29 March 2020

News Flash

गद्धेपंचविशी : शहाणपण शिकवणारी पंचविशी

 ‘गद्धेपंचविशी’ या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात ‘तारुण्यकाळ, चुका होण्याचा काळ, यात विवेक किंवा पोच फारसा नसतो,’ असा दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर असताना.

||नरेन्द्र चपळगावकर

anjaleejoshi@gmail.com

एलएल.बी. या दोन्ही परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो होतो. वकील व्हायचे की प्राध्यापक याचा निर्णय अवघड होता. वडिलांना गावात मिळणारा सन्मान आणि त्यांनी अनेकांना मिळवून दिलेला न्याय याचे आकर्षण होते; पण वाङ्मयाच्या आवडीमुळे मी लातूरला मराठीचा शिक्षक म्हणून काम करू लागलो. तेथे पिण्याचे पाणी फारच थोडे आणि गढूळ येई. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला होता. तेव्हा लातूर सोडून वकिलीकडे वळावे असे ठरवले आणि १९६३ मध्ये वडिलांच्या हाताखाली काम करण्यास प्रारंभ केला.. चुका करण्याचे दिवस संपत आले होते. शहाणपण कशात आहे, हे ठरवायचे होते. प्राध्यापकाला मिळू शकणारा पगार आणि त्यासाठी दुसऱ्या गावी राहणे परवडणार नाही, हे कळले होते. वकिली हाच एक पर्याय उरलेला होता. वकिलीला सुरुवात केली तेव्हा पंचविशी संपलेली होती. तिशी येत होती.

‘गद्धेपंचविशी’ या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशात ‘तारुण्यकाळ, चुका होण्याचा काळ, यात विवेक किंवा पोच फारसा नसतो,’ असा दिला आहे. सर्वाच्याच आयुष्यात हा काळ थोडाफार डोकावतो. त्याला किती वाव द्यायचा हा ज्याच्या त्याच्या वृत्तीचा प्रश्न असतो. ‘गद्धेपंचविशी’ हे संबोधन केवळ दोषदिग्दर्शक, वयस्कांची अमान्यता सांगणारे नाही; उलट त्यात बराचसा अंश कौतुकाचा आहे. व्यवहाराचा फार विचार न करता पावले उचलली जात आहेत, काही चुकतील, पण तसे फारसे वाईट चालू नाही, असा पालकांचा अभिप्राय व्यक्त करणारा हा शब्द आहे.

पंचविशी म्हणजे फक्त पंचविसावे वर्ष नव्हे. त्याच्या आगेमागे पाच-सात वर्षांचा काळ हा या पंचविशीतच मोजला जातो. या काळाची लांबीरुंदी त्या त्या माणसावर अवलंबून असते. काही वेळा मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे पंचविशीत हा काय गद्धेपणा करणार हे दहा-पंधरा वर्षे अगोदरच कळू लागते. माझे वडील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे अधिवेशन जानेवारी १९५३ मध्ये हैदराबादला भरणार होते. दोन महिन्यांनी मी मॅट्रिकच्या परीक्षेला बसणार होतो. तरी, मला तुमच्याबरोबर अधिवेशनाला यायचे आहे, असा हट्ट वडिलांजवळ मी धरला. त्यांनी थोडा वेळ समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, पण मी हट्ट सोडत नाही हे पाहिल्यावर मला बरोबर न्यायचे कबूल केले. इतर वर्गमित्र अभ्यासात गुंग असताना मी मात्र हैदराबादच्या नानलनगरमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, शेख अब्दुल्ला, मौलाना आझाद अशा नेत्यांना जवळून पाहत होतो; त्यांची भाषणे ऐकत होतो. त्या वेळी शेख अब्दुल्लांवर अविश्वास व्यक्त होऊ लागला होता. अंतस्थपणे ते नेहरूंनाही विरोध करीत आहेत, असा आरोप होत होता. त्यासंदर्भातील ‘जहाँ जवाहर का कदम होगा वहाँ अब्दुल्ला का दिल बिछा होगा’ हे शेख अब्दुल्लांच्या भाषणातले वाक्य आणि दुसऱ्या दिवशीच्या आमखास मैदानावरील जाहीर सभेतील ‘मैं हैदराबादमें एकभी कम्युनिस्ट को नही छोडुंगा’

हे वल्लभभाईंचे वाक्य अजून माझ्या स्मरणात आहे. वय चौदाच वर्षांचे होते, पण वंशपरंपरेने आलेला राजकारणातला रस अभ्यासातले माझे लक्ष काढून घेत होता.

