माझ्या आईची, जावेची, त्या माऊलीची भाकरी करायची पद्धत भले वेगळी असेल, पण त्या पिठाशी आपल्या सुंदर बोटांनी बोलत बोलत त्याला कुरवाळत त्याच्यातनं इतकं काही तरी छान खमंग बनवण्याचा तो सोहळा सगळीकडे तसाच होता. त्या तिघींच्या भाकरीभोवतीचं भवताल भले वेगवेगळं असेल, दगडाच्या चुलीपासून ते गॅसच्या ज्योतीपर्यंत बदलत जाणारं, पण आपापल्या हातांनी त्या तिघी त्या पिठाशी साधत असलेलं तादात्म्य, त्यातून बनत जाणारी ती तंद्री एकच होती. ही तंद्री माझ्या आयुष्यात आली ती अन्शीमुळं.
आत्ताच दुर्गाबाई भागवतांच्या ‘दुपानी’ नावाच्या पुस्तकात भाकरीचं वर्णन वाचलं आणि खूप वर्षांनी आईची भाकरी आठवली. दुर्गाबाईंनी ‘मानिनी’ चित्रपटात त्या काळच्या फार मोठय़ा अभिनेत्री रत्नमालाबाईंनी कशी सुंदर भाकरी केली आहे, याचं वर्णन केलं आहे. माझ्या आईला भाकरी करताना पाहायला मला लहानपणी तर आवडायचंच, अजूनही आवडतं. तिच्या हाताला भाकरीचं पीठ मळण्यापासूनच एक फार छान लय मिळते. हालचालींना सुसंगतता यायला लागते. एखाद्या कोऱ्या कॅनव्हासवर कुठल्याशा रंगात बुडवून ब्रश टेकवला आणि एक नागमोडी, गोलाई असलेला आकार तो ब्रश न उचलता हात काढतच गेला तर त्या हाताला जी गोलाईयुक्त सुसंगतता असेल तशी काहीशी आईच्या पीठ मळण्याला असते. म्हणजे तिनं पाण्यात बुडवायला हात उचलला तरी उचललाच नाहीये असं वाटतं. प्रत्येक हालचाल एकमेकीला जोडलेली. तिचा भाकरीवर थापटणारा हातसुद्धा एका तालात जाणारा. भाकरी तव्याइतकी मोठी आणि गोल. एका झपक्यात तव्यावर डौलदार पडताच पहिल्यांदा उलटली गेली की आईचा तिच्यावरनं फिरणारा पाण्याचा प्रेमओला हात. तो हात फिरताक्षणी जणू ते पीठ मोहरल्यासारखं झालं आहे, आईला प्रतिसाद देतं आहे असं वाटण्यासारखा. लगेचच भाकरीचा मंदसा वास यायला लागतो. तो वास ती जसजशी भाजली जाईल तसतसा वाढतच जातो. एका क्षणी आई गॅसवरचा तवा काढून नुसत्या आगीवर ती भाकरी भाजायला घेते तेव्हा ती टम्म फुगते. या सगळय़ा वेगवेगळय़ा कृतींमध्ये आईचा हात आणि घडत जाणारी भाकरी हे एकमेकांशी बोलत आहेत असं वाटतं. हे टम्म फुगणं हा या संवादाचा परमोच्च बिंदू.. आईचा हात आणि भाकरी यांचा हा संवाद प्रेमळ ओलावा ते खटय़ाळपणा या वेगवेगळय़ा भावांमधून जातो आहे असं वाटतं. आधी आईचा ओला हात प्रेमानं फिरतो तिच्यावरून पण ती टम्म फुगताच आई तिला टपल्या मारल्यासारखं मारते आणि तिच्यातून फुस्सकन् वाफ बाहेर येते तेव्हा ती भाकरी फिस्कन हसल्यासारखी वाटते. लहानपणी त्या गरम भाकरीला ताटात घेऊन मी नुसतीच पाहात राहायची. तिचा वरचा पापुद्रा उचलून आतल्या खरबरीत भागावरून हळूच हात फिरवायला खूप आवडायचं. आई त्या भागावर थोडंसंच मीठ शिंपडून त्यावर तुपाचा हात फिरवायची. त्यानंतर जेव्हा त्या भाकरीचा पहिला घास तोंडात जायचा तेव्हा काय व्हायचं हे कुठल्या शब्दांत सांगू? माझं लग्न ठरलं. माझी मोठी जाऊ मेघना फार सुंदर भाकऱ्या करते असं मी सासरच्या सगळय़ांकडनंच ऐकलं होतं. माझ्या लग्नानंतर एकदा तिनं तिच्या टुमदार घरामागच्या सुरेख बागेत चुलीवरच्या भाकऱ्यांचा फक्कड बेत