कर्करोगाने आपल्या मुलाचा झालेला अकाली मृत्यू मनाच्या खोल गुहेत दडवून, कर्करोगग्रस्तांबरोबरच  अभावाचं जिणं जगणाऱ्यांनाही नवीन आयुष्य देणाऱ्या, त्यांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या तीन दाम्पत्यांच्या या कहाण्या.
 ‘कॅन्सर पेशन्ट एड् असोसिएशन’तर्फे उद्या (२२ सप्टेंबर)  साजऱ्या होणाऱ्या ‘नॅशनल कॅन्सर-रोज डे’च्या निमित्ताने..
मानवी भावजीवनातील सर्वात असह्य़ दु:ख म्हणजे आपल्या अपत्याचा मृत्यू बघणं. त्यातही आपल्या अपत्याला कर्करोगासारख्या दुर्धर रोगाला बळी पडताना हताशपणे पाहाणं यापरती दुसरी जीवघेणी गोष्ट नाही. त्या आघाताने मातापित्यांचे उन्मळून पडणे अथवा जीवनेच्छा संपणे अगदी स्वाभाविक आहे. मात्र कधी कधी हाच आघात हृदयातील स्नेहाचे, करुणेचे नंदादीप प्रकाशमान करून जातो. अपत्यमृत्यूचे हलाहल पचवून आपल्या कार्याने दुसऱ्यांची आयुष्ये फुलवणाऱ्या सामान्यांतल्या असामान्य मातापित्यांच्या या कथा. प्रभाकर-नीरा राव, विजय-साधना फळणीकर आणि उदय-गीता जोशी यांच्या. आपल्या मुलांच्या मृत्यूच्या दु:खालाच त्यांनी जगण्याचा आधार बनवलं आणि अनेकांच्या जगण्याचे ते आज आधार बनले आहेत.
प्रभाकर आणि नीरा राव यांचं दोन मुली, एक मुलगा असे पंचकोनी सुसंस्कृत कुटुंब. व्यवसायाने टेक्सटाइल इंजिनीअर असलेले राव सल्लागार म्हणून काम करत. मुलं चांगली शिकली. कर्तृत्वाने बहरू लागली, नोकरीनिमित्त अमेरिकेत गेलेल्या धाकटय़ा सत्यजितचेही लग्न झाले आणि राव दाम्पत्याला आपली सांसारिक कर्तव्ये पूर्ण केल्याचे समाधान वाटले. लवकरच नातवंडाचीही चाहूल लागली. नीरा राव खुशीखुशीत सुनेचे बाळंतपण करायला अमेरिकेला गेल्या. मात्र नातवाच्या आगमनाचा आनंद अल्पजीवी ठरला. सत्यजितला लिम्फोमा (एक प्रकारचा कर्करोग) झाल्याचे निदान झाले. अमेरिकेतील अद्ययावत रुग्णालये, आधुनिक तंत्रज्ञान, प्रभावी औषधे यापैकी कशाचाही उपयोग न होता अवघ्या सहा महिन्यांत सत्यजित हे जग सोडून गेला. ते वर्ष होतं १९९६.
साठीच्या उंबरठय़ावरचे आई-वडील खचले. आईने तर अंथरूण धरले. हे असे का झाले? कसे झाले? झालेल्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी प्रभाकर रावांच्या मनात सुरू झाली. या सर्वाचा विचार करता करता त्यांना जाणवली तिथल्या स्वयंसेवी संस्थांनी केलेली मदत. कर्करोगाचे निदान, उपचार, मानसिक ताणतणावांचे व्यवस्थापन असे अनेक पैलू सोप्या भाषेत समजावून देणारी छोटी-छोटी पुस्तके. ‘माझ्या देशातल्या किती रुग्णांना अशी माहिती मिळते? मदत मिळते?’ या विचारांच्या प्रकाशात प्रभाकरांना आपल्या उर्वरित जीवनाचे ईप्सित लख्खपणे गवसले. ‘उठ नीरा आपल्याला खूप काम करायचे आहे. कर्करोगाबद्दल विविध प्रकारच्या माहिती देणाऱ्या पुस्तिका आपण भारतीय भाषांमध्ये काढू.’