परिणाम व्हायचा तोच झाला. शालान्त परीक्षेत तिसरा वर्ग मिळाला. मराठवाडय़ातील महाविद्यालयात प्रवेश मिळू शकत नव्हता. शेवटी अमरावतीला नागपूर विद्यापीठाच्या आश्रयाला जावे लागले. अमरावतीच्या दोन वर्षांत अनेक लेखक आणि कवी परिचयाचे झाले; त्यांचाही त्या वेळी उत्साहकाळाचाच प्रारंभ होता. त्यातले काही स्वत:च्याच लेखनाविषयी बोलत असल्यामुळे वाङ्मयाचा परिचय मात्र झाला नाही. मॅट्रिक झाल्यानंतर लगेच औरंगाबादच्या ‘मिलिंद महाविद्यालया’त प्रवेश घ्यायचा होता, तो दोन वर्षे अमरावतीला जावे लागल्यामुळे लांबला होता. बी.ए.साठी मात्र मी त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या महाविद्यालयात गुणवंत प्राध्यापक नेमले होते. महाविद्यालयाला उत्तम आणि हवेशीर इमारत होती आणि मुख्य म्हणजे फार चांगले ग्रंथालय आणि मदत करणारे ग्रंथपाल होते. मराठी शिकवायला स्वत: प्राचार्य चिटणीससुद्धा होते. आधुनिक वाङ्मयापैकी इंदिरा संतांचा ‘शेला’ आणि वामनराव चोरघडय़ांचा ‘प्रस्थान’ हा कथासंग्रह ते शिकवत. शिकवताना रंगले म्हणजे सलग दोन-अडीच तास तेच शिकवत. क्रमिक पुस्तक शिकवता शिकवता वाङ्मयाकडे कसे पाहावे हेही ते सांगत.

नाताळची सुटी लागल्यावर औरंगाबादचाच, पण एम.ए.साठी हैदराबादला गेलेला सुधीर रसाळ हैदराबादहून आला आणि एका दीर्घकालीन मैत्रीचा प्रारंभ झाला. माझा एक वर्गमित्र चंद्रकांत भालेराव, मी आणि रसाळ तिघे रोज संध्याकाळी फिरायला जात असू. अतिशय गंभीरपणे सुधीर नव्या लेखनाची दखल घेत असे आणि त्याविषयी बोलत असे. ‘सत्यकथे’चा अंक हा आम्हा सगळ्यांसाठी दरमहा येणारा नजराणा असे आणि आम्ही उत्कंठेने वाटत पाहत असू. महाविद्यालयातील वातावरण मोकळे असे. विविध राजकीय मतांच्या नेत्यांना महाविद्यालयात बोलवावे आणि त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी ऐकावेत असाच प्राचार्याचा प्रयत्न असे. डॉ. आंबेडकर दरवर्षी एक-दोन वेळा तरी महाविद्यालयात येत. एकदा मराठी भाषिकांचा एकच प्रांत करण्याऐवजी त्याचे तीन प्रांत करावेत, अशी योजना सुचवणारे त्यांचे भाषण महाविद्यालयातच झाले. अगदी जवळ बसून त्या विचारवंत नेत्याला पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मिळाला होती. शंकरराव देव संयुक्त महाराष्ट्राचे त्या वेळचे सर्वश्रेष्ठ नेते, त्यांचेही भाषण प्राचार्याच्या अनुज्ञेने महाविद्यालयात झाले. त्या वेळी आणि नंतर मराठवाडा विद्यापीठाच्या मागणी दिनानिमित्त झालेल्या सभेतही प्राचार्य चिटणीसांनी मला बोलायला सांगितले होते. एकदा महाविद्यालयातील मुलींनी ‘शारदा’ नाटकातील शारदा, वल्लरी आणि मैत्रिणींचा प्रवेश बसवला होता. त्या वेळी समारोपात मी या प्रवेशातल्या घरगुती वातावरणाचा, संवादांचा आणि भाषेचा उल्लेख केला. चिटणीसांनी तो आवडल्याचे मला मुद्दाम सांगितले. वडिलांची सोपी आणि समजावून सांगण्याच्या शैलीतली भाषणे मी ऐकलेली होती. सभाधीटपणा वगैरे उपजतच असावा.

