04 December 2020

News Flash

निरामय घरटं : निसर्गनियम

निसर्गावर नियंत्रण करू  पाहाणाऱ्या जमान्यात अनैसर्गिकतेकडे झुकणं अधिक जवळचं होऊन बसलं आहे का?

शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीचा विचार करता जे एखाद्या वयाला घडणं अपेक्षित नसतं त्याचा ताण तर घेतला जात नाही ना, हे बघण्याची गरज आहे.

उमा बापट – umaajitbapat@gmail.com

कोवळी पालवी नि पानगळ हा निसर्गनियम आहे हे सर्वानी सहजपणे स्वीकारलेलं असतं, पण आपल्याशी निगडित निसर्गनियमांना आपण नैसर्गिकरीत्या सामावून घेतो का?  निसर्गावर नियंत्रण करू  पाहाणाऱ्या जमान्यात अनैसर्गिकतेकडे झुकणं अधिक जवळचं होऊन बसलं आहे का? शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीचा विचार करता जे एखाद्या वयाला घडणं अपेक्षित नसतं त्याचा ताण तर घेतला जात नाही ना, हे बघण्याची गरज आहे. निसर्गनियमांना समजून घेत त्यांच्याबरोबर वाढणं हे सहज सुंदर घडणं आहे.

मंद सुगंध पसरवत शुभ्र, तरल ब्रह्मकमळ उमलतं. काही तासांसाठी उमलणं आणि मलूल होऊन मिटणं, दोन्ही निसर्गक्रमानं होणाऱ्या सहज क्रिया. ऋतुचक्र निसर्गनियमानं चालू असतं.  जलचक्र अभ्यासात शिकलेलं असतं. अव्याहतपणे होत आलेली सजीवांची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे अटळ आहे, हेसुद्धा ठाऊक असतं. कोवळी पालवी नि झाडांची पानगळ हा निसर्गनियमच आहे, हे स्वीकारलेलं असतं; पण आपल्याशी निगडित निसर्गनियमांना नैसर्गिकरीत्या, सहजतेनं सामावून घेतो का आपण?

निसर्गाला नियंत्रित करू पाहाणाऱ्या जगात अनैसर्गिकतेकडे झुकणं अधिक जवळचं होऊन बसलं आहे का? आपल्या जगण्याबाबत विचार करणं, मुलांच्या आणि स्वत:च्या वाढीबाबत जागरूक राहाणं, नियोजनपूर्वक पूर्वतयारीला कामात महत्त्व देणं, याचा अर्थ असा नाही की निसर्गनियमांना न जुमानणं. बालपणापलीकडेही निरागसता, निवांतपणा जपत निखळ जगणं ही एक जीवनशैली आहे. तसंच निसर्गनियमांना समजून घेत त्यांच्यासोबत वाढणं हे सहज, सुंदर घडणं आहे. परदेशात झाडांच्या पानगळीचे रंग पाहायला (फॉल कलर्स) आवर्जून जाणं हे पर्यटनातलं आकर्षण असतं. हिरवी पानं रंग बदलून पिवळी, तांबूस, लालसर होऊन जातात. पानगळीनंतर निष्पर्ण होण्याआधीची ही एक स्वाभाविक स्थिती असते. बीजाचं अंकुरणं, पालवी फुटणं, फुलांचा बहर, फळांचं लगडणं आणि झाडाची पानगळ ,या प्रत्येक स्थितीमधील निसर्ग माणसाला मोहून टाकतो. ‘साकुरा’च्या फुलांचा बहर जपानी संस्कृतीत उत्सव होतो. माणसाच्या आयुष्यातील टप्पेही स्वत:चं सौंदर्य लेवूनच येतात. प्रत्येक अवस्थेची गंमत आणि आव्हानं ही वेगळी. लहानपणी स्वस्थ बसू न शकणं ही समस्या आहे, की चंचलता हा बालपणीच्या स्थायीभावातला एक भाव आहे? चंचलता स्वाभाविक असण्याचं वय संपून रेंगाळली आणि प्रौढ वयात स्वभावाचा अंगभूत भाग झाली, तर मात्र ती समस्या होऊ शकते. नोकरीतली धरसोड ही बालपणातल्या चंचलतेसारखी स्वाभाविक चंचलता उरत नाही. ती धरसोड वृत्ती, संदिग्धता आणि अस्थिर मानसिकता होऊन गेलेली असते. तेव्हा ती समस्या म्हणता येईल; पण बालसुलभ चंचलतेकडे समस्या म्हणून बघून चालेल का?

