षण असतंच. स्त्रीच्या बाबतीत असं असेलच असं नाही. अर्थात हा लेखकाचा दृष्टिकोन झाला. पण यापलीकडे या दोघांत काही भावबंध, समीकरणं, निरपेक्ष, निव्र्याज अशी विचारांची, भावनांची देवाणघेवाण असू शकतेच की. विशेषत: आजच्या काळात, जिथे कामाचे १२-१४ तास सतत एकत्र असणं अपरिहार्य आहे तिथे स्त्री-पुरुष सहकारी मित्र असणं, कामाच्या निमित्तानं अनेक शहरं, देश फिरताना सहज ओळख होणं, आणि बौद्धिक क्षमता जुळल्यानंतर मैत्री होणं हे अगदी साहजिक असतं. काही वेळा जोडीदाराचं नोकरीचं, राहाण्याचं ठिकाण वेगळं असतं, तेव्हा आधार देणारा, हक्काचा असा एक सुहृद मिळणं, हेसुद्धा सहज घडतं. आपापले परीघ, कर्तव्यं, जबाबदाऱ्या ओळखून दुसऱ्या व्यक्तीला जाणून घेण्याइतका, पण तिच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ न करण्याइतपत पुरेसा समजूतदारपणा दोघांकडेही असतो. तरीही त्यांच्यात ‘तसलं’ काहीतरी घडण्याची शक्यता, नव्हे खात्रीच असते अनेकांना!

लिंगभेदामुळे अशा नात्यात मैत्री आणि आकर्षण यातली सीमारेषा धूसर असते हे मान्य, पण काळानुसार झालेले बदल लक्षात घेऊन दोन क्षण का होईना, पण दोन माणसं म्हणून त्या दोघांकडे पाहिलं तरी पुरेसं आहे. यानिमित्तानं स्त्रियांच्या मनातली मित्राची नक्की व्याख्या तरी काय असते, या पुरुषांना चिरंतन पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं, तर कवयित्री अरुणा ढेरे यांच्या या ओळी सार्थ ठरतील –

स्त्रीच्या मनातला मित्र हा तिच्या चौकटींना समजून घेऊन त्यांचं कुंपण न होऊ देता, तिला आभाळात झेप घेऊ देणारा तिचा सखा आहे. म्हणून तर काही वेळा मैत्रिणीपेक्षा ती मित्राकडे जास्त मोकळी होऊ पाहते. बायका-बायकांमध्ये असलेली एक सुप्त ईर्षां, मत्सरभावना, बायकांच्या तोंडात तीळ न भिजण्याची वृत्ती माहिती असल्यामुळे बऱ्याचदा स्त्रिया काही गोष्टी मैत्रिणीच्या तुलनेत मित्राशी पटकन ‘शेअर’ करतात. मित्र शांतपणे ऐकून घेईल, आपलं गुपित त्याच्याकडे सुरक्षित राहील, ‘जज’ न करता, तटस्थपणे, त्या वेळच्या परिस्थितीनुसार योग्य सल्ला देईल, हा विश्वास ‘तिच्या’ मनात असतो. आपल्या सहचराला, त्याच्यातल्या पुरुषी आवेग-भावनांना समजून घेण्यासाठीसुद्धा मित्रांशी केलेलं हितगुज उपयोगी पडतं. या शेअरिंगमुळे दुसऱ्या पुरुषाबरोबरचं तिचं लोंबकळणारं नातं सावरू शकतं,

स्थिर होऊ शकतं. मैत्रीत किती खासगी गोष्टी एकमेकांना सांगायच्या हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे, पण प्रत्येक पिढीनुसार या देवाणघेवाणीची मर्यादा रुंदावत गेली आहे, हे मागच्या तीन पिढय़ांकडे पाहिलं तर सहज लक्षात येतं.

आताच्या साठी-सत्तरीच्या घरात असलेल्या आई, मावशी, काकू, मामी यांच्याकडे बघितलं तर मित्रवर्गात मोडणाऱ्या तमाम पुरुषांना त्या एकतर ‘भाऊजी’ किंवा ‘दादा’ किंवा तत्सम काहीतरी ‘लेबल’ चिकटवून मोकळ्या झालेल्या असतात. हे कृष्ण आणि द्रौपदीसारखं आहे. म्हणायला कृष्ण द्रौपदीचा सखा, मित्रच. पण त्या काळच्या सामाजिक संकेतात नातं बसवायचं म्हणून तेही भाऊ-बहीणच. मग या पिढीतल्या बायकांचं तरी लेबलिंग करण्यात काय चुकलं? ‘अमुक एक माझा मित्र आहे’ म्हणताच, ‘बदफैली’, ‘वाईट वळणाची’, ‘मुलांवर कसले संस्कार करणार मग?’, हे प्रश्न बाणांसारखे आदळणार. मुळातच स्त्रीला मनातलं मनातच ठेवायची सक्ती. मन मोकळं करायचंच असेल तर ती जागा पुरुषवर्गापैकी फक्त तिचा पती, वडील, भाऊ, फारतर काका, मामा वगैरेच. अगदी दिराबरोबरचं नातंही बदनामच जास्त के लं गेलं आहे. चार हातांचं अंतर ठेवूनच पुरुषांशी वागणारी ही पिढी- ‘आहेत की मैत्रिणी. त्यांच्याकडे जावं. मित्रच कशाला हवाय?,’ हे म्हणताना एकीकडे घुसमट मान्य करते, पण ती व्यक्त करायला एखादा मित्र असला तर जणू काही आभाळ कोसळेल या विरोधाभासात जगते. यालाही अपवाद आहेत- पण ते अपवादानंच!