या काळातच भाषावार प्रांतरचनेमुळे हैदराबादचे ‘मराठवाडा’ साप्ताहिक औरंगाबादला आले. ‘मराठवाडा साहित्य परिषदे’चे मध्यवर्ती कार्यालयसुद्धा औरंगाबादला आले. अनंत भालेराव हे केवळ पत्रकार नव्हते. वाङ्मय, भाषा, संस्कृती आणि राजकारण या सर्वच विषयांत त्यांना रस होता. आपले वृत्तपत्र हे सर्वागीण लोकशिक्षण करणारे असावे, असा त्यांचा प्रयत्न होता. प्रसिद्धीची साधने मराठवाडय़ात कमी असल्यामुळे आपल्याला फारसा वाव मिळत नाही, अशी मराठवाडय़ातल्या लेखकांची तक्रार असे. त्यांची बरीचशी सोय ‘मराठवाडा’ आणि परिषदेचे मासिक ‘प्रतिष्ठान’ यांच्यामुळे झाली होती.

त्या काळात मराठी ललित साहित्याला बहर आला होता. कथा, कविता, कादंबरी अशा सगळ्याच वाङ्मय प्रकारांत सकस वाङ्मय निर्माण होत होते. विठ्ठलराव घाटे आणि इरावती कर्वे वेगवेगळ्या घाटाची व्यक्तिचित्रे लिहीत होते. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेने मोठय़ा प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. व्यंकटेश माडगूळकर आजवर शहरी माणसाला

अज्ञात असलेल्या माणदेशाचा परिचय करून देत होते. त्यांची ‘बनगरवाडी’ नुकतीच प्रसिद्ध झाली होती. द.मा. मिरासदारांच्या वेगळ्या ढंगांच्या कथा आणि आरती प्रभूंची कविता प्रसिद्ध होत होती. आवर्जून वाचावे असे भरपूर लिहिले जात होते.

त्याच वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मनाने गुंतलो होतो. त्यातच प्रचाराची एक संधी चालून आली. चंद्रकांत भालेराव याला सराफ्यातली सुवर्णकार मंडळी ओळखत होती. त्या वेळी वेगवेगळ्या मेळ्यांत चुरस असे. आपल्या मेळ्यात उत्तम गाणी असावीत असे त्या सुवर्णकारांना वाटले. त्यांनी चंद्रकांतला सांगताच त्याने मला बरोबर घेऊन गीतरचनेची जबाबदारी स्वीकारली. मेळ्यांसाठी गाणी लिहिणे हा एक तापदायक प्रकार असे, पण उत्साहाच्या भरात त्याचे काही वाटत नसे. औरंगाबादचे आकाशवाणी केंद्र बंद करून त्याच वेळी पुण्याला केसकर मंत्रिमहोदयांनी आकाशवाणी केंद्र स्थापन केले. त्याविरुद्ध शिष्टमंडळे गेली. आश्वासने मिळाली, पण काहीच घडले नाही. हा प्रश्न मला फार महत्त्वाचा वाटत होता. मी मेळ्यासाठी एक पोवाडा लिहिला होता.

‘नभोवाणी केंद्र गेलं, शहराचं नाक गेलं,

काय केलं तेव्हा आमच्या मंत्र्यांनी?