दीड-दोन वर्षांची मुलं एकमेकांत देवाणघेवाण करत काटेकोर नियम असलेले स्पर्धात्मक खेळ खेळू शकत नाहीत. ही समस्या नाही, अवस्था आहे. या वयातली मुलं सांभाळकर्ते किंवा पालकांशी खेळतात. वय वाढलं की हळूहळू मुलं आपापसात खेळायला तयार होतात. या वयातील खेळाच्या सहभागाचा हा निसर्गनियम आहे. हे लक्षात घेत या वयातील मुलांसाठीचे उपक्रम आखता येतील.

शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीचा विचार करता जे एखाद्या वयाला घडणं अपेक्षित नसतं, त्याचा ताण तर पालक, शिक्षक, समाज यांच्याकडून घेतला जात नाही ना, हे बघायची गरज आहे. चौदा-पंधराव्या वर्षी पुढील आयुष्यातलं कार्यक्षेत्र निवडण्याचं गांभीर्य येणं सोपं नाही; पण या नैसर्गिक वाढीची फारशी दखल न घेता परीक्षा व्यवस्थेची यंत्रणा मुलांवर आदळते. एका बाजूला मित्रांचा प्रभाव असणारं वय, स्वच्छंदी मानसिकता, स्व-प्रतिमेबाबत दोलायमान अवस्था, ही सारी पौगंडावस्थेतली निसर्गनियमानं असणारी स्थिती, तर दुसऱ्या बाजूला मात्र याच वयात मुलांनी शिक्षणाबाबत आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्याचा दबाव. या अनैसर्गिक रचनेमुळे काही समस्यांना आमंत्रण मिळतं. मुलांची भावनिक समज, त्यांना सामोरी जावी लागणारी स्पर्धा आणि निर्णायक क्षण याचं व्यस्त प्रमाण, यामुळे शिक्षणातली गळती, अपयशातून खचून जाणं, पालक-मुलांच्या नात्यातील तेढ, प्रवेश प्रक्रियांना जोडून येणारे गैरप्रकार अशा नव्या समस्या नव्या काळात समाजानं ओढवून घेतल्या. ‘निवांत रमणं’ (१५ फेब्रुवारी) या लेखात पाहिल्याप्रमाणे आपण जगण्याची गती वाढवल्यानं जगण्यातली नैसर्गिक लय हरवून बसलो.

वैकासिक मानसशास्त्रात मुलांच्या वाढीच्या टप्प्यांची आणि प्रौढ वय ते वृद्धापकाळ या अवस्थांची, त्यातल्या स्वाभाविक अडथळ्यांची शास्त्रीय मांडणी केलेली आहे. त्याच्या आधारे प्रत्येक अवस्थेचं स्वत:चं अस्तित्व आदरानं स्वीकारायला हवं. एखादी अवस्था म्हणजे अडचण किंवा समस्या आहे असा आभास तयार करणं उचित नाही. वृद्धापकाळ ही अवस्था आहे. म्हातारपण म्हणजे आजारपण नाही, हे ज्यांना उमगतं ते या वयात केस गळतात, डोळ्यांना कमी दिसतं, म्हणून दु:खी न होता जगू शकतात. हातावर पडलेल्या सुरकुत्या हे तर म्हातारपणाचं देणं आहे. त्याला झिडकारून निसर्गनियमाला कसं का टोलवावं? कोणती सौंदर्यप्रसाधनं साठीच्या वयात वापरून कृत्रिम तजेला निर्माण करायचा अट्टहास आहे?

