आपण आपल्यातला ‘मी’ जाणून घेण्यासाठी किती उत्सुक असतो? आपण कायम आपली इतरांशी तुलना करीत राहतो. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करतो. हा खरे तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्यातील ‘मी’चा अपमानच असतो.
एका राजाची ही गोष्ट. त्याला काही अधिकारी नेमायचे होते म्हणून त्याने गावात दवंडी दिली. गावातून शंभरेक तरुण मुलाखतीसाठी आले. त्यांची प्रथम त्याने शारीरिक चाचणी घेतली. नंतर मुलाखती घेतल्या आणि त्यातून त्याने चार तरुण निवडले. प्रधानजींना वाटत होते या मंडळींना राजाने लगेच नोकरीवर घ्यावे, पण राजा मात्र तयार नव्हता. त्याला या तरुणांची परीक्षा घ्यायची होती. राजाने आदेश दिला, ‘या चारही तरुणांना चार स्वतंत्र कोठडीत बंदिस्त करून टाका. त्यांना चार दिवस उपाशी ठेवा.’ राजाच्या आदेशाचे पालन करण्यात आले.
पाचव्या दिवशी राजाने पुन्हा आदेश दिला, आत चारही कोठडीत जेवणाची ताटे पाठवा आणि पाठोपाठ भीती वाटेल असे एक कुत्रे प्रत्येक कोठडीत पाठवा. राजाची आज्ञा सर्वानी पाळली आणि सर्व जण त्या तरुणांचे निरीक्षण करू लागले. पहिल्या खोलीत ते जेवणाचे ताट आणि कुत्रे जाताच तो तरुण घाबरला. त्याने जेवणाचे ताट कुत्र्यासमोर ठेवले आणि तो देवाची प्रार्थना करू लागला. राजा म्हणाला, ‘याला आपल्या अध्यात्म विभागात कामाला घ्या. हा तिथल्या कामासाठी योग्य आहे.’
दुसऱ्या खोलीतले दृश्य मजेशीर होते. तो तरुण स्वत:ही ताटातले अन्न खात नव्हता आणि कुत्र्यालाही खाऊ देत नव्हता. राजा म्हणाला, याला आपल्या अर्थव्यवहार खात्यात घ्या. हा स्वत:ही पैसे खाणार नाही आणि इतरांनाही खाऊ देणार नाही.
तिसऱ्या कोठडीतले दृश्य आणखी मजेशीर होते. तिथला तरुण कुत्र्याला मनोभावे अन्न भरवीत होता. राजा म्हणाला, ‘याला आपल्या मुदपाकखान्यात घ्या. हा उत्तम पदार्थ बनवून इतरांना खाऊ घालेल.’
चौथ्या कोठडीतला प्रकार आणखी वेगळा होता. तिथला तरुण अक्षरश: कुत्र्याच्या मानगुटीवर बसून जेवण करीत होता. राजा म्हणाला, ‘याला आपल्या संरक्षण विभागाचा प्रमुख करा. हा त्यासाठी योग्य आहे.’ राजाची पारख करण्याची रीत वेगळी होती. प्रत्येकातल्या ‘मी’चा कल जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता.
आपण आपल्यातला ‘मी’ जाणून घेण्यासाठी किती उत्सुक असतो? आपण कायम आपली इतरांशी तुलना करीत राहतो. त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करतो. हा खरं तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आपल्यातील ‘मी’चा अपमानच असतो. व्यक्तिमत्त्व नावाच्या मूल्याशी केलेली ती प्रतारणाच असते. आपल्याकडे लहान मुलांना नेहमी सांगितले जाते अमक्यासारखा हो, तमक्यासारखा हो. पण तुझ्या रंगाने, गंधाने आणि अंगभूत गुणांनी बहरलेले तुझे व्यक्तिमत्त्व आम्हाला हवे आहे, असा आग्रह कोणी धरीत नाही. संत ज्ञानेश्वर ‘ज्ञानेश्वरी’त एक सुंदर दाखला देतात.
‘स्वधर्मु जो बापा। तोचि नित्य यज्ञु जाण पां।
म्हणोनि वर्ततां तेथे पापा। संचारु काही॥’
 आपल्या स्वभावानुसार आचरण करणे हाच खरा यज्ञ आहे. स्वभावधर्मानुसार आपण आचरण केले तर कधीही पाप लागत नाही. तुका म्हणे झरा। मूळचाचि आहे खरा॥ असे बजावणाऱ्या संतश्रेष्ठ तुकोबारायांचेही हेच सांगणे आहे.