विमानात धावपळ, शिष्टमंडळांचा घोळ,

तक्रारी साऱ्या यांच्या बहिऱ्या कानी’

असा काहीसा तो पोवाडा होता. मेळ्यांना प्रचंड गर्दी असे. लोक आपली काव्यरचना ऐकून दाद देत आहेत, असे वाटत असे. मेळ्यांतली गाणी त्या वेळच्या चित्रपटातल्या गाण्यांच्या चालीवर रचली जात. लोकांना आम्ही लिहिलेल्या गाण्यांचे शब्द ऐकूच येत नसत. गाणाऱ्या मुलामुलींच्या सुरेलपणावर विश्वास नसल्यामुळे वाद्यमेळाचा प्रचंड गजर चालू असे आणि श्रोते चित्रपटातले मूळ गाणेच गुणगुणत दाद देत असत. आम्ही स्टेजपासून लांब आपल्याच भ्रमामध्ये गर्क असू. लवकरच हा भ्रम फिटला आणि गीतरचनेचा नादही सुटला.

‘प्रतिष्ठान’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. इतरत्रही पाच-सात कथा प्रसिद्ध झाल्या होत्या. आपला एक कथासंग्रह छापला जावा, अशी इच्छा मनात निर्माण झाली. माझ्याच आग्रहामुळे चुलत्यांनी एक छोटेसे मुद्रणालय काही वर्षांपूर्वी सुरू केले होते. उत्साहाच्या भरात मी कंपोज, अगदी डिग्री टाइप सुद्धा शिकलो होतो. ट्रेडलवर प्रतीही काढू शकत होतो. एके दिवशी मी कथासंग्रहाच्या पानाचे मोजमाप मनाशी निश्चित केले आणि एका पानाची जुळणी केली. कागदाच्या अर्ध्या भागात ते पान आणि अर्धे कोरे असे ठेवून मी दोनशे-तीनशे प्रती स्वत: ट्रेडलवर छापल्या. पाय दुखू लागले आणि उत्साह संपला. संकल्पित कथासंग्रह जन्मापूर्वीच आटोपला. आपल्या कथा-कवितांना वाङ्मयीन मूल्य नाही आणि त्या छापून आल्या हे काही प्रमाणपत्र नव्हे हे लवकरच लक्षात आले आणि ते लेखन मी बंद केले.

या काळात उत्साह इतका प्रचंड होता की, सर्व प्रकारच्या उद्योगांत मी भाग घेत होतो. आकाशवाणी औरंगाबादला आकाशवाणीची पुनस्र्थापना करण्याचा प्रश्न मला फारच जिव्हाळ्याचा वाटत होता. सर्वच साहित्य संमेलनांत मी हा ठराव मांडत असे. (लोक तेव्हा मनातल्या मनात हे ‘आकाशवाणीवाले’ आले असे म्हणत असणार.) मित्रमंडळीही  माझ्या या एककलमी कार्यक्रमाबद्दल माझी थोडीफार चेष्टा करत असत. ‘मराठवाडा साहित्य संमेलन’ हे त्या वेळी पाच जिल्हय़ांचे संमेलन होते. नियुक्त झालेल्या अध्यक्षांची औपचारिक निवड करताना प्रत्येक जिल्हय़ातर्फे अनुमोदन द्यावे, अशी प्रथा मीच आग्रह धरून सुरू केली. स्वाभाविकच बीड जिल्हय़ातर्फे ते काम मलाच मिळत गेले. १९६२ चे नववे मराठवाडा साहित्य संमेलन मी आग्रहाने बीडला घ्यायला लावले. अध्यक्ष होते इतिहास संशोधक विश्वेश्वर अंबादास कानोले. संमेलनातला एक परिसंवाद ‘परंपरा आणि नवता’ या विषयावर होता. चर्चेसाठीचा निबंध विंदा करंदीकरांनी लिहिला होता आणि त्या चर्चेत भाग घेतला होता, श्री. पु. भागवत, वसंत बापट, भालचंद्र महाराज कहाळेकर, भगवंतराव देशमुख, नरहर कुरुंदकर यांनी. अशा उंचीचे कार्यक्रम प्रादेशिक संमेलनात मला पुढे फार कमी पाहावयास मिळाले.