‘आता या सगळ्याचा काय उपयोग? आपला जीत थोडाच परत येणार आहे?’ मातृहृदय अजून आक्रंदत होतं. ‘आपला जीत नाही परत येणार गं, पण आपल्या जीतसारखे अनेक रुग्ण आपण योग्य माहिती देऊन वाचवू शकू. रुग्णांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं जगणं सुसह्य़ करू.’ प्रभाकरांनी त्यांची समजूत घातली. मन:चक्षूसमोर योजनेचा आराखडा साकार होत होता..
१९९६मध्ये खी३ अ२२्रूं३्रल्ल ऋ१ र४स्र्स्र्१३ ळ उंल्लूी१ ढं३्रील्ल३२ (खअरउअढ) या धर्मादायी संस्थेची राव दाम्पत्याने स्थापना केली. पुस्तकांद्वारे सीडी-डीव्हीडीद्वारे कर्करोगाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, इतर स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत मदत पोहोचवणे ही या संस्थेची काही उद्दिष्टे. कर्करोगाशी संबंधित विविध पैलूंवर उदा. कर्करोगाची लक्षणे, विविध प्रकार, उपचार पद्धती, आहार, रुग्णाचे मानसिक धैर्य टिकविणे आदी विषयांवर तज्ज्ञांकडून इंग्रजीत छोटय़ा छोटय़ा पुस्तिका लिहून घेतल्या. हे ज्ञान जनसामान्यांनाही समजावे म्हणून या पुस्तिकांचे मराठी, गुजराती, हिंदी, बंगाली, मल्याळम्, तामिळ, कन्नड या भारतीय भाषांमध्ये भाषांतर करून घेतले. अतिशय नाममात्र किमतीत या पुस्तिका उपलब्ध आहेत. मुंबईतील टाटा रुग्णालयातील एका छोटय़ा दुकानातून हे ‘ज्ञानदान’ अविरत चालू आहे. दुसऱ्या प्रकाशनांचीही कर्करोगासंबंधित पुस्तके दुकानात उपलब्ध आहेत. जवळजवळ २१० प्रकारची विविध पुस्तके रुग्ण पाहू शकतो. दर महिन्याला १२०० ते १५०० पुस्तके विकली जातात. गेल्या दहा वर्षांत दोन लाखांहून अधिक पुस्तिका लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.
ऐंशीच्या उंबरठय़ावरचे मृदुभाषी प्रभाकर व नीरा राव अजूनही रोज ऑफिसमध्ये येतात.‘ टाटा रुग्णालय’जवळच ऑफिस असल्याने येणाऱ्या रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने चौकशी करतात. मार्गदर्शन करतात. जीतसारख्या लाखो रुग्णांना कर्करोगाविरुद्धच्या लढाईत ते मोलाची मदत करत आहेत. रोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या रुग्णांची कशी काळजी घ्यावी, मृत्युशी कसा सामना करावा, यासाठी त्यांच्याबरोबर श्री. गणपती यांच्यासारखे स्वयंसेवक हे रुग्ण व नातेवाइक  यांच्याशी संवाद साधतात. त्यांना आधार देतात. या संस्थेतर्फे गरजू रुग्णांना दरमहा सुमारे एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. त्यांना जगण्याचं बळ मिळतं.
त्यांच्यासारखेच साधना आणि विजय फळणीकर. ‘आपलं घर’ ही पुण्यात मुलांसाठी आणि निराधार वृद्धांसाठी संस्था चालवणाऱ्या साधना आणि विजय फळणीकरांचं अवघं आयुष्यच संघर्षमय! लहानपणापासून विजय फळणीकरांनी दुर्दैवाचे दशावतार भोगले. सुखवस्तू कुटुंबात जन्माला आलेल्या विजयचे तो नऊ वर्षांचा असताना वडील वारले. आप्तस्वकीयांनी, नोकरांनी तिजोरी, घर धुऊन नेले. कुटुंब रस्त्यावर आले. आई-आत्या घरकामं करून कुटुंबाला कसंबसं पोसू लागल्या. त्यांचे कष्ट बघून अस्वस्थ झालेला विजय नशीब अजमावायला मुंबईला पळून गेला. आपण पांढरपेशी माणसं कल्पनाही करू शकणार नाही, अशा प्रसंगांना छोटय़ा विजयने तोंड दिले. रिमांड होममधील काळे गुरुजींच्या प्रेमळ मार्गदर्शनामुळे गाडी परत रुळावर आली. लेखक, कवी, संगीतकार, नाटककार, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडू लागले. सुखवस्तू कुटुंबातील साधनाने सहधर्मचारिणी म्हणून घरात प्रवेश केला. लवकरच वैभवचा जन्म झाला आणि सर्व कष्ट, दु:ख, अवहेलनांची भरपाई झाली. ‘आपल्याला आयुष्यात जे जे साध्य करता आले नाही ते ते सर्व वैभवला मिळवून द्यायचे. आपणही कृतार्थ जीवन जगू. आजी-आजोबा होऊन नातवंडांत खेळू.’ फळणीकर दाम्पत्याची मनोराज्ये रंगत होती. वैभव शाळेत जाऊ लागला. हुशार, सर्व कलागुणसंपन्न. विद्यार्थीप्रिय, शिक्षकप्रिय असा गुणी मुलगा. दरम्यान विजय यांचीही व्यावसायिक घोडदौड सुरू होती.