त्या मानानं चाळिशी-पन्नाशीच्या आताच्या पिढीत बहुतेक बायका नोकरी-व्यवसाय करू लागलेल्या, बाहेरच्या जगाशी दोन हात करणाऱ्या, नवऱ्यासमोर  मित्राला ‘घरी ये सगळ्यांना घेऊन,’ इतपत म्हणण्याचं तरी स्वातंत्र्य असलेल्या, ‘गेट-टुगेदर’मध्ये मैत्रिणींइतक्याच मित्रांबरोबर दिलखुलासपणे रमणाऱ्या, पण तरी कात्रीत अडकलेल्या.  एकीकडे जुन्या पिढीच्या घट्ट  संस्कारात वाढल्यामुळे ‘समाज काय म्हणेल’, ‘घरचे काय म्हणतील,’ याचा बागुलबुवा, आणि दुसरीकडे नव्या पिढीचा वारा लागल्यामुळे ‘मित्र असू शकतोच की, त्यात काय एवढं? आपल्याला रोज थोडंच बोलायचंय?’ अशी दुहेरी मानसिकता सांभाळताना दमछाक झालेल्या. मनातून या पिढीतल्या प्रत्येक ‘अमृता’ला ‘इमरोज’सारखा अबोल, समजुतीचा, शहाणा मित्र असावा असं वाटतं.

मग जुने संस्कार आणि नव्यानंच कळू लागलेलं स्वातंत्र्य यातला साकव बांधत ‘कितीक हळवे कितीक सुंदर किती शहाणे अपुले अंतर’ म्हणतच त्या मित्राला, मैत्रीला जपतात. त्यात त्यांची विचित्र ओढाताण होऊन कधी कधी चांगली मैत्री सुरुवातीलाच कोमेजून जाते, किंवा ‘खूबसूरत मोड पे’ जाऊन संपते. घरी मोकळं वातावरण असेल, सहचर समजूतदार असेल, तर मात्र मैत्री छान मुरलेलं लोणचंदेखील होते.

या दोन्ही पिढय़ांच्या कैक पुढे असलेली विशी-तिशीतली आताची तरुण पिढी बघितली तर मात्र त्यांच्या मैत्रीविषयीच्या कल्पना अगदी स्पष्ट असतात. गौरी देशपांडेंच्या कथेतली फॅन्टसी वाटावी अशी पुरुष मंडळी या पिढीतल्या तरुणींचे मित्र असू शकतात. त्यांच्याकडे ‘फॅशन सेन्सवाली’ मैत्रीण, ‘स्कॉलर’ मैत्रीण, आई—बाबांना ‘कन्व्हिन्स मारू शकणारी’ मैत्रीण अशी मैत्रिणींची वर्गवारी असते. तशीच ‘कॉफीवाला’ मित्र, ‘मूव्हीवाला’ मित्र, ‘चिलआऊट’ मित्र, जगातल्या कुठल्याही विषयावर गप्पा मारता येतील असा ‘इंटेलेक्च्युअल’ मित्र, अशी मित्रांचीदेखील वर्गवारी असते. समाजाला खिजगणतीतही न घेता पुरुषांशी मैत्री निभावताना ‘दिल दोस्ती दुनियादारी’ व्यावहारिक जगात कशी पाळायची हे त्यांना माहिती असतं. पहिल्या नजरेतलं प्रेम असो किंवा मैत्री, दोन्ही सहज स्वीकारतात. अगदी साहित्य, राजकारण, अर्थकारण यापासून पिरिएड्स, डेटिंग, सेक्स, ट्रान्स-रिलेशन्स अशा कुठल्याही विषयावर मित्राशी गप्पा मारू शकतात, वाद घालू शकतात, एकमेकांचे दृष्टिकोन पडताळून पाहू शकतात. त्यासाठी दर वेळी ‘वेव्हलेंग्थ’ जुळावी अशीही पूर्वअट नसते. मैत्री करताना वय, लिंग, हुद्दा वगैरे गोष्टींपेक्षा स्वभाव, आवडीनिवडी, नावीन्य शोधण्यात ही पिढी जास्त उत्सुक असते. वरवर पाहता ही पिढी बिनधास्त, उथळ वाटते, पण आपल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारण्याएवढी सुजाणही आहे. मैत्रीतला गुंता मोकळेपणानं बोलून सोडवणं, मैत्री पुढच्या टप्प्यावर गेली किंवा तुटली तरी कुठल्याही प्रसंगात ‘मूव्ह ऑन’ करणं त्यांना चांगलं जमतं. मित्र हा बॉयफ्रें ड, पार्टनर झाला तरी त्या बाकीच्या मित्रांना लगेच टाटा, बाय-बाय करत नाहीत. पुरुषाबरोबरचं नातं हे ‘बेड’वरच संपतं, या भ्रमाला काट देणारी, मित्रावर मित्र म्हणूनच विसंबून राहणारी, मैत्री आणि खासगी आयुष्य ठरवून वेगळं ठेवू शकणारी आजची स्त्री आत्मभानाला प्राधान्य देणारी आहे.