शिक्षण संपवून आणि लातूरची वर्षभराची प्राध्यापैकी संपवून मी जेव्हा बीडला वकिलीसाठी आलो तेव्हाही व्यवसाय एके व्यवसाय असा झापडबंद मार्ग मी स्वीकारलेला नव्हता. मधुसूदनराव वैद्य या माझ्या वडिलांच्या मित्राने गावातल्या जुन्या बंद पडलेल्या वाचनालयाचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले व त्यासाठी आम्ही दहा-बारा तरुण वकिलांना घरी बोलावले. आम्ही सगळे उत्साहाने या उपक्रमात सामील झालो. पुढची अनेक वर्षे बीडचे ए.एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय माझ्या कामाचा एक महत्त्वाचा भाग होते. ‘गद्धेपंचविशी’ला साजेशी आणखी एक गोष्ट मी केली, ती म्हणजे नगरपालिकेची निवडणूक लढवली. बहुतेक मतदार लहानपणापासून मला ओळखत होते. निवडून येण्याचे ते एक कारण होते; पण आणखी एक गोष्ट पथ्यावर पडली. नेहमी यश मिळवणारे एक निवडणूकपटू उमेदवार वॉर्डातल्या एका गल्लीतील एकगठ्ठा मते आदल्या दिवशी रात्री योग्य प्रकारे प्रचार करून ती मिळवीत असत. या वेळी त्यांच्या दुर्दैवाने त्या गल्लीचाच त्यांच्याचपैकी एक उमेदवार उभा राहिला व त्याला गल्लीतली सगळीच मते मिळाली. हमखास विजयी होणारे जुनेजाणते आणि हा नवा असे दोघेही जण पडले आणि मी निवडून आलो. राजकारणातला एकगठ्ठा मताचा धडा मला शिकता आला आणि तोही पराभवाची फी न देता. अनेक वर्षांपूर्वी १९५२ मध्ये वडिलांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळी निवडणुकीत कोणकोणत्या घटकांचा प्रचारात वापर होतो याचा धडा मला लहानपणीच पाहावयास मिळाला होता.

नगरपालिकेच्या सभासदत्वाने मला राजकीय वास्तवाचा आणखी एक धडा दिला होता. एके दिवशी नगरपालिकेच्या बैठकीत नगरपालिका कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने आपल्या मालकीच्या मोकळ्या जागेतून घरे बांधण्यासाठी प्लॉट मोफत द्यावेत, असा ठराव आला. माझ्या मनातले समाजवादीपण एकदम जागे झाले आणि मी उत्साहात त्या ठरावाला पाठिंबा दिला. तो ठराव बिनविरोध मंजूर झाला. थोडे दिवस मी एक पुरोगामी काम केले म्हणून आनंदात होतो. पुढे कळले की, नगरपालिकेतल्या दादामंडळींनी कर्मचाऱ्यांकडून त्यांना नगरपालिका देणार असलेले प्लॉट अगोदरच नाममात्र किमतीने विकत घेण्याचे करार केले होते. प्रत्यक्षात फायदा त्या दादांचा होणार होता. कर्मचाऱ्यांचे नाव जागा हडप करण्यासाठी वापरण्यात आले होते.

बीडमध्ये गद्धेपंचविशीतच आणखी एक चांगला नाद लागला. माझ्या शाळेत काही दिवस शिक्षक असलेले गोपाळराव देशपांडे संगीताचे आणि विशेषत: पंडित जसराजांचे चाहते. जसराज आणि मणिराम हे दोघे त्यांच्या लहानपणी गोपाळरावांच्या वडिलाकडे राहून गेले होते. गोपाळरावांच्या घरी जसराजांच्या तीन-चार मैफली घरगुती वातावरणात ऐकता आल्या. स्वरांचे माधुर्य थोडे कळू लागले. शास्त्रीय ज्ञानाची गरजच वाटत नव्हती. त्याच काळात