 सुखाच्या हिंदोळ्यावर झुलत असताना २००१चा ऑक्टोबर महिना उजाडला. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वैभवला ताप आला. ताप उतरेना म्हणून रक्ताच्या तपासण्या केल्या. निदान झाले. ‘अ‍ॅक्यूट ल्युकेमिया- रक्ताचा कर्करोग’. ज्यावर काही उपाय नाही. पुण्यात-मुंबईत नामवंत डॉक्टरांचे उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी निराशेने मान हलवली. १८ नोव्हेंबरला वैभव हे जग सोडून गेला. मातापिता  लाडक्या लेकाच्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी शोधू लागले.
आपल्या प्रारब्धाला वेगळ्या तऱ्हेने फळणीकर दाम्पत्य सामोरे गेले. वैभवची स्मृती जपण्यासाठी त्यांनी ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरियल ट्रस्ट’ सुरू केला. गरजू लोकांसाठी ट्रस्टने वाजवी दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. वैभव तर गेला, पण मातापित्याच्या मनातील वात्सल्याचा झरा ‘मी, माझे’ याचे बंधन तोडून सर्व विश्वाला कवेत घ्यायला धावू लागला. मायेची पाखर समाजातील उपेक्षित निराधार मुलांवर घालावी असे त्यांच्या मनाने घेतले. जून २००२ मध्ये पुण्याजवळील वारजे येथे अनाथ मुलांना आधार देणारे ‘आपलं घर’ सुरू केले. वय वर्षे तीन ते दहा या वयोगटातील १४ मुलांचे ते आईवडील झाले. अनेक अडचणी समोर येत गेल्या. पैशांची वानवा तर जास्तच भेडसावे. मात्र फळणीकरांच्या कार्याची, संस्थेच्या उद्दिष्टांशी जशी लोकांना माहिती होत गेली तशी समाजातील संवेदनशील माणसे संस्थेशी कायमची जोडली गेली. मुलांवर घरचे संस्कार व्हावेत, आजी-आजोबांचे प्रेम मिळावे अन् वृद्धांनाही नातवंडांचा सहवास लाभावा म्हणून वृद्धाश्रमही सुरू केला. सिंहगडाच्या पायथ्याशी डोणजे येथे मोठे घरकुल उभे राहिले. ट्रस्टने डोणजेच्या आजूबाजूच्या गावांतील मुले आणि स्त्रियांसाठी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम नि:शुल्क सुरू केले.
‘परमेश्वरा, माझ्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत असेच काम करून घे. समाजातील मुले अनाथ होऊ नयेत अन् वृद्धांची उपेक्षा होऊ नये. यदाकदाचित पुढचा जन्म असलाच तर राहून गेलेले काम करण्याची संधी दे. वैभव मात्र कायम आमच्यासोबत राहून आम्हाला काम करता येऊ दे.’ विजय फळणीकरांचे ईश्वराकडे एवढेच मागणे आहे. साधनाताई मूकपणे ‘मम्’ म्हणतात.
 असाच प्रसंग पण थेट परदेशातला..