पिढी कुठलीही असो, अशी भिन्नलिंगी मैत्री गरजेची होती आणि आहे, हे सगळ्याच पिढयांना मान्य आहे. आणि कुठल्याही मैत्रीला लागू होतं तेच स्त्री-पुरुष मैत्रीलाही- विश्वास आणि संवाद असेल, मनाच्या हळव्या कोपऱ्यांचा शोध घेत एक आश्वासक आधार  निर्माण होत असेल, तर अशी मैत्री का नाकारावी? उलट दोन्ही हात पसरून तिचा स्वीकारच करावा, असा विचार आजची स्त्री करते. चहा-कॉफीला भेटणं, ‘ट्रेक’ला जाणं, पुस्तकांवर, चित्रपटांवर, अलीकडच्या घटनांवर चर्चा, वाद घालणं, एकमेकांच्या आवडीनिवडी जपणं, अडचणींमध्ये नुसतं सोबत असण्यानंसुद्धा धीर देणं, यातून मैत्री समंजसपणे पुढे नेते. आयुष्यात काहीतरी कमी आहे म्हणून नव्हे, तर ‘मला अमुक एक मित्र म्हणून हवा आहे’ म्हणून ती मैत्री करायला शिकते. आकर्षणाचा बिंदू त्यात असावा की नसावा, तो गृहीत धरूनच मैत्री करावी का, केली तर ती किती पुढे न्यावी, या गोष्टी व्यक्तिगणिक बदलतील. पण व्यक्तीपेक्षा मैत्री जपण्याला प्राधान्य दिलं की त्या दुय्यम ठरतात, हे तिला चांगलंच ठाऊक आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तर स्त्री-पुरुष मैत्री वेगवेगळ्या स्वरूपांत, संदर्भात जुळताना दिसते आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टा’मुळे दूर अंतरावर असलेली व्यक्ती सहजगत्या फोटो, ‘चॅट विंडो’ किंवा ‘व्हिडीओ कॉल’वर दिसते, बोलते हा भरवसा खूप काही देऊन जातो. आपला मित्र किंवा मैत्रीण जिथे कुठे आहे तिथे तिच्या संसारात, कामात रमलेली, गुरफटलेली पाहून मनाला समाधान मिळतं. पूर्वी कुणाशी काही कारणानं बिनसलं असेल तर आता ‘मेसेज’ करून, ‘चॅट’च्या माध्यमातून पुन्हा संपर्क साधून मनातली जळमटं धुऊन काढता येतात. ‘ई-मेल’चा उपयोग पत्रमैत्री जुळताना होतो, तर ‘इन्स्टा’, ‘पिंटरेस्ट’वर फोटो, ‘कोटस्’ टाकून जुळलेला संवाद पुढे मैत्रीत रूपांतरित झाल्याची उदाहरणंसुद्धा सापडतात. या ‘हायटेक’ जगाचा फायदा सगळ्यात जास्त मधल्या पिढीला  झाला आहे. लग्न झाल्यावर मित्रमैत्रिणी विखुरले जाऊन नंतर वर्षांनुर्वष साधा फोनवरदेखील संपर्क नसणं हे या पिढीनं, विशेषत: स्त्रियांनी अनुभवलेलं आहे. आता मात्र नवीन पिढीशी जुळवून घेण्यासाठी ‘स्मार्ट’ झाल्यामुळे ‘आभासी कट्टय़ा’वर एकत्र जमणं, वाढदिवस साजरे करणं, भटकंतीला जाणं, वगैरे तर ही मंडळी करतातच. शिवाय ‘बुक क्लब’, ‘कॉफी क्लब’, ‘ट्रॅव्हलॉग’, साहित्य संमेलनं, गायन, लेखन, कवितावाचन, अभिनय, बिझिनेस मीटिंग्ज हे सगळंच ‘ऑनलाइन’ करता येत असल्याकारणानं स्त्री-पुरुष मैत्री अधिकाधिक मोकळीढाकळी होत चालली आहे. शिवाय समाजमाध्यमांवर मैत्री होण्यासाठी इत्थंभूत वैयक्तिक माहिती हवी, हा निकषच गळून पडतो. समान आवडीचे विषय बघून मैत्री तेवढय़ापुरतीच ठेवता येते आणि नंतर वाटलं तर हळूहळू खासगी ‘स्पेस’मध्ये शिरू देऊन पुढे जाता येतं. ‘भेटायला हवं’ ही ‘फेज’ या मैत्रीमध्ये येतेच असं नाही, आणि तिच्यावाचून फार काही बिनसलंय असंही घडत नाही. समाजमाध्यमांच्या बाहेर आणि आत वेगवेगळ्या प्रतिमा असलेली व्यक्ती असली तरी तिच्या हव्या असलेल्या पैलूकडे बघून ‘सॉर्टेड’, सुटसुटीत मैत्री असणंही शक्य आहे. अर्थात आभासी जगातसुद्धा सदासर्वदा सगळं आलबेल नसतंच, पण पुरुषाशी मैत्री करण्याला आणि ती निभावण्याला स्त्रियांसाठी पूर्वीसारखे अडसर आता राहिलेले नाहीत. त्यामुळे लेकी-सुनांबरोबरच आई-आजी-सासवाही आभासी जगात निर्धास्तपणे मित्रमैत्रिणींसोबत विहरत असतात.