प्रत्येक अवस्थेचं स्वतंत्र कार्य, त्या अवस्थेमध्ये काय साधायचं ती उद्दिष्टं ठरलेली असतात. वयाच्या पहिल्या वर्षांपर्यंत चालण्या-बोलण्याची सुरुवात होते. कु णी आधी चालेल किंवा उशिरा बोलेल हेसुद्धा नैसर्गिक आहे. बहुतांश वाढीच्या बारकाव्यांबाबत साधारण कालखंड नोंदवला जातो. थोडं फार पुढेमागे होणं हासुद्धा निसर्गक्रम आहे. एखादा टप्पा लवकर गाठला म्हणून लगेच काय बाजी मारली किंवा थोडा वेळ जास्त लागला तर जगाच्या स्पर्धेत किती मागे पडणार, असा बाऊ करण्याचं कारण नसतं. मुलामुलींचं वयात येणं हेदेखील कु णाचं लवकर, तर कु णाचं उशिरा होत असतं; पण अपेक्षित शारीरिक बदल तर घडणारच असतात. तरीही एखाद्या मुलाचा आवाज फुटला नसेल तर इतरांचे आवाज मात्र कधीच फुटले, माझा अजून नाही, म्हणून बाकी मुलं मला गटात ‘तू लहान आहेस’ असं वागवतात,  हे एखाद्या मुलाला खटकतं. वर्गात एखाद्या मुलीची मासिक पाळी सगळ्यात आधी सुरू झाली तर तो चर्चेचा विषय बनतो. प्रत्येक वयात काय वाढ अपेक्षित आहे याचे ठोकताळे मांडलेले असले तरी प्रत्येक व्यक्तीच्या वाढीमध्ये स्वत:ची गती आणि वाढण्याची कक्षा वेगळी असते. हासुद्धा निसर्गनियमच आहे. ‘निरनिराळे सारे’(२० जून) या लेखात व्यक्तिभिन्नतेचा आदर जपण्याबाबत विचार मांडलेला आहे. वाढीतील नैसर्गिकता समजून घेण्यास कुटुंबांनी आणि शिक्षणसंस्थांनी मुलांना मदत के ली, तर त्याचा फायदा होतो.

विशिष्ट अवस्थेतील टप्पा गाठताना एखादी गोष्ट साध्य झाली नसेल, तर धोक्याच्या घंटा काय ते समजून घेत निसर्गनियमाचा तोल सांभाळता येतो. ओळखीची व्यक्ती आणि अनोळखी व्यक्ती यातील फरक लहानपणी समजायला लागतो. एखाद्या वस्तूमुळे, कृतीनं शरीराला इजा होते म्हणजे काय, हे भान तयार होत जातं; पण जेव्हा मुलांचा असा विकास झालेला दिसत नाही, तेव्हा त्याकडे जास्त काळजीपूर्वक लक्ष देऊन बालरोगतज्ज्ञांचा, मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे असं समजावं. वाढ निसर्गनियमानं होत असेल तर आपण कशाला काय करायचं? आपोआप होईल सगळं, असंही वाटू शकतं. रोप वाढताना कसदार जमीन, सूर्यप्रकाश, वेळच्या वेळी आणि योग्य प्रमाणात मिळालेलं पाणी, या सगळ्याची आवश्यकता असते हे आपण जाणतोच. तेव्हा र्सवकष वाढ होताना अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम होत असतो हे जाणवेल. शास्त्रातदेखील ही सूत्रं मांडलेली आहेत. नैसर्गिक वाढ होताना पोषक वातावरण मिळणं किंवा न मिळणं हा तर प्रभावी निर्णायक घटक आहे. सहा वर्षांच्या आत एखादं मूल आपोआप वाचायला शिकतं तेव्हा त्या मुलातली चुणूक जाणवतेच, पण त्याबरोबर हे लक्षात घ्यायला हवं, की ज्या घरात पुस्तकं हा घरातल्या वातावरणाचा अविभाज्य घटक असतो, जिथे मुलांनी वाचनस्नेही पालक अनुभवलेले असतात, ज्या घरांमध्ये वाचनसंस्कृती जपली जाते, तिथे एखादं मूल सहज, आपोआप वाचायलाही शिकतं, पण लिखित साहित्याशी परिचय तर वातावरणातूनच झालेला असतो. नैसर्गिकरीत्या होणाऱ्या वाढीला वातावरणाची पूरक जोड मिळते. जेव्हा सजग पालक, शिक्षक, समाजातील सकस वातावरण आणि सहज वाढणं नैसर्गिकरीत्या मिसळून जातं तेव्हा निसर्गनियमांना धरून वाढणं हा नित्यक्रम होऊन जातो.