स्थळ- अमेरिका. वर्ष-१९८०. बहुतेक लहान मुलांना वाटतं तसंच लहानग्या क्रिसलाही (वय ७) पोलीस व्हायचं होतं. कडक युनिफॉर्मवर ऐटीत टोपी घालून रूबाबात फिरायचे होते. सायरन वाजवणाऱ्या पोलिसांच्या गाडीत बसून किंवा मोटारसायकलवरून चोरांचा पाठलाग करायचा होता. क्रिसला ल्युकेमियानं गाठलं अन् सगळंच चित्र पालटलं. आजार बळावत चालला तसं क्रिसच्या आईला-लिंडाला त्याचं स्वप्न एका दिवसासाठी तरी का होईना, पण पुरं व्हावं याचा ध्यास
लागला. कुटुंबाचे हितचिंतकही हेलावले. सर्वानी मिळून
प्रयत्न केले अन् अ‍ॅरिझोना पोलीस खात्याने एक अनोखा निर्णय घेतला. औटघटकेचे पोलीसपद क्रिसला
बहाल केले. त्याच्यासाठी खराखुरा युनिफॉर्म शिवला. ऐटदार टोपी आली. इतर बॅचेस आले. पोलीस म्हणून त्याचा शपथविधी झाला. एक
दिवस क्रिस पोलिसांच्या मोटारसायकलवरून, कारमधून, हेलिकॉप्टरमधून मनमुराद फिरला. औटघटकेच्या     (पान ६ पाहा)    (पान १ वरून) राज्याचा पुरेपूर आनंद घेऊन क्रिस हे जग सोडून गेला, पण जाताना सर्व समाजाला विचार करायला प्रवृत्त करून गेला. त्याची आई आणि इतर हितचिंतकांनी मिळून असाध्य रोगाने ग्रासलेल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मेक अ विश फाऊंडेशन’ स्थापन केली. या संस्थेच्या आता जगभर शाखा आहेत..
    उदय आणि गीता जोशी आपल्या मुलाला-गंधारला ल्युकेमियाच्या उपचारासाठी अमेरिकेला घेऊन चालले होते. गंधारने हट्ट धरला, ‘मला डिस्ने वर्ल्ड दाखवणार असाल तरच येणार.’ आजाराची गंभीरता आणि उपचारांदरम्यानचे क्लेश याची त्याला काय कल्पना असणार? गंधारवर उपचार चालू असताना जोशी दाम्पत्याला ‘मेक अ विश फाऊंडेशनचे’ स्वयंसेवक भेटले. या स्वयंसेवकांनी गंधारची डिस्ने वर्ल्ड भेट अपेक्षेपेक्षाही कितीतरी संस्मरणीय केली. ती प्रत्यक्षात उतरलेली स्वप्नदृश्ये डोळ्यात घेऊन गंधार १९९५ मध्ये दुसऱ्या जगात निघून गेला. अजाण वयात गंभीर आजाराशी लढत असलेल्या किती मुलांच्या इच्छा अशा पूर्ण होत असतील? अशा मुलांच्या आयुष्यात आपण थोडा तरी आनंद फुलवू शकू का? जोशी दाम्पत्याने १९९६ मध्ये ‘मेक-अ-विश’ची शाखा भारतात सुरू केली. आतापर्यंत या संस्थेने अडीच ते अठरा वर्षांपर्यंतच्या २५ हजारपेक्षा जास्त मुलांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. कोणाला सचिनला तर कोणाला शाहिद कपूर, सलमान खानला भेटायचे असते. कोणाला श्रीहरीकोटा येथील स्पेस रिसर्च इन्स्टिटय़ूट पाहायचे असते. कोणाला चक्क एका दिवसासाठी डॉक्टर बनायचे असते.
जोशी दाम्पत्य ती ती इच्छा पूर्ण करतात. इच्छा पूर्ण झाल्याने आनंदलेल्या प्रत्येक मुलाच्या रूपाने जोशी दाम्पत्यासाठी गंधारच हसत असतो!    
drrujuta@yahoo.co.in

संपर्कासाठी पत्ता-
१) जीत असोसिएशन फॉर सपोर्ट टू कॅन्सर पेशंट्स (JASCAP)-
JASCAP  माहिती केंद्र, ५-६, कोंढाजी चाळ क्रमांक ५, परळ.
दूरध्वनी- ०२२-६५३४५०४०
e-mail id – pkrjascap@gmail.com
jeetjascap@gmail.com
२) विजय फळणीकर
‘आपलं घर’, अतुलनगरमागे,
राघवदास विद्यालयाजवळ,
मुंबई-बंगलोर हायवे, वारजे माळवाडी,
पुणे-४११०५८ फोन- ९८५०२२७०७७
apalaghar@yahoo.com
३) मेक अ विश फाऊंडेशन
पहिला मजला ७ /१०, रुम. नं. १, बोटावाला बिल्डिंग, हॉर्निमल सर्कल, फोर्ट,
मुंबई-४०००२३
दूरध्वनी-०२२-२२६१७४१२ / २२६१