माणसातला ‘मी’ ही त्याच्या अस्तित्वाची खूण असते. अनेकदा त्याच्यासाठी ती प्रेरकशक्ती असते. मी हे केले, मी हे करू शकतो, मला हे करायचे आहे, असा आत्मविश्वास माणसामध्ये निर्माण करून त्याला एखाद्या कार्यासाठी प्रवृत्त करण्याची मोठी ताकद मीमध्ये असते. सनिकांच्या हातात कितीही धारदार आणि आधुनिक शस्त्रे दिली, पण त्यांच्यातला मी लढण्यासाठी तयार नसेल तर त्या शस्त्रांचा काय उपयोग? इतर वेळी ‘मी’ हा अहंकारस्वरूप म्हणून स्वीकारला जातो. पण त्या त्या कार्यक्षेत्रात मी हा ऊर्जास्त्रोत म्हणून कामाला येऊ शकतो. जोपर्यंत मी हा स्वत्वाची खूण म्हणून काम करीत असतो, तोपर्यंत त्या मीपणाला आणि पर्यायाने येणाऱ्या अहंकाराला माणसाचा दागिना किंवा सद्गुण म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या अहंकाराचे गर्वात रूपांतर होते आणि ते त्या माणसाच्या जडणघडणीला जास्त हानीकारक ठरते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा जसा शेवटी विषात रूपांतरित होतो तसेच मीपणाचेही आहे.
प्रतिभावंत माणसे अहंमन्य असतात, असा अनेकदा लोकांचा समज असतो आणि तो खरा ठरावा अशा पद्धतीने ही माणसे वागत असतात. या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले तर? ही माणसे अहंमन्य नसती आणि सारखी ‘मी’ला विसरून वागत असती तर लोकांनी त्यांचे काय केले असते? त्यांची किंमत केली नसती, हेच या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. हे काय कोणतेही निमंत्रण स्वीकारतात, कोठेही बोलावले की येतात, त्यांची कशीही व्यवस्था करा अगर करू नका, त्यांची काहीच तक्रार नसते. मानधन दिले काय किंवा नाही दिले काय, त्यांना त्यांचे काहीच वाटत नाही. अशा पद्धतीने लोक वागवायला कमी करीत नाहीत. गुणवत्ता असताना अधिक अहंकारी न होता कोणी आपली वाजवून किंमत वसूल करीत असेल तर अशा माणसांसाठी त्याच्यातला मीपणा, थोडासा अहंकार हा त्यांच्यासाठी दागिना ठरू शकतो. हा थोडासा अहंकार त्याच्याकडे नसता तर लोकांनी त्याची किंमत कवडीमोल केली असती. ज्या अहंकारातून स्वत्व आणि सत्त्व या दोन्ही गोष्टी जपल्या जातात त्या मीपणाकडे आणि अहंकाराकडे सकारात्मक भावनेने पाहिले पाहिजे. जेव्हा स्वत्व आणि सत्त्व जपताना माणसाच्या अंगी विनयशीलता असते तेव्हा अशा व्यक्तिमत्त्वांना मीपणा, थोडासा अहंकार शोभून दिसतो. जेव्हा माणसाच्या मीपणाला उर्मटपणाची आणि उद्धटपणाची झालर असते तेव्हा माणसातल्या सद्गुणांपेक्षाही त्याच्या अहंकाराचीच चर्चा अधिक होताना दिसते.
माणसांच्या व्यक्तिमत्त्वात गुणदोषांचा संयोग असतो. दोषविरहित माणसे शोधूनही सापडणार नाहीत. सापडलीच तर ती माणसे असणार नाहीत. काही माणसे विनयशील असतात पण त्यांच्याबद्दल थोडासाही आदर वाटत नाही. कारण त्यांच्याकडे भूमिका नसते. ठामपणा नसतो. कोणीही यावे आणि वाकवावे अशा पद्धतीने ती वाकत असतात. अशा माणसांकडे पाहिल्यानंतर वाटते यांना परमेश्वराने थोडा जरी मीपणा किंवा अहंकार दिला असता तर किती बरे झाले असते? अनेकदा थोडासा मीपणा, अहंकार व्यक्तिमत्त्वाची पत आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी निश्चित उपयोगी पडू शकतो. पण त्याची मात्रा वाढली तर ती व्यक्तिमत्त्वाला अपायकारक ठरू शकते. लाखो रुपये भरून प्रवासी कंपनीमार्फत परदेशात निघालेल्या माणसांचा अहंकार विमानतळावरच गळून पडतो. बसस्टॅण्ड आणि रेल्वे स्टेशनपेक्षा तिथे जास्त गर्दी असते. हजारोंच्या संख्येने माणसे त्याच उद्देशाने निघालेली असतात.
जगज्जेता अलेक्झांडर खूप महत्त्वाकांक्षी, पराक्रमी आणि अहंकारी होता. हा अहंकार पराक्रमातून, यशातून येणे स्वाभाविक होते. पण त्याला जीवनाचे अंतिम सत्य अखेरच्या क्षणी का होईना उमगले होते. मृत्यूपूर्वी त्याने स्नेहांकितांना सांगितले, ‘मृत्यूनंतर ज्या खड्डय़ात तुम्ही मला पुरणार आहात, तिथे तुमच्या इच्छेखातर हव्या त्या मौल्यवान वस्तू तुम्ही टाका. पण माझे दोन्ही हात मात्र मोकळेच राहू द्यात. लोकांना कळू द्या हा जगज्जेता जग जिंकूनही जाताना बरोबर काहीच घेऊन जाऊ शकला नाही.’
कर्तृत्वाची शिखरे गाठल्यानंतर असे अलगद मीपण गळून पडण्याला एक वेगळा अर्थ आहे. तो समजावून घेता आला तर अहंकार दागिना म्हणून मिरवण्यात कुणालाही धन्यताच वाटेल.
joshi.milind23@gmail.com