कारल्याचा कडूपणा काढून टाकण्यात वेळ घालवणं व्यर्थ. तसं, बालपणी बालहट्ट किंवा तारुण्यातल्या उसळत्या जोशाला संथ करणं अशक्यप्राय. आयुष्याच्या मध्यात जबाबदाऱ्यांमुळे वाटणारं अडकलेपण, निवृत्तीनंतरची पोकळी आणि वृद्धावस्थेत शेवटाची वाट पाहाणं हे न चुकणारं, हे वेळीच जाणू. आवड म्हणून कानात लोंबते डूल घातले आणि टी-शर्ट घातला तरी चाळिशीत सोळा वर्षां ंसारखं दिसणार नाही, याची समंजस जाणीव ठेवू. रोज नव्या तंत्रज्ञानाची भर पडणाऱ्या युगातही निसर्गनियमाचं अबाधित स्थान मनोमन स्वीकारू. मनुष्यवाढीच्या प्रवासात आततायी नियोजन किंवा अवास्तव अपेक्षांच्या अट्टहासातून अनैसर्गिकता टाळू. निरनिराळ्या अवस्थेतल्या नैसर्गिक ऊर्मी नि निसर्गनियमानं नटलेलं निरामय घरटं नि:संकोच निरखू.

जशी सुरुवात तसा शेवट, हा निसर्गनियम. वर्तमानपत्रातील सदराची उत्सुकता, वाचक नि लेखकाचं नातं जुळणं, सदर रंगत जाणं आणि संपत येणार ही जाणीव; हे टप्पेही स्वाभाविक आहेत. हळूहळू पाऊस थांबत जातो, तसं निसर्गाला स्मरून आजच्या लेखापासून हलके हलके या सदराच्या समारोपाकडे वळू. लेखनप्रवासाचा समृद्ध अनुभव मला ‘लोकसत्ता- चतुरंग’च्या कार्यकारी गटानं दिला. निसर्गाप्रमाणे विविधतेने नटलेल्या ‘चतुरंग’च्या वाचकांची संख्या खूप मोठी आहे याचा निव्र्याज आनंद लाभला. वय र्वष १५ ते ८६ इतक्या वेगवेगळ्या अवस्थांमधल्या वाचकांनी मनमोकळा अभिप्राय दिला. काही पालकांनी दहा वर्षांपेक्षा लहान मुलांना त्यांच्या वयाला साजेसे या लेखनातले किस्से वाचून दाखवले हे आशादायी आहे. अनेक वाचकांपैकी मोजकेच लिखित प्रतिक्रिया पाठवतात या निसर्गनियमाचं भान ठेवत अव्यक्त अभिप्रायांचाही मनापासून मान राखते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 1:44 am

Web Title: nature law niramay gharta dd70
Next Stories
1 पडसाद : उर्मिला पवार यांचेही योगदान महत्त्वपूर्ण
2 उत्तरायणातले सहजीवन
3 नवे बंध अनुबंध
Just Now!
X