डॉ. उमेश पेंढरकर यांनी बीडमध्ये एक म्युझिक सर्कल सुरू केले. अनेक गायक आणि वादक ऐकायला मिळाले. त्या वेळी बीडमध्ये असलेल्या एका कार्यकारी अभियंत्याच्या वाढदिवशी १ ऑगस्टला दरवर्षी भीमसेन जोशी हमखास येऊन गात. त्यांचेही तीन-चार वेळा गाणे ऐकता आले. त्या काळात जसराजांकडून ऐकलेली ‘निरंजनी नारायणी’सारखी रचना, अंबाप्रसादांची पेटीवरची आणि निजामुद्दीनची तबल्यावरची साथ अजून स्मरणात आहे. त्या काळात ऐकलेले गाणे पुढे स्मरणानेच आनंद देत गेले. प्रत्यक्ष गाणे ऐकणे हळूहळू कमी झाले.

या काळात मी ‘सकाळ’, ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि नंतर ‘केसरी’ अशा वृत्तपत्रांचा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्या वेळी वृत्तपत्रांचे रूप सौम्य असे. ‘केसरी’त तर मी अनेक वर्षे मराठवाडय़ाची वार्तापत्रे लिहीत होतो. मराठवाडय़ाच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाची फारशी माहिती बाहेर नसल्यामुळे ती वार्तापत्रे चांगली वाचलीही जात. याच काळात ‘संयुक्त महाराष्ट्रासाठी मी काय करू इच्छितो’ या विषयावर ‘किलरेस्कर’ मासिकाने एक स्पर्धा घेतली होती. त्यात मला पहिला क्रमांक मिळाला. यानिमित्ताने मुकुंदराव किलरेस्कर आणि शांताबाई यांचा स्नेह झाला. पुढील जवळजवळ वीस वर्षे या कुटुंबाशी आणि त्यांच्या मासिकांशी माझा जवळचा संबंध होता. ‘किलरेस्कर’ मासिकांच्या संपादन बैठकांना मला निमंत्रण असे. त्या मासिकांना त्याचा कितपत उपयोग झाला हे माहीत नाही, पण मला संपादकीय कामात सहभागी होण्याची संधी आनंद देणारी होती. अनंत भालेरावांनी ‘मराठवाडा’चे संपादकपद तू स्वीकार, अशी सूचना केली होती. तोपर्यंत माझा वकिलीत चांगला जम बसला होता. म्हणून मी ते स्वीकारू शकलो नाही. संपादक होण्याचे राहूनच गेले.

एलएल.बी. या दोन्ही परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालो होतो. वकील व्हायचे की प्राध्यापक याचा निर्णय अवघड होता. वडिलांना गावात मिळणारा सन्मान, राजकीय कामासाठी या व्यवसायात मिळणारे स्वातंत्र्य आणि त्यांनी अनेकांना मिळवून दिलेला न्याय याचे नाही म्हटले तरी आकर्षण होते. त्या वेळी तरी वाङ्मयाची निर्माण झालेली आवड प्राध्यापकीच्या पारडय़ात पडली आणि मी लातूरला मराठीचा शिक्षक म्हणून काम करू लागलो. लातूरमध्ये काही जुने मित्र होते, तर काहींचा नव्याने परिचय होत होता. राष्ट्र सेवा दलाशी अगदी लहानपणी नाशिकला थोडा संबंध आला होता. तो लातूरमध्ये वेगळ्या स्वरूपात जागा झाला होता. गावात त्या वेळी एकच महाविद्यालय असे व मराठीच्या प्राध्यापकाकडे सांस्कृतिक नेतृत्वही येई. लोकमान्य टिळकांची लातूरला एक गिरणी होती. या वायर गिरणीचे काम त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस काही दिवस पाहात. अनेक वर्षे गिरणी बंदच होती, पण मोकळी जागा कायम होती. तेथे वस्ती होऊ लागली होती. या वस्तीला ‘टिळकनगर’ असे नाव द्यावे, असे मी टिळक पुण्यतिथीच्या एक सभेत सुचवले. सुदैवाने ते नाव अजून कायम आहे. लातूरला वर्षभर काम केले. तेथे पिण्याचे पाणी फारच थोडे आणि गढूळ येई. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला होता. तेव्हा लातूर सोडून वकिलीकडे वळावे असे ठरवले. काही दिवस औरंगाबादला वकिली करून बीडला वडिलांच्या हाताखाली काम करण्याला मी १९६३ मध्ये प्रारंभ केला. प्राध्यापक की वकील याचा निर्णय मी करण्याऐवजी लातूरच्या गढूळ पाण्यानेच केला होता.