आखला होता. तो दिवस मी इतक्या वर्षांनंतरही विसरणार नाही. त्या दिवशीची मेघनाच्या भाकरीची चव पुन्हा एकदा मला आईच्या भाकरीकडे घेऊन गेली! त्यानंतर अगदी परवा माझ्या नवऱ्याच्याच एका कामासाठी सोलापूरजवळच्या एका खेडय़ात गेले होते. तो दिवस तिथल्या बाजाराचा होता. गावातले छोटे छोटे रस्ते वेगवेगळय़ा सुंदर रंगांनी भरून गेले होते. त्या चिंचोळय़ा रस्त्यांमधून जमिनीवर मांडलेल्या त्या निरागस वस्तू बघत मी हिंडत होते. केशरी लाल रंगावर पिवळसर रेशमानं भरतकाम केलेल्या चंच्या, बैलांच्या घंटा, घुंगरू, पितळेचे देव आणि बरोबरीनेच ताज्या टवटवीत भाज्या या सगळय़ाचा विलक्षण वास आणि या सगळय़ाचा मिळून एक गजबज कोलाहल नाका-कानात भरून राहिला होता. त्या गजबजीत घाई नव्हती, उत्सव होता. त्यात मी एका गल्लीच्या मध्यावर पोचतेय तोच तो परिचित वास कुठूनसा तरंगत आला. भाकरी भाजली जाण्याचा. आता इथे कुठून येतोय हा वास, आसपास कुठं घर, झोपडंही दिसेना. त्या वासाच्या मागे गेले, तो ती गल्ली संपताना कोपऱ्यावर एक कल्हईवाला दिसला. त्याच्या सामानामागे छोटी मोकळी जागा, एक झाड आणि त्या झाडाखाली एक अद्भुत सोहळा!
उन्हं पडून संधिप्रकाशाची वेळ जवळ येत चाललेली. त्या कल्हईवाल्याच्या सुंदर बायकोनं रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली होती. झाडाखाली चार दगडांवर एका काळय़ा पडलेल्या पातेल्यात भात रटरटत होता. त्याच्या शेजारी एक काळा मोठा लोखंडी तवा तापत होता. तो तवा आईच्या तव्याहून बराच मोठा होता. ही माऊली तिथं त्या झाडाखाली मोठय़ा, पातळ भाकऱ्या थापत होती. या अन्नपूर्णेची भाकरी करण्याची पद्धत माझ्या आईपेक्षा वेगळी होती. आई डाव्या हातानं परात पकडून उजव्या हातानं भाकरी थापटते. त्याच एका हातानं थापटत थापटत ती गोलही फिरवत मोठी करत जाते. ही झाडाखालची माऊली दोन्ही हातांनी भाकरी परातीत थापटत गोल फिरवत मोठी करत होती. दरम्यान, संधिप्रकाशाचा जादूई प्रकाश पसरला आणि तिची थापटणारी आकृती अस्पष्ट सावलीसारखी दिसायला लागली. ती आता मला एक चित्रंच वाटू लागली. आसपासचा गजबजाट, गर्दी याच्या इतक्या जवळ असूनही ती त्या कशातच नव्हती. तिची एक शांत तंद्री लागली होती. ती आणि तिची भाकरी याचं एक वेगळं विश्व तयार होऊन राहिलं होतं. त्या विश्वाला त्या रंगीबेरंगी बाजाराचं, त्या बाजारातल्या चंच्या, बाहुल्या, घुंगरू यांचं झळाळतं कोंदण होतं. एक मात्र वाटलं. माझ्या आईची, जावेची या माऊलीची भाकरी करायची पद्धत भले वेगळी असेल पण त्या पिठाशी आपल्या सुंदर बोटांनी बोलत बोलत त्याला कुरवाळत त्याच्यातनं इतकं काही तरी छान खमंग बनवण्याचा तो सोहळा सगळीकडे तसाच होता. त्या तिघींच्या भाकरीभोवतीचं भवताल भले वेगवेगळं असेल, दगडाच्या चुलीपासून ते गॅसच्या ज्योतीपर्यंत बदलत जाणारं, पण आपापल्या हातांनी त्या तिघी त्या पिठाशी साधत असलेलं तादात्म्य, त्यातून बनत जाणारी ती तंद्री एकच होती. मला स्वत:ला स्वयंपाकाची फारशी आवड नसल्यानं ही तंद्री माझ्या आयुष्यात यायला वेळच लागला. ती माझ्या आयुष्यात आली ती अन्शीमुळं.