मुळात अडसर मनाचे असतात. ते दूर करून स्वच्छ मोकळ्या नजरेनं या मैत्रीकडे बघणं यात समाजमाध्यमांचा बराच हात आहे हे नक्कीच. तंत्रज्ञान जसं आणखी विस्तारत जाईल तसे या मैत्रीचे आयामही बदलणार आहेत यात शंका नाही. आताच्या पिढीतले आई-बाबा जेव्हा आजी-आजोबा होतील, किंवा मुलं आई-बाबा होतील, तेव्हा त्यांच्याकडेही ‘ट्रॅव्हल फ्रें ड’, ‘हॉटेलिंग फ्रे ंड’, ‘बुक फ्रें ड’, ‘गॉसिप फ्रें ड’, अशी वर्गवारी असेल.

कायम वर्तमानात जगणाऱ्या या पिढीला समोरचा ‘कूल’ वाटणं पुरेसं असेल. जिथे जवळची माणसं कमी होत चालली आहेत, भोवतालची स्पर्धा सातत्यानं वाढत चालली आहे, माणसांपेक्षा ‘गॅजेट्स’ची संख्या जास्त होते आहे, एकीकडे आपला अवकाश हवा असताना दुसरीकडे एकटेपणाची जाणीव प्रबळ होते आहे, अशा वेळी या पिढीला तिथे फक्त मित्र किंवा मैत्रीण असणं महत्त्वाचं असेल. लिंग हा मुद्दाच नसेल. तिथे या भिन्नलिंगी मैत्रीला नाकारलं जाण्याचं भय नसेल, उलट हक्काचं अंगण असेल, आणि विस्तारलेल्या क्षितिजापाशी अशी मैत्री नवीन तारांगण शोधत असेल, हे नक्की.

माझ्या मित्रा

ऐक ना,

मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ

अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ

बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा

तीव्रमधुर तिथला वाऱ्याचा वावर

आणि मुक्त असण्याची त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही

कितीदा पाह्य़लेय मी हे स्वप्न, झोपेत आणि जागेपणीही!

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही

पण थांब, घाई करू  नकोस,

अर्धे फुललेले बोलणे असे अध्र्यावर खुडू नाही.

हे ऐकताना हसशील, तर  मर्द असशील;

स्वप्न धरायला धावशील माझ्यासाठी,

तर प्रेमिक असशील,

समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात

धपापतेय माझे काळीज,

तर मग तू कोण असशील?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,

हाती देशील तर पती असशील,

आणि चालशील जर माझ्यासोबत

त्या उजळ हसऱ्या स्वप्नाकडे

समजून हेही, की ते हाती येईल, न येईल,

पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे, धापत धावणे

आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल,

तर मग तू कोण असशील?

मित्र असशील माझ्या मित्रा!

– कवयित्री : अरुणा ढेरे