चुका करण्याचे दिवस संपत आले होते. शहाणपण कशात आहे, हे ठरवायचे होते. प्राध्यापकाला मिळू शकणारा पगार आणि त्यासाठी दुसऱ्या गावी राहणे आपल्याला परवडणार नाही, हे कळले होते. वकिली हाच एक पर्याय उरलेला होता. वकिलीला सुरुवात केली तेव्हा पंचविशी संपलेली होती. तिशी येत होती. माझ्या लग्नाच्या बाबतीतही वडिलांनी मला स्वातंत्र्य दिले होते. त्यांनी तुला आवडेल त्या मुलीशी आणि तुला आवडेल तेव्हा लग्न कर, असे त्यांनी सांगितले होते.  औरंगाबादला शिकत असताना वर्गात सगळे भगिनीमंडळच जमा झाले होते. त्यामुळे तेथे काही घडण्याचा संभवच नव्हता. शेवटी बीडला तीन-चार वर्षे वकिली झाली होती. मी व्यवसायात स्थिरावलो असल्याचे मुलींच्या बापांच्या लक्षात आले असावे. काही मुली सांगूनही आल्या.

एके दिवशी माझ्या एका मित्राच्या घरी बसलो असताना तेथे सहज आलेली एक मुलगी मी पाहिली. तिची थोडी चौकशी मी मित्राजवळ केली. ती आवडल्याची कदाचित त्याला माझ्या चेहऱ्यावरून दिसले असावे. मी केलेल्या चौकशीने त्याचा अंदाज पक्का झाला. मित्राची योजकता की निव्वळ योगायोग माहीत नाही, पण तीच मुलगी रीतसर सांगून आली. काहीशा अनौपचारिकपणेच मी ती पाहिली आणि ती पसंत असल्याचे वडिलांना सांगितले. वाङ्मय आणि संगीत यात आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला रस असावा, अशी मनात कुठे तरी इच्छा होती. आता त्याचा आग्रह धरणे महागात पडले असते. लग्नानंतरही अशी गोडी निर्माण होऊ शकते, हे शहाणपण आता आले होते. होणारी पत्नी फक्त मॅट्रिक झालेली होती. तिला पुढे शिकण्याची इच्छा आहे, याची मी खात्री करून घेतली आणि लग्नाला होकार दिला. मांडे गुरुजींकडून मीच जाऊन लग्नाचा मुहूर्त काढून द्या सांगितले. मला रविवार पाहिजे आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मुहूर्त नऊ वाजण्यापूर्वीच पाहिजे, अशा दोन अटी मी त्यांना सांगितल्या होत्या. त्याबरहुकूम त्यांनी ३ जूनला १९६८ चा मुहूर्त काढून दिला. विवाहाला माझ्या जनसंपर्कामुळे दोनेक हजार माणसे हजर होती. नंदिनीच्या व माझ्या सहजीवनाने पुढे खात्री झाली की, ३ जूनलाच आपली गद्धेपंचविशी संपली आहे आणि शहाणपणाचा काळ सुरू झाला आहे.. झपाटलेला काळ नेहमी राहत नसतो, पण त्याचा दरवळ मात्र आयुष्यभर सोबत करीत असतो.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 1:00 am

Web Title: narendra chapalgaonkar gadhe panchvishi chaturang abn 97
Next Stories
1 माझा साक्षात्कारी कर्करोग!
2 सकारात्मकतेचा फायदाच..
3 कर्करोग माझा गुरू
Just Now!
X