04 August 2020

News Flash

चरितार्थासाठी गायीची मदत

मुंबई व उपनगरातील एकूण २७०० मंदिरांपुढे नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या सुमारे ४००० महिला गायी घेऊन बसतात. बहुसंख्य महिला निरक्षर आहेत.

| March 14, 2015 01:01 am

ch21मुंबई व उपनगरातील एकूण २७०० मंदिरांपुढे नाथपंथी डवरी गोसावी समाजातल्या सुमारे ४००० महिला गायी घेऊन बसतात. बहुसंख्य महिला निरक्षर आहेत. ५१ टक्के विधवा आहेत. तर समाजातील बहुसंख्य पुरुष व्यसनाधीन व बेकार. ही गायही त्यांना भाडय़ाने आणावी लागते आणि ही गाय पालिकेने उचलून नेली की सोडवण्याचा १० हजार रुपयांचा खर्च. गायीच्या जिवावर कसंबसं गुजराण करणाऱ्या या भटक्या समाजाला आता पर्यायी व्यवस्थेची गरज आहे. त्यांच्या मुलांना शिक्षणाची गरज आहे. समाज म्हणून त्यांना माणसासारखं जगणं आपण देऊ लागतो..नाही का?

मुं बईतल्या सांताक्रुझ येथील डवरीनगर येथे राहाणाऱ्या भटक्या जमातीपकी नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या मंगल विनोद िशदे, कांदिवली पश्चिमेला इराणीवाडी येथे असलेल्या शंकराच्या देवळासमोर रोज गाय घेऊन बसतात. सातवीत शिकणारी त्यांची मुलगी नंदा तिची शाळा सांभाळून गायीसोबत आपल्या आईला साथ द्यायची. गेल्याच महिन्यात (मंगळवार ३ फेब्रुवारी २०१५) त्या दोघी माय-लेकी नेहमीप्रमाणे देवळासमोर, पण रस्त्याच्या कडेला गाय घेऊन बसलेल्या होत्या. ‘कोंडवाडय़ाची गाडी येत आहे, गाय तातडीने हलवा.’ असा सतर्कतेचा इशारा लोकांकडून मिळाला, पालिकेची अतिक्रमणविरोधी गाडी येताच रस्त्यावरील तात्पुरत्या टपऱ्या लपवण्यासाठी टपरीधारकांची जशी धांदल उडते तशीच या मायलेकींचीही धांदल उडाली. गाय रस्त्यावर इकडे तिकडे जाऊ नये म्हणून गायीचा दोर नंदाच्या हातात होता तिने तो आपल्या कमरेला गुंडाळून त्याचे टोक हातात धरले होते. मायलेकींची घाईगर्दी, धावपळ आणि झालेली ओढाताण यामुळे गायीने धक्का दिला. नंदा जमिनीवर आडवी पडली. गाय जोरात चालू लागली. ते पाहून लोकांनी आरडाओरडा केला. गाय पळू लागली. तिच्या दाव्याला बांधली गेलेली नंदा फरफटू लागली. नंदाला वाचविण्यासाठी लोक तिच्या मागे धावू लागले, ओरडू लागले. त्यामुळे गाय आणखी भेदरली व बिथरल्यासारखी जोरात पळू लागली. तशी नंदा फुटपाथ, रिक्षा, दुभाजक यांवर आदळत गेली. दुपारी दोनच्या सुमारास तिला शताब्दी रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. का झालं असं? नाथपंथी डवरी गोसावी जमात, त्यातील महिला, गाय, देऊळ, कोंडवाडा, महानगरपालिका यांचा गुंता कसा व काय निर्माण झाला आहे?
नाथ म्हणजे रक्षण करणारा स्वामी, व नाथ संप्रदाय म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय. नाथ पंथ म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचा संप्रदाय होय. तो एक जात किंवा जमात नव्हे. ऐतिहासिक विकास प्रक्रियेत झालेल्या उलथा-पालथी व फेरबदलांचा परिणाम म्हणून नाथपंथी भटक्या जनसमुहाच्या जीवनपद्धतीतही अनेक फेरबदल झाले. जसे प्राचीनकाळी एकसंध असलेल्या नाथ संप्रदायाचे गुरुनिहाय, प्रांतनिहाय गट पडले आणि कालांतराने त्या गटांच्या जाती-जमाती बनल्या. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर किंवा महाराष्ट्रातील मढी येथील गोरक्षनाथाला मानणारे ‘नाथजोगी’ तर उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सोनारी येथील भरवनाथाची गादी (गुरूला गादी म्हटले जाते.) व नाथांचा आखाडा मानणारे ‘नाथपंथी डवरी गोसावी’ असे महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन गट म्हणजेच जमाती आढळतात. ज्यांच्यात रोटी व्यवहार होतो, पण बेटी व्यवहार होत नाही. डवरी गोसावी, नाथ जोगी, जोगी, गारपगारी, बालसंतोषी, किंगरीवाले, भराडी वगैरे नावाने ओळखले जाणारे वेगवेगळे गट पडले म्हणजेच त्या नावांच्या छोटय़ा छोटय़ा जमाती निर्माण झाल्या. सारेच भिक्षेकरी, साधनविहिन व भटके.
नाथांच्या गोसावी वेशात भिक्षा मागणे हा परंपरागत व्यवसाय असला तरी बदलत्या काळानुसार जाईल तिथे मिळेल तो व जमेल तो मार्ग उपजिविकेसाठी स्वीकारण्यात आला. नाथपंथी डवरी गोसावीपकी काहीजण दत्तगुरूंच्या किंवा साईबाबांच्या मंदिराचा छोटासा गाडा तयार करतात व सोयीप्रमाणे तो बलगाडी, चारचाकी टेम्पो किंवा दुचाकीवर बसवून कुटुंबासह गावोगाव भटकतात. श्रद्धाळू लोक देवदर्शन घेऊन स्वमर्जीने दक्षिणा देतात. हेच त्यांचे उत्पन्न. काहीजण उपजत पाच किंवा सहा पायांची गाय किंवा बल घेऊन फिरतात. दैवी चमत्कार समजून लोक गोमाता किंवा नंदीची पूजा करून दक्षिणा देतात. गावाजवळच्या मदानात पाल ठोकून मुक्काम करतात. पालातली तशीच पालाबाहेरची भोवतीची जागा झाडून, शेणाने सारवून स्वच्छ ठेवण्याचे काम शिवाय सरपण, पाणी, चारा उपलब्ध करण्याची जबाबदारी त्यांच्या महिला पार पाडतात. कुटुंबासह भटकंती असल्यामुळे बहुतांशी मुलं-मुली शाळाबाह्य़ आहेत. काही जणांनी आश्रमशाळेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. भटकेपणामुळे सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा किंवा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतरांच्या मानाने यांची पालवस्ती स्वच्छ व सुटसुटीत असते.
भटकत भटकत मुंबईसारख्या शहरात दाखल झालेल्या नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या लोकांनी स्टोव्ह दुरुस्ती, छत्र्या दुरुस्ती, रद्दी कागद-भंगार गोळा करणे / विकणे आणि परंपरागत पद्धतीने नाथाच्या/गोसाव्याच्या रूपात भिक्षा मागणे, गायींचा आधार घेणे आदी व्यवसाय स्वीकारले. गोसाव्याच्या रूपात भिक्षा मागणाऱ्या काही कुटुंबातील महिला देवीच्या नावे जोगवा मागताना दिसतात.
जात पंचायतीत महिलांना फारच दुय्यम स्थान आहे. अविवाहित मुलीने आंतरजातीय लग्न केले तर किंवा जातीतल्या मुलाबरोबर स्वमर्जीने पळून गेली तर तिच्या पित्याला गुन्हेगार ठरवले जाते. विवाहानंतरच्या मुलीच्या वर्तणुकीबद्दल नवऱ्याला जबाबदार धरले जाते. विधवा किंवा घटस्फोटित महिलेस अविवाहित मुलाबरोबर पुनर्वविाह करता येत नाही. विदुर किंवा घटस्फोटित पुरुषाबरोबर म्होतर लावता येते. म्होतर लावलेल्या महिलेस सणवारात मान दिला जात नाही. आंतरजातीय विवाह केल्यास पुढील पाच पिढय़ांपर्यंतच्या सर्व लोकांना किंवा त्या मूळ जोडप्यापकी दोघांचा मृत्यू होईपर्यंत इतर सर्वाना गुन्हा लागू होतो.
पुणे जिल्ह्य़ातील पोफलज गावी फार पूर्वी शिंदे घराण्यात आंतरजातीय विवाह झाला. पाचवी पिढी चालू आहे. पुढे सुमारे ३०० कुटुंबांचा विस्तार झाला आहे. मूळ जोडप्यांपकी पत्नी जिवंत आहे. त्यामुळे त्या सर्वाना अद्याप जातीत मान नाही. महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण फार कमी आहे. महाराष्ट्र विमुक्त भटका समाज सेवा संघटनेतर्फे केलेल्या पाहणी व अनुभवाप्रमाणे मुंबई व उपनगरांत या जमातीची लोकसंख्या सुमारे २५ हजार व महाराष्ट्रात सुमारे एक लाख असावी. यांच्यापकी सुमारे ६० टक्के आजही विकासप्रक्रियेपासून अलिप्त असे भटके जीवन जगत आहेत.
मुंबईत यांच्यापकी काही महिलांनी, लोकांची देवभक्ती व गोमातेवरचे प्रेम लक्षात घेऊन, गायींच्या आधारे उपजिविका करण्याचा मार्ग शोधून काढला. सुमारे शंभर वर्षांपूर्वीपासून मुंबईत पिढय़ान्पिढय़ा हा व्यवसाय चालू आहे. वेगवेगळ्या देवळांपुढे या महिला गाय घेऊन बसतात. देवदर्शनाला येणारे श्रद्धाळू भाविक देवपूजेबरोबर गोमातेच्या पूजेचे पुण्य पदरी बांधून घेण्यासाठी त्या बाईजवळचाच चारा विकत घेऊन त्या गायीला खाऊ घालतात. गाय विकत घेऊन सांभाळावी अशी त्यांची परिस्थिती नव्हती आणि नाही. मुंबईतल्या गवळ्याकडून किंवा उपनगरांत मोठे बस्तान बसलेल्या तबेल्यातून त्या गायी भाडय़ाने घेतात. दिवसभराचे गायीचे भाडे, परस्पर चारा व संगोपनाची व्यवस्था शिवाय सकाळ-संध्याकाळच्या दुधाची मालकी असा तिहेरी लाभ गायमालकांचा होत असला तरी या महिलांना किमान उत्पन्नाची हमी आहे. गायीचे भाडे व चाऱ्याचा खर्च वजा करून उरलेल्या कमाईतून त्या बाईचे घर कसेबसे चालते. महिलांना आíथक स्वातंत्र्य असून कुटुंब सांभाळ्ण्याची जबाबदारी पण त्यांच्यावरच असते. पहाटे ४ वाजता उठल्या तरच घरचे उरकून, गोठय़ातली गाय देवळापुढे सकाळी ८ वाजता आणता येते. हे काम मोठे जिकिरीचे, त्रासाचे ठरले आहे.
जागतिकीकरण हा केवळ श्रीमंती विकासाचा मुद्दा नाही. त्या प्रक्रियेत सर्वात आधी होरपळली जाते ती गरीब जनता. मुंबईचे शांघाय करण्याचा सरकारी नारा देण्यात आला. मुंबईत पिढय़ान्पिढय़ा गरिबीत परंतु खात्रीचे व स्थिर जीवन जगणाऱ्या गायवाल्या मराठी महिलांची गाय रोज कोंडवाडय़ात जाऊ लागली. २००७ च्या सुमारास हे सुरू झाले. गाय उचलून नेली की उपासमार तर आलीच, पण किमान ५००० रुपयांचा दंड भरून गाय सोडवायची. उशीर झाला तर दिवसागणिक आणखी दीड हजार रुपये भरायचे. कर्ज काढून पसा उपलब्ध करण्यास तीन-चार दिवस लागले की, किमान दहा हजार रुपये दंड भरल्याशिवाय गाय ताब्यात मिळत नाही. शिवाय भरमसाट दंड भरून सोडविलेली गाय मालकाच्या तबेल्यात घेऊन जाण्यासाठी टेम्पो भाडय़ापोटी दोन ते तीन हजार रुपये खर्च वेगळा. कारण महापालिकेचा एकुलता एक कोंडवाडा मालाडला. हा सारा उद्योग या महिलांनाच करावा लागतो.
महाराष्ट्र विमुक्त भटका समाज सेवा संघटनेतर्फे कॅप्टन मोहनराव िशदे आणि मिलन चव्हाण यांनी मुंबईतील गायवाल्या महिलांची २००७ मध्ये पहाणी केली व त्यांच्या समस्या सुटण्यासाठी पाठपुरावा केला.
धर्म, देव व गोपुजेवर अनेक कारणाने श्रद्धा असलेल्या मुंबई व उपनगरांतल्या लाखो भाविकांना गोपूजेसाठी गाय उपलब्ध करून त्यांना समाधान देण्याचे, स्वत:ची स्वावलंबीपणाने उपजिविका साधायची शिवाय गायीच्या मालकालाही आíथक लाभ द्यायचा अशा तिहेरी लाभात लाखो लोकांचे हित गुंतलेले आहे हे स्पष्ट करून महनगरपलिकेकडे पाठपुरावा केला. तेव्हा मनपा सभागृहात विषयावर चर्चा होऊन, सार्वजनिक आरोग्य खाते, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या द्वारे, ‘मंदिराजवळ महिलांच्या योग्य नियंत्रणात (नागरिकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव होत नसलेल्या) गाय असल्यास त्या गायीला पकडण्यात येऊ नये,’ अशा सूचना कोंडवाडा विभागास देण्यात आल्या आहेत.’ असे लेखी पत्र संघटनेला देण्यात आले. अशा सूचनेनंतरही, संघटनेच्या मते गायवाल्या महिलांकडून ७७ हजार ४६० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आणि आजही नियंत्रणात असलेल्या गायी उचलून नेल्या जातात. त्याचाच परिणाम म्हणजे वरिलप्रमाणे झालेला नंदाचा मृत्यू!
संघटनेमार्फत झालेल्या पाहणीप्रमाणे मुंबई व उपनगरांतील एकूण २७०० मंदिरांपुढे या भटक्या जमातीच्या सुमारे ४००० महिला गायी घेऊन बसतात. बहुसंख्य महिला निरक्षर आहेत. या महिलांपकी ५१ टक्के महिला विधवा आहेत. बहुसंख्य पुरुष व्यसनाधीन व बेकार. घोडपदेव झोपडपट्टीत तर ६० टक्के महिला विधवा आहेत. नंदासारख्यांना उज्ज्वल भविष्य द्यायचे असेल तर तूर्तास या महिलांच्या व्यवसायाला अभय द्यावे लागेल किंवा पर्यायी व्यवस्था करावी लागेल. त्यांच्या कुटुंबातील इतर मुला-मुलींना योग्य त्या कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योग व्यवसायासाठी संधी व साधने पुरविली तर येत्या
५-१० वर्षांत त्यांना देवळापुढे, रस्त्यावर गायी घेऊन बसण्याची गरज भासणार नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रात गावोगावी पाल ठोकून भटकंती करून गुजराण करणाऱ्या आणि जगण्याची उमेद घेऊन मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या या कुटुंबांना हक्काचे घर आणि एक पर्यायी सन्मान देणारा व्यवसाय मिळणे हा त्यांचा निकडीचा प्रश्न आहे.
अ‍ॅड. पल्लवी रेणके

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2015 1:01 am

Web Title: nag panthi davari gosavi samaj
टॅग Woman
Next Stories
1 तुणतुण्याची सुटता साथ..
2 आसवेच स्वातंत्र्याची ..
3 बहुरूपी लिंगव्वा..
Just Now!
X