  ‘बाधा’ नावाच्या सुमित्रा भावे सुनील सुकथनकरांच्या चित्रपटातली माझी भूमिका, ‘अन्शी! ही एक धनगर बाई.. दुर्गाबाईंनी ‘दुपानी’मध्ये भाकरीविषयी लिहितानासुद्धा भाकरीच्या कलेत धनगर बायकांना अग्रस्थान दिले आहे. ‘अन्शी’च्या तयारीसाठी चित्रीकरणाच्या काही दिवस आधी माझे दिग्दर्शक मला चित्रीकरण ज्या ठिकाणी होणार होतं त्या धनगरांच्या वस्तीवर घेऊन गेले. तिथल्या धनगर सखारामबापूंनी गेल्या दिवशीच मला त्यांची मुलगी मानलं. एका खोपटातल्या एका चतुर धनगरिणीला मी माझं गुरू बनवलं. तिची साडी नेसण्याची पद्धत, तिचे दागिने, तिचं डोक्यावर चंबळ ठेवून त्यावर एकावर एक घागरींची चळत लावून न डगमगता ताठ कण्यानं पाणी आणणं, सगळं मी आसुसून टिपत होते. संध्याकाळ झाली तशी ती बसली भाकऱ्या थापायला. तिची भाकरीची पद्धत आणखीनच वेगळी. तिच्या त्या थापटण्याच्या रत्नसोहळय़ाला तिचं आयुष्य, तिच्या मेंढरांचा वास, तिची सारवलेली लिंपलेली चूल या भवतालाचं कोंदण. तिच्या भाकरीच्या पद्धतीनुसार भाकरीच्या मळलेल्या पिठाचा गोळा दोन्ही हातात घ्यायचा. चपटा करून दोन्ही हातांची बोटं, अंगठा आणि तळवा यांच्या सांदरीत पकडायचा आणि बोटांनी हातातल्या हातात गोल फिरवत फिरवत मोठा मोठा करत न्यायचा. गोळा हातातच असा बऱ्यापैकी मोठा होत गेला की परातीत ठेवून थोडय़ा वेळ थापटून पुन्हा एका झपक्यात चुलीवरच्या तव्यावर. मग पुढचं सगळं सगळीकडचं सारखचं. फक्त आई गॅस लहान-मोठा करेल, झाडाखालची बाई तिच्या कल्हईवाल्या नवऱ्याकडच्या कुठल्याशा यंत्रानं हवा फुंकून जाळ कमी-जास्त करत होती, ही धनगर बाई फुंकणी वापरत होती. तिच्या भाकऱ्या झाल्यावर मी बसले चुलीसमोर. तिनं मळलेलं पीठ लोण्यासारखं मऊ. त्याला हात लावताक्षणी मुकं जनावर आसुसून आपल्याला लगटावं त्या असोशीनं माझ्याशी बोलायला लागलं. पहिल्या एक-दोन भाकऱ्या मोडल्या. तिसरीपासून माझ्या बोटांचं आणि पिठाचं सूत जमलं. कुठली भूमिका कुठल्या रस्त्यानं तुमच्यापर्यंत चालत येईल सांगता येत नाही. अन्शी माझ्याकडे भाकरीच्या रस्त्यानं आली. मी त्या दिवसापासून अन्शीच्या भूमिकेचा वेगळा असा काहीच विचार केला नाही. फक्त संवाद समजून घेतले आणि घरी रोज भाकरी थापत राहिले. अन्शी एक घुसमटलेली धनगर बाई. तिच्या नवऱ्याला ती आवडत नाही, पेक्षा त्याला तिच्याकडे बघायला वेळच नाही. रोज रात्री अन्शीच्या हातची भाकरी पोटात रिचवली की त्याची फटफटी काढून दुसऱ्या एका बाईकडं निघून जातो. घरी अन्शीच्या सासूनं अन्शीला पोर व्हायला हवं म्हणून तिच्यामागं तगादा लावलेला. पण नवरा दुसऱ्याच बाईशी संग करतो. अन्शीचा आणि त्याचा संगच नाही तर पोर होणार कसं.. तोंड उघडून हे अन्शीला कुणाला सांगताही येत नाही. अशा मुक्या पात्रांना चांगली संहिता शब्दांपलीकडच्या काही प्रसंगांमधून बोलकं करते. चित्रपटात एक प्रसंग आहे- रात्र झाली आहे. अन्शी चुलीसमोर भाकरी करायला बसली आहे. नवरा खाली बघून जेवतो आहे. त्याचं जेवण झालं की तो निघून जाणार हे अन्शीला माहीत आहे. अन्शी त्याच्याकडे एकटक पाहते आहे. उदास. तिचे हात भाकरी करतात पण नजर त्याच्याकडे. या प्रसंगाचं चित्रीकरण चालू असताना मी उदासपणे ती भाकरी करायला घेतली आणि माझ्या बोटांनी आणि त्या भाकरीच्या पिठानं मला अन्शीची गोष्टच सांगायला घेतली. वाटलं, अन्शीचं मन कुणालाच कळत नाही, पण या तिच्या हातात फिरणाऱ्या भाकरीला मात्र कळलं आहे. तिच्या हातात फिरणाऱ्या त्या पांढऱ्या पिठाच्या गोळय़ाला तिची बोटं तिची मूक गोष्ट सांगत आहेत. अन्शीची गोष्ट. तिच्या भाकरीच्या पदरी रत्नसोहळय़ाचं नशीब नाही. तिच्या भाकरीचं कोंदण म्हणजे एक उदास विरहिणी. तिला तिच्या नवऱ्याला काय काय म्हणायचं आहे.. ते सगळं आतल्या आत घुसमटलेलं. त्या दिवशी अन्शीची उदास भाकरी माझ्या हातात संथ फिरत असताना मी अन्शीची आणि त्या भाकरीची उदास तंद्री पाहिली. त्या तंद्रीत तिच्याशी नकळत अन्शीची गोष्ट तिच्या भाकरीत उतरत जाते. तिला वाटतं, माझ्या धमन्यांमधली माझी गोष्ट माझ्या बोटांकडून या भाकरीत गेली. ती गोष्ट त्या भाकरीकडून रोज माझ्या नवऱ्याच्या पोटात जाते. तरी तो ती ऐकतच नाही. खाली मान घालून जेवत राहतो. माझ्याकडे ढुंकूनही न बघता.. अन्शीची उदास भाकरी तिच्या हातात संथ फिरत असताना ती मात्र आसुसून नवऱ्याकडे टक लावून पाहते आहे. तिला वाटतं आहे, एकदा तरी त्याला त्या भाकरीची भाषा कळेल, त्याचा घास घशातच अडकेल आणि तो अन्शीच्या डोळय़ांत बघेल. एकदा तरी.. निदान एकदा तरी..!
अन्शीनं मला भाकरीची भाषा शिकवली. त्यानंतर आता कुणालाही भाकरी करताना पाहिलं की मला ती भाकरी थापणाऱ्या त्या अन्नपूर्णेची गोष्ट त्या भाकरीतून ऐकू यायला लागते. कधी ती समाधानाची असते, कधी घुसमटीची. पण ती नक्की असते, भाकरीची गोष्ट.. असतेच